सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

451-11
तरी मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें ॥451॥
तर अर्जुना! मी(खरोखर काळ) आहे, हें स्पष्ट जाण. सर्व लोकांचा संहार करण्यकरितां मी वाढत आहे. हीं जिकडे तिकडे सर्वत्र माझी उग्र मुखे पसरलीं असून, या सर्व विश्वाला आतां मी गिळून टाकींन.
452-11
एथ अर्जुन म्हणे कटकटा । उबगिलों मागिल्या संकटा । म्हणौनि आळविला तंव वोखटा । उवाइला हा ॥452॥
तेव्हा अर्जुन म्हणतो, अरेरे!अगोदर विश्वरूपाच्या मुखांत होत असलेल्या सर्व लोकांच्या संहाराला पाहून मी त्रस्त झालो होतो; म्हणून भगवंताची प्रार्थना केली, तों तो अधिकच निष्ठुरपणाने प्रगट झाला.
453-11
तेवींचि कठिण बोलें आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी । म्हणौनि सवेंचि म्हणे किरीटी । परि आन एक असे ॥453॥
तसेच जीवाची आशा नाहीशी करणार्‍या निष्ठूर बोलण्याने अर्जुन अत्यंत कष्टी होईल, म्हणून भगवान लगेच म्हणाले, अर्जुना!पण त्यांत दुसरे एक आहे.
454-11
तरी आतांचिये संहारवाहरे । तुम्हीं पांडव असा बाहिरे । तेथ जातजातां धनुर्धरें । सांवरिले प्राण ॥454॥
तुम्ही पांडव मात्र आतां होणार्‍या या संहाररूपी बाधेच्या बाहेर आहांत. हे ऐकताच अर्जुनाने जात असलेले प्राण सावरले
455-11
होता मरणमहामारीं गेला । तो मागुता सावधु जाहला । मग लागला बोला । चित्त देऊं ॥455॥
अर्जुन मरणाच्या महामारीत सापडला होता; पण भगवंताच्या अश्वासनाने पुनः देहावर आला आणि मग भगवंताच्या बोलण्याकडे चित्त देऊं लागला.


456-11
ऐसें म्हणिजत आहे देवें । अर्जुना तुम्ही माझें हें जाणावें । येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं ॥456॥
देव असे म्हणूं लागले की,अर्जुना! तुम्ही माझे आहांत, हे लक्षात असूं दे. बाकीच्या सर्वांना ग्रासण्याकरीतां मी प्रवृत्त झालो आहे.
457-11
वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसें जग हें माझिया तोंडीं । तुवां देखिलें जें ॥457॥
प्रलयकालाच्या अग्निमध्ये, ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा, त्याप्रमाणे हे संपूर्ण जग, माझ्या तोंडात जात आहे, हें जें तू पाहिलेस
458-11
तरी तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं । इये वायांचि सैन्यें पाहीं । बरवतें आहाती ॥458॥
त्यांत तर यत्किंचितहि अन्यथा होणार नाही. दोन्हीकडील सैन्ये व्यर्थच आपल्या पराक्रमाची फुशारकी मारत आहेत.
459-11
ऐसा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा । वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥459॥
असे हे सैन्याचे मिळालेले समुदाय, पराक्रमाचे बळ आणून कुंथुं लागले आहेत आणि यमापेक्षाहि आमचे गजदळ श्रेष्ठ आहे अशी त्याची प्रशंसा करतात.
460-11
हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें । यमावरी गजदळें । वाखाणिजताती ॥460॥
हे म्हणतातकी,यासृष्टीवर दुसरीसृष्टि निर्माणकरूं.पैजबांधून मृत्युलामारू आणि या सर्व जगाचा घोट भरूं.


461-11
म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं । आणि जगाचा भरूं । घोंटु यया ॥461॥
सर्व पृथ्वी गिळूं. वरच्यावरच आकाश जाळुं. वार्‍याला देखील बाणाने जखडून टाकू
462-11.
पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरी जाळूं । कां बाणवरी खिळूं । वारयातें ॥462॥
पराक्रमाच्या मदाने मत्त होऊन अशा या चतुरंग सैन्यसंपत्तीच्या बळावर जे कृतांताशी स्पर्धा करीत आहेत.
463-11
बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट । मारकपणें काळकूट । महुर म्हणत ॥463॥
यांचे हे सर्व शब्द शस्रांपेक्षां तीक्ष्ण आणि अग्निपेक्षा दाहक दिसतात आणि प्राण घेण्यात यांच्यापेक्षा काळकूटही मधूरच म्हणावे लागेल.
464-11
तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळें । अगा चित्रीव फळें । वीर हे देखें ॥464॥
परंतु अर्जुना ! हे सर्व योध्दे गंधर्वनगरीचे देखावे किंवा भेंडोळें अथवा चित्रांतील पुतळे आहेत, पहा !
465-11
हां गा मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला । इया शृंगारूनियां खाला । मांडिलिया पैंजण 465
अरे!ही सर्व सैन्ये म्हणजे मृगजळाचा पूर होय, हीं सैन्ये नसून कापडाचा साप आहे किंवा कातड्यात भुसा भरून तयार केलेल्या व श्रृंगारलेल्या ह्या बाहुल्या मांडल्या आहेत.
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्॥11.33॥
अर्थ म्हणून तू युद्धाला उभा रहा. यश संपादन कर. शत्रूंना जिंकून समृद्धियुक्त अशा राज्याचा उपभोग घे. हे सर्व मी पूर्वीच मारून टाकलेले आहेत. हे सव्यसाचिन् (तू) केवल निमित्तमात्र हो.॥11-33॥


466-11
येर चेष्टवितें जें बळ । तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ । आतां कोल्हारिचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥466॥
बाकी हालचाल करविणारें जें बळ मी पहिलेच गिळून टाकलें आहे. आतां हे सर्व सैन्य कुंभाराने केलेल्या मातीच्या वेताळाप्रमाणे निर्जीव आहे.
467-11
हालविती दोरी तुटली । तरी तियें खांबावरील बाहुलीं । भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती ॥467॥
बाहुलिला नाचविणारी दोरी तुडली तर, खांबावरील बाहूल्या वाटेल त्याने लोटल्या की उलथून पडतात.
468-11
तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळू न लगेल पैं गा । म्हणौनि उठीं उठीं वेगां । शाहाणा होईं ॥468॥
त्याप्रमाणे सैन्याची ही रचना मोडण्याला, अर्जुना वेळ लागणार नाही; म्हणून एकदम उठ, शहाणा हो.
469-11
तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागाविलें ॥469॥
गोग्रहणाचे वेळीं तूं संपूर्ण सैन्यावर मोहनास्र घातलेंस व मग विराटराजाच्या अति भित्र्या उत्तराने सैन्याची वस्रें हिसकावून त्यांना नग्न केलें.
470-11
आतां हें त्याहूनि निपटारें जहालें । निवटीं आयितें रण पडिलें । घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें ॥470॥
आतां हें सैन्य त्याच्याहूनहि निकृष्ट दर्जाचें झालें आहे. आधींच मरून पडलेलें सैन्य नाहीसे कर व एकट्या अर्जुनाने शत्रूला जिंकलें असें यश घें.


471-11
आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे । तूं निमित्तमात्रचि होयें । सव्यसाची ॥471॥
नुसते यशच नाही तर संपूर्ण राज्यहि तुला प्राप्त झालें आहे. अर्जुना ! यांच्या नाशाला तूं नुसता निमित्तमात्रच होणार आहे.
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णां तथान्यानपि योधवीरान् । मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्‌नान्॥11.34॥
अर्थ द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण तसेच इतरही युद्धातले वीर मी मारलेले आहेत. त्यांना तू ठार कर. भिऊ नको. युद्ध कर. प्रतिपक्षीयांना तू जिंकशील॥11-34॥
472-11
द्रोणाचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं । कैसेनि कर्णावरी । परजूं हें न म्हण ॥472॥
द्रोणाच्या बरोबरीचा मी नाही असे मनांत आणूं नकोस. भीष्माची भीति बाळगूं नकोस. कर्णावर शस्र कसें चालवूं असें म्हणूं नकोस.
473-11
कोण उपायो जयद्रथा कीजे । हें न चिंतूं चित्त तुझें । आणिकही आथि जे जे । नावाणिगे वीर ॥473॥
वजयद्रथाला मारण्यांकरितां कोणता उपाय करावा, याचे चिंतन मनांत करू नकोस. आणखी जे जे नांवाजलेले पराक्रमी वीर आहेत,
474-11
तेही एक एक आघवें । चित्रींचे सिंहाडे मानावे । जैसे वोलेनि हातें घ्यावें । पुसोनियां ॥474॥
ते सर्व ओल्यृ हातांनी पुसून घेण्यासारखे भिंतीवर काढलेल्या सिंहाची चित्रे आहेत असे मान.
475-11
यावरी पांडवा । काइसा युद्धाचा मेळावा? । हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां ॥475॥
अशा स्थितीत अर्जुना ! हे काय युध्दाकरितां जमलेलें सैन्य आहे? हा सर्व भास असून, बाकीचे हे सर्व मी गिळून टाकले आहेत.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *