101-12
उचललेया प्राणासरिसीं । इंद्रियेंही निगती जैसीं । तैसा मनोबुद्धिपाशीं । अहंकारु ये ॥101॥
किंवा ज्याप्रमाणे प्राण निघून गेल्याबरोबर इंद्रियेही प्राणाबरोबर निघून जातात, त्याप्रमाणे मन व बुद्धी जेथे जडतात तेथेच अहंकारही राहतो.
102-12
म्हणौनि माझिया स्वरूपीं । मनबुद्धि इयें निक्षेपीं । येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी ॥102॥
म्हणून माझ्या स्वरूपाचे ठिकाणी (अर्जुना!) आपली मनबुद्धी लाव म्हणजे एवढ्यानेच सर्वव्यापी असा जो मी तोच तू होशील.
103-12
यया बोला कांहीं । अनारिसें नाहीं । आपली आण पाहीं । वाहतु असें गा ॥103॥
हे माझे बोलणे यत्किंचितही अन्यथा नाही, हे मी आपली शपथ वाहून सांगतो.
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनन्जय ॥12.9॥
अर्थ अथवा हे धनंजया माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला असमर्थ असलास तर (चित्तैकाग्रतेचा अथवा ध्यानाचा) अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्य़ाची इच्छा कर.॥12-9॥
104-12
अथवा हें चित्त । मनबुद्धिसहित । माझ्यां हातीं अचुंबित । न शकसी देवों ॥104॥
किंवा मनबुद्धीसहित हे चित्त जर एकदम माझ्या स्वाधीन करू शकत नसलास
105-12
तरी गा ऐसें करीं । यया आठां पाहारांमाझारीं । मोटकें निमिषभरी । देतु जाय ॥105॥
तर, हे अर्जुना! असे कर की, या चोवीस तासांमध्ये घटकाभर थोडेसे माझ्याकडे चित्त लावण्याचा प्रयत्न करत जा.
106-12
मग जें जें कां निमिख । देखेल माझें सुख । तेतुलें अरोचक । विषयीं घेईल॥106॥
मग असा प्रयत्न करीत असता, माझे सुख अनुभविण्यात जसा जसा क्षण जाईल तसा तसा चित्ताला विषयसुखाचा कंटाळा येत जाईल.
107-12
जैसा शरत्कालु रिगे । आणि सरिता वोहटूं लागे । तैसें चित्त काढेल वेगें । प्रपंचौनि ॥107॥
ज्याप्रमाणे शरदऋतूला प्रारंभ झाला असता नद्यांचे पाणी ओसरू लागते, त्याप्रमाणे विषयसुखाचा वीट येता येता, तुझे चित्त विषयसुखातून वेगाने निघेल.
108-12
मग पुनवेहूनि जैसें । शशिबिंब दिसेंदिसें । हारपत अंवसे । नाहींचि होय ॥108॥
मग ज्याप्रमाणे चंद्रबिंब, पौर्णिमेपासून दिवसेंदिवस कमी होत होत अमावास्येला नाहीसे होते.
109-12
तैसें भोगाआंतूनि निगतां । चित्त मजमाजीं रिगतां । हळूहळू पंडुसुता । मीचि होईल ॥109॥
त्याप्रमाणे चित्त विषयसुखाच्या वासनेतून क्रमाने निघून, माझ्या ठिकाणी प्रविष्ट होऊ लागले असता अर्जुना! तू हळूहळू मीच होशील.
110-12
अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे । येणें कांहीं न निपजे । ऐसें नाहीं ॥110॥
बा अर्जुना! ज्याला अभ्यासयोग म्हणतात, तो हाच होय, असे जाण. या अभ्यासयोगाने प्राप्त होत नाही असे काहीही नाही.
111-12
पैं अभ्यासाचेनि बळें । एकां गति । अंतराळे । व्याघ्र सर्प प्रांजळे । केले एकीं ॥111॥
कारण अभ्यासाच्या बळाने कोणी आकाशगामी झाले. कोणी व्याघ्र, सर्प अशा दुष्ट प्राण्यांना सुस्वभावी केले
112-12
विष कीं आहारीं पडे । समुद्रीं पायवाट जोडे । एकीं वाग्ब्रह्म थोकडें । अभ्यासें केलें ॥112॥
अभ्यासाने विषही आहार होऊ शकते, समुद्रावरूनही पायवाटाप्रमाणे चालता येते. कोणी अभ्यासाच्या बळाने वेदादिशास्त्रे मुखोद्गत केली.
113-12
म्हणौनि अभ्यासासी कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं । यालागी माझ्या ठायीं । अभ्यासें मीळ ॥113॥
याप्रमाणे अभ्यासाला काहीही असाध्य नाही; म्हणून अभ्यासाने माझी प्राप्ती होऊ शकते
श्लोक अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥12.10॥
अर्थ अभ्यासयोगाला देखील असमर्थ असलास, तर सर्वस्वी माझ्याकरता कर्मे करणारा हो. माझ्याकरता कर्मे केलीस तरी देखील तू सिद्धी मिळवशील.
(भक्तीयोग = मार्ग 3 रा माझ्या करता कर्मे कर. मला कर्मे अर्पण कर)
114-12
कां अभ्यासाही लागीं । कसु नाहीं तुझिया अंगीं । तरी आहासी जया भागीं । तैसाचि आस ॥114॥
किंवा हा अभ्यास करण्याचेही तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर तुझी क्षात्र-प्रकृती या गुणभागाची बनली असेल तशा प्रकृतीतच तू राहा.
115-12
इंद्रियें न कोंडीं । भोगातें न तोडीं । अभिमानु न संडीं । स्वजातीचा ॥115॥
इंद्रियांचा निग्रह करू नकोस, विषयभोगाचा त्यागही करू नकोस व आपल्या जातीचाही अभिमान सोडू नकोस.
116-12
कुळधर्मु चाळीं । विधिनिषेध पाळीं । मग सुखें तुज सरळी । दिधली आहे ॥116॥
कुलपरंपरागत धर्माचे आचरण कर. अमुक कर व अमुक करू नकोस, असे जे शास्त्र तुला सांगितले असेल, त्या विधिनिषेधांचे पालन कर. याप्रमाणे तुला वागण्याची सुखाने मोकळीक दिली आहे.
117-12
परी मनें वाचा देहें । जैसा जो व्यापारु होये । तो मी करीतु आहें । ऐसें न म्हणें ॥117॥
पण मन – वाचा – शरीर यांच्याकडून जसा व जो व्यापार होईल, तो मी करीत आहे, असे मात्र म्हणू नकोस- म्हणजे असे तुझ्या चित्तात उठता कामा नये.
118-12
करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥118॥
अद्वैत व पूर्ण सच्चिदानंदस्वरूप परमात्म्यावरच कर्म स्फुरत असल्यामुळे, उत्पन्न होणार्या कर्माच्या पूर्वी, कर्मांत व कर्माच्या शेवटी तोच असतो. त्याच्याच योगाने विश्वांतील सर्व घडामोडी होतात; म्हणून कर्म करणे किंवा न करणे हे त्यालाच माहीत (असे समजावे).
119-12
उणयापुरेयाचें कांहीं । उरों नेदी आपुलिया ठायीं । स्वजाती करूनि घेईं । जीवित्व हें ॥119॥
हे कर्म उणे झाले की पुरे झाले असे काही मनात राहु देऊ नकोस. आपले जीवत्व म्हणजे जीवन सजात म्हणजे केवळ कर्माच्या जातीचे किंवा केवळ कर्मरूपच करून घे.
120-12
माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेलें । तया पाणिया ऐसें केलें । होआवें गा ॥120॥
जसें पाणी, माळी जिकडे नेतो तिकडे ते शांतपणे जाते, त्या पाण्याप्रमाणे तू आपले कर्म होऊ दे.
121-12
म्हणौनि प्रवृत्ति आणि निवृत्ती । इयें वोझीं नेघे मती । अखंड चित्तवृत्ती । माझ्या ठायीं ॥121॥
म्हणून मी कर्म करतो आणि मी कर्म करीत नाही, असे दोन्ही प्रवृत्ति-निवृत्तिरूप कर्माचे ओझे बुद्धीत वागवू नकोस, म्हणजे कल्पनारहित झालेली चित्तवृत्ती माझे ठिकाणीच अखंड राहील.
122-12
एऱ्हवीं तरी सुभटा । उजू कां अव्हाटां । रथु काई खटपटा । करितु असे? ॥122॥
हे उत्तम योद्ध्या अर्जुना ! रथ आपण होऊन सरळ मार्गाने किंवा आडमार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो काय?
123-12
आणि जें जें कर्म निपजे । तें थोडें बहु न म्हणिजे । निवांतचि अर्पिजे । माझ्यां ठायीं ॥123॥
आणि जे जे कर्म होत जाईल, ते थोडे झाले किंवा बहु झाले असे न म्हणता, स्वस्थ चित्ताने माझे ठिकाणी अर्पण करावे.
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥12.11॥
अर्थ माझ्या ठायी आश्रय करून, माझ्या ठिकाणी कर्मांचा संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असशील तर नियतचित्त होऊन सर्व कर्मफलांचा त्याग कर.॥12-11॥
भक्तियोग – मार्ग 4 था कर्मफलाचा त्याग कर.
124-12
ऐसिया मद्भावना । तनुत्यागीं अर्जुना । तूं सायुज्य सदना । माझिया येसी ॥124॥
हे अर्जुना ! याप्रमाणे माझी भावना करून कर्म करीत राहिले असता, देहपातानंतर तू माझ्या ऐक्यरूपी मंदिरात प्राप्त होशील.
125-12
ना तरी हेंही तूज । नेदवे कर्म मज । तरी तूं गा बुझ । पंडुकुमरा ॥125॥
अथवा पांडुकुमारा अर्जुना ! जर आपल्या कर्मकर्तृत्वाचा अहंकार सोडून तुझ्याच्याने संपूर्ण कर्म मला अर्पण करवत नसेल, तर तू अशा रीतीने मला भज.