सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

, ,

101-9
ग्रीष्माचां अतिरसीं । सबीजे तृणें जैसीं । मागुती भूमीसी । सुलीनें होती ॥101॥
ग्रीष्म ऋतूमध्ये कडक उन्हाच्या योगाने ज्याप्रमाणे गवत बीजासह जिरून जाते; किंवा वर्षाकालच्या मेघाचे अवडंबर संपल्यावर शरदऋतूचा अंकुर फुटतो,
102-9
कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हां घनजात आटे । गगनींचें गगनीं ॥102॥
तेव्हां सर्व आकाशांतील ढग आकाशांतच जिरून जातात; अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायु उत्पन्न होऊन नाहीसां होतो
103-9
नातरी आकाशाचिये खोंपे । वायु निवांतुचि लोपे । कां तरंगता हारपे । जळीं जेवीं ॥103॥
अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायु उत्पन्न होऊन नाहीसां होतो, किंवा पाण्यांत उत्पन्न झालेल्या लाटा पाण्यांतच नाहींतशा होतात,
104-9
अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनींचें मनीं मावळे । तैसें प्राकृत प्रकृती मिळे । कल्पक्षयीं ॥104॥
नाही तर जागे झाल्यावर मनांतले स्वप्न मनांतच मावळते, त्याप्रमाणे महाप्रलयाच्या शेवटी प्रकृतीपासून उत्पन्न झालेली सर्व भूते प्रकृतींतच मिळतात
105-9
मग कल्पादीं पुढती । मीचि सृजीं ऐसी वदंती । तरी इयेविषयीं निरुती । उपपत्ती आइक ॥105॥
मग सृष्टीच्या आरंभी पुनः ती मीच निर्माण करितो अशी जी बोलवा आहे, ती विषयीची खरी खुबी तुला सांगतो, ती ऐक.
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्॥9.8॥


106-9
तरी हेचि प्रकृति किरिटी । मी स्वकीया सहजें अधिष्ठीं । तेथ तंतुसमवायपटीं । जेविं विणावणी दिसे ॥106॥
तर अर्जुना, ह्याच माझ्या प्रकृतीचा मी जेव्हां सहज अंगीकार करतो, तेव्हां, तंतूंच्या समुदायासंबंधाने ज्याप्रमाणे वस्त्रावर विणकर दिसते
107-9
मग तिये विणावणीचेनि आधारें । लहानां चौकडियां पटत्व भरे । तैसी पंचात्मके आकारें । प्रकृतिचि होये ॥107॥
मग त्या विणकरीच्या आधाराने जशी लहान चौकड्यांची वस्त्रे तयार होतात, त्याप्रमाणे, पंचभूतात्मक आकाराने प्रकृति सृष्टिरूपाने चमकूं लागते.
108-9
जैसें विरजणियाचेनि संगें । दूधचि आटेजों लागे । तैशी प्रकृति आंगा रिगे । सृष्टिपणाचिया ॥108॥
ज्याप्रमाणे विरजण घातल्याच्या योगाने दूध विरजूं लागते त्याप्रमाणे, प्रकृति ही सृष्टीतील आकार बनूं लागते.
109-9
बीज जळाचि जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये । तैसें मज करणें आहे । भूतांचे हें ॥109॥
ज्याप्रमाणे पाण्याच्या सान्निध्याने बीजाला फांद्या वैगेरे फुटून त्याचें झाड होते, त्याप्रमाणे प्राणिमात्रासंबंधी सृष्टीतील पसारा माझ्यामुळे होतो.
110-9
अगा नगर हें रायें केलें । या म्हणणया साचपण कीर आलें । परि निरुतें पाहतां काय शिणले । रायाचे हात ॥110॥
अरे, एखादे शहर राजानें वसविले हे म्हणणे जरी खरे असले, तरी खरोखर पाहूं गेले असतां राजाच्या हाताला कांही शीण पडतो का?


111-9
आणि मी प्रकृति अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे । मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥111॥
आणि मी प्रकृतीचा स्वीकार करतो तो कसा म्हणशील, तर जसा स्वप्नावस्थेंत असलेला मनुष्य जागृतावस्थेत येतो तसा
112-9
तरि स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता । कीं स्वप्नामाजीं असतां । प्रवासु होय ॥112॥
हे पंडुसुता, स्वप्नावस्थेंतून जागृतावस्थेत येतांना त्या मनुष्याचे पाय दुखतात का? कींवा स्वप्नावस्थेंत असतांना त्याला फिरण्याचे श्रम होतात का?
113-9
या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं । मज एकही करणें नाहीं । ऐसाचि अर्थु ॥113॥
या सर्वाचा अभिप्राय काय म्हणशील, तर ही भूतसृष्टि निर्माण करण्याला मला कांही एक करावे लागत नाही, हाच अर्थ आहे.
114-9
जैशी रायें अधिष्ठिली प्रजा । व्यापारे आपुलालिया काजा । तैसा प्रकृतिसंगु माझा । येर करणें तें इयेचें ॥114॥
ज्याप्रमाणे राजानें आज्ञेत ठेवलेली प्रजा आपल्या प्राप्तीस्तव व्यापार करते, त्याप्रमाणे, प्रकृतीचा व माझा संबंध आहे. येरव्ही उत्पत्ति, स्थिती व लय हे सर्व व्यापार तिचेच आहेत.
115-9
पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्र भरतें अपार दाटी । तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ॥115॥
हे पहा, पौर्णिमेच्या चंद्राची भेट होताच समुद्राला अपार भरती येते. पण अर्जुना येथे चंद्राला कांही श्रम पडतात का?


116-9
जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां । कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ॥116॥
लोखंड जड असूनही लोहचुंबक जवळ असल्याने जरी हालते, तरी लोहचुंबकाला लोखंड हालवण्याचे कोणते श्रम पडतात?
117-9
किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगीकारीं । आणि भूतसृष्टी एकसरी । प्रसवोंचि लागे ॥117॥
किंबहुना याप्रमाणे मी सृष्टि उत्पन्न होणाऱ्या इच्छेचा अंगीकार केल्यावर एकदम प्राणिमात्राचा विस्तार होऊं लागतो.
118-9
जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृतिआधीन पांडवा । जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमि ॥118॥
पांडवा, हा सर्व प्राणिसमुदाय प्रकृतीच्या आधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाला वेली, पानें वैगेरे उत्पन्न करण्यास भूमि समर्थ आहे,
119-9
नातरि बाळादिकां वयसां । गोसावी देहसंगु जैसा । अथवा घनावळी आकाशा । वार्षियें जेवीं ॥119॥
अथवा बाळपण, तारुण्य व वृद्धपण या अवस्थांना ज्याप्रमाणे देहसंग हे मुख्य कारण आहे, कींवा आकाशांत मेघपंक्ति उत्पन्न होण्यास जसा वर्षाकाल कारण आहे,
120-9
कां स्वप्नासि कारण निद्रा । तैसी प्रकृति हे नरेंद्रा । या अशेषाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा ॥120॥
किंवा स्वप्नाला जशी निद्रा कारण आहे, त्याचप्रमाणे हे नरेंद्रा, या सर्व प्राणिसमुदायाला प्रकृति मुख्य कारण होय.


121-9
स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा । हे असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥121॥
स्थावरजंगमाला, स्थुलसूक्ष्माला, फार काय सांगावे? या जगाला प्रकृतिच मूळ कारण होय.
122-9
म्हणोनि भूतें हन सृजावीं । कां सृजिलीं प्रतिपाळावीं । इयें करणीं न येती आघवीं । आमुचिया आंगा ॥122॥
म्हणून, प्राणी उत्पन्न करावे किंवा उत्पन्न झालेल्यांचा प्रतिपाळ करावा, या सर्व कृतीचे कर्तुत्व मजकडे येत नाही.
123-9
जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रे नाहीं वाढविली । तेवि मातें पावोनि ठेलीं । दुरी कर्में ॥123॥
पाण्यांत चंद्राला प्रकाश वेल पसरल्याप्रमाणे दिसतो, त्याची उत्पत्ति चंद्राने केली नाही, त्याप्रमाणे, ही कर्मे मजपासून उत्पन्न झालेली असुनही मजपासून दुरच असतात.
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु॥9.9॥

124-9
आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरुं सैंधवाचा घाटु । तेवि सकळ कर्मा मीच शेवटु । ती काइ बांधती मातें ॥124॥
ज्याप्रमाणे, समुद्राच्या पाण्याचा लोट वाहूं लागल्यावर त्याला मिठाचा बांध आडवूं शकत नाही, त्याप्रमाणे, माझ्यांत लय पावणारी सर्व कर्मे मला कशी बांधू शकतील?
125-9
धूम्ररजांची पिंजरी । वाजतिया वायुतें जरी होकारी । कां सूर्यबिंबामाझारीं । आंधारे रिगे ॥125॥
धूराचे छत जर वाहणाऱ्या वायुस हांक मारुन अडथळा करील,किंवा सुर्यकिरणांत अंधार शिरेल, फार काय सांगावे?

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading