सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

326-13
कां अभ्रापैलीकडे । जैं येत चांदिणें कोडें । तैं चकोरें चांचुवडें । उचलितीना ॥13-326॥
किंवा ढगामधून ज्या वेळेला चांदणे येते त्यावेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपभोग घेण्याकरता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाहीत.
327-13
तैसें तुम्ही वास न पाहाल । ग्रंथु नेघा वरी कोपाल । जरी निर्विवाद नव्हैल । निरूपण ॥13-327॥
त्याप्रमाणे जर माझे निरूपण निर्विवाद (शंकारहित) होणार नाही, तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक असणार नाही व ग्रंथाचा स्वीकार करणार नाही, इतकेच नव्हे तर शिवाय आणखी तुम्ही रागवाल.
328-13
न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें । तें व्याख्यान जी तुमतें । जोडूनि नेदी ॥13-328॥
निरनिराळ्या मतांचे निराकरण न करता जर अहिंसेचे व्याख्यान केले तर त्या व्याख्यानात आक्षेपांचा संबंध दूर होणार नाही. (त्यामधे शंकेच्या पुष्कळ जागा रहातील) व महाराज तसले व्याख्यान मला तुमची प्राप्ती होऊ देणार नाही.
329-13
आणि माझें तंव आघवें । ग्रथन येणेचि भावें । जे तुम्हीं संतीं होआवें । सन्मुख सदां ॥13-329॥
आणि माझे ग्रंथ रचणे याच हेतूने आहे की तुम्ही संतांनी नेहेमी प्रसन्न असावे.
330-13
एऱ्हवीं तरी साचोकारें । तुम्ही गीतार्थाचे सोइरे । जाणोनि गीता एकसरें । धरिली मियां ॥13-330॥
श्रोत्यांची स्तुती =
सहज विचार करून पाहिले तर तुम्ही खरोखर गीतार्थाचे चाहते आहात, असे समजून मी गीतेचा आश्रय केला, तिला जीवासारखी प्रिय मानून तिचे व्याख्यान करू लागलो.


331-13
जें आपुलें सर्वस्व द्याल । मग इयेतें सोडवूनि न्याल । म्हणौनि ग्रंथु नव्हे वोल । साचचि हे॥331॥
जी आपली सर्व मालमत्ता (पूर्ण कृपा) आहे ती द्याल व हिला गीतेला सोडवून न्याल, म्हणून गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर माझ्याजवळ तुमचे तारण आहे.
332-13
कां सर्वस्वाचा लोभु धरा । वोलीचा अव्हेरु करा । तरी गीते मज अवधारा । एकचि गती॥332॥
अथवा तुम्ही आपल्या सर्वस्वाचा लोभ धराल व तारणाचा अव्हेर कराल तर गीतेची व माझी एकच गती आहे असे समजा.
333-13
किंबहुना मज । तुमचिया कृपा काज । तियेलागीं व्याज । ग्रंथाचें केलें॥333॥
फार काय सांगावे? मला तुमच्या कृपेशी काम आहे व या कृपेकरता मी हे ग्रंथाचे निमित्त केले.
334-13
तरी तुम्हां रसिकांजोगें । व्याख्यान शोधावें लागे । म्हणौनि जी मतांगें । बोलों गेलों॥334॥
तरी तुम्ही जे रसिक त्या तुम्हा योग्य व्याख्यान योजावे लागले, म्हणून माझ्याकडून अन्य मतांची चर्चा झाली.
335-13
तंव कथेसि पसरु जाहला । श्लोकार्थु दूरी गेला । कीजो क्षमा यया बोला । अपत्या मज ॥335॥
तो व्याख्यानाचा विस्तार झाला, श्लोकाचा अर्थ एकीकडे राहिला, या माझ्या बोलण्याबद्दल मला लेकराला आपण क्षमा करावी.


336-13
आणि घांसाआंतिल हरळु । फेडितां लागे वेळु । ते दूषण नव्हें खडळु । सांडावा कीं ॥336॥
आणि (जेवीत असताना) घासातील खडा काढताना वेळ लागतो, तर जेवणार्‍याला तो घासातील खडा काढण्याला वेळ लागला व आपले जेवण आटोपण्यास उशीर केला तर त्यात जेवणार्‍याचा दोष नाही, कारण घासातील खडे वगैरे कचरा काढून टाकलाच पाहिजे.
337-13
कां संवचोरा चुकवितां । दिवस लागलिया माता । कोपावें कीं जीविता । जिताणें कीजे? ॥337॥
अथवा सोबतीच्या संभावित चोराला चुकवून आल्यामुळे घरी येण्यास मुलाला जास्त दिवस लागले तर आईने मुलावर रागवावे किंवा तो जिवंत घरी आला म्हणून त्याच्यावरून मीठमोहर्‍या वगैरे ओवाळून त्याची दृष्ट काढावी!
338-13
परी यावरील हें नव्हे । तुम्हीं उपसाहिलें तेंचि बरवें । आतां अवधारिजो देवें । बोलिलें ऐसें ॥338॥
परंतु हे माझे बोलणे वरच्यासारखे (शाबासकी देण्यासारखे) नाही, तर माझे बोलणे पाल्हाळाचे होते व ते तुम्ही सहन केले हे म्हणणेच बरे. तर आता महाराज, ऐका. देव असे बोलले.
339-13
म्हणे उन्मेखसुलोचना । सावध होईं अर्जुना । करूं तुज ज्ञाना । वोळखी आतां ॥339॥
भगवान म्हणतात, हे ज्ञानरूपी उत्तमदृष्टी असणार्‍या अर्जुना, आता तुला ज्ञानाचा उत्तम परिचय करून देतो, तू इकडे लक्ष दे.
340-13
तरी ज्ञान गा तें एथें । वोळख तूं निरुतें । आक्रोशेंवीण जेथें । क्षमा असे॥340॥
तर जेथे चरफडल्याशिवाय क्षमा असेल तेथे ज्ञान आहे, हे तू पक्के ओळख.


341-13
अगाध सरोवरीं । कमळिणी जियापरी । कां सदैवाचिया घरीं । संपत्ति जैसी ॥341॥
?ञफार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल (विपुल वाढतात) अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ती (अलोट येत असते),
342-13
पार्था तेणें पाडें । क्षमा जयातें वाढे । तेही लक्षे तें फुडें । लक्षण सांगों ॥342॥
अर्जुना, त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते तेही ज्या लक्षणांपासून कळते, ती लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो.
343-13
तरी पढियंते लेणें । आंगीं भावें जेणें । धरिजे तेवीं साहणें । सर्वचि जया ॥343॥
ज्या भावनेने आवडता अलंकार धारण करतात, त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो.
344-13
त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवांचे मेळावे । वरी पडिलिया नव्हे । वांकुडा जो ॥344॥
आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तीन प्रकारच्या तापांचे समुदाय आहेत, ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले तथापि जो डगमगत नाही.
345-13
अपेक्षित पावे । तें जेणें तोषें मानवें । अनपेक्षिताही करवे । तोचि मानु ॥345॥
इच्छा असलेली एखादी वस्तू मिळाली असता जेवढा संतोष होतो, तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिचा आदर करतो.

346-13
जो मानापमानातें साहे । सुखदुःख जेथ सामाये । निंदास्तुती नोहे । दुखंडु जो ॥346॥
जो मान व अपमान (मनाच्या सारख्या स्थितीने) सहन करतो व सुखदु:खे ही ज्याच्या ठिकाणी सामावली जातात, (सारखी मानली जातात) व निंदा आणि स्तुतीने ज्याच्या मनाची स्थिती दोन प्रकारची (सुखाची व दु:खाची) होत नाही.
347-13
उन्हाळेनि जो न तपे । हिमवंती न कांपे । कयसेनिही न वासिपे । पातलेया ॥347॥
उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाने जो कापत नाही आणि काही जरी प्राप्त झाले तरी जो भीत नाही.
348-13
स्वशिखरांचा भारु । नेणें जैसा मेरु । कीं धरा यज्ञसूकरु । वोझें न म्हणे ॥348॥
मेरु पर्वत आपल्या शिखराचे जसे ओझे मानीत नाही अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे म्हणत नाही,
349-13
नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती । तैसा नाना द्वंद्वीं प्राप्तीं । घामेजेना ॥349॥
ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही, त्याप्रमाणे नाना प्रकारची सुखदु:खादि द्वंद्वे प्राप्त झाली असता जो श्रमी होत नाही.
350-13
घेऊनी जळाचे लोट । आलिया नदीनदांचे संघाट । करी वाड पोट । समुद्र जेवीं ॥350॥
पाण्याचे लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्यात सर्वांचा समावेश करुन घेतो,

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *