सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

51-12
मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारीं केला उभा । तया चोजवलें प्रभा । निमथावरी ॥51॥
आणि मग, त्याच वज्राग्नीच्या प्रखर उष्णतेने तेजस्वी झालेल्या कुंडलिनीशक्तीचा टेंभा, आधारचक्रावर उभा करून, त्याच्या योगाने ब्रह्मरंध्रापर्यंतचा सुषुम्नानाडीचा मार्ग ज्यांनी प्रकाशित केला,
52-12
नवद्वारांचिया चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी । उघडिली खिडकी । ककारांतींची ॥52॥
शरीराच्या नवद्वारांच्या कवाडांना निग्रहाची खीळ घालून, ककारांतीची खिडकी (म्हणजे ह्रदयापासून ब्रह्मरंध्रिपर्यंत गेलेल्या सुषुम्नानाडीचे शेवटील द्वार) उघडी केली.
53-12
प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे । मनोमहिषाचेनि मुंडें । दिधलीं बळी ॥53॥
प्राणशक्ति हीच कोणी चामुंडादेवी, तिला संकल्परूपी मेंढे मारून मनोरूपी महिषासुराच्या मुंडक्यासह बळी दिले. (प्राणशक्तीने सुषुम्नानाडीत प्रवेश करून तिची ऊर्ध्व ब्रह्मरंध्राकडे गति होऊ लागली असता, मन व मनाचे संकल्प विकल्प हे संपूर्ण नाहीसे होतात असा अर्थ)
54-12
चंद्रसूर्यां बुझावणी । करूनि अनुहताची सुडावणी । सतरावियेचें पाणी । जिंतिलें वेगीं ॥54॥
इडा, पिंगळा यांचे ऐक्य करून व अनाहतनादाला स्पष्ट करून, सतराव्या कलेचे अमृतरूप पाणी वेगात प्राप्त करून घेतले. (चंद्र किंवा इडा नाडी, ही डाव्या नाकपुडीच्या ठिकाणी असून, त्या नाडीवाटे डाव्या नाकपुडीतील वायू वाहत असतो. सूर्य किंवा पिंगळा नाडी, ही उजव्या नाकपुडीच्या ठिकाणी असून, त्या नाडीचे द्वारा उजव्या नाकपुडीतून वायू वाहत असतो. इडा, पिंगळा या नाड्यांचा निग्रह करून – म्हणजे त्यांना आपापल्या नाडीतून वाहू न दिले असता- त्यांची बुझावणी म्हणजे ऐक्य होते. असे ऐक्य झाले असता ह्रदयातील अनाहतनादही स्पष्ट ऐकू येऊ लागतो व सतराव्या कलेचे अमृतपान होते.
या भूमिकेवर योग्याच्या सूक्ष्म किंवा लिंगदेहाचे निरसन होतें.)
55-12
मग मध्यमा मध्य विवरें । तेणें कोरिवें दादरें । ठाकिलें चवरें । ब्रह्मरंध्र॥55॥
मग मध्यमा – म्हणजे प्राण व अपान या दोन नाड्यांच्या मध्ये असणारी जी सुषुम्ना नाडी – हेच कोणी विवर, त्या विवरांत असणार्‍या षट्चक्रांच्या पाकळ्या व मात्रा यांनी कोरलेल्या जिन्याने, ज्यांनी सर्वांच्या शेवटी असलेले ब्रह्मरंध्र गाठले.


56-12
वरी मकारांत सोपान । ते सांडोनिया गहन । काखे सूनियां गगन । भरले ब्रह्मीं ॥56॥
मग, मकारान्त म्हणजे धन – अज्ञानसुषुप्तिरूप जो कारण देह – हीच कोणी पायरी – ही बिकट पायरी ओलांडून, आकाशही काखेत मारून, योगी ब्रह्मरूपाशी ऐक्य पावतो.
57-12
ऐसे जे समबुद्धी । गिळावया सोऽहंसिद्धी । आंगविताती निरवधी । योगदुर्गें ॥57॥
अशा रीतीने जे समबुद्धी म्हणजे ब्रह्मबुद्धी होतात, ते “मी ब्रह्म आहे.” ही आपली सोहंसिध्दिची जाणीव नाहीशी करण्याकरिता- म्हणजे मूळची जाणीवरहित स्थिती प्राप्त होण्याकरिता -बिकट योगरूपी किल्ले स्वाधीन ठेवण्याचा अखंड – म्हणजे मरेपर्यंत प्रयत्न करतात.
(ब्रह्मज्ञान्याला योगाभ्यासाचे मरेतोपर्यंत अखंड कष्ट करून, सोहंसिध्दीची जाणीव, समाधीने नाहीशी करावी लागते, तेव्हा ते मरणानंतर जाणीवनेणीवरहित अशा निर्विकल्प विदेहमुक्तीला प्राप्त होतात. पण इतके कष्ट करूनही प्रकृतीआधीन जीवाला, योगाने किल्ले स्वाधीन करून घेणे अत्यंत दुष्कर असल्यामुळे, अमुक अवधीत ते स्वाधीन होतील असे मुळीच सांगता येत नाही, हे माऊलिंनी “आंगविताति निरवधि” या पदाने दाखविले आहे.)
58-12
आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठीं । तेही मातेंचि किरीटी । पावती गा ॥58॥
जे योगी, आपला जीवभाव निशेःष नाहीसा करून, त्याच्या मोबदल्यात तात्काळ शून्यस्वरूप अशी निर्विकल्प ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतात, तेही अर्जुना ! भक्तांप्रमाणे मलाच प्राप्त होतात.
59-12
वांचूनि योगचेनि बळें । अधिक कांहीं मिळे । ऐसें नाहीं आगळें । कष्टचि तया ॥59॥
माझ्या प्राप्तीवाचून योगाने योगाभ्यासाच्या बळावर योग्यांना काही प्राप्त होते असे नाही. भक्तांपेक्षा योग्यांना एका कष्टाचीच अधिक प्राप्ती असते.
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥12.5॥

अर्थ अव्यक्त ब्रह्माचे ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश असतो. कारण देहधार्‍यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो.॥12-5॥
60-12
जिहीं सकळ भूतांचिया हितीं । निरालंबीं अव्यक्तीं । पसरलिया आसक्ती । भक्तीवीण ॥60॥
जे कोणी सगुण स्वरूपाच्या भक्तिवाचून, सर्व प्राणिमात्रांचे एकसमान कल्याणरूप किंवा सुखरूप असणारे, चित्ताचे आलंबन न होणारे, इंद्रियातीत असे जे परब्रह्म, त्याच्या प्राप्तीची मनात तीव्र इच्छा धारण करतात.


61-12
तयां महेन्द्रादि पदें । करिताति वाटवधें । आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें । पाडोनि ठाती ॥61॥
त्यांना महेंद्रादि देव, त्यांच्या परमार्थमार्गात वाटमारेपणा करतात – म्हणजे त्यांच्या ठिकाणी इंद्रादिपदाच्या प्राप्तीची इच्छा उत्पन्न करून परमेश्वरप्राप्तीपासून भ्रष्ट करतात – आणि ऋध्दिसिध्दीच्या जोड्या प्राप्त होऊन त्यांच्या परमार्थाच्या आड येतात – म्हणजे ऋध्दिसिध्दी त्यांना प्राप्त होऊन त्या सुखात ते गुंतून पडतात.
62-12
कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग । आणि शून्येंसीं आंग । झुंजवावें कीं ॥62॥
कामक्रोधादी विकारांचे अनेक उपद्रव चित्तात उठावणी करतात आणि त्यांचा प्रतिकार करणे म्हणजे शून्याशीच शरीराने भांडण्यासारखे आहे.
63-12
ताहानें ताहानचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी । अहोरात्र वावीं । मवावा वारा ॥63॥
किंवा तहान लागलेल्या पुरुषाने तहान पिऊनच तहान शमवावी, भूक लागलेल्या पुरुषाने अन्न न खाता भूक खाऊनच तृप्ती मानावी, किंवा वारा मोजू पाहणार्‍यांनी अहोरात्र दोन्ही हात पसरून ठेवूनच तो मोजावा.
64-12
उनी दिहाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें । झाडासि साजणें । चाळावें गा ॥64॥
किंवा जगण्यातच निद्रेचे सुख मानावे, इंद्रियनिग्रहातच इंद्रियाचे सुख मानावे व झाडाशी सख्य करून मैत्रीचे सुख भोगावे.
65-12
शीत वेढावें । उष्ण पांघुरावें । वृष्टीचिया असावें । घरांआंतु ॥65॥
शीताचे वेष्टन करायचे, उष्णताच पांघरायची आणि पावसाच्या घरात राहायचे (अशासारखे योगसुख आहे)


66-12
किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीच नवा । भातारेंवीण करावा । तो हा योगु ॥66॥
किंबहुना अर्जुना ! हा योग म्हणजे पतीवाचून करावा लागणारा नित्य नवा अग्निप्रवेश आहे.
67-12
एथ स्वामीचें काज । ना वापिकें व्याज । परी मरणेंसीं झुंज । नीच नवें ॥67॥
य️ येथे पतीच्या उद्धाराचे किंवा पित्याच्या उद्धाराचे निमित्त नाही. पण मरणाशी नित्य युध्द करावे लागते.
68-12
ऐसें मृत्यूहूनि तीख । कां घोंटे कढत विख । डोंगर गिळितां मुख । न फाटे काई? ॥68॥
किंवा असे हे योगाचे कष्ट, अत्यंत कढत विष पिण्यासारखे मृत्यूच्या दुःखापेक्षाही तीव्र आहे. डोंगर गिळला असता मुख फाटणार नाही काय?
69-12
म्हणौनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥69॥
हे उत्तम योद्ध्या अर्जुना ! जे योगमार्गाचा अभ्यास करण्याला निघाले, त्यांच्या वाट्याला नुसते दुःखच आले.
70-12
पाहें पां लोहाचे चणे । जैं बोचरिया पडती खाणें । तैं पोट भरणें कीं प्राणें । शुद्धी म्हणों ॥70॥
अर्जुना ! विचार कर. बोचर्‍या (दंतहीन) माणसाला लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग आला असता, ते त्याचे पोट भरणे म्हणावे लागेल की प्राणे-म्हणजे प्राणांतिक प्रायश्चित्त घेऊन-शुध्द होणे म्हणावे लागेल.


71-12
म्हणौनि समुद्र बाहीं । तरणे आथि केंही । कां गगनामाजीं पाईं । खोलिजतु असें ?॥71॥
म्हणून हाताने समुद्र तरणे किंवा पायाने आकाशात चालणे कधी तरी होईल काय?
72-12
वळघलिया रणाची थाटी । आंगीं न लागतां कांठी । सूर्याची पाउटी । कां होय गा ॥72॥
हे अर्जुना ! युध्दाला सज्ज झालेल्यांना रणांगणात उतरल्यानंतर शरीराला काठीचा देखील प्रहार न लागता (स्वर्गप्राप्तीकरिता) सूर्यमंडळाची प्राप्ती होईल काय?
73-12
यालागीं पांगुळा हेवा । नव्हे वायूसि पांडवा । तेवीं देहवंता जीवां । अव्यक्तीं गति ॥73॥
म्हणून अर्जुना ! ज्याप्रमाणे पांगळा मनुष्य, वायुशी गतीत स्पर्धा करू शकत नाही, त्याप्रमाणे देहधारी जीवाला निराकार इंद्रियातित अशा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणे अत्यंत कठीण आहे.
74-12
ऐसाही जरी धिंवसा । बांधोनियां आकाशा । झोंबती तरी क्लेशा । पात्र होती ॥74॥

असे असूनही, आकाशासारख्या शून्यरूप निराकार परब्रह्माशी झोंबण्याचे धैर्य धरलेच, तर ते क्लेशालाच प्राप्त होतात.
75-12
म्हणौनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा । जे कां भक्तिपंथा । वोटंगले ॥75॥
म्हणून, अर्जुना ! दुसरे जे सगुण भगवंताच्या भक्तिमार्गाचा अवलंब करतात, त्यांना असे दुःख भोगण्याचा प्रसंगच येत नाही.
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥12.6॥

अर्थ पण हे पार्था, जे सर्व कर्मे मला अर्पण करून मत्पर होऊन अनन्य योगाने (भक्तीने) माझे ध्यान करीत उपासना करतात॥12-6॥

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *