1051-13
तरी क्षेत्रज्ञ येणें बोलें । तुज आपणपें जें दाविलें । आणि क्षेत्रही सांगितलें । आघवें जें ॥1051॥
तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखवले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले.
1052-13
तया येरयेरांच्या मेळीं । होईजे भूतीं सकळीं । अनिलसंगें सलिलीं । कल्लोळ जैसे ॥1052॥
वार्याच्या संबंधाने जशा पाण्यावर लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्र-क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात (संबंधात) सर्व प्राणी उत्पन्न होतात.
1053-13
कां तेजा आणि उखरा । भेटी जालिया वीरा । मृगजळाचिया पूरा । रूप होय ॥1053॥
अथवा सूर्यकिरणे व बरड जमीन यांचा संबंध आला म्हणजे अर्जुना, मृगजळाचा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो.
1054-13
नाना धाराधरधारीं । झळंबलिया वसुंधरी । उठिजे जेवीं अंकुरीं । नानाविधीं ॥1054॥
अथवा पर्जन्याचा धारांनी वृष्टीने भिजलेल्या पृथ्वीमधे जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात.
1055-13
तैसें चराचर आघवें । जें कांहीं जीवु नावें । तें तों उभययोगें संभवे । ऐसें जाण ॥1055॥
त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही चराचर आहे ते तर उभयतांच्या (क्षेत्र-क्षेत्रज्ञांच्या) मिलाफाने उत्पन्न होते असे समज.
1056-13
इयालागीं अर्जुना । क्षेत्रज्ञा प्रधाना- । पासूनि न होती भिन्ना । भूतव्यक्ती ॥1056॥
अर्जुना या करता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष व प्रकृती यांच्या पासून भिन्न नाहीत
समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् ।
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥13.27॥
क्ष्लोकभावार्थ- सर्व भूतांच्या ठिकाणी सारख्याच असणार्या व नाश पावणार्या भूतांमधे अविनाश असलेल्या अशा परमेश्वरास जो जाणतो, तोच ज्ञान्यांतील डोळस होय.
ज्ञानी मनुष्याची लक्षणे सर्व प्राणिमात्रात एकच परमात्मा आहे.
1057-13
पैं पटत्व तंतु नव्हे । तरी तंतूसीचि तें आहे । ऐसां खोलीं डोळां पाहें । ऐक्य हें गा ॥1057॥
वस्त्र जे जरी सूत नाही, तरी पण वस्त्रपणा हा सूतावरच आहे. अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे.
1058-13
भूतें आघवींचि होती । एकाचीं एक आहाती । परी तै प्रतीती । यांची घे पां ॥1058॥
सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात व ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पहाणारास भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात.
1059-13
यांचीं नामेंही आनाने । अनारिसी वर्तने । वेषही सिनाने । आघवेयांचे ॥1059॥
या भूतांची नावेही निरनिराळी आहेत, यांच्या वागणुकीसुद्धा भिन्न भिन्न आहेत व या सर्वांचे वेषही भिन्न भिन्न आहेत.
1060-13
ऐसें देखोनि किरीटी । भेद सूसी हन पोटीं । तरी जन्माचिया कोटी । न लाहसी निघों ॥1060॥
अर्जुना, असे पाहून तू जर आपल्या पोटात (मनात) द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता येणार नाही.
1061-13
पैं नानाप्रयोजनशीळें । दीर्घें वक्रें वर्तुळें । होती एकाचींच फळें । तुंबिणीयेचीं ॥1061॥
अनेक कारणांमुळे लांब व वाकडी व वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराची दुध्या भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात.
1062-13
होतु कां उजू वांकुडें । परी बोरीचे हें न मोडे । तैसी भूतें अवघडें । परी वस्तु उजू ॥1062॥
बोरीचे झाडाची फांदी सरळ अथवा वाकडी असेना का, पण तिला बोरीचीच म्हणतात. त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी (त्यात व्यापून असणारी) ब्रह्मवस्तू सरळच(एकच) आहे.
1063-13
अंगारकणीं बहुवसीं । उष्णता समान जैशी । तैसा नाना जीवराशीं । परेशु असे ॥1063॥
निखार्याच्या पुष्कळ ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे.
1064-13
गगनभरी धारा । परी पाणी एकचि वीरा । तैसा या भूताकारा । सर्वांगीं तो ॥1064॥
अर्जुना, पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून जसे पाणी एकच आहे त्याप्रमाणे या भूताकाराच्या सर्वांगात तो परमात्मा आहे.
1065-13
हें भूतग्राम विषम । परी वस्तू ते एथ सम । घटमठीं व्योम । जिंयापरी ॥1065॥
ज्याप्रमाणे घागरीत व घरात आकाश एकच असते, त्याप्रमाणे हे भूतसमुदाय जरी वेगवेगळे आहेत, तरी त्यात व्यापून असणारी जी वस्तू, ती एकसारखीच आहे.
1066-13
हा नाशतां भूताभासु । एथ आत्मा तो अविनाशु । जैसा केयूरादिकीं कसु । सुवर्णाचा ॥1066॥
ज्याप्रमाणे बाहुभूषणादिक अनेक अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयूरादिक अलंकारांची वाटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही, त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणारा आहे पण या भूताभासात असणारा आत्मा अविनाश आहे.
1067-13
एवं जीवधर्महीनु । जो जीवेंसीं अभिन्नु । देख तो सुनयनु । ज्ञानियांमाजीं ॥1067॥
याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्मरहित आहे व तो सर्व जीवात व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो, तो ज्ञान्यांमधे चांगला डोळस आहे.
1068-13
ज्ञानाचा डोळा डोळसां- । माजीं डोळसु तो वीरेशा । हे स्तुति नोहे बहुवसा । भाग्याचा तो ॥1068॥
अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत, त्यामधे तो डोळस आहे. ही त्याची स्तुती नसून तो फारच भाग्यवान आहे.
समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥13.28॥
श्लोकार्थ -::- ईश्वर सर्वत्र समानत्वाने स्थित आहे असे जाणणारा स्वत:चा घात करत नाही. देह मी आहे असे समजत नाही. नंतर म्हणजे असे जाणल्यानंतर, तो श्रेष्ठ अभेदभावाने पहातो तो श्रेष्ठगती प्राप्त करतो.
1069-13
जे गुणेंद्रिय धोकोटी । देह धातूंची त्रिकुटी । पांचमेळावा वोखटी । दारुण हे ॥1069॥
कारण की देह हा गुण व इंद्रिये यांची रहाण्याची धोकटी आहे, देह हा (कफ, वात व पित्त) या तीन धातूंपासून बनलेला आहे. हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे. तो वाईट आहे व भयंकर आहे.
1070-13
हें उघड पांचवेउली । पंचधां आगी लागली । जीवपंचानना सांपडली । हरिणकुटी हे ॥1070॥
हा देह म्हणजे उघड पांच नाग्यांची इंगळी आहे (अथवा) वेगवेगळ्या पाच ठिकाणी दंश करणारी आहे. जीवरूप सिंहाला हा देह हे एक हरणाचे (रहाण्याचे) घरच सापडले आहे.
1071-13
ऐसा असोनि इये शरीरीं । कोण नित्यबुद्धीची सुरी । अनित्यभावाच्या उदरीं । दाटीचिना ॥1071॥
त्याप्रमाणे या देहात हा जीव असा सिंहासारखा असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवीत नाही? आपल्या नित्यभावाच्या स्मृतीने अनित्यभावाचा नाश का करत नाही? हे एक आश्चर्य आहे.
1072-13
परी इये देहीं असतां । जो नयेचि आपणया घाता । आणि शेखीं पंडुसुता । तेथेंचि मिळे ॥1072॥
येथेपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणार्या मूर्खाची स्थिती सांगितली व या ओवीपासून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानी पुरुषाचे वर्णन करतात). परंतु ज्ञानी पुरुष या देहात असताना (देहतादात्म्याने) आपल्या घातावर येत नाही. (म्हणजे आपला घात करून घेत नाही). आणि अर्जुना, शेवटी मरणानंतर तो तेथे (ब्रह्मस्वरूपात मिळतो).
1073-13
जेथ योगज्ञानाचिया प्रौढी । वोलांडूनियां जन्मकोडी । न निगों इया भाषा बुडी । देती योगी ॥1073॥
कोट्यावधी जन्म ओलांडून, योग व ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणारा नाही, अशा कृतनिश्चयाने, ज्या ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी बुडी देऊन रहातात.
1074-13
जें आकाराचें पैल तीर । जें नादाची पैल मेर । तुर्येचें माजघर । परब्रह्म जें ॥1074॥
जे आकाररूप नदीचा पलीकडला काठ आहे, (निराकार आहे) व जे ब्रह्म नादाची पलीकडली कड आहे (शब्दातीत आहे) व जे परब्रह्म तूर्यावस्थेचे मध्यघर (गाभा) आहे,
1075-13
मोक्षासकट गती । जेथें येती विश्रांती । गंगादि आपांपती । सरिता जेवीं ॥1075॥
ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षसुद्धा सर्व साध्ये, जेथे (ब्रह्माच्या ठिकाणी) विश्रांतीला येतात.
