सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी २२६ ते २५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

226-11
ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसें क्षोभा । तेवींचि देवो बैसला कीं उभा । का शयालु हें नेणवें ॥226॥
अशा रीतीने विश्वरूपाची एक एक सौंदर्य शोभा पाहतं असतां, अर्जुन अगदी भांबावून गेला. तसेच देव बसले आहेत, उभे आहेत, की निजले आहेत हे त्याला कांहीच कळेना.
227-11
बाहेर दिठी उघडोनि पाहे । तंव आघवें मूर्तिमय देखत आहे । मग आतां न पाहें म्हणौनि उगा राहे । तरी आंतुही तैसेंचि ॥227॥
अर्जुन दृष्टि उघडून बाहेर पाहूं लागला, तेव्हा त्याला सर्व मूर्तीमय दिसू लागलें आणि आतां बाहेर दृष्टि उघडून पाहत नाही असे म्हणून तो डोळे मिटून स्तब्ध राहिला, तर आंतहि त्याला तसेच मूर्तीमय दिसू लागले.
228-11
अनावरें मुखें समोर देखे । तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके । तंव तयाहीकडे श्रीमुखें । करचरण तैसेचि ॥228॥
दृष्टिसमोर विश्वरूपाची असंख्य विशाल मुखें पाहून, भीतीने अर्जुन विश्वरूपाकडे पाठ करून उभा राहिला असतां, तिकडेहि त्याला तशीच विश्वरूपाची असंख्य व विशाल मुखे व करचरणादिक दिसूं लागलें.
229-11
अहो पाहतां कीर प्रतिभासे । एथ नवलावो काय असे? । परि न पाहतांही दिसे । चोज आइका ॥229॥
अहो!दृष्टीने पाहत असतांना अर्जुनाला विश्वरूप दिसावें यांत आश्चर्य काय आहे, पण तो पाहत नसतांना देखील त्याला विश्वरूप दिसत होते, हें नवल ऐका !
230-11
कैसें अनुग्रहाचें करणें । पार्थाचें पाहणें आणि न पाहणें । तयाही सकट नारायणें । व्यापूनि घेतलें ॥230॥
भगवंताच्या कृपेचे करणें कसें आहे, पहा ! अर्जुनाचे पाहणें व न पाहणें या दोहोलाहि भगवंतांनी व्यापून घेतलें.
(जेवढे कांही पांचभौतिक जडविनाशी पदार्थ आहेत, ते सर्व देश, काल, वस्तु या तिन्ही मर्यादेने मर्यादित असल्यामुळे ते ज्ञानाने, आहेत असे करतात, तेव्हाच ते असतात. जेव्हां त्यांचे ज्ञान होत नाही — म्हणजे ते आहेत असे कळत नाही – तेव्हा ते नसतात; पण परब्रह्म, अद्वैत, एक जिनसी व त्याच्याहून दुसर्‍या वस्तूंचे अस्तित्वच मानतां येत नाही, इतके व्यापक असल्यामुळे व त्याची ज्ञानदृष्टिहि तशीच नित्य अविनाशी असल्यामुळे, ज्याप्रमाणे त्या परब्रह्माचें अस्तित्व व निस्तित्व पाहण्यावर किंवा न पाहण्यावर अबलंबून नसतें; त्याप्रमाणेच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथील विश्वरूपाचे अस्तित्व व नास्तित्व अर्जुनाचे पाहण्यावर किंवा न पाहण्यावर अवलंबून नव्हतें, असे विधान करून, परमेश्वराचें नामरूपरहित असणारे साकारस्वरूपदेखील,परमेश्वराच्या नामरूपरहित निराकार स्वरूपाप्रमाणेंच शुध्द व नित्य असतें,असें दाखविलें आहे.)


231-11
म्हणौनि आश्चर्याच्या पुरीं एकीं । पडिला ठायेठाव थडीं ठाकी । तंव चमत्काराचिया आणिकीं । महार्णवीं पडे ॥231॥
म्हणून एका आश्चर्याच्या पुरांत पडलेला अर्जुन, त्या आश्चर्याच्या पुरांतून बाहेर पडून थडीला लागतो तोंच, तो तेथल्या तेथे दुसर्‍या चमत्काराच्या समुद्रांत पडत असें.
232-11
तैसा अर्जुनु असाधारणें । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें । कवळूनि घेतला तेणें । अनंतरूपें ॥232॥
याप्रमाणे अलौकिक अशी अनंत रूपें धारण करणार्‍या विश्वरूप परमेश्वराने आपल्या विश्वरूपाची लीला दाखवून, अर्जुनाला संपूर्ण व्यापून टाकले.
233-11
तो विश्वतोमुख स्वभावें । आणि तेचि दावावयालागीं पांडवें । प्रार्थिला आतां आघवें । होऊनि ठेला ॥233॥
भगवान श्रीकृष्ण स्वभावतःच सर्वव्यापी व सर्वतोमुख आहे आणि अर्जुनाने तो स्वभावतःच सर्वतोमुख सर्वव्यापी कसा आहे, हेच पाहण्याची इच्छा करून, तसे विश्वरूप दाखविण्याची भगवंताला प्रार्थना केली व भगवान तात्काळ त्याच्या समोर विश्वरूप होऊन राहिले.
234-11
आणि दीपें कां सूर्यें प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे । तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें । दिधली आहे ॥234॥
भगवंतांनी विश्वरूप पाहण्याकरिता अर्जुनाला जी दृष्टि दिली ती दिव्याच्या किंवा सूर्याच्या सहाय्याने पाहूं शकणारी किंवा ती “मिटली असतां पाहणेंच होणार नाही” अशी नव्हती.
235-11
म्हणौनि किरीटीसि दोहीं परी । तें देखणें देखें अंधारी । हें संजयो हस्तिनापुरीं । सांगतसे राया ॥235॥
म्हणून अर्जुन, डोळे मिटून व डोळे उघडे ठेवून, अशा दोन्ही प्रकाराने आंधारी म्हणजे दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशावाचून विश्वरूप पाहात होता; असे हस्तिनापुरी संजय धृतराष्ट्राला सांगु लागला.


236-11
म्हणे किंबहुना अवधारिलें । पार्थें विश्वरूप देखिलें । नाना आभरणीं भरलें । विश्वतोमुख ॥236॥
संजय म्हणतो, किंबहुना नाना अलंकाराने अलंकृत झालेले व सर्वत्र मुखे असलेले, असे विश्वरूप अर्जुनाने पाहिले, हे आपण ऐकले ना?
दिवि सूर्य सहस्रस्यभवेद्युगपदुत्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः॥11.12॥

अर्थ आकशामधे सहस्रावधी सूर्यांची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभे सारखी होईल॥11-12॥
237-11
तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसया ऐसा सांगावा । कल्पांतीं एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥237॥
महाराजा धृतराष्ट्रा! विश्वरूपाच्या अंगाचे तेज कशासारखे होते ते सांगू गेल्यास, कल्पांतसमयी बारा आदित्यांचा समुदाय एकत्र होतो.
238-11
तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती कां एकेचि अवसरीं । तऱ्ही तया तेजाची थोरी । उपमूं नये ॥238॥
असे ते हजारो दिव्यसूर्य जरी एकाचवेळी उदय पावले, तरी त्यांच्या त्या एकत्रित झालेल्या तेजांच्या थोरवीचीदेखील विश्वरूपाच्या तेजाला उपमा देता येणार नाही.
239-11
आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे । तेवींचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ॥239॥
त्यातच संपूर्ण विजांचा प्रकाश एकत्र करून आणि प्रलयांतील अग्नीची संपूर्ण सामग्री बरोबरी करू शकेल; पण ते तंतोतंत विश्वरूपाच्या तेजासारखे कधीच होणार नाही.
240-11
तऱ्ही तिये अंगप्रभेचेनि पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें । आणि तया ऐसें कीर चोखडें । त्रिशुद्धी नोहे ॥240॥
असे महात्म्या विश्वरूप श्रीहरीच्या सर्वांगाच्या ठिकाणी असणारे साहजिक तेज होते, ते भगवान व्यासमुनींच्या कृपेने मीही पाहू शकलो.


241-11
ऐसें महात्म्य या श्रीहरीचें सहज फांकतसे सर्वांगीचें तेज । तें मुनिकृपा जी मज । दृष्ट जाहलें ॥241॥
असे महात्म्या विश्वरूप श्रीहरीच्या सर्वांगाच्या ठिकाणी असणारे साहजिक तेज होते, ते भगवान व्यासमुनींच्या कृपेने मीही पाहू शकलो.
(भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन झाले व संजयला श्रीगुरु व्यासांच्या कृपेने त्याच विश्वरूपाचे दर्शन झाले. यावरून श्रीगुरूच्या कृपेनेही विश्वरूपाचे दर्शन होते, असे स्पष्ट दिसते.)
तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् प्रविभक्तमनेकधा॥
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा॥11.13॥

अर्थ देव, पितर, मनुष्य इत्यादि) अनेक भिन्न) रूपांनी विभाग पावलेले हे सर्व जग त्यावेळी देवाधिदेवाच्या त्या शरीरामधे (एका बाजूला) एका ठिकाणी स्थित असे अर्जुनाने पाहिले.॥11-13॥
242-11
आणि तिये विश्वरूपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें । जैसे महोदधीमाजीं बुडबुडे । सिनानें दिसती ॥242॥
आणि महासमुद्राच्या ठिकाणी, जसे निरनिराळे बुडबुडे दिसतात, तसे त्या विश्वरूपात एका बाजूशा संपूर्ण जग आपल्या विस्ताराने भासत होते.
(येथून आपल्या विश्वरूपाच्या ठिकाणीच जगाची उत्पत्ती, स्थिती, लय कसे होतात, हे भगवंतांनी अर्जुनाला दाखवावयास सुरुवात केली आहे.
सर्व नामरूपाने एक भगवान नटला आहे, असे ज्ञान नसलेल्या अज्ञानी जीवांना, सर्व नामरूपाचा पसारा, भ्रमाने जगद्रूप व सत्य भासत असतो; पण भगवंताच्या अद्वैतस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर मात्र, तो संपूर्ण जगत्पसारा भ्रमजन्य भास आहे, असा अनुभव येतो.)
243-11
कां आकाशीं गंधर्वनगर । भूतळीं पिपीलिका बांधे घर । नाना मेरुवरी सपूर । परमाणु बैसले ॥243॥
आकाशात गंधर्वनगर दिसावे किंवा जमिनीवर मुंग्यांनी वारूळ उभारावे अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरले असावेत,
244-11
विश्व आघवेंचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं । अर्जुन तिये अवसरीं । देखता जाहला ॥244॥
त्याप्रमाणे त्यावेळी भगवंताच्या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी, अर्जुन संपूर्ण जगदाभास पाहता झाला.
ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः ।
प्रणम्य शिरसा देवं कृताझ्जलिरभाषत॥11.14॥

अर्थ तेव्हा तो आश्चर्ययुक्त व रोमांचयुक्त झालेला अर्जुन आपल्या मस्तकाने देवाला वंदन करून हात जोडून म्हणाला -॥11-14॥
(संजयकृत अर्जुनाचे वर्णन = 246)
245-11
तेथ एक विश्व एक आपण । ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण । तेंही आटोनि गेलें अंतःकरण । विरालें सहसा ॥245॥
तेथे जग ही एक वस्तू असून तिला पाहणारा तिच्याहून निराळा मीही एक आहे, असे जे थोडेसे द्वैत सत्य वाटत होते, ते नाहीसे होऊन अंतःकरण एकाएकी विरून गेले.


246-11
आंतु आनंदा चेइरें जाहलें । बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें । आपाद पां गुंतलें । पुलकांचलें ॥246॥
आंतील महानंद प्रगट झाला, बाहेर शरीराच्या अवयवांचें ठिकाणी जें बळ होतें, तें नाहीसें झालें व पायापासून मस्तकापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले.
247-11
वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलांचें सर्वांग जैसें । विरूढे कोमलांकुरीं तैसे । रोमांच जाहले ॥247॥
वर्षाऋतूच्या आरंभीं, ज्याप्रमाणे पर्वताच्या अंगावरून पावसाचें पाणी वाहून गेल्यानंतर, गवताचे कोवळे अंकुर फुटतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
248-11
शिवतला चंद्रकरीं । सोमकांतु द्रावो धरी । तैसिया स्वेदकणिका शरीरीं । दाटलिया ॥248॥
सोमकांतमण्याशीं चंद्राच्या किरणांचा स्पर्श झाला असतां, तो सोमकांत मणी जसा पाझरतो, तसे अर्जुनाच्या सर्व शरीरावर धर्मबिंदु दाटून आले.
249-11
माजीं सापडलेनि अलिकुळें । जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे । तेवीं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥249॥
पाण्यावरील कमळाच्या कळींत सापडलेल्या भ्रमराच्या समुदायाने, ज्याप्रमाणे कमळाची कळी हालू लागते, त्याप्रमाणे आंत उठणार्‍या सखाच्या उमाळ्यामुळे बाहेर अर्जुनाचे अंग कापूं लागले.
250-11
कर्पूरकर्दळीचीं गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें । पुलिका गळती तेवीं थेंबुटें । नेत्रौनि पडती ॥250॥
कापूर उत्पन्न करणार्‍या कापूरकेळीत कापूर दाटला असतां ज्याप्रमाणे त्या कापूरकेळीची सोपटें उकललीं जाऊन, त्यांतून कापराचे कण गळूं लागतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या नेत्रांतून जलबिंदु पडू लागले.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *