651-13
मग म्हणें या नांवें । ज्ञान एथ जाणावें । हे स्वमत आणि आघवें । ज्ञानियेही म्हणती ॥651॥
यानंतर लक्षणांवरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वत:चे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात असे श्रीकृष्ण म्हणाले.
652-13
करतळावरी वाटोळा । डोलतु देखिजे आंवळा । तैसें ज्ञान आम्हीं डोळां । दाविलें तुज ॥652॥
तळहातावर डोलत असलेला आवळा जसा सर्व अंगांनी पूर्णपणे दिसतो, त्याप्रमाणे आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असे ज्ञान दाखवले.
653-13
आतां धनंजया महामती । अज्ञान ऐसी वदंती । तेंही सांगों व्यक्ती । लक्षणेंसीं ॥653॥
यानंतर विशाल बुद्धीच्या अर्जुना, अज्ञान जे म्हणतात तेही स्पष्ट लक्षणांनी सांगतो.
654-13
एऱ्हवीं ज्ञान फुडें जालिया । अज्ञान जाणवे धनंजया । जें ज्ञान नव्हे तें अपैसया । अज्ञानचि ॥654॥
अज्ञानाची लक्षणे = सामान्य लक्षण
अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्ञान स्पष्ट झाल्यावर अज्ञान जाणता येईल. कारण की जे ज्ञान नाही ते आपोआप कोणीही न सांगता अज्ञानच आहे
655-13
पाहें पां दिवसु आघवा सरे । मग रात्रीची वारी उरे । वांचूनि कांहीं तिसरें । नाहीं जेवीं ॥655॥
अर्जुना असे पहा की ज्याप्रमाणे सर्व दिवस संपल्यावर मग रात्रीच्या येण्याची पाळी असते, याशिवाय तिसरे काही नसते.
656-13
तैसें ज्ञान जेथ नाहीं । तेंचि अज्ञान पाहीं । तरी सांगों कांहीं कांहीं । चिन्हें तियें ॥656॥
त्याप्रमाणे जेथे ज्ञान नाही तेच अज्ञान समज. तरी पण ती काही लक्षणे सांगतो ऐक.
657-13
तरी संभावने जिये । जो मानाची वाट पाहे । सत्कारें होये । तोषु जया ॥657॥
अज्ञानाची लक्षणे = प्रतिष्ठा, मान,गर्विष्ठपणा
तरी जो प्रतिष्ठेकरता जगतो, जो मानाची वाट पहातो आणि ज्याला सत्काराने संतोष होतो.
658-13
गर्वें पर्वताचीं शिखरें । तैसा महत्त्वावरूनि नुतरे । तयाचिया ठायीं पुरे । अज्ञान आहे ॥658॥
पर्वताची शिखरे जशी खाली लवत नाहीत, तसा जो गर्वाने मोठेपणावरून खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज.
659-13
आणि स्वधर्माची मांगळी बांधे । वाचेच्या पिंपळीं । उभिला जैसा देउळीं । जाणोनि कुंचा ॥659॥
आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळाला जशी मुंज (मोळाची दोरी) सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, त्याप्रमाणे जो आपण केलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो, (म्हणजे आपण केलेला धर्म वाचेने लोकांना सांगतो) अथवा जसे देवळात सर्वांना उघड दिसेल असे मोर्चेल जाणूनबुजून ठेवलेले असते.
660-13
घाली विद्येचा पसारा । सूये सुकृताचा डांगोरा । करी तेतुलें मोहरा । स्फीतीचिया ॥660॥
विद्येचा पसारा, दुकान घालतो, केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटवतो आणि जेवढे म्हणून काही करतो, तेवढ्याचा मोर्चा कीर्तीकडे असतो.
661-13
आंग वरिवरी चर्ची । जनातें अभ्यर्चितां वंची । तो जाण पां अज्ञानाची । खाणी एथ ॥661॥
स्वत:च्या अंगाला भस्म, गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तर्हेने फासतो व लोक याची पूज्य म्हणून पूजा करत असता हा त्यास फसवीत रहातो, तो अज्ञानाची खाण आहे असे समज.
662-13
आणि वन्ही वनीं विचरे । तेथ जळती जैसीं जंगमें स्थावरें । तैसें जयाचेनि आचारें । जगा दुःख ॥662॥
अज्ञानाची लक्षणे = दुराचार, दुर्वचन
आणि ज्याप्रमाणे रानास वणवा लागला म्हणजे वृक्ष, प्राणी वगैरे सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे ज्याच्या वागणुकीने सर्व जगास दु:ख होते,
663-13
कौतुकें जें जें जल्पे । तें सबळाहूनी तीख रुपे । विषाहूनि संकल्पें । मारकु जो ॥663॥
अणि जो सहज जे बोलेल, ते भाल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण टोचते व जो संकल्पाने विषापेक्षा जास्त घात करणारा असतो.
664-13
तयातें बहु अज्ञान । तोचि अज्ञानाचें निधान । हिंसेसि आयतन । जयाचें जिणें ॥664॥
आणि ज्याचे वागणे हिंसेचे घरच असते, त्याच्याजवळ फार अज्ञान आहे (इतकेच नव्हे) तर तोच अज्ञानाचा खजिना आहे.
665-13
आणि फुंकें भाता फुगे । रेचिलिया सवेंचि उफगे । तैसा संयोगवियोगें । चढे वोहटे ॥665॥
अज्ञानाची लक्षणे = चित्ताचे असमत्व
जसा भाता फुंकल्याने फुगतो व त्यातील वारा सोडल्याने तो लागलीच रिकामा पडतो (संकोचित होतो) त्याप्रमाणे जो इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने हर्षित व दु:खी होतो.
666-13
पडली वारयाचिया वळसा । धुळी चढे आकाशा । हरिखा वळघे तैसा । स्तुतीवेळे ॥666॥
वार्याच्या भोवर्यात धूळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते तसा स्तुतीच्या वेळी आनंदाने चढून जातो.
667-13
निंदा मोटकी आइके । आणि कपाळ धरूनि ठाके । थेंबें विरे वारोनि शोखे । चिखलु जैसा ॥667॥
जराशी निंदा ऐकली की कपाळ धरून रहातो व जसा चिखल पाण्याच्या एकाक थेंबाने विरघळतो व थोड्याशा वार्याने तो वाळतो.
668-13
तैसा मानापमानीं होये । जो कोण्हीहि उर्मी न साहे । तयाच्या ठायीं आहे । अज्ञान पुरें ॥668॥
त्याप्रमाणे मानाने व अपमानाने ज्याची स्थिती होते व ज्याला कोणत्याही प्रकारचा वेग सहन होत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे.
669-13
आणि जयाचिया मनीं गांठी । वरिवरी मोकळी वाचा दिठी । आंगें मिळे जीवें पाठीं । भलतया दे ॥669॥
अज्ञानाची लक्षणे = मनातून दुसर्याचा घात
आणि ज्याच्या मनामधे गाठ असते आपल्या मनातील गोष्ट दुसर्यास कधीही कळू देत नाही ज्याचे बोलणे व पहाणे वरून मोकळ्या मनाचे असते व तो वाटेल त्याच्याशी शरीराने मिळतो पण मनाने मात्र त्यास तोंडघशी पाडतो.
670-13
व्याधाचे चारा घालणें । तैसें प्रांजळ जोगावणें । चांगाचीं अंतःकरणें । विरु करी ॥670॥
पारध्याचे जनावरास चारा घालणे हे जसे असते वरून पहाणारास प्रामाणिक व सरळपणाचे दिसते, पण त्याच्या मनात घात करण्याचा हेतू असतो, त्याप्रमाणे सरळ ज्याचे दुसर्यास पोसणे अथवा सांभाळणे असते पण ते केवळ त्या पोसले जाणार्या माणसाच्या घाताकरताच असते व जो चांगल्या माणसाची अंत:करणे विरुद्ध करतो.
671-13
गार शेवाळें गुंडाळली । कां निंबोळी जैसी पिकली । तैसी जयाची भली । बाह्य क्रिया ॥671॥
शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली लिंबोणी जशी वरून सुंदर दिसते, (परंतु आत कडू असते) तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते
672-13
अज्ञान तयाचिया ठायीं । ठेविलें असे पाहीं । याबोला आन नाहीं । सत्य मानीं ॥672॥
त्याच्या ठिकाणी अज्ञान ठेवलेले आहे असे समज, यात अन्यथा नाही, हे खरे मान.
673-13
अज्ञानाची लक्षणे = गुरूविषयी अश्रद्धा
आणि गुरुकुळीं लाजे । जो गुरुभक्ती उमजे । विद्या घेऊनि माजे । गुरूसींचि जो ॥673॥
आणि गुरुकुळी ज्याला लाज वाटते, जो गुरुभक्तीला कंटाळतो व गुरूपासून विद्या शिकून गुरूवरच उलटतो,
674-13
तयाचें नाम घेणें । तें वाचे शूद्रान्न होणें । परी घडलें लक्षणें । बोलतां इयें ॥674॥
त्या अभक्ताचे नाव घेणे हे ब्राह्मणाच्या जिव्हेला शूद्राच्या अन्नाच्या स्पर्शाप्रमाणे आहे. पण काय करावे? अज्ञानाची लक्षणे सांगताना त्या अभक्ताचे नाव घेणे भाग पडले.
675-13
आता गुरुभक्तांचें नांव घेवो । तेणें वाचेसि प्रायश्चित देवों । गुरुसेवका नांव पहा वो । सूर्यु जैसा ॥675॥
म्हणून आता गुरूच्या भक्ताचे नामस्मरण करू व त्यायोगाने वाचेस प्रायश्चित्त देऊ. गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणू काय सूर्यच आहे असे समजा.
