सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

101-15
अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरीं घेती धांव । तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचें ॥101॥
शरीरातील त्वचेइंद्रियांचे वेल आणि पाने स्पर्श रुपी अंकुर येतो. त्यावेळी नव्या नव्या विकारांची खुपच पुष्कळ वाढ होते.
102-15
पाठीं रूपपत्र पालोवेलीं । चक्षु लांब तें कांडें घाली । ते वेळीं व्यामोहता भली । पाल्हाळीं जाय ॥102॥
ज्याप्रमाने पुढे रुप नावाचे पान फुटते. आणि मग डोळा हा भ्रमाने त्याची गोडी चाखण्यासाठी धाव घेत असतो.
103-15
आणि रसाचें आंगवसें । वाढतां वेगें बहुवसें । जिव्हे आर्तीची असोसें । निघती बेंचें ॥103॥
आणि पाण्यापासुन तयार झालेल्या रसांच्या साली खुप वेगाने वाढत असतात. त्यावर जिभेच्या इच्छारुपी पानांचे पुष्कळ झुंबाडे निघत असतात.
104-15
तैसेंचि कोंभैलेनि गंधें । घ्राणाची डिरी थांवु बांधे । तेथ तळु घे स्वानंदें । प्रलोभाचा ॥104॥
त्याचप्रमाणे गंधविषयरूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो, तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते, म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो.
105-15
एवं महदहंबुद्धि । मनें महाभूतसमृद्धी । इया संसाराचिया अवधी । सासन्निजे ॥105॥
याप्रमाणे महतत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धी, मन व पंचमहाभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते.

106-15
किंबहुना इहीं आठें । आंगीं हा अधिक फांटे । परी शिंपीचियेवढें उमटे । रुपें जेवीं ॥106॥
फार काय सांगावे? या आठ अंगांनी हा संसारवृक्ष अधिक वाढतो, परंतु (हा संसार किती वाढला तरी त्याचे अधिष्ठान जे ब्रह्म, त्याच्यापेक्षा अधिक वाढत नाही). जसे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठान जी शिंप तेवढेच भासते.
107-15
कां समुद्राचेनि पैसारें । वरी तरंगता आसारे । तैसें ब्रह्मचि होय वृक्षाकारें । अज्ञानमूळ ॥107॥
अथवा समुद्रावर तयार होणार्‍या लाटा ज्याप्रमाने समुद्राएवढ्याच असतात. त्याप्रमाणे ब्रह्मच हे अज्ञानमूळ असलेल्या संसारवृक्षाच्या आकाराने तयार होते.
108-15
आतां याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु । जैसा आपणपें स्वप्नीं परिवारु । येकाकिया ॥108॥
अर्जुना संपुर्ण विक्ष्व हे अज्ञानाचा विस्तार असुन त्यावर त्याचा सर्व पसारा भासत आहे. ज्याप्रमाने स्वप्नात मनुष्य एकटा असुन जेवढे काही तो स्वप्न पाहतो.
ते सर्व आपणच होऊन जातो.
109-15
परी तें असो हें ऐसें । कावरें झाड उससे । यया महदादि आरवसें । अधोशाखा ॥109॥
परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे. अशा या तर्‍हेने हा भ्रमात्मक संसारवृक्ष वाढत असून, महत्-तत्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात.
110-15
आणि अश्वत्थु ऐसें ययातें । म्हणती जे जाणते । तेंही परिस हो येथें । सांगिजेल ॥110॥
या वृक्षाला अश्वत्थ म्हणण्य़ाचे कारण आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात. त्याचे कारण काय? तेही येथे सांगण्यात येईल, ऐक.

111-15
तरी क्ष्वा म्हणिजे उखा । तोंवरी एकसारिखा । नाहीं निर्वाहो यया रुखा । प्रपंचरूपा ॥111॥
तर क्ष्व: म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंचरूपी वृक्षाची एकसारखी स्थिती नाही. म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात.
112-15
जैसा न लोटतां क्षणु । मेघु होय नानावर्णु । कां विजु नसे संपूर्णु । निमेषभरी ॥112॥
ज्याप्रमाने एक क्षण लोटला नाही तोच मेघ विविध रंगांचा होतो अथवा वीज ही निमिषभर देखील पुर्णपणे टिकत नाही.
113-15
ना कांपतया पद्मदळा । वरीलिया बैसका नाहीं जळा । कां चित्त जैसें व्याकुळा । माणुसाचें ॥113॥
ज्याप्रमाने कमळाच्या हालणार्‍या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते.
114-15
तैसीचि ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्षणाप्रती । म्हणौनि ययातें म्हणती । अश्वत्थु हा ॥114॥
त्याप्रमाणेच या संसारवृक्षाची स्थिती आहे, म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो, म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात.
115-15
आणि अश्वत्थु येणें नांवें । पिंपळु म्हणती स्वभावें । परी तो अभिप्राय नव्हे । श्रीहरीचा ॥115॥
आणि अश्वत्थ या नावाने स्वभावत: पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा या ठिकाणी तसा अभिप्राय नाही.

116-15
एऱ्हवीं पिंपळु म्हणतां विखीं । मियां गति देखिली असे निकी । परी तें असो काय लौकिकीं । हेतु काज ॥116॥
एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ उपमा दिली असती तरी सुद्धा मला ती चांगली पटली असती. परंतु ते राहू द्या, आपल्याला लौकिकार्थाशी काय करायचे आहे? भगवंताच्या हेतूशी आपल्याला काम आहे.
117-15
म्हणौनि हा प्रस्तुतु । अलौकिकु परियेसा ग्रंथु । तरी क्षणिकत्वेंचि अश्वत्थु । बोलिजे हा ॥117॥
म्हणून आता या संसारवृक्षासंबंधी अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रामध्ये अश्वत्थ असे म्हटले जाते.
118-15
आणीकुही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु । आथी परी तो भीतरु । ऐसा आहे ॥118॥
आणखी हा वृक्ष अव्यय म्हणजेच नित्य या नावाने प्रसिद्ध आहे; परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे.
119-15
जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एके आंगें काढे । आणि नदी येरीकडे । भरितचि असती ॥119॥
(संसारवृक्ष विनाशी असून याला अविनाशी का म्हणतात)
ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याचे बाष्पिकरण होऊन वाफेद्वारे मेघानां जाऊन मिळतात. व तेच मेघ पाऊसाचा वर्षाव करुन नदीपाञात ओढे, नाल्या द्वारे ते नद्यानां भेटुन त्या सर्व नद्दा पुन्हा समुद्रास जाऊन भेटतात.
120-15
तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे । परी ते फुली जंव नुघडे । मेघा नदींची ॥120॥
त्याचप्रमाने तो समुद्र कमी होत नाही अथवा जास्त होत नाही, असा चारही बाजुंनी परिपूर्णच आहे, असे वाटते, परंतु त्याचे परिपूर्णत्व,जोपर्यंत मेघ आणी नदी यांचे उपसने आणि भरणे, हे स्वरुप स्पष्ट झालेले नाही. तेवढ्या पुरताच समुद्र भरलेला आहे असेच वाटते.

121-15
ऐसें या रुखाचें होणें जाणें । न तर्के होतेनि वहिलेपणें । म्हणौनि ययातें लोकु म्हणे । अव्ययु हा ॥121॥
त्याप्रमाणे या संसारवृक्षाची वाढ व लय अति प्रचंड गतीने होत असल्यामुळे त्याचा तर्क करता येत नाही, म्हणून सामान्य लोक याला अविनाशी असे म्हणतात.
122-15
एऱ्हवीं दानशीळु पुरुषु । वेंचकपणेंचि संचकु । तैसा व्ययेंचि हा रुखु । अव्ययो गमे ॥122॥
ऐरवी जसा दान करणारा पुरुष दानधर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्यसंचय करतो, तसा हा संसारवृक्ष नाश पावत असताही अविनाशी असा भासतो.
123-15
जातां वेगें बहुवसें । न वचे कां भूमीं रुतलें असे । रथाचें चक्र दिसे । जियापरी ॥12॥
ज्याप्रमाने रथाचे चाक अती वेगाने फिरत असताना देखील ते फिरत नाही तर जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते.
124-15
तैसें काळातिक्रमें जे वाळे । ते भूतशाखा जेथ गळे । तेथ कोडीवरी उमाळे । उठती आणिक ॥124॥
त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसारवृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाळते व त्या योगाने गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यवधी अंकुर या संसारवृक्षास फुटतात.
125-15
परी येकी केधवां गेली । शाखाकोडी केधवां जाली । हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढाभ्रें ॥125॥
ज्याप्रमाने आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यवधी (शरीररूपी) शाखा केव्हा उत्पन झाल्या हे कळत नाही

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *