सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २२६ ते २५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

226-15
तैसा जंव पार्था । विवेकु नुधवी माथा । तंव अंतु नाहीं अश्वत्था । भवरूपा या ॥226॥
त्याप्रमाणे अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसाररूपी वृक्षाला अंत नाही.
227-15
वाजतें वारें निवांत। जंव न राहे जेथिंचें तेथ। तंव तरंगतां अनंत। म्हणावीचि कीं ॥227॥
जोपर्यंत वहाणारा वारा जागच्या जागी शांत रहात नाही, तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे.
228-15
म्हणौनि सूर्यु जैं हारपे । तैं मृगजळाभासु लोपे । कां प्रभा जाय दीपें । मालवलेनि ॥228॥
(ज्ञानाने अविद्या नाहीशी झाली की संसारवृक्षाचा नाश होतो.) येवढ्याकरता सूर्य जेव्हा मावळतो, तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते अथवा दिवा मालवल्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो
229-15
तैसें मूळ अविद्या खाये । तें ज्ञान जैं उभें होये । तैंचि यया अंतु आहे । एऱ्हवीं नाहीं ॥229॥
त्याप्रमाणे संसारवृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे (नाहीसे करणारे) ज्ञान उठाव करेल तेव्हाच या संसार-वृक्षाला शेवट आहे, एरवी नाही.
230-15
तेवींचि हा अनादी । ऐसी ही आथी शाब्दी । तो आळु नोहे अनुरोधी । बोलातें या ॥230॥
(संसारवृक्ष अनादि कसा?) त्याप्रमाणे हा संसारवृक्ष अनादि, (आरंभरहित) आहे असे जे म्हणतात ते म्हणणे या संसारवृक्षावर आरोप नाही तर एका दृष्टीने ते म्हणणे या संसारवृक्षाच्या अनादित्वास अनुसरून आहे.

231-15
जें संसारवृक्षाच्या ठायीं । साचोकार तंव नाहीं । मा नाहीं तया आदि काई । कोण होईल? ॥231॥
कारण की संसारवृक्ष तर स्वरूपाने खरा नाही. तर मग जो (स्वरूपाने खरा) नाही त्याला कोणी आरंभ असेल काय?
232-15
जो साच जेथूनि उपजे । तयातें आदि हें साजे । आतां नाहींचि तो म्हणिजे । कोठूनियां? ॥232॥
जो खरोखर जेथून (कोठून तरी) उत्पन्न होतो त्याला आरंभ आहे हे म्हणणे शोभते. आता जो स्वरूपेकरून नाहीच, त्याचा आरंभ कोठून म्हणावयाचा?
233-15
म्हणौनि जन्मे ना आहे । ऐसिया सांगों कवण माये । यालागीं नाहींपणेंचि होये । अनादि हा ॥233॥
म्हणून जो उत्पन्न होत नाही व ज्याला अस्तित्व नाही, तशाला कोण आई आहे म्हणून सांगू? {अर्थात त्याचा आरंभ काय सांगावयाचा?}
234-15
वांझेचिया लेंका । कैंची जन्मपत्रिका । नभीं निळी भूमिका । कें कल्पूं पां ॥234॥
वांझेच्या मुलाला जन्मपत्रिका कोठची? आकाशात निळी जमीन कोठे कल्पावयाची?
235-15
व्योमकुसुमांचा पांडवा । कवणें देंठु तोडावा । म्हणौनि नाहीं ऐसिया भवा । आदि कैंची? ॥235॥
अर्जुना आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडावा? म्हणून स्वरूपेकरून जो नाही, अशा संसाराला आरंभ कसला?

236-15
जैसें घटाचें नाहींपण । असतचि असे केलेनिवीण । तैसा समूळ वृक्षु जाण । अनादि हा ॥236॥
ज्याप्रमाणे घटाचा नाहीपणा (प्रागभाव) हा कोणी उत्पन्न केल्याशिवाय आहेच आहे, त्याप्रमाणे हा संपूर्ण संसारवृक्ष अनादि आहे असे समज.
237-15
अर्जुना ऐसेनि पाहीं । आद्यंतु ययासि नाहीं । माजीं स्थिती आभासे कांहीं । परी टवाळ ते ॥237॥
(संसारवृक्षाचे भासणे मिथ्या आहे तरी भासतो) अर्जुना याप्रमाणे पहा की या संसारवृक्षाला आदि व अंत नाही, मध्ये स्थितीकाली तो काही भासत आसतो पण ते त्याचे भासणे मिथ्या आहे.
238-15
ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रींही कीर न रिगे । माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें ॥238॥
ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि शेवटी खरोखर समुद्रासही मिळत नाही तरी मध्येच मृगजळ दिसते.
239-15
तेसा आद्यंती कीर नाहीं । आणि साचही नोहे कहीं । परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥239॥
त्याप्रमाणे हे अर्जुना, संसारवृक्ष आरंभी व अंती खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही. परंतु खोटेपणाचे नवल असे आहे की तो नसून भासतो.
240-15
नाना रंगीं गजबजे । जैसें इंद्रधनुष्य देखिजे । तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ॥240॥
ज्याप्रमाणे अनेक रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते, त्याप्रमाणे अज्ञान्याला हा संसारवृक्ष आहे असे भासते.

241-15
ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे । लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ॥241॥
अशा रीतीने स्थितीकाली हा संसारवृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवतो. तो कसा तर जसा बहुरूपी हा कफनी धारण करून (साधूची सोंगे आणून) लोकांना फसवतो तसा.
242-15
आणि नसतीचि श्यामिका । व्योमीं दिसे तैसी दिसो कां । तरी दिसणेंही क्षणा एका । होय जाय ॥242॥
आणि नसलेलाच निळेपणा आकाशात दिसतो, तसा दिसेना का? तरी ते दिसणेही एका क्षणात होते व जाते.
243-15
स्वप्नींही मानिलें लटिकें । तरी निर्वाहो कां एकसारिखें । तेवीं आभासु हा क्षणिकें । रिताचि गा ॥243॥
स्वपनातील खोटे पदार्थ वस्तुत: नाहीत, तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी एकसारखे टिकतात का? तर टिकत नाहीत. (ते जसे क्षणिक भासणारे आहेत) तशा क्षणिक भासणार्‍या पद्धतीचा हा संसारवृक्षाचा आभास आहे.
244-15
देखतां आहे आवडें । घेऊं जाइजे तरी नातुडे । जैसा टिकु कीजे माकडें । जळामाजीं ॥244॥
आपले पाण्यात दिसणारे प्रतिबिंब धरण्याकरता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे, (तरी पण ते प्रतिबिंब त्यास सापडत नाही) त्याप्रमाणे हा संसारवृक्षाचा भास पाहिला असता आहे असा वाटतो आणि त्यास धरावयास गेले तर (म्हणजे विचाराने त्याचे अस्तित्व पाहू गेले तर) तो सापडत नाही.
245-15
तरंगभंगु सांडीं पडे । विजूही न पुरे होडे । आभासासि तेणें पाडें । होणें जाणें गा ॥245॥
बा अर्जुना, लाटांचे होणे व जाणे (ह्या संसारभासाच्या होण्या-जाण्याच्या उपमेला) कमी पडते. विजेचा उदयास्त जरी अती त्वरित असतो तरी वीज देखील याच्या बरोबरीला येत नाही, तितक्या मानाने (त्वरेने) संसारभासाचे होणे-जाणे आहे.

246-15
जैसा ग्रीष्मशेषींचा वारा । नेणिजे समोर कीं पाठीमोरा । तैसी स्थिती नाहीं तरुवरा । भवरूपा यया ॥246॥
ज्याप्रमाणे ग्रीष्मांतीचा वारा हा समोरून वाहतो की पाठीमागून वहातो हे कळत नाही (त्याची स्थिती जशी एकच नसते) त्याप्रमाणे या संसाररूपी श्रेष्ठ वृक्षाला स्थितीकाली एकच अवस्था नाही, म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचे स्थित्यंतर होते. म्हणजे संसाराला स्थितीही नाही.
247-15
एवं आदि ना अंतु स्थिती । ना रूप ययासि आथी । आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ॥247॥
याप्रमाणे संसारवृक्षाला आदि, अंत व स्थिती ही नाहीत व याला रूपही नाही. आता असे जर आहे तर हे अर्जुना, याला उपटून टाकण्यात श्रम ते काय?
248-15
आपुलिया अज्ञानासाठीं । नव्हता थांवला किरीटी । तरी आतां आत्माज्ञानाच्या लोटीं । खांडेनि गा ॥248॥
या संसारवृक्षाच्या नाशाचा उपाय म्हणजे आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार
अर्जुना हा नसलेला वृक्ष (केवळ) आपल्या अज्ञानामुळे बळावला आहे. तर आता त्याला आत्मज्ञानरूपी दुधारी तलवारीने नाहीसा कर.
249-15
वांचूनि ज्ञानेवीण ऐकें । उपाय करिसी जितुके । तिहीं गुंफसि अधिकें । रुखीं इये ॥249॥
याशिवाय एका ज्ञानावाचून त्याच्या नाशाकरता जितके उपाय तू करशील त्यांच्या त्या उपायांच्या योगाने तू या संसारवृक्षात अधिक अडकशील.
250-15
मग किती खांदोखांदीं । यया हिंडावें ऊर्ध्वीं अधीं । म्हणौनि मूळचि अज्ञान छेदीं । सम्यक् ज्ञानें ॥250॥
मग या संसारवृक्षाच्या फांद्या-फांद्यांनी खाली व वर किती फिरावे? त्या फिरण्याला अंतच नाही. म्हणून या संसारवृक्षाचे अज्ञानरूपी मूळच यथार्थज्ञानाने तोडून टाक.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *