301-16
प्राण घेपती संपन्नांचे । ते पाप जरी साचें । तरी सर्वस्व हाता ये तयांचें । हें पुण्यफळ कीं? ॥ 301 ॥
श्रीमान् लोकांचे प्राण घेणे हे जर पापच असेल तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हेही पुण्यफळ मानावयास नको काय? 1
302-16
बळी अबळातें खाय । हेंचि बाधित जरी होय । तरी मासयां कां न होय । निसंतान? ॥ 302 ॥
सामर्थ्यवानाणे दुर्बळाला खावे हे जर खरोखर पाप असेल तर, माशांचे आजवर निसंतान कां झाले नाहीं? 2
303-16
आणि कुळें शोधूनि दोन्ही । कुमारेंचि शुभलग्नीं । मेळवीजती प्रजासाधनीं । हेतु जरी ॥ 303 ॥
आणि कुलशील पाहून कुमार व कुमारी यांचा शुभमुर्हुतावर विवाह करणें हें जर प्रजाप्राप्ती चे साधन असेल.3
304-16
तरी पशुपक्षादि जाती । जया मिती नाहीं संतती । तयां कोणें प्रतिपत्तीं । विवाह केले? ॥ 304 ॥
तर- ज्यांच्या प्रजेला गणित नाही असे पशुपक्षादिकार्य विवाह कोणत्या मुहूर्तावर व कोणीं लाविले होते? 4
305-16
चोरियेचें धन आलें । तरी तें कोणासि विष जालें? । वालभें परद्वार केलें । कोढी कोणी होय? ॥ 305 ॥
चोरीने मिळविलेले धन विषाप्रमाणे कोणास बांधिले आहे? अथवा प्रेमाखातर केलेल्या परस्त्रीगमनातें कोणाच्या अंगावर कुष्ठ उठलें आहे सांगा ! 5
306-16
म्हणौनि देवो गोसांवी । तो धर्माधर्मु भोगवी । आणि परत्राच्या गांवीं । करी तो भोगी ॥ 306 ॥
म्हणून ईश्वर हा सर्वसत्ताधीश असून तो जीवांना धर्माधर्माचे फल भोगवितो व येथील शुभकर्माचे भोग त्यांना परलोकी (स्वर्गत) देतो. 6
307-16
परी परत्र ना देवो । न दिसे म्हणौनि तें वावो । आणि कर्ता निमे मा ठावो । भोग्यासि कवणु? ॥ 307 ॥
असे म्हणावें तर, परलोक किंवा देव हे केवळ परोक्ष किंवा प्रत्ययाला कधीही न येणारे असल्याने सर्व व्यर्थ आहेत, आणि शुभाशुभकर्मे करणाराच जर नाहीसा होऊन जातो तर भोग्य भोगणार तरी कोण? 7
308-16
येथ उर्वशिया इंद्र सुखी । जैसा कां स्वर्गलोकीं । तैसाचि कृमिही नरकीं । लोळतु श्लाघे ॥ 308 ॥
उर्वशीच्या उपभोगाने इंद्र जर स्वर्गात सुखी आहे असे म्हणाल किंवा म्हणावें तर येथे प्रत्यक्ष नरकांतील कीटकही तशा तऱ्हेचे स्त्रीसुख भोगून संतुष्ट आहेत ! 8
309-16
म्हणौनि नरक स्वर्गु । नव्हे पापपुण्यभागु । जे दोहीं ठायीं सुखभोगु । कामाचाचि तो ॥ 309 ॥
म्हणून नरकलोक किंवा स्वर्ग, तसेच पाप व पुण्य वगैरे कांहीही नसून दोहींकडे कामतृप्तीनेच सुखभोग सारखा घडतो. 9
310-16
याकारणें कामें । स्त्रीपुरुषयुग्में । मिळती तेथ जन्मे । आघवें जग ॥ 310 ॥
म्हणून कामेच्छेने जेणें स्त्री व पुरुष हीं एकत्रसंलग्न होतात तेथे जगांतील सर्व प्राण्यांची सहजच उत्पत्ति होते. 310
311-16
आणि जें जें अभिलाषें । स्वार्थालागीं हें पोषे । पाठीं परस्परद्वेषें । कामचि नाशी ॥ 311 ॥
आणि स्वार्थाच्या इच्छेने आपण जें जे काही जोडतों, त्याचा वीट आल्यावर अगर द्वेष उत्पन्न झाला असतां, आपली इच्छाच नाश करिते. 11
312-16
एवं कामावांचूनि कांहीं । जगा मूळचि आन नाहीं । ऐसें बोलती पाहीं । आसुर गा ते ॥ 312 ॥
ह्या प्रमाणे सर्व लोकव्यवहाराला त्यांच्या इच्छेवांचून अन्य कहींही कारण नाही, असें आसुरीसंपत्तिमानांचे म्हणणे आहे.12
313-16
आतां असो हें किडाळ । बोली न करूं पघळ । सांगतांचि सफोल । होतसे वाचा ॥ 313 ॥
आतां ह्या निंद्य कथा पुरेत; त्यांची अधिक चर्चा नको; कारण तसे करणे म्हणजे वाचा व्यर्थ शिणविण्यासारखे होय. 13
एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः ।
प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥16. 9॥
314-16
आणि ईश्वराचिया खंती । नुसधियाचि करिती चांथी । हेंही नाहीं चित्तीं । निश्चयो एकु ॥ 314 ॥
आणि ईश्वराच्या नास्तित्वाबद्दल नुसती वायफळ बडबड करितात इतकेच नसून त्यांच्या चित्ताचही तसाच निश्चय असतो. 14
315-16
किंबहुना उघड । आंगी लाऊनियां पाखांड । नास्तिकपणाचें हाड । रोंविलें जीवीं ॥ 315 ॥
किंबहुना, असा उघडपणे अभिमानाने पाखांड मताचा स्वीकार करणारे हे लोक म्हणजे हा नास्तिकांचा बाजार आहे, हे दाखविण्यासाठी त्यांच्या हद्दीवर पुरलेले नास्तिकतेचे हाडुकच होय. 15
316-16
ते वेळीं स्वर्गालागीं आदरु । कां नरकाचा अडदरु । या वासनांचा अंकुरु । जळोनि गेला ॥ 316 ॥
अशा स्थितींत, स्वर्गाविषयी आदर, किंवा नरकाविषयीं भय वगैरे चित्तांतील सर्व अंकुर जळून गेलेले असतात. 16
317-16
मग केवळ ये देहखोडां । अमेध्योदकाचा बुडबुडा । विषयपंकीं सुहाडा । बुडाले गा ॥ 317 ॥
मग, अर्जुना, हे आसुरी संपत्तीचे जन देहरूप खोड्यात गुंतून पडून, अपवित्र जलांतील बुडबुड्याप्रमाणे विषयरूप चिखलात बुडून राहातात. 17
318-16
जैं आटावें होती जळचर । तैं डोहीं मिळतीं ढीवर । कां पडावें होय शरीर । तैं रोगा उदयो ॥ 318 ॥
जलचरांचे निःसंतान होण्याचा योग आला की, त्या जलाशयापाशीं कोळयांची गर्दी होते किंवा शरीरक्षय होण्याचा काल आला कीं, रोगोद्भव होत असतो. 18
319-16
उदैजणें केतूचें जैसें । विश्वा अनिष्टोद्देशें । जन्मती ते तैसे । लोकां आटूं ॥ 319 ॥
धूमकेतूचा उदय म्हणजे जगावर कोसळणया अरिष्टाचे जसें पूर्वचिन्ह होय, त्याप्रमाणे असुरी संपत्तीच्या लोकांचा उदय किंवा भरणा म्हणजे लोकक्षयाचेच लक्षण होय.19
320-16
विरूढलिया अशुभ । फुटती तैं ते कोंभ । पापाचे कीर्तिस्तंभ । चालते ते ॥ 320 ॥
जसें पेरावें तसे उगवतो ह्या न्यायाने अशुभ पेरणीला अशुभच अकुर येतात तसेच हे लोक म्हणजे पापाचा डंका पिटणारे चालते जाहिरातीचे खांबच होत. 320
321-16
आणि मागांपुढां जाळणें । वांचूनि आगी कांहीं नेणें । तैसें विरुद्धचि एक करणें । भलतेयां ॥ 321 ॥
आणि आग पुढे व मागे जे सांपडेल ते जसे जाळीत सुटते तशी ह्यांची कोणतीही कृति म्हणजे विरुद्ध अथवा करू नये तीच नेमकी असावयाची, 21
322-16
परी तेंचि गा करणें । आदरिती संभ्रमें जेणें । तो आइक पार्था म्हणे । श्रीनिवासु ॥ 322 ॥
परंतु तीच त्यांची क्रिया कशा तयारीने होत असते तें अर्जुना, तू श्रवण कर असें भगवान् म्हणाले.22
काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः ।
मोहाद् गृहीत्वाऽसद्ग्रहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ 16.10॥
323-16
तरी जाळ पाणियें न भरे । आगी इंधन न पुरे । तयां दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो ॥ 323 ॥
अरे, जाळे पाण्याने भरलें असें कधीं होत नाही, किंवा अग्नीला काष्ठे पुरे झालीं असेंही कधीं होत नाही; ह्या दुर्भर पदार्थाप्रमाणे ज्याची क्षुधा कधीं शान्त नसते. 23
324-16
तया कामाचा वोलावा । जीवीं धरुनिया पांडवा । दंभमानाचा मेळावा । मेळविती ॥ 324 ॥
मनामध्ये काम किंवा इच्छा यास आश्रय देऊन, अर्जुना, जे त्यांना दंभ व मान ह्यांची आणखी जोड देतात. 24
325-16
मातलिया कुंजरा । आगळी जाली मदिरा । तैसा मदाचा ताठा तंव जरा । चढतां आंगीं ॥ 325 ॥
आधींच माज आलेल्या हत्तीला आणखी दारू पाजावी त्याप्रमाणे हे जसेजसे वृद्ध होतात, तसा तसा त्यांच्या अंगात उन्मत्तपणा वाढत जातो. 25
Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण
