201-11
तैसीं अद्भुतें भयासुरें । तेथ वदनें देखिलीं वीरें । आणिकें असाधारणें साळंकारें । सौम्यें बहुतें ॥201॥
त्याप्रमाणे भगवंताची अत्यंत भ्यासुर मुखें अर्जुनाने पाहिलीं आणखी कांही अप्रतिम अलंकारांनी अलंकृत केलेली व सौम्य अशीं पुष्कळशीं तोंडें पाहिलीं,
202-11
पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें । परी वदनांचा शेवटु न टके । मग लोचन तें कवतिकें । लागला पाहों ॥202॥
परंतु (अर्जुन) ज्ञानदृष्टीने पाहत होता, तरी त्या मुखांचा शेवट व अंत त्याला लागत नव्हता; भगवंताचे डोळे कोणीकडे आहेत, हें तो कौतुकाने पाहूं लागला.
(अर्जुन ज्ञानदृष्टिने पाहत होता, तरी तोंडाचा अंत त्याला लागला नाही, या माऊलिंच्या वचनावरून विश्वरूप हा अमर्याद अशा सच्चिदानंद परब्रह्माचाच नामरूपात्मक अविष्कार असल्यामुळे, परब्रह्माप्रमाणेच त्याचा व त्याच्या एका एका अवयवाचा देखील शेवट दिसत नव्हता, हे साहजिकच आहे.)
203-11
तंव नानावर्णें कमळवनें । विकासिलीं तैसे अर्जुनें । डोळे देखिले पालिंगनें । आदित्यांचीं ॥203॥
तेव्हा अनेक रंगांच्या कमळाचीं वनें प्रफुल्लित झालेलीं दिसावीं व सूर्यांच्या रांगा लागाव्या, त्याप्रमाणे अर्जुनाने देवांच्या डोळ्यांच्या रांगा पाहिल्या,
204-11
तेथेंचि कृष्णमेघांचिया दाटी- । माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी । तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळीं ॥204
तेथेच ज्याप्रमाणे प्रलयकालीं पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांच्या गर्दीत विजा चमकाव्या, त्याप्रमाणे भुवयाखालीं भगवंताची अग्निसारखी पिंगटदृष्टि अर्जुन पाहूं लागला.
205-11
हें एकैक आश्चर्य पाहतां । तिये एकेचि रूपीं पंडुसुता । दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ॥205॥
असें एक एक अश्चर्य पाहतां पाहतां, एका विश्वरूपाचे ठिकाणीच अर्जुनाला अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे दर्शन होऊं लागलें.
206-11
मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट कें दोर्दंडें । ऐसी वाढविताहे कोडें । चाड देखावयाची ॥206॥
मग अर्जुन म्हणतो, देवाचे चरण कोठे आहेत? देवाचा मुकुट कोठे आहे व बाहूकोठे आहेत? अशाप्रमाणे भगवंताचे निरनिराळे अवयव पाहण्याची, अर्जुन इच्छा वाढवूं लागला.
207-11
तेथ भाग्यनिधि पार्था । कां विफलत्व होईल मनोरथा । काय पिनाकपाणीचिया भातां । वायकांडीं आहाती?॥207॥
संपूर्ण भाग्याचा सांठा अशा अर्जुनाचे मनोरथ कसें व्यर्थ जातील? पिनाक धनुष्य धारण करणार्या शंकराच्या भात्यांत निष्फळ होणारे बाण राहतील काय?
208-11
ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे?म्हणौनि साद्यंतपण अपारांचे । देखिलें तेणें ॥208॥
किंवा ब्रह्मदेवाच्या वाणीत अर्थहीन अक्षरांचे सांचे राहूं शकतात काय? म्हणूनच त्या भाग्यवान अर्जुनाने अपार अशा विश्वरूपालाहि संपूर्ण पाहिलें.
209-11
जयाची सोय वेदां नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे । अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले ॥209॥
ज्या विश्वरूपाची स्थिती वेदालाही अगम्य आहे, त्या विश्वरूपाचे सर्व अवयव अर्जुन दोन्ही डोळ्यांनी एकदमच पाहूं लागला.
210-11
चरणौनि मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी । जे नाना रत्न अळंकारीं । मिरवत असे ॥210॥
नाना प्रकारच्या रत्नालंकारांनी सुशोभित झालेले विश्वरूपचें वैभव, अर्जुन पायापासून मस्तकापर्यंत पाहूं लागला.
211-11
परब्रह्म आपुलेनि आंगें । ल्यावया आपणचि जाहला अनेगें । तियें लेणीं मी सांगें । काइसयासारिखीं ॥211॥
परमात्मा आपल्या अनेक अंगावर घालण्याकरिता आपणच अनेक अलंकाररूप झाला होता. ते अलंकार कशासारखे होते, ते मी सांगतो.
212-11
जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा । जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्व प्रगटे ॥212॥
ज्याच्या प्रभेच्या कांतीने चंद्रमंडळ व सूर्यमंडळ यांना तेज प्राप्त झाले आहे आणि जे महातेजाचाही जिव्हाळा असून, ज्यामुळे हे विश्व म्हणजे हा नामरूपाचा पसारा प्रगट होतो,
213-11
तो दिव्यतेज शृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु । देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु । देखत असे ॥213॥
त्या दिव्यतेजरूप श्रृंगाराचे कोणाच्या बुध्दीला आकलन होऊ शकेल? देवाने आपणच अलंकाररूप होऊन, आपणच ते अलंकार घातले आहेत,असे वीर अर्जुन पाहात होता.
214-11
मग तेथेंचि ज्ञानाचिया डोळां । पहात करपल्लवां जंव सरळा । तंव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा । तैसीं शस्त्रें झळकत देखे ॥214॥
पुनः तेथेच अर्जुन ज्ञानदृष्टीने, सरळ अशा हिताकडे पाहात असता, त्या हाताच्या ठिकाणी कल्पांतीच्या अग्नीच्या ज्वाळा तोडणारी तेजस्वी शस्रे झळकत असलेली तो पाहू लागला.
215-11
आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हतियार । आपण जीव आपण शरीर । देखें चराचर कोंदलें देवें ॥215॥
भगवान आपणच अंग व आपणच अलंकार झाले. आपणच हात असून, आपणच हातातील हत्यारही झाले. आपणच जीव असून, आपणच शरीर झाले. अशी संपूर्ण चराचरसृष्टी देवानेच व्यापली आहे, असे अर्जुन पाहू लागला.
216-11
जयाचिया किरणांचे निखरपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे । तेजें खिरडला वन्हि म्हणे । समुद्रीं रिघों ॥216॥
ज्या शस्रांच्या तेजस्वी किरणांच्या प्रखरतेमुळे नक्षत्रांचेदेखील फुटाणे फुटत होते आणि ज्या तेजाने संतप्त झालेला अग्नीदेखील, दाह शमविण्याकरिता समुद्रात शिरण्याची इच्छा करीत होता.
217-11
मग कालकूटकल्लोळीं कवळिलें । नाना महाविजूंचें दांग उमटलें । तैसे अपार कर देखिले । दितायुधीं ॥217॥
मग जणू काय समुद्राच्या लाटांनी संपूर्ण काळकूट विषच भरून घ्यावे किंवा प्रलयसमयीच्या विजांचे समुदाय प्रगट व्हावेत, त्याप्रमाणे नानाप्रकारची आयुधे धारण केलेले भगवंतांचे अनंत हात अर्जुन पाहू लागला.
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥11.11॥
अर्थ दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेले, दिव्य गंधांची ज्यास उटी केली होती, सर्व आश्चर्यांनी युक्त अनंत सर्वतोमुख व दिव्य असे ते रूप होते.॥11-11॥
218-11
कीं भेणें तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी । तंव सुरतरूची सृष्टी । जयांपासोनि कां जाहली ॥218॥
अर्जुनाने भीतीने आपली दृष्टी तेथून काढली व भगवंताच्या कंठाकडे व मुकुटाकडे अर्जुन पाहू लागला, तेव्हा इंद्राच्या नंदनवनातील सर्व पुष्पवृक्षांची ज्यापासून उत्पत्ती झाली असे म्हणता येईल,
219-11
जिये महासिद्धींचीं मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे । तैसीं कुसुमें अति चोखटें । तुरंबिलीं देखिलीं ॥219॥
ज्यापासून महासिध्दि प्राप्त होतात व लक्ष्मीलाही आपला शीण भागविण्याकरिता विश्रांती घेता येईल, अशी सुंदर व सुगंधित फुले, ज्याच्या कंठातील माळांत व मुकुटाच्या ठिकाणी खोवलेली दिसत होती.
220-11
मुगुटावरी स्तबक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक । कंठीं रुळताति अलौकिक । माळादंड ॥220॥
मुकुटावर फुलांचे गुच्छ खोवले आहेत, ठिकठिकाणी अनेक प्रकारच्या पूजा बांधल्या आहेत, गळ्यात अनेक दिव्य फुलांचे हार रुळतांना दिसत आहेत.
221-11
स्वर्गें सूर्यतेज वेढिलें । जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें । तैसें नितंबावरी गाढिलें । पीतांबरु झळके ॥221॥
जणूं स्वर्गाने सूर्याचें तेज वेढल्याप्रमाणे किंवा सोन्याने मेरु पर्वताला मढविल्याप्रमाणे भगवंताच्या कमरेभोवंतीं घट्ट नेसलेला पिवळा पीतांबर झळकत होता.
222-11
श्रीमहादेवो कापुरें उटिला । कां कैलासु पारजें डवरिला । नाना क्षीरोदकें पांघरविला । क्षीरार्णवो जैसा 222॥
धवलवर्ण महादेवाला कापराची उटी लावावी किंवा कैलास पर्वताला पार्याचा लेप लावावा अथवा क्षीरसमुद्राला दुग्धरूपी उदकाचेच पांघरूण घालावें.
223-11
जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवीं बुंथी घेवविली । तैसीं चंदनपिंजरी देखिली । सर्वांगीं तेणें 223॥
किंवा ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून त्याचें पांघरूण आकाशाकडून घेववावे, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर शुभ्रचंदनाची उटी लावलेली पाहिली.
224-11
जेणें स्वप्रकाशा कांतीं चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे । जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे । वेदवतीये ॥224॥
ज्या दिव्य सुगंधयुक्त चंदनाच्या उटीने सच्चिदानंदरूप भगवंताच्या स्वप्रकाशरूप चिन्मय देहालाहि विशेष कांति प्राप्त होऊन शोभा येते व ब्रह्मानंदाचाच विग्रह अशा भगवंताचा ग्रीष्मऋतूंतील तापहि नाहीसा होतो व ज्याच्या दिव्य सुगंधामुळे चित्तवेधक गुणालाहि आयुष्य लाभतें.
225-11
जयाचे निर्लेप अनुलेपु करी । जे अनंगुही सर्वांगीं धरी । तया सुगंधाची थोरी । कवण वानी? ॥225॥
अलिप्त परमात्मा, ज्या चंदनाच्या उटीचा आपल्या अंगाला लेप करतो, स्वतः सर्वांगसुंदर असा मदनहिं आपल्या सर्वांगावर धारण करतो, त्या चंदनाच्या सुगंधाचे वर्णन कोण करूं शकेल.