सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ७६ ते १०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

76-11
तैसी प्रकृती हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती । मग परतत्त्व माझिये मती । शेजार केलें ॥76॥
त्याप्रमाणें माझ्या व आत्मस्वरूपाच्या मध्ये जो अज्ञानप्रकृतिचा पडदा होता,तो आपण देवा !दूर सारला आणि माझ्या बुध्दी परतत्वाचे शय्याघर केलें
77-11
म्हणौनि इयेविषयींचा मज देवा भरंवसा कीर जाहला जीवा । परी आणीक एक हेवा । उपनला असे ॥77॥
म्हणून या आत्मस्वरूपाविषयीं आता माझा दृढ विश्वास झाला आहे; पण आणखी एक उत्कट इच्छा माझ्या मनांत उत्पन्न झाली आहे.
78-11
तो भिडां जरी म्हणों राहों । तरी आना कवणा पुसों जावों । काय तुजवांचोनि ठावो । जाणत आहों आम्ही? ॥78॥
भिडेने ती इच्छा बोलून दाखवत नाही असें म्हणावे., तर दुसर्‍या कोणाला मी तिच्याविषयी विचारणार? तुझ्यावांचून आम्ही दुसरें ठिकाण जाणतो काय?
79-11
जळचरु जळाचा आभारु धरी । बाळक स्तनपानीं उपरोधु करी । तरी तया जिणया श्रीहरी । आन उपायो असे? ॥79॥
पाण्यांत राहणार्‍या प्राण्यांनी पाण्यांत राहण्याचा संकोच केला किंवा लहान मुलाने आईच्या स्तनपानाविषयी भीड धरली, तर त्याच्या जगण्याला दुसरा उपाय काय आहे?
80-11
म्हणौनि भीड सांकडी न धरवे । जीवा आवडे तेंही तुजपुढां बोलावें । तंव राहें म्हणितलें देवें । चाड सांगैं ॥80॥
म्हणून भीड किंवा संकोच धरूं नये व आपल्या मनाला वाटते ते खुशाल तुमच्यासमोर बोलावें,असें वाटतें. तेव्हा भगवान म्हणाले,अर्जुना ! बोलूं नकोस. मनांतली इच्छा सांग
एवमेतद्यथाऽऽत्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम॥11.3॥


81-11
मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्हीं केली जे गोठी । तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी ॥81॥
त्यावर तो अर्जुन बोलला; अर्जुन म्हणतो, देवा ! तुम्ही आपल्या परमेश्वरस्वरूपाविषयीं जे निरूपण केलें, त्यायोगें आता माझ्या बौध्दिक अनुभवदृष्टिने समाधान झालें.
82-11
आतां जयाचेनि संकल्पें । हे लोकपरंपरा होय हारपे । जया ठायातें आपणपें । मी ऐसें म्हणसी ॥82॥
आतां ज्याच्या संकल्पाने ही सृष्टिपरंपरा होते व लय पावते व ज्या स्वरूपाला ‘ते स्वतः मी आहे’ असें म्हणतोस.
83-11
तें मुद्दल रूप तुझें । जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें सुरकार्याचेनि व्याजें । घेवों घेवों येसी ॥83॥
जेथून तूं द्विभूज किंवा चतुर्भुज रूप धारण करून देवादिकांचे कार्य करण्याकरितां वारंवार जगांत प्रगट होतोस, तें तुझे मुळचें रूप
84-11
पैं जळशयनाचिया अवगणिया । कां मत्स्य कूर्म इया मिरवणिया । खेळु सरलिया तूं गुणिया । सांठविसी जेथ ॥84॥
क्षीराब्धींतील जलावर शयन करणारें सोंग असो किंवा मत्स्य, कुर्म इत्यादिरूपाने मिरवणे असो, हे खेळ करणार्‍या गारूड्या ! हे तुझे खेळ संपले की ही तुझीं रूपें ज्याठिकाणी सांठविलीं जातात
(येथे ‘खेळ’ या शब्दाचा अर्थ “खोटा” असा अर्थ नसून “लिलेने विग्रह धरणे” असा आहे. या ओवींत भगवंताच्या क्षीराब्धिजळशायीरूप व मत्स्यादिरूपे घेण्याला खेळ म्हटले आहे; म्हणून ती रूपे मिथ्या असे समजतां येत नाहीत. कारण वेदान्तदृष्टिने एक अविद्येचे कार्यच मिथ्या व नाशीवंत आहे. “नित्याविद्यानिवृत्तत्वात् ” भगवान नित्य अविद्यारहित आहे असे वेदान्तांत मानले असल्यामुळे भगवंताचे कोणतेंहि रूप अविद्याजन्य नसतें. अर्थात् ‘भगवंताचीं ही रूपें हा खेळ आहे’ या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, भगवंताची हीं सर्व रूपें व विश्वरूपहि पूर्ण सच्चिदानंद स्वरूप राहूनच, ती सहज लिलेने घेतली जातात. त्यांत विश्वरूप हें पहिलें लीलाविग्रहीरूप असून क्षीराब्धिजळशायी किंवा मत्स्यकूर्मादि हीं विश्वरूपाचीं लीलाविग्रही रूपें आहेत. अर्थात जडविनाशी, कल्पित अशा अविद्येच्या अपेक्षेने विद्योपाधि ही संज्ञा असलेल्या ज्ञानप्रधान विद्यावृत्तीने हीं सर्व रूपें भगवान घेत असल्यामुळे व विद्यावृत्तीनेच त्यांचा अनुभव येत असल्यामुळे, तीं खोटी, विनाशी म्हणतां येत नाहीत.)
85-11
उपनिषदें जें गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती । जयातें सनकादिक आहाती । पोटाळुनियां ॥85॥
उपनिषदें ज्याचें वर्णन करतात, योगीलोक अंतर्मुखदृष्टि करून जे पाहतात आणि सनकादिक ज्या स्वरूपाला नेहमी मिठी मारून आहेत.


86-11
ऐसें अगाध जें तुझें । विश्वरूप कानीं ऐकिजे । तें देखावया चित्त माझें । उतावीळ देवा ॥86॥
असें अतर्क्य जें तुझें विश्वरूप नुसतें कानांनी ऐकतो, तें डोळ्यांनी पाहण्याकरितां मी फार उतावीळ झालो आहे.
87-11
देवें फेडूनियां सांकड । लोभें पुसिली जरी चाड । तरी हेंचि एकीं वाड । आर्तीं जी मज ॥87॥
देवांनी माझ्या मनांतील संकोच नाहीसा करून, काय इच्छा आहे ती सांग, असे मोठ्या प्रेमाने विचारलें. म्हणून सांगतों कीं माझ्या मनांत हीच एक भारी इच्छा आहे.
88-11
तुझें विश्वरूपपण आघवें । माझिये दिठीसि गोचर होआवें । ऐसी थोर आस जीवें । बांधोनि आहें ॥88॥
तुझे संपूर्ण विश्वरूप माझ्या दृष्टिस दिसावें अशी तीव्र इच्छा मी मनांत धरून आहे
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयाऽत्मानमव्ययम्॥11.4॥

89-11
परी आणीक एक एथ शारङ्गी । तुज विश्वरूपातें देखावयालागीं । पैं योग्यता माझिया आंगीं । असे कीं नाहीं ॥89॥
पण देवा ! येथे आणखी एक गोष्ट आहे, तुझ्या विश्वरूपाला पाहण्याकरितां लागणारी योग्यता माझ्या अंगी आहे किंवा नाही
90-11
हें आपलें आपण मी नेणें । तें कां नेणसी जरी देव म्हणे । तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचें ?॥90॥
हे मी आपलें आपणच जाणूं शकत नाही. तुझी योग्यता आहे किंवा नाही, हें तूं कां जाणूं शकत नाहीस असे जर, देवा ! तुम्ही म्हणाल, तर रोगी आपल्या रोगाचे निदान जाणतो काय?


91-11
आणि जी आर्तीचेनि पडिभरें । आर्तु आपुली ठाकी पैं विसरे । जैसा तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ॥91॥
आणि ज्याप्रमाणे अत्यंत तहानलेला पुरुष जसा मला समुद्रहि पुरेसा होत नाही असे म्हणतो, त्याप्रमाणे महाराज ! इच्छा करणार्‍या पुरुषाची इच्छा अत्यंत वाढली असतां त्याला आपल्या योग्यतेचा विसर पडतो.
92-11
ऐशा सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली । यालागीं योग्यता जेवीं माउली । बालकाची जाणे 92॥
अशाप्रकारे अत्यंत इच्छेच्या वेगामुळेच भूल पडून, माझ्याने आपली योग्यता सांभाळली जात नाही; म्हणून आई जशी आपल्या मुलाला काय व किती पचेल, हें जाणतें.
93-11
तयापरी श्रीजनार्दना । विचारिजो माझी संभावना । मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे ॥93॥
त्याप्रमाणें, जनार्दना ! माझ्या योग्यतेचा विचार करा व मग विश्वरूपच दाखविण्याला प्रारंभ करा.
94-11
तरी ऐसी ते कृपा करा । एऱ्हवीं नव्हे हें म्हणा अवधारा । वायां पंचमालापें बधिरा । सुख केउतें देणें? ॥94॥
म्हणून योग्यता असेल, तर विश्वरूप दाखविण्याची कृपा करा, नाहीतर विश्वरूपच पाहण्याची तुझी योग्यता नाही, असे म्हणा. बहिर्‍याला व्यर्थ कोमल स्वराचें काय सुख द्यायचें? (त्याप्रमाणे माझी योग्यता नसतांना आपण विश्वरूप दाखविलें तरी मला काय त्याचें सुख होणार?)
95-11
एऱ्हवीं येकले बापियाचे तृषे । मेघ जगापुरतें काय न वर्षे? । परी जहालीही वृष्टि उपखे । जऱ्ही खडकीं होय ॥95॥
नाही तरी एका भाग्यवान चातकाकरितां वर्षाव करतांना मेघ सर्व पृथ्वीवरच पडत नाहीत काय? पण पृथ्वीवर वर्षाव झाला तरी खडकावर झालेला वर्षाव व्यर्थच जातो.


96-11
चकोरा चंद्रामृत फावलें । येरा आण वाहूनि काय वारिलें? । परी डोळ्यांवीण पाहलें । वायां जाय ॥96॥
पूर्ण चंद्राच्या प्रकाशांत चकोरांना अमृतकण मिळतात आणि बाकीच्यांना चंद्राने आपल्याप्रकाशांतील अमृतकण वेचायला शपथपूर्वक मनाई केली आहे काय? पण चकोराची अमृतकण पाहण्याची दृष्टि इतरांना नसल्यामुळे, नुसता चंद्राचा प्रकाश पाहण्याने तो लाभ होत नाही.
97-11
म्हणौनि विश्वरूप तूं सहसा । दाविसी कीर हा भरवंसा । कां जे कडाडां आणि गहिंसा- । माजी नीत्य नवा तूं कीं ॥97॥
म्हणून म्हटल्याबरोबर तूं एकदम विश्वरूप दाखविशील हा मला पक्का विश्वास आहे; कारण उताविळपणे व अविचाराने देणार्‍यांमध्ये तुझें देणें नेहमीच अपूर्व असतें.
98-11
तुझें औदार्य जाणों स्वतंत्र । देतां न म्हणसी पात्रापात्र । पैं कैवल्या ऐसें पवित्र । जें वैरियांही दिधलें ॥98॥
तुझे औदार्य निरपेक्ष आहे. हें मी जाणतों; पण देतांना तूं पात्रापात्रातेचा विचार करीत नाहीस. मोक्षासारखी शुध्द अशी स्थिति तूं आपल्या शत्रुलाहि दिलीस.
99-11
मोक्षु दुराराध्यु कीर होय । परी तोही आराधी तुझे पाय । म्हणौनि धाडिसी तेथ जाय । पाइकु जैसा ॥99॥
खरोखरच मोक्षाची आराधना करणें (मोक्ष प्राप्त करून घेणे.) अत्यंत कठीण आहे; पण तोहि तुझ्या पायाची आराधना करतो म्हणजे तो तुझ्या पायाच्या आश्रयानेच मिळतो – म्हणून तूं जेथें त्याला पाठवितोस, तेथें तो सेवकाप्रमाणे जातो.
100-11
तुवां सनकादिकांचेनि मानें । सायुज्यीं सौरसु दिधला पूतने । जे विषाचेनि स्तनपानें । मारूं आली 100॥
विषाने स्तन भरून तूझा प्राण घेण्याकरितां आलेल्या पुतनेलाहि, भगवंता ! त्वां सनकादिकांच्या प्रमाणे आपल्या सायुज्यमुक्तीचें सुख दिलें.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *