126-9
हें असो पर्वताचिये हृदयींचें । जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचे । तेविं कर्मजात प्रकृतीचें । न लगे मज ॥126॥
ज्याप्रमाणे पर्वताच्या पोटांतील द्रव्यांना पर्जन्याच्या अतिवृष्टीनेही कांही बाधा होत नाही, त्याप्रमाणे, प्रकृतीच्या कर्मापासून मला कांही एक बाधा होत नाही.
127-9
एऱ्हवीं इये प्राकृतीं विकारीं । एकु मीचि आहे अवधारीं । परि उदासीनाचिया परि । करीं ना करवी ॥127॥
त्याप्रमाणे, प्रकृतीच्या कर्मापासून मला कांही एक बाधा होत नाही. एरव्ही त्या प्रकृतीच्या कार्याला एक कारण आहे असे समज; परंतु उदासीनाप्रमाणे मी कांही करीत नाही.
128-9
दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणे ॥128॥
ज्याप्रमाणे घरांत ठेवलेला दिवा अमुक कर किंवा करूं नको असे कोणाला सांगत नाही, आणि कोण काय व्यापार करतो हेंही जाणत नाही
129-9
तो जैसा का साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु । तैसा भूतकर्मीं अनासक्तु । मी भूतीं असें ॥129॥
तो साक्षिभूत असून गृहकृत्यांची प्रवृत्ति होण्यास कारणीभूत होतो त्याप्रमाणे, सृष्टीची उत्पत्ति, स्थिति व लय या कर्मात मी उदासीन असून भूतांच्या ठिकाणीं आहे.
130-9
हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगो बहुतां उपपत्तीं । येथ एकवेळां सुभद्रापती । येतुलें जाण पां ॥130॥
हा एकच अभिप्राय खरा आहे. पुनः पुनः पुष्कळ पर्यायांनी काय सांगू? तर हे सुभद्रापति, एकदां एवढे लक्षांत ठेव.
मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते॥9.10॥
131-9
जे लोकचेष्टां समस्तां । जैसा निमित्तमात्र कां सविता । तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता । हेतु मी जाणें ॥131॥
अर्जुना, सर्व सृष्टीतील लोकांच्या व्यापारास ज्याप्रमाणे सूर्य कारणीभूत आहे, त्याप्रमाणे, जगाच्या उत्पत्तीला मी कारण आहे असे जाण.
132-9
कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती । म्हणोनि मी हेतु हें उपपत्ती । घडे यया ॥132॥
कां कीं, मायेचा अंगीकार मी केला आहे, व तिच्या योगाने प्राणिमात्राची उत्पत्ति होते. म्हणून या जगाच्या उत्पत्तीचे कारण मी अशी लोकांची समजूत आहे.
133-9
आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें । जे माझां ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥133॥
तेव्हां माझ्यापासून भूतांची उत्पत्ति जरी होते, तरी भूतांत मीं नाही, ही माझी अद्भूत करणी या ज्ञानाच्या उजेडाने नीट न्याहाळून पहा.
134-9
अथवा भूतें ना माझां ठायीं । आणि भूतांमाजि मी नाहीं । या खुणा तुं कही । चुकों नको ॥134॥
अथवा प्राणी माझ्या ठिकाणीं नाहींत व मी त्यांच्या ठिकाणीं नाही हे वर्म तूं कधी विसरूं नकोस.
135-9
हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड । आतां इंद्रियां देऊनि कवाड । हृदयीं भोगीं ॥135॥
हे माझे मुख्य वर्म असुनही तुला उघड करुन दाखविले आहे. तर आतां तूं आपल्या इंद्रियांची दारे बंद करून त्यांना कळूं न देतां आपल्या ह्रदयांत याचा उपभोग घे.
136-9
हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारेपण पार्था । न संपडे गा सर्वथा । जेविं भुसीं कणु ॥136॥
पार्था, हे वेदांतसिद्धांतांचे वर्म जोपर्यत हाती लागले नाही, तोपर्यंत माझे खरे स्वरूप कधीही कळणार नाही. ज्याप्रमाणे कोड्यांत शोधूं लागले असता दाण्याचा एक कण सुद्दा सांपडत नाही.
137-9
एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळलें ऐसें । परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे ॥137॥
एरव्ही, अनुमानाच्या साह्याने माझे खरे स्वरूप कळले असे वाटते. पण मृगजलाच्या ओलाव्याने जमीन कधी भिजली आहे का?
138-9
जें जाळ जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें । परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांगे ॥138॥
माशाला धरण्याकरिंता जे जाळे पसरतात त्यांत चंद्राचे बिंब सापडल्यासारखे दिसते, परंतु ते जाळे नदीच्या कांठावर काढून झाडल्यावर चंद्रबिंब कोठे असते का सांग बरे?
139-9
तैसें बोलवरि वाचाबळें । वायांचि झकविजती प्रतीतीचे डोळे । मग साचोकारें बोधावेळे । आथि ना होईजे ॥139॥
त्याचप्रमाणे ‘ आम्हांला अनुभव आला ‘ असे शब्दाच्या व वाणीच्या योगाने कितीएक लोक वरकरणी दाखवितात; पण मग खऱ्या बोधाच्या परिक्षेची वेळ आली म्हणजे त्या वेळेस खरोखर त्यांना ज्ञान झालेले नाही (असे अनुभवास येते), व दुसऱ्यास ते करूनही देता येत नाही.
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ 9-11 ॥
संदर्भित अन्वयार्थ
मम = माझा, परम् = परम, भावम् = भाव, अजानन्तः = न जाणणारे, मूढाः = मूढ लोक हे, मानुषीम् = मनुष्याचे, तनुम् = शरीर, आश्रितम् = धारण करणाऱ्या, माम् = मज, भूतमहेश्वरम् = संपूर्ण भूतांचा महान ईश्वर असणाऱ्याला, अवजानन्ति = तुच्छ समजतात (म्हणजे आपल्या योगमायेने संसाराच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात संचार करणाऱ्या मज परमेश्वराला साधारण मनुष्य समजतात) ॥ 9-11 ॥
अर्थ
माझ्या परम भावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्यशरीर धारण करणाऱ्या मला-सर्व भूतांच्या महान ईश्वराला-तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. ॥ 9-11 ॥
140-9
किंबहुना भवा बिहा या । आणि साचें चाड आथि जरी मियां । तरि तुम्हीं गा उपपत्ती इया । जतन कीजे ॥140॥
किंबहुना या संसाराला भिऊन माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा असली तर तुला हे जे मी वर्म सांगितले, ते आपल्या लक्षांत पूर्ण वागीव.
141-9
एऱ्हवीं वेधली दिठी कवळें । ते चांदणियाते म्हणे पिंवळें । तेविं माझां स्वरुपीं निर्मळे । देखाल दोष ॥141॥
एरवी, काविळीच्या योगाने दृष्टी ग्रासल्यावर तो मनुष्य चांदण्याला पिवळे म्हणतो, त्याप्रमाणे, निर्दोष असे जे माझे शुद्ध स्वरूप, त्या स्वरूपावर त्याला दोष दिसतात.
142-9
नातरी ज्वरें विटाळले मुख । ते दुधातें म्हणे कडू विख । तेविं अमानुषा मानुष । मानाल मातें ॥142॥
किंवा तापाने कडू तोंड झाल्यावर त्याला ज्याप्रमाणे दूध विषासारखे कडू लागते, त्याचप्रमाणे मी मनुष्य नसूनही मनुष्य आहे असे ते मला मानतात.
143-9
म्हणऊनि पुढती तूं धनंजया । झणें विसंबसी या अभिप्राया । जे इया स्थूलदृष्टी वायां । जाइजेल गा ॥143॥
म्हणून, हे धनंजया, वारंवार या अभिप्रायाला विसरूं नको. जर नुसत्या स्थुल दृष्टीनें पाहूं लागलास, तर तुझे पाहणे व्यर्थ होईल.
144-9
पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेंचि न देखणें जाण निरुतें । जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे ॥144॥
ज्याप्रमाणे स्वप्नांतील अमृताने कोणी अमर होत नाही, त्याप्रमाणे जे मला स्थूल दृष्टीनें पाहतात, ते खरोखर मला पहात नाहीत.
145-9
एऱ्हवीं स्थूलदृष्टी मूढ । मातें जाणती कीर दृढ । परि तें जाणणेंचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥145॥
एरवीं अज्ञानी लोक स्थूल दृष्टीनें मला जाणले असे म्हणतात, परंतु त्यांचा समज त्यांच्या खऱ्या समजाच्या आड येतो.
146-9
जैसा नक्षत्राचिया आभासा- । साठीं घातु झाला तया हंसा । माजीं रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥146॥
ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाण्यांत पाहून ते मोतीच आहे असे समजून ते प्राप्त करून घेण्याकरीता हंस पक्षी आकाशांतून उडी टाकून प्राणास मुकतो;
147-9
सांगे गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ । काय सुरतरु म्हणोनि बाबुळ । सेविली करी ॥147॥
गंगा आहे असे समजून मृगजळाजवळ जर कोणी गेला, तर त्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल सांग बरे? त्याचप्रमाणे, कल्पवृक्ष समजून बाभूळ हाती धरल्यावर त्याचा काय उपयोग होणार?
148-9
हा निळयाचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्ने म्हणोनि गारा । वेंची जेविं ॥148॥
नीलमण्याचा दोन सरांचा हार समजून जर कवड्या सर्पाला हाती धरले; किंवा रत्न समजून गारा वेचून घेतल्या,
149-9
अथवा निधान हें प्रगटलें । म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले । कां साउली नेणतां घातलें । कुहां सिंहें ॥149॥
अथवा द्रव्याचा ठेवा जमिनीतून वर येऊन उजेड पडला आहे असे समजून खैराचे निखारे पदरांत घेतले, अथवा आपलीच पडछाया पाण्यांत पाडली आहे असे न जाणता सिंह विहीरींत उडी टाकून ज्याप्रमाणे प्राणास मुकला,
150-9
तेविं मी म्हणोनि प्रपंचीं । जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची । तिहीं चंद्रासाठीं जेविं जळींची । प्रतिमा धरिली ॥150॥
त्याप्रमाणे, प्रपंचात मी खास आहे, अशा कृतनिश्चयाने जे प्रपंचातच गुंग होतात, ते चंद्राच्या ऐवजी त्याचे पाण्यांत पडलेले प्रतिबिंब धरण्याकरिंता प्रयत्न करणाऱ्याप्रमाणे फसतात.