सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७०१ ते ७२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

701-13
जैसें सत्रीं अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें । वाणसियेचें उभलें । कोण न रिगे? ॥701॥
ज्याप्रमाणे सत्रातील अन्न असते, ते वाटेल त्याला मिळते किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही? अथवा वेश्येच्या उंबर्‍याचे आत कोण प्रवेश करणार नाही?
702-13
तैसें जयाचें अंतःकरण । तयाच्या ठायीं संपूर्ण । अज्ञानाची जाण । ऋद्धि आहे ॥702॥
त्याचप्रमाणे ज्याचे अंत:करण असते म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणे जे बर्‍या-वाईट कल्पनांनी व्यापले जाते त्या पुरुषाचे ठिकाणी अज्ञानाची पूर्ण भरभराट आहे.
703-13
आणि विषयांची गोडी । जो जीतु मेला न संडी । स्वर्गींही खावया जोडी । येथूनिची ॥703॥
आणि जिवंत अथवा मेला असला तरी जो विषयांवरील प्रेम सोडीत नाही व मेल्यानंतरही स्वर्गातही खावयास, भोगावयास मिळावे म्हणून जो येथूनच सामुग्री सकाम कर्मे करून ठेवतो.
704-13
जो अखंड भोगा जचे । जया व्यसन काम्यक्रियेचें । मुख देखोनि विरक्ताचें । सचैल करी ॥704॥
जो भोगाकरता एकसारखा कष्ट करतो आणि ज्याला काम्यकर्म करण्याचे व्यसन असते व जो विरक्त पुरुषाचे मुख पाहून कपडे वगैरेसह स्नान करतो,
705-13
विषो शिणोनि जाये । परि न शिणे सावधु नोहे । कुहीला हातीं खाये । कोढी जैसा ॥705॥
विषय त्रासून जातो परंतु हा विषय सेवन करणारा अज्ञानी पुरुष त्रासत नाही व सावधही होत नाही. तो कसा तर जसा कोडी(कुष्ठरोग झालेला) पुरूष सडलेल्या हातांनी खातो पण त्याला जशी कुजलेल्या हाताची किळस येत नाही.

706-13
खरी टेंकों नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडें । तऱ्ही जेवीं न काढे । माघौता खरु ॥706॥
ज्याप्रमाणे गाढवाला गाढवी आपल्या अंगास स्पर्श करू देत नाही व गाढव तिच्या जवळ आला असता ती त्यास उलट लाथा मारून त्याचे नाकाड फोडते, तरी पण तो गाढव मागे हटत नाही
707-13.
तैसा जो विषयांलागीं । उडी घाली जळतिये आगीं । व्यसनाची आंगीं । लेणीं मिरवी ॥707॥
जो विषयाकरता जळत्या आगीत उडी घालतो व आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे म्हणून मिरवतो.
708-13
फुटोनि पडे तंव । मृग वाढवी हांव । परी न म्हणे ते माव । रोहिणीची ॥708॥
हरीण हा पिण्याची तीव्र इच्छा इतकी वाढवतो की तो मृगजळाच्या मागे लागून उर फुटून पडला तरी मृगजळाची हाव सोडत नाही व असे म्हणत नाही की मृगजल ही जलाची भ्रांती आहे.
709-13
तैसा जन्मोनि मृत्यूवरी । विषयीं त्रासितां बहुतीं परीं । तऱ्ही त्रासु नेघे धरी । अधिक प्रेम ॥709॥
त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयांनी जरी अनेक प्रकारांनी त्यास त्रास दिला तरी तो कंटाळत नाही, तर उलट विषयांच्या ठिकाणी अधिकच प्रेम धरतो.
710-13
पहिलिये बाळदशे । आई बा हेंचि पिसें । तें सरे मग स्त्रीमांसें । भुलोनि ठाके ॥710॥
पहिल्या प्रथमच्या बाळपणात आई, बाबा असे आईबापाचे वेड असते, ते संपते, मग तारुण्यात स्त्रीच्या देहाने वेडा होतो.

711-13
मग स्त्री भोगितां थावों । वृद्धाप्य लागे येवों । तेव्हां तोचि प्रेमभावो । बाळकांसि आणी ॥711॥
मग तारुण्याच्या भरात स्त्री भोगीत असताना म्हातारपण येऊ लागते, त्यावेळी तेच स्त्रीवरील प्रेम मुलाबाळांवर आणून ठेवतो.
712-13
आंधळें व्यालें जैसें । तैसा बाळें परिवसे । परि जीवें मरे तों न त्रासे । विषयांसि जो ॥712॥
एखाद्या आंधळ्या मुलास जन्म दिला की त्याची आई जशी आपल्या तान्ह्या मुलास विसंबत नाही, तसे जो आपल्या मुलाबाळास धरून रहातो आणि महाराज, मरतो परंतु विषयांविषयी त्यास वीट येत नाही,
713-13
जाण तयाच्या ठायीं । अज्ञानासि पारु नाहीं । आतां आणीक कांहीं । चिन्हें सांगों ॥713॥
त्याच्या ठिकाणी अज्ञानाला अंत नाही असे समज. आता (अज्ञानाची) आणखी काही लक्षणे सांगतो.
714-13
तरि देह हाचि आत्मा । ऐसेया जो मनोधर्मा । वळघोनियां कर्मा । आरंभु करी ॥714॥
<अज्ञानाची लक्षणे देहात्मवादी,अभिमान ताठा> तर देह हाच आत्मा आहे. देहच मी आहे अशा मनाच्या समजुतीवर स्वार होऊन जो कर्म करण्यास प्रारंभ करतो.
715-13
आणि उणें कां पुरें । जें जें कांहीं आचरे । तयाचेनि आविष्करें । कुंथों लागे ॥715॥
आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडते त्यामधे तो पूर्ण झालेल्या कर्मामुळे गर्वाने फुगतो व अपूर्ण झालेल्या कर्मामुळे खंत करतो.

716-13
डोईये ठेविलेनि भोजें । देवलविसें जेवीं फुंजे । तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले ॥716॥
बाधेने घेरलेल्या एखाद्याने मंत्रतंत्र करणाराच्या डोक्यावर सर्व जबाबदारी ठेवल्यावर तो मंत्रतंत्र करणारा जसा आनंदाने फुगून जातो, त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो.
717-13
म्हणे मीचि एकु आथी । माझ्यांचि घरीं संपत्ती । माझी आचरती रीती । कोणा आहे ॥717॥
तो म्हणतो, जगात काय तो एक मीच (महत्वाचा मनुष्य) आहे, माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे व माझी वागण्याची पद्धत दुसर्‍या कोणाला आहे?
718-13
नाहीं माझेनि पाडें वाडु । मी सर्वज्ञ एकचि रूढु । ऐसा गर्वतुष्टीगंडु । घेऊनि ठाके ॥718॥
माझ्यासारखा कोणी मोठा नाही. प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मीच एक आहे. अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताठ होऊन रहातो.
719-13
व्याधि लागलिया माणुसा । नयेचि भोग दाउं जैसा । निकें न साहे जो तैसा । पुढिलांचें ॥719॥
रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत (दाखवल्यास जशी त्याची तळमळ होते) त्याप्रमाणे जो लोकांचे बरे सहन करत नाही.
720-13
पैं गुण तेतुला खाय । स्नेह कीं जाळितु जाय । जेथ ठेविजे तेथ होय । मसीऐसें ॥720॥
परंतु जसा एखादा दिवा वात ‘तेवढी खातो, तेल जाळून टाकतो व जेथे ठेवावा तेथे काजळासारखे काळे करतो.

721-13
जीवनें शिंपिला तिडपिडी। विजिला प्राण सांडीं। लागला तरी काडी। उरों नेदी॥१३-७२१॥
पाणी शिंपडल्याने तडतड करतो, वारा लागला तर विझून जातो. एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जाळून टाकतो, एक काडी उरू देत नाही.
722-13
आळुमाळ प्रकाशु करी। तेतुलेनीच उबारा धरी। तैसिया दीपाचि परी। सुविद्यु जो॥१३-७२२॥
थोडासा प्रकाश करतो व तेवढ्याने उष्णता वाढवतो, त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो म्हणजे ज्याला ज्ञान थोडे असते पण अवगुण बरेच असतात.
723-13
औषधाचेनि नांवें अमृतें। जैसा नवज्वरु आंबुथे। कां विषचि होऊनि परतें। सर्पा दूध॥१३-७२३॥
नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले असता तो नवज्वर जसा वाढतो अथवा सर्पाला दूध पाजले असता ते जसे विष होऊन उलटते.
724-13
तैसा सद्गुणीं मत्सरु। व्युत्पत्ती अहंकारु। तपोज्ञानें अपारु। ताठा चढे॥१३-७२४॥
त्याप्रमाणे चांगल्या गुणांविषयी जो मत्सर असतो, विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो आणि तपाने व ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो,
725-13
अंत्यु राणिवे बैसविला। आरें धारणु गिळिला। तैसा गर्वें फुगला। देखसी जो॥१३-७२५॥
अत्यंजाला जसे राज्यावर बसवावे म्हणजे तो गर्वाने फुगतो अथवा अजगराने खांबाचे लाकूड गिळले असता तो जसा फुगतो. त्याप्रमाणे अभिमानाने फुगलेला जो तुला दिसेल.

, , , , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading