सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी ७६ ते १०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

76-8
डोळां जें देखावें । कां कानी हन ऐकावें । मनीं जें भावावें । बोलावें वाचे॥76॥
डोळ्यांनी जे पहावे किंवा कानांनी जे ऐकावे, मनाने जे चिंतावे अथवा वाचेने जे बोलावे,
77-8
तें आतं बाहेरि आघवें । मीचि करूनि घालावें । मग सर्वीं काळीं स्वभावें । मीचि आहें ॥77॥
ते ह्रदयांत भासणारे व बाह्य दृष्टीला दिसणारे सर्व मीच आहे असे समजावे. मग सर्वत्र मीच आहे असे सहज तुला दिसेल.
78-8
अर्जुना ऐसें जाहलिया । मग न मरिजे देह गेलिया । मा संग्रामु केलिया । भय काय तुज ॥78॥
अर्जुना, याप्रमाणे, सर्व गोष्टी मद्रूप आहेत असे तुझ्या मनाने घेतले, म्हणजे देह गेला तरी तूं मरणार नाहीस. मग युद्ध केले असता तुला भय कसले आहे?
79-8
तूं मनबुद्धि साचेंसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी । तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ॥79॥
तूं मन आणि बुद्धि हीं खरोखर माझ्या स्वरुपास अर्पण करशील, तर मद्रूप होशील हे प्रतिज्ञापूर्वक तुला मी सांगतो.
80-8
हेंच कायिसया वरी होये । ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे । तरी अभ्यासूनि आदीं पाहें । मग नव्हे तरी कोपें ॥80॥
हेच कशाने होईल,असा जर तुझ्या मनांत संशय येत असेल, तर अगोदर याचा अभ्यास करून अनुभव घे आणि जर मी म्हणतो त्याप्रमाणे न होईल तर मग माझ्यावर रागाव.
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुन्तयन् ॥8. 8॥

81-8
येणेंचि अभ्यासेंसिं योगु । चित्तासि करीं पां चांगु । अगा उपायबळें पंगु । पहाड ठाकी ॥81॥
याकरितां चांगल्या रीतीने चित्ताची आणि अभ्यासाची गांठ घातली (मनःपूर्वक अभ्यास केला,) तर, ज्याप्रमाणे लंगडा उद्योगबलाने पर्वतही चढूं शकतो,
82-8
तेविं सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरूषाची मोहर । लावें मग शरीर । राहो अथवा जावो ॥82॥
त्याप्रमाणे, नेहमीं ब्रह्मविचाराचा अभ्यास करून चित्ताला आत्म्याचा छंद लाव, मग शरीर राहो अथवा जावो.
83-8
जें नानागतीतें पाववितें । तें चित्त वरील आत्मयातें । मग कवण आठवी देहातें । गेलें की आहे ॥83॥
नानागति पावविणारे असे चित्त जर आत्म्याला वरील, तर मग देह गेला कीं आहे याची आठवण कोण करील?
84-8
पैं सरितेचिनि ओघें । सिंधुजळा मीनलें ओघें । तें काय वर्तत आहे मागें । म्हणोनि पाहों येते ॥84॥
हे पहा कीं, पाणी नदीच्या ओघाने धो धो करीत समुद्रांत मिळण्यास चालले म्हणजे, मागे काय होते आहे हे पाहण्याकरितां परतते का? नाही.
85-8
ना तें समुद्रचि होऊन ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें । जेथ यातायात निमालें । घनानंद जें ॥85॥
नाही. ते समुद्रांत मिळाल्यावर समुद्ररूपच होते. त्याचप्रमाणे, चित्त हे आत्मरूप झाले, म्हणजे जन्ममरणांच्या यातायाती चुकतात. कारण त्या ठिकाणी परमानंदच भरलेला आहे.
कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद् ।
सर्वस्य धातरमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥ 8.9 ॥

86-8
जयाचें आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें । जें आघवेंचि आघवेपणें । देखत असे ॥86॥
ज्याचें निराकार अस्तित्व, ज्याला जन्म अथवा मरण नाही, व जे सर्वव्यापकपणाने सर्वास पाहते
87-8
जें गगनाहून जुनें । जं परमाणूहूनि सानें । जयाचेनि सान्निधानें । विश्व चळे ॥87॥
जे आकाशाच्या आधीचे, जे परमाणूहूनही सूक्ष्म, ज्याच्या सान्निध्याने विश्वाचे व्यापार चालतात,
88-8
जें सर्वांतें यया विये । विश्व सर्व जेणें जिये । हेतु जया बिहे । अचिंत्य जें ॥88॥
ज्याच्यापासून ह्या सर्वाची उत्पत्ति होते, सर्व विश्व जगते, ज्याला तर्क भितो व ज्यांचे अनुमान करता येत नाही;
89-8
देखे वोळंबा इंगळु न चरे । तेजीं तिमिर न शिरे । जें दिहाचें आंधारें । चर्मचक्षूसीं ॥89॥
; पहा – वाळवी कधी इंगळ (विस्तव) खात नाही; तेजामध्ये अंधार शिरत नाही; व जे अज्ञानदृष्टीला दिवसांही दिसत नाही;
90-8
सुसडा सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी । अस्तमानाचें जयासी । आडनांव नाहीं॥90॥
जे निर्मळ अशा सुर्यरूप कणांच्या राशीसारखे आहे, व ज्ञान्याला नित्य उजेड करणारे आहे व ज्याला अस्त कधीच नाही,
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ 8.10 ॥

91-8
तया अव्यंगवाणेया ब्रह्मातें । प्रयाणकाले प्राप्ते । जो स्थिरावलेनि चित्तें । जाणोनि स्मरे ॥91॥
त्या अव्यंग स्वरुपाच्या ब्रह्माला जाणून, मरणकाल समीप आला असतां जो एकाग्र चित्ताने त्याचे स्मरण करितो;
92-8
बाहेरी पद्मासन रचुनी । उत्तराभिमुख बैसोनि । जीवीं सुख सूनि । कर्मयोगाचें ॥92॥
बाहेर पद्मासन घालून उत्तरेस तोंड करुन बसून, आणि कर्मयोगाने प्राप्त झालेले सुख अंतःकरणांत सांठवून,
93-8
आंतु मिनलेनि मनोधर्मे । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें । आपेंआप संभ्रमें । मिळावया ॥93॥
अंतर्यामी एकाग्र चित्ताने स्वरुपप्राप्तीच्या प्रेमाने आपोआप ब्रह्मास त्वरित मिळण्याकरीता,
94-8
आकळलेनि योगें । मध्यमा मध्यमार्गे । अग्निस्थानैनि निगे । ब्रह्मरंघ्रा ॥94॥
संपादिलेल्या योगाच्या द्वारे सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गाने, अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रांत जाण्याकरितां निघतो,
95-8
तेथ अचेत चित्ताचा सांगातु । आहाचवाणा दिसे मांडतु । जेथ प्राण गगनाआंतु । संचरे कां ॥95॥
जेथे प्राण व चित्त यांची संगति आहे असें उगीच बाह्यात्कारी दिसते; जेथे प्राणाचा लय आकाशांत होतो.


96-8
परी मनाचेनि स्थैयैं धरिला । भक्तीचिया भावना भरला । योगबळें आवरला । सज्ज होउनी ॥96॥
परंतु मनाच्या स्थिरतेने जो बांधला गेला, व ज्याचे अंतःकरण भक्तीयुक्त झाले आहे, व जो योगाचे बळाने तयार होऊन मन आपल्या ताब्यात ठेवितो
97-8
तो जडाजडातें विरवितु । भ्रूलतांमाजी संचरतु । जैसा घंटानाद लयस्थु । घंटेसींच होय ॥97॥
तो चित्त व प्राण यांना भ्रुकुटीमध्ये आवरून धरुन ज्याप्रमाणे घंटेचा नांद घंटेतच लय पावतो, त्याप्रमाणे दोघांचा लय करतो,
98-8
कां झांकलिय घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां । या रीती जो पांडवा । देह ठेवी ॥98॥
किंवा मडक्याखालील झाकलेला दिवा केव्हां नाहींसा होतो हे ज्याप्रमाणे समजत नाही, त्याप्रमाणे, अर्जुना, जो आपला देह ठेवतो
99-8
तो केवळ परब्रह्म । जया परमपुरूष ऐसें नाम । तें माझें निजधाम । होऊनि ठाके ॥99॥
(ब्रह्मकाशांत प्राणवायु नेऊन तो आत्मस्वरूपी केव्हां लीन होतो हे समजूं न देता आपला देह ठेवतो). तो केवळ परब्रह्म- ज्याला परमपुरुष असे नांव आहे – त्या माझ्या निजस्वरूपाप्रत जाऊन मिळतो.
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति यत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥8. 11॥
100-8
सकळां जाणणेयां जे लाणी । तिये जाणिवेची जे खाणी । तयां ज्ञानियांचिये आयणी । जयातें अक्षर म्हणिपे ॥100॥
जे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा शेवट, त्या ज्ञानाची जें केवळ खाणच आहे, ते असणाऱ्या बुद्धिमान ज्ञानी पुरूषांनीही ज्याला ‘अक्षर ‘ असे म्हटलें आहे.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *