सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

51-11
मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु । आणि कौरवांतें इयां स्वजनु । आपुलें म्हणें॥51॥
या जगांत मी एक कोणी अर्जुन आहे, असा या देहाच्या ठिकाणीं मी अभिमान वागवित होतों व हे कौरव माझे सोयरे आहेत असे म्हणत होतो.
52-11
याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें कें रिगेन । ऐसें देखत होतों दुःस्वप्न । तों चेवविला प्रभु ॥52॥
यावरहि आणखि मी यांना मारीन, तर त्या पापामुळे माझी काय गति होईल असे खोटेंच स्वप्न पाहत होतों; पण भगवंता ! तूं मला जागे केलेंस.
53-11
देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ॥53॥
हे देवा ! खरी वस्ती सोडून आकाशांतील गंधर्वनगराकडे जायला निघालों. पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतों.
54-11
जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें । ऐसें वायां मरतया जीवाचें । श्रेय तुवां घेतलें ॥54॥
खरोखर कापडाचा केलेला साप, पण तो सत्य मानल्यामुळे त्याच्या विषाची बाधा होऊन लहरी येऊं लागल्या होत्या आणि आता मी मरणार अशी व्यर्थ कल्पना करणार्‍या जीवाला वांचविण्याचें श्रेय तुम्ही घेतलें.
55-11
आपुलें प्रतिबिंब नेणता । सिंह कुहां घालील देखोनि आतां । ऐसा धरिजे तेवीं अनंता । राखिलें मातें ॥55॥
आपलेंच प्रतिबिंब आहे असे न जाणतां (हा दुसरा सिंह आहे असे जाणून त्याच्याशीं लढण्याकरितां आतां) हा सिंह उडी टाकतो असे पाहून त्याला मागे जसें धरून ठेवावें, त्याप्रमाणे देवा ! तुम्ही माझे रक्षण केलें.


56-11
एऱ्हवीं माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारीं । जें आताची ️सातांही सागरी एकत्र मिळिजे ॥56॥
नाही तर, पहा देवा ! माझा असा पक्का निश्चय होता की आतांच सातही समुद्र एकत्र मिळून –
57-11
हें जगचि आघवें बुडावें । वरी आकाशहि तुटोनि पडावें । परी झुंजणें न घडावें । गोत्रजेशीं मज ॥57॥
सर्व जग बुडो की आकाश तुटून पडो, पण कांही झाले तरी आपल्यांच स्वजनांशी लढू नये.
58-11
ऐसिया अहंकाराचिये वाढी । मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी । चांगचि तूं जवळां एऱ्हवीं काढी । कवणु मातें ॥58॥
अशा प्रबळ अहंकाराने मी आग्रहरूपी जळांत बुडी मारून बसलों होतों, पण इतकें फार चांगले झालें की तूं जवळच होतास, नाही तर कोणी मला त्यांतून काढीलें असते?
59-11
नाथिलें आपण पां एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें । थोर पिसें होतें लागलें । परि राखिलें तुम्ही ॥59॥
मी कोणी निराळा नसतांना, मी कोणी एक आहे अशी कल्पना केली आणि माझ्याहून कोणी निराळा नसतांना निराळे मानून त्याला गोत्रज हें नांव ठेवलें. असा विलक्षण भ्रम झाशा होता, पण तूं माझें रक्षण केलेंस.
60-11
मागां जळत काढिलें जोहरीं । तैं तें देहासीच भय अवधारीं । आतां हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ॥60॥
पूर्वी जळत असलेल्या लाक्षागृहांतून आम्हांला वांचविलेस, मात्र त्यावेळी देहालाच भीति होती, पण ही दुसरी लाक्षागृहाची भीति चैतन्यासह देहाला प्राप्त झाली.
(लौकिक अग्नि देहाचा नाश करतो; पण अविवेकरूपी अग्नि चैतन्यासहित देहांच्या नाशाची भीति उत्पनान करतो, असा अर्थ.)


61-11
दुराग्रह हिरण्याक्षें । माझी बुद्धि वसुंधरा सूदली काखे । मग माहार्णव गवाक्षें । रिघोनि ठेला ॥61॥
मी युध्द करणार नाही, या दुराग्रहरूपी हिरण्याक्षाने माझी बुध्दिरूपी पृथ्वी आपल्या काखेंत घालून अविवेकरूपीं समुद्राच्या भगदाडांतून तो पाताळांत जाऊन राहिला होता – (म्हणजे कांही झालें तरी मी युध्द करणारच नाही अशा अट्टाहासामुळे माझी बुध्दि विचारहीन होऊन अविवेकाने कौरव हे माझे स्वजन आहेत या मोहांत सापडली होती.)
62-11
तेथे तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें । हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज ॥62॥
️येथे तुझ्यासारखा समर्थ स्वामी मिळाल्यामुळे, माझी बुध्दि एकदांची विवेकरूपी आपल्या मूळ ठिकाणावर आली. माझ्या बुध्दिचा उध्दार करण्याकरितां तुला दुसर्‍यांदा हे असे वराह व्हावें लागले.
63-11
ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें । परी पांचही पालव मोकलिले । मजप्रती ॥63॥
देवा ! तुझे असे उपकार मी या एका वाचेने काय सांगणार? पण एवढें मात्र खरें की तूं माझ्या ठिकाणीं आपले पंचप्राण अर्पण केले आहेस.
64-11
तें कांहीं न वचेचि वायां । भलें यश फावलें देवराया । जे साद्यंत माया । निरसिली माझी ॥64॥
देवा ! तूं माझ्याकरितां श्रम केलेस, ते कांही वायां गेले नाहीत; कारण तूं माझा संपूर्ण अज्ञानभ्रम नाहीसा केलास असें थोर यश तुला प्राप्त झाले.
65-11
आजीं आनंदसरोवरींचीं कमळें । तैसे हे तुझे डोळे । आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती ॥65॥
परमानंदरूपी सरोवरांतील जणूं काय कमळेंच, असे हे तुझे डोळे, ज्याच्यावर कृपेचे मंदिर करतील-


66-11
हां हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी? । केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेंसीं ॥66॥
अशा त्याच्याशी मोहाची किंवा अविवेकाची गांठ पडणे, ही अगदीच दुर्घट गोष्ट कशी असणार? जो वडवानळ समुद्राचे पाण्याने विझत नाही, त्याला मृगजळाच्या वृष्टीने काय होईल –
67-11
आणि मी तंव दातारा । ये कृपेचिये रिघोनि गाभारां । घेत आहें चारा । ब्रह्मरसाचा ॥67॥
आणि प्रभो ! कृपासागरा ! मी तर तुमच्या कृपेच्या गाभार्‍यांतच बसून ब्रह्मानंदाचा अस्वाद घेत आहे.
68-11
तेणें माझा जी मोह जाये । एथ विस्मो कांहीं आहे?तरी उद्धरलों कीं तुझे पाने शिवतले आहाती ॥68॥
त्यामुळे माझें मोहरूपी अज्ञान नाहीसें झालें त्यात काय आश्चर्य आहे? पण आपल्या कृपेने माझा उध्दार झाला हें मी आपल्या पायावर हात ठेवून सांगतो.
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्॥11.2॥

69-11
पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा । मियां तुजपासोनि महेशा । परिसिलें आजीं ॥69॥
हे कमळाला आश्रय होणारे ज्याचे डोळे आहेत अशा व कोटी सूर्यांचे तेजाप्रमाणे ज्यांची अंगकांति अशा सर्वेश्वरा ! मी तुझ्यापासून आज ऐकीलें.
70-11
इयें भूतें जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती । ते मजपुढां प्रकृती । विवंचिली देवें ॥70॥
ही सर्व भूतसृष्टि ज्या प्रकृतिपासून उत्पन्न होते व जी मध्ये पुनः लय पावते, त्या प्रकृतीचें संपूर्ण विवेचन माझ्यासमोर केले.


71-11
आणि प्रकृती कीर उगाणा दिधला । वरि पुरुषाचाही ठावो दाविला । जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेद 71॥
आणि माझ्या प्रकृतीचें झाडून विवेचन केलें तसेंच ज्याचे कीर्तिरूप वस्र पांघरून वेद सवस्र झाला, त्या परमात्म्याची स्वरूपस्थितिहि सांगितली.
72-11
जी शब्दराशी वाढे जिये । कां धर्मा{ऐ}शिया रत्नांतें विये । ते एथिंचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणौनि ॥72॥
अहोजी महाराज ! शब्दराशीरूप वेदाचा जो एवढा विस्तार झाला आहे व टिकून राहिला आहे किंवा धर्मासारख्या रत्नाला ज्यांनी जो जन्म दिला, तो आपल्या सामर्थ्यरूप पायाचा आश्रय केला म्हणूनच होय.
73-11
ऐसें अगाध माहात्म्य । जें सकळमार्गैकगम्य । जें स्वात्मानुभवरम्य । तें इयापरी दाविलें ॥73॥
असे आपले सर्व मार्गाच्या ऐक्यतेने कळणारे व स्वानुभवालाहि रमविणारें जें तुझे अगाध माहात्म्य मला तुम्ही दाखविले.
74-11
जैसा केरु फिटलिया आभाळीं । दिठी रिगे सूर्यमंडळीं । कां हातें सारूनि बाबुळीं । जळ देखिजे ॥74॥
ज्याप्रमाणे आकाशांत आलेले ढग निहीसे झाले असतां सूर्यमंडलाचे ठिकाणीं दृष्टि जाते किंवा हाताने शेवाळ बाजुला सारूणच पाणी पाहतां येते.
75-11
नातरी उकलतया सापाचे वेढे । जैसें चंदना खेंव देणें घडे । अथवा विवसी पळे मग चढे । निधान हातां ॥75॥
किंवा सर्पाचे वेढे दूर केले असतांच चंदनाच्या झाडाला मिठी मारतां येते अथवा द्रव्यावर बसलेले पिशाच्च पळाले की तें द्रव्य आपल्या हाती येते

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *