सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ६७६ ते ७०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

676-13
येतुलेनि पांगु पापाचा । निस्तरेल हे वाचा । जो गुरुतल्पगाचा । नामीं झाला ॥676॥
एवढ्याने गुरुभक्ताचे नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी मात्रागमनी असणाराचे नाव घेण्याच्या पापामुळे जो हीनपणा झाला, तो घालवील,
677-13
हा ठायवरी । तया नामाचें भय हरी । मग म्हणे अवधारीं । आणिकें चिन्हें ॥677॥
गुरुभक्ताच्या नावाच्या उच्चार येथपर्यंत अभक्ताच्या नामोच्चरणाचे भय (दोष) हरण करतो, मग आणखी अज्ञानाची चिन्हे ऐक, असे देव म्हणाले.
अज्ञानाची लक्षणे = कर्म करण्य़ाविषयी आळस
678-13
तरि आंगें कर्में ढिला । जो मनें विकल्पें भरला । अडवींचा अवगळला । कुहा जैसा ॥678॥
तरी तो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते, तो म्हणजे रानातील त्याज्य म्हणून टाकलेला आडच होय.
679-13
तया तोंडीं कांटिवडे । आंतु नुसधीं हाडें । अशुचि तेणें पाडें । सबाह्य जो ॥679॥
त्या रानातील आडाच्या तोंडावर काटे वगैरे घाण पडलेली असते आणि आत फक्त हाडे असतात (पाणी नसते). त्या आडाप्रमाणे जो आतबाहेर अमंगल असतो.
680-13
जैसें पोटालागीं सुणें । उघडें झांकलें न म्हणे । तैसें आपलें परावें नेणे । द्रव्यालागीं ॥680॥
ज्याप्रमाणे कुत्रे पोटाला अन्न मिळण्याकरता एखादा पदार्थ झाकलेला आहे की उघडा आहे हा विचार करीत नाही, त्याप्रमाणे द्रव्याकरता जो आपले व परके अशी निवड जाणत नाही,

681-13
इया ग्रामसिंहाचिया ठायीं । जैसा मिळणी ठावो अठावो नाहीं । तैसा स्त्रीविषयीं कांहीं । विचारीना ॥681॥
कुत्र्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे कुत्रीच्या संगाला योग्य किंवा अयोग्य जागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे स्त्रीसंगाविषयी जो काही विचार करत नाही.
682-13
कर्माचा वेळु चुके । कां नित्य नैमित्तिक ठाके । तें जया न दुखे । जीवामाजीं ॥682॥
विहित कर्मे करण्याची वेळ चुकली अथवा नित्य नैमित्तिक कर्मे राहिली तर त्याचे ज्याला मनात दु:ख वाटत नाही,
683-13
पापी जो निसुगु । पुण्याविषयीं अतिनिलागु । जयाचिया मनीं वेगु । विकल्पाचा ॥683॥
पाप करण्यास ज्याला काही लाज वाटत नाही आणि पुण्याविषयी जो अतिशय नि:संग बनलेला असतो व ज्याच्या मनात विकल्पाचे वारे भरलेले असते.
684-13
तो जाण निखिळा । अज्ञानाचा पुतळा । जो बांधोनि असे डोळां । वित्ताशेतें ॥684॥
जो आपल्या डोळ्यांपुढे धनाच्या इच्छेस कायम करून चालतो, तो एकरस अज्ञानाचा पुतळा आहे असे समज.
685-13
आणि स्वार्थें अळुमाळें । जो धैर्यापासोनि चळे । जैसें तृणबीज ढळे । मुंगियेचेनी ॥685॥
आणि ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्थाकरता जो केलेल्या निश्चयापासून ढळतो,

686-13
आणि स्वार्थें अळुमाळें । जैसें थिल्लर कालवे । तैसा भयाचेनि नांवें । गजबजे जो ॥686॥
डबक्यात पाय घातल्या बरोबर जसे डबक्यातील पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे भयाचे नाव ऐकल्याबरोबर जो घाबरून जातो.
687-13
मनोरथांचिया धारसा । वाहणें जयाचिया मानसा । पूरीं पडिला जैसा । दुधिया पाहीं ॥687॥
वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो, त्याप्रमाणे दु:खाची बातमी ऐकल्याबरोबर ज्याचे मन दु:खाने पुरे व्यापले जाते,
688-13
वायूचेनि सावायें । धू दिगंतरा जाये । दुःखवार्ता होये । तसें जया ॥688॥
पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वहात जातो, त्याप्रमाणे मनोरथांच्याओघाबरोबर ज्याचे मन भटकत असते असे समज.
689-13
वाउधणाचिया परी । जो आश्रो कहींचि न धरी । क्षेत्रीं तीर्थीं पुरीं । थारों नेणे ॥689॥
वावटळीप्रमाणे जो कोठे स्थिर रहात नाही व जो क्षेत्रात तीर्थांचे ठिकाणी अथवा सप्तपुर्‍यांपैकी कोण्या एका पुरीत कायम रहाण्याचे जाणत नाही.
690-13
कां मातलिया सरडा । पुढती बुडुख पुढती शेंडा । हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥690॥
माजलेला सरडा जसा झाडाच्या बुंध्यापासून शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा घालतो, त्याप्रमाणे ज्याचे भटकणे निरर्थक असते.

691-13
जैसा रोविल्याविणें । रांजणु थारों नेणे । तैसा पडे तैं राहणें । एऱ्हवीं हिंडे ॥691॥
ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोवल्याशिवाय बसावयाचे जाणत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल, तरच तो एके ठिकाणी राहील, नाहीतर तो सारखा हिंडतो.
692-13
तयाच्या ठायीं उदंड । अज्ञान असे वितंड । जो चांचल्यें भावंड । मर्कटाचें ॥692॥
जो चंचलपणाने माकडाचे भावंड आहे, त्याच्या ठिकाणी मोठे अज्ञान पुष्कळ आहे.
693-13
अणि पैं गा धनुर्धरा । जयाचिया अंतरा । नाहीं वोढावारा । संयमाचा ॥693॥
अज्ञानाची लक्षणे = निग्रह नाही आणि अर्जुना, ज्याच्या मनाला निग्रहाचा धरबंध नाही.
694-13
लेंडिये आला लोंढा । न मनी वाळुवेचा वरंडा । तैसा निषेधाचिया तोंडा । बिहेना जो ॥694॥
ओहोळाला पूर आला असता तो लोंढा जसा वाळूच्या बांधाला जुमानत नाही, तसा जो निषिद्ध कर्माला तोंड देण्यास भीत नाही,
695-13
व्रतातें आड मोडी । धर्माते पायें वोलांडी । नियमाची आस तोडी । जयाची क्रिया ॥695॥
व्रतांना मध्येच मोडतो, स्वधर्माला लाथेने झुगारतो, व ज्याच्या कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच रहात नाही.

696-13
नाहीं पापाचा कंटाळा । नेणें पुण्याचा जिव्हाळा । लाजेचा पेंडवळा । खाणोनि घाली ॥696॥
ज्याला पापाचा कंटाळा नाही, जो पुण्याला आश्रय देत नाही व लाजेची मर्यादा समूळ खणून टाकतो.
697-13
कुळेंसीं जो पाठमोरा । वेदाज्ञेसीं दुऱ्हा । कृत्याकृत्यव्यापारा । निवाडु नेणे ॥697॥
जो आपल्या कुळातील आचार मानत नाही, जो वेदाची आज्ञा एकीकडे ठेवतो व करण्यास योग्य कर्म कोणते व न करण्यास कर्म कोणते, यातील निवड जो जाणत नाही,
698-13
वसू जैसा मोकाटु । वारा जैसा अफाटु । फुटला जैसा पाटु । निरंजणी ॥698॥
अज्ञानाची लक्षणे= (विषयात गुंतलेला) सोडलेला पोळ जसा पाहिजे तिकडे मोकळा हिंडत असतो किंवा वारा जसा अफाट पाहिजे तिकडे वहात असतो अथवा अरण्यात पाण्याचा फुटलेला पाट जसा पाहिजे तिकडे वहात असतो.
699-13
आंधळें हातिरूं मातलें । कां डोंगरीं जैसें पेटलें । तैसें विषयीं सुटलें । चित्त जयाचें ॥699॥
आंधळा हत्ती माजला असता तो जसा वाटेल तिकडे हिंडतो, अथवा डोंगरावर पेटलेला वणवा जसा वाटेल तिकडे चेतत जातो, त्याप्रमाणे ज्याचे चित्त विषयांच्या ठिकाणी वाटेल तिकडे भटकत असते.
700-13
पैं उबडा काय न पडे । मोकाटु कोणां नातुडे । ग्रामद्वारींचे आडें । नोलांडी कोण ॥700॥
पण उघड्यावर काय काय पडत नाही? मोकळे सुटलेले जनावर कोणास सापडत नाही? गावच्या वेशीचा उंबरा कोण ओलांडत नाही?

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *