सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

251-11
उदयलेनि सुधाकरें । जैसा भरलाचि समुद्र भरे । तैसा वेळोवेळां उर्मिभरें । उचंबळत असे ॥251॥
पौर्णिमेला पूर्णचंद्राचा उदय झाला असतां, ज्याप्रमाणे भरलेल्या समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे आंत वेळोवेळी उठत असलेल्या आनंदाच्या उर्मीमुळें अर्जुन वारंवार उचंबळूं लागला.
252-11
ऐसा सात्त्विकांही आठां भावां । परस्परें वर्ततसे हेवा । तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली ॥252॥
याप्रमाणे अर्जुनाचे ठिकाणी प्रगट झालेल्या आष्टसात्विकभावांत परस्पर स्पर्धा होऊं लागली असतां, अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले.
253-11
तैसाचि तया सुखानुभवापाठीं । केला द्वैताचा सांभाळु दिठी । मग उसासौनि किरीटी । वास पाहिली ॥253॥
तसेंच त्या ब्रह्मसुखानुभवानंतर पुनः देहावर येऊन व द्वैतसृष्टीचा अंगीकार करून, अर्जुनाने एक उसासा टाकला व विश्वरूपाकडे दृष्टि केली.
254-11
तेथ बैसला होता जिया सवा तियाचिया कडे मस्तक खालविला देवा । जोडूनि करसंपुट बरवा । बोलतु असे ॥254॥
तेथे अर्जुन जिकडे बसला होता, तिकडेच अर्जुनाने आपलें मस्तक वांकवून देवाला नमस्कार केला व दोन्ही हात जोडून देवाशीं प्रेमाने बोलूं लागला.
अर्जुन उवाच ।
पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् ।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्चसर्वानुरगांश्च दिव्यान्॥11.15॥

अर्थ हे देवा, तुझ्या देहामधे (सर्व) देव, (स्थावरजंगमादि) भूतविशेषांचे सर्व समुदाय, ब्रह्मदेव, विष्णु, शंकर, सर्व ऋषि व दिव्य नाग मी पहात आहे.॥11-15॥(अर्जुनाने केलेले विश्वरूपाचे वर्णन = 255)
255-11
म्हणे जयजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्हीं । जें हें विश्वरूप कीं आम्हीं । प्राकृत देखों ॥255॥
अर्जुन म्हणतो, देवा ! तुमचा जयजयकार असो. आपण माझ्यावर विलक्षण कृपा केली, त्यामुळे मी सामान्यपुरुष देखील तुमचे हें विश्वरूप पाहात आहे.


156-11
परि साचचि भलें केलें गोसाविया । मज परितोषु जाहला साविया । जी देखलासि जो इया । सृष्टीसी तूं आश्रयो ॥256॥
हे स्वामी भगवंता ! खरोखरच त्वां माझ्या इच्छेप्रमाणे केलेंस आणि मला त्यामुळे अत्यंत संतोष झाला. या संपूर्ण सृष्टीला तूंच आश्रय आहेस, हें मी आज पाहिलें.
257-11
देवा मंदराचेनि अंगलगें । ठायीं ठायीं श्वापदांचीं दांगें । तैसीं इयें तुझ्या देहीं अनेगें । देखतसें भुवनें ॥257॥
देवा ! ज्याप्रमाणे मंदार पर्वताचे अंगावर श्वापदांचे कळप असावे, त्याप्रमाणे या तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणीं अनेक भुवनें मी पाहत आहे.
258-11
अहो आकाशचिये खोळे । दिसती ग्रहगणांचीं कुळें । कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीचीं ॥258॥
अहो देवा आकाशाच्या पोटांत ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसावे किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाचे ठिकाणीं पक्षांची घरटीं असावींत.
259-11
तयापरी श्रीहरी । तुझिया विश्वात्मकीं इये शरीरीं । स्वर्गु देखतसें अवधारीं । सुरगणेंसीं ॥259॥
त्याप्रमाणे भगवंता! या तुझ्या विश्वरूप शरीराचे ठिकाणी सर्व देवसमुदायासह मी स्वर्गलोक पाहत आहे.
260-11
प्रभु महाभूतांचें पंचक । येथ देखत आहे अनेक । आणि भूतग्राम एकेक । भूतसृष्टीचें ॥260॥
प्रभो ! येथे पंचमहाभूतांचे अनेक समुदाय मी पाहत असून, एक एक सृष्टीचे जारज अंडजादि प्राणीसमुदायहि पाहत आहे.


261-11
जी सत्यलोकु तुजमाजीं आहे । देखिला चतुराननु हा नोहे? । आणि येरीकडे जंव पाहें । तंव कैलासुही दिसे ॥261॥
भगवंता !तुझ्याठिकाणीच सत्यलोक आहे. पाहिलेला हा ब्रह्मदेव नव्हे काय !आणि दुसरीकडे जों मी पाहतो तों तुझ्याठिकाणी कैलासहि दिसूं लागला.
262-11
श्रीमहादेव भवानियेशीं । तुझ्या दिसतसे एके अंशीं । आणि तूंतेंही गा हृषीकेशी । तुजमाजीं देखे ॥262॥
पार्वतीसहवर्तमान भगवान शंकर तुझ्या एका अंशावर दिसत असून, भगवंता ! तुझे चतुर्भुजरूपहि मी तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी पाहत आहे.
263-11
पैं कश्यपादि ऋषिकुळें । इयें तुझिया स्वरूपीं सकळें । देखतसें पाताळें । पन्नगेंशीं ॥263॥
त्याचप्रमाणे कश्यपादि संपूर्ण ऋषींचीं कुळें, या तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी मी पाहत असून, नागासहवर्तमान अनेक पाताळलोकहि तुझ्या ठिकाणी पाहत आहे.
264-11
किंबहुना त्रैलोक्यपती । तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती । इयें चतुर्दशभुवनें चित्राकृती । अंकुरलीं जाणों ॥264॥
हे त्र्यैलोक्यनाथा ! किंबहुना तुझ्या एक एक अवयवरूप भितीचे ठिकाणी चवदा लोकांच्या चित्रांची आकृति चितारलेली दिसत आहे.
265-11
आणि तेथिंचे जे जे लोक । ते चित्ररचना जी अनेक । ऐसें देखतसे अलोकिक । गांभीर्य तुझें ॥265॥
आणि त्या चवदा लोकांतील संपूर्ण प्राणी म्हणजे अनेक चित्रांची रचनाच होय. अशी तुझी असामान्य थोरवी पाहत आहे.
अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनंतरूपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम्॥11.16॥

अर्थ मी तुला अनेक हात, उदरे, मुखे व नेत्र असलेला व सर्वत्र अंतरहित रूपे धारण करणारा व विश्वरूप असा पहात आहे. हे विश्वेश्वरा, तुझा आरंभ, मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही.॥11-16॥


266-11
त्या दिव्यचक्षूंचेनि पैसें । चहुंकडे जंव पाहात असें । तंव दोर्दंडीं कां जैसें । आकाश कोंभैलें ॥266॥
हे देवा ! तुवां दिलेल्या ज्ञानदृष्टीचा संपूर्ण विकास करून चोहोंबाजूला मी जों पाहूं लागलों, तों जणूं काय कोंभ फुटावें असे तुझे दोन बाहु दिसत आहेत.
267-11
तैसे एकचि निरंतर । देवा देखत असें तुझे कर । करीत आघवेचि व्यापार । एकेचि काळीं ॥267॥
त्याचप्रमाणें तुझा एक एक हात एकाचवेळीं अखंड सर्व व्यापार करीत आहे असें मी पाहात आहे.
(जीवाच्या मर्यादित स्वरूपामुळें व अल्पशक्ति मुळें, जीवाच्या ठिकाणीं कर्माचा किंवा व्यापाराचा आरंभादि क्रम दिसून पडतो आणि त्याच्या अल्पज्ञतेमुळें त्याचे ज्ञान भूत, भविष्य वर्तमान असे तिन्ही कलांनी विभागले जातें. पण परमेश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान व सर्वव्यापक असल्यामुळे त्याचे ठिकाणी सर्व व्यापार व सर्व ज्ञानें एकदम एका वर्तमानकालीच असतात. परमेश्वराच्या शक्तिव्यापाराला व ज्ञानाला भूत, भविष्य, वर्तमान अशी कलांची मर्यादा नसतें.)
268-11
मग महाशून्याचेनि पैसारें । उघडलीं ब्रह्मकटाहाचीं भांडारें । तैसीं देखतसें अपारें । उदरें तुझीं ॥268॥
परब्रह्म जेवढें अमर्याद आहे, तेवढेच त्याच्यावर भासणार्‍या तुझ्या विश्वरूपाची उदरें, जणू काय अपार ब्रम्हांडाचीं भांडारें उघडल्याप्रमाणे दिसत आहेत.
269-11
जी सहस्रशीर्षयाचें देखिलें । कोडीवरी होताति एकीवेळें । कीं परब्रह्मचि वदनफळें । मोडोनि आलें ॥269॥
आहो जी देवा!तुम्ही सहस्रशीर्ष आहांत, याची एकाचवेळीं कोट्यावधी प्रत्यंतरे येत आहेत किंवा जणुं काय परब्रह्मच मुखरूपी फळाने भरभरारून आले.
270-11
तैसीं वक्त्रें जी जेउतीं तेउतीं । तुझीं देखितसे विश्वमूर्ती । आणि तयाचिपरी नेत्रपंक्ती । अनेका सैंघ ॥270॥
अशीं, हीं विश्वरूपा ! तुझी मुखें मी जिकडे तिकडे पाहांत आहे; त्याप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक रांगा मी सर्वत्र पाहात आहे.


271-11
हें असो स्वर्ग पाताळ । कीं भूमी दिशा अंतराळ । हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसें ॥271॥
हें असूं दे, पण हा सर्व स्वर्ग, हे पाताळ किंवा ही भूमी, ह्या दिशा, हें आकाश, ही निरनिराळी भाषा वापरण्याची देखील सोय राहीली नाही. तुला संपूर्ण मूर्तीरूप मी पाहात आहे.
(मूढ मृगांना, मृगजळ हें पाणीच वाटतें; म्हणून मनुष्य त्याला मृगजळ म्हणत असला, तरी त्याला तें जसें सूर्य प्रकाशाचे कंपन वाटतें, त्याप्रमाणे अज्ञानी जीवांना, भगवंताचें विश्वरूप अनेक प्रकारच्या वस्तूंनी भरलेलें जगत वाटत असलें, तरी ज्ञानभक्ताला एक भगवानच सर्व वस्तुरूपाने दिसतो.)
272-11
हें तुजवीण एकादियाकडे । परमाणूहि एतुला कोडें । अवकाशु पाहतसें परि न सांपडे । ऐसें व्यापिलें तुवां ॥272॥
तूं नाहीस अशी परमाणु इतकी सूक्ष्म तरी पोकळी कोठे आहे काय, हे मी कौतुकाने पाहत आहे, पण ती कोठे सापडत नाही असे तुवां व्यापिलें आहे.
273-11
इये नानापरी अपरिमितें । जेतुलीं साठविलीं होतीं महाभूतें । तेतुलाहि पवाडु तुवां अनंतें । कोंदला देखतसें ॥273
ही नानाप्रकारची. जेवढी अपरिमीत महाभूतें ब्रह्मांडांत सांठविली दिसत होती, तेवढाहि संपूर्ण विस्तार, अनंता ! एका तुझ्यानेच भरलेला आहे असें मी पाहत आहे.
274-11
ऐसा कवणें ठायाहूनि तूं आलासी । एथ बैसलासि कीं उभा आहासि । आणि कवणिये मायेचिये पोटीं होतासी । तुझें ठाण केवढें ॥274॥
असा तूं विश्वव्यापक कोणत्या ठिकाणाहून आलास? येथे तू बसला आहेस की उभा आहेस? तूं कोणत्या मातेच्या पोटी होतिस? तुझें ते स्थान केवढे आहे?
275-11
तुझें रूप वय कैसें । तुजपैलीकडे काय असे । तूं काइसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां ॥275॥
तुझें रूप व वय कसे आहे? तुझे पलीकडे काय आहे? तू कशावर आहेस? हें मी संपूर्ण निरखून पाहिलें.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *