सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

426-11
परि जेतुलें येथ प्रवेशलें । तें तातलिया लोहें पाणीचि पां गिळिलें । वहवटींहि पुसिलें । नामरूप तयांचें ॥426॥
पण तुझ्या मुखांत जेवढे काही गेले, तेवढे सर्व तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याप्रमाणे गिळले गेले. त्यांचे वहिवाटीपुरते देखील नामरूप राहिले नाही.
लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः । तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो॥11-30॥
अर्थ जळत असणार्‍या मुखांनी सर्व लोकांना सर्व बाजूंनी गिळीत असणारा तू (अतितृप्तीमुळे) जिभा चाटीत आहेस. हे विष्णो, आपल्या तेजाने सर्व जग व्यापून तुझी प्रखर तेजे जगाला ताप देत आहेत.॥11-30॥
427-11
आणि येतुलाही आरोगण । करितां भुके नाहीं उणेपण । कैसें दीपन असाधारण । उदयलें यया ॥427॥
आणि इतकेहि भक्षण करून याची भूक यत्किंचितही शांत झाली नाही. कसा याचा जठराग्नी अत्यंत प्रदिप्त झाला आहे.
428-11
जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणगा दुकाळु पाहला । तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवें चाटितां ॥428॥
ज्याप्रमाणे ज्वरातून उठलेला रोगी किंवा दुष्काळात सापडलेला भिकारी खाय खाय करतो, त्याप्रमाणे ओठ चाटतांना जिभेची वळवळ दिसत आहे.
429-11
तैसें आहाराचे नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं । कैसी समसमीत नवाई । भुकेलेपणाची ॥429॥
तसेच तुझ्या खाण्याचा नव्हे असा कोणताच पदार्थ तुझ्या तोंडातून सुटला नाही. अत्यंत भुकेचे नवल कसे आहे !
430-11
काय सागराचा घोंटु भरावा? । कीं पर्वताचा घांसु करावा? । ब्रह्मकटाहो घालावा । आघवाचि दाढे ॥430॥
संपूर्ण समुद्राचा घोट घ्यावा की सगळ्या पर्वताचा एकच घास करावा अथवा हे सर्व ब्रह्मांड असेच्या असेच दाढेखाली घालावे.


431-11
दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि घ्याविया । ऐसें वर्तत आहे साविया । लोलुप्य बा तुझें ॥431॥
सगळ्या दिशा गिळून टाकाव्या की चांदण्या चाटून घ्याव्या, अशा प्रकारचा खरोखर तुझा हावरेपणा दिसत आहे.
432-11
जैसा भोगीं कामु वाढे । कां इंधनें आगीसि हाकाक चढे । तैसी खातखातांचि तोंडें । खाखांतें ठेलीं ॥432॥
ज्याप्रमाणे भोगाने भोगवासना वाढत जाते किंवा लाकडे घातल्याने अग्नि भडकतो, त्याप्रमाणे ही सर्व तुझी मुखे खाताखाताच खाखावलेली आहेत.
433-11
कैसें एकचि केवढें पसरलें । त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें । जैसें कां कवीठ घातलें । वडवानळीं ॥433॥
तुझे एकच मुख कसे विस्तीर्ण पसरले आहे, पहा!ज्याप्रमाणे वडवाग्नीमध्ये कवठ घालावे, त्याप्रमाणे हें संपूर्ण त्रिभुवन तुझ्या नुसत्या जिभेच्या टोकाला लागले आहे.
434-11
ऐसीं अपार वदनें । आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें । कां आहारु न मिळतां येणें मानें । वाढविलीं सैंघ ॥434॥
अशी ही असंख्य मुखे आहेत. आता तितकी त्रिभुवने कोठली आणणार?पुरेसा आहार मिळत नसतांना ज्यांचा ताप असहाय्य होतो, अशी मुखे का असंख्य वाढविलीस?
435-11
अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा । जैसी वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ॥435॥
देवा!ज्याप्रमाणे वणव्याचा वेढा पडून, त्यात जनावरे सापडतात, त्याप्रमाणे तुझ्या मुखांतील पेटलेल्या ज्वालांना बिचारे हे ब्रह्मांड बळी पडले आहे.


436-11
आतां तैसें यां विश्वा जाहालें । देव नव्हे हें कर्म आलें । कां जग चळचळां पांगिलें । काळजाळें ॥436॥
आता तसेच या विश्वाला झाले. हे विश्वरूप म्हणजे देव नव्हे, हे लोकांचे दुर्दैव आहे किंवा जगरूपी जलचरांना पकडण्याकरिता काळाने आपलेच जाळे पसरले आहे.
437-11
आतां इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें । हीं वक्त्रें नोहेती जोहारें । वोडवलीं जगा ॥437॥
आता या अंगकांतीरूप पाशातून, हे चराचर प्राणी कोणीकडून बाहेर पडतील?ही तुझी मुखे नसून, ही जगाला लाक्षागृहे झाली आहेत.
438-11
आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणे । परी जया लागे तया प्राणें । सुटिकाची नाहीं ॥438॥
अग्नीला आपल्या दाहकशक्तीने दुसर्‍याला मी कसा जाळतो, हे समजत नाही; पण ज्याला अग्नी लागतो तो मात्र जिवंत राहात नाही.
439-11
नातरी माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें । कां आपुलियां मारा नेणें । विष जैसें ॥439॥
किंवा माझ्या तीक्ष्णपणाने पदार्थ कसा कापला जातो, हे शस्राला माहीत नसते. किंवा माझ्याने मनुष्य कसा मरतो हे विषाला ज्याप्रमाणे कळत नाही,
440-11
तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं । परी ऐलीकडिले मुखीं खाई । हो सरली जगाची ॥440॥
त्याप्रमाणे तुझे हे विश्वरूप कसे उग्र व भयंकर आहे याची तुला जाणीव नाही; पण अलीकडील मुखरूपी खाईत संपूर्ण जगच नाहीसे झाले.


441-11
अगा आत्मा तूं एकु । सकळ विश्वव्यापकु । तरी कां आम्हां अंतकु । तैसा वोडवलासी? 41
सर्व ब्रह्मांडाचा एक अंतरात्मा असून सर्व जगतांत भरला आहेस, मग आम्हांला कां असा प्राण घेणारा मृत्यु झालास?
442-11
तरी मियां सांडिली जीवित्वाची चाड । आणि तुवांही न धरावी भीड । मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें ॥442॥
तरी मी जिवंत राहण्याची आशा सोडली आहे. आणखी तूंहि कांहीं संकोच करू नकोस. तुझ्या मनांत जें कांही असेल ते स्पष्ट सांग.
443-11
किती वाढविसी या उग्ररूपा । आंगींचें भगवंतपण आठवीं बापा । नाहीं तरी कृपा । मजपुरती पाही ॥443॥
आतां या आपल्या रूपाचा भयंकरपणा किती वाढवितौस? तुझ्या स्वतःच्या अंगी असलेल्या भगवंतपणाचे स्मरण ठेव. नाही तर माझ्यापुरती तरी कृपा कर.
(यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य असे हे लोकांना सुखच देणारे, सहा श्रेष्ठ गुण भगवंताचे ठिकानी नित्य असतात; म्हणून त्याला भगवान म्हणतात. यांत संहार करण्याचा गुण नाही याची आठवण करून देण्याकरितां अर्जुनाने येथे “आंगीचें भगवंतपण आठवी बापा” असें म्हटले आहे.)
आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद । विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्॥11.31॥
अर्थ हे उग्र रूप धारण केलेला तू कोण आहेस मला सांग. हे देवश्रेष्ठा मी तुला नमस्कार करतो. माझ्यावर अनुग्रह कर. अगोदर मी तुला पूर्णत्वाने जाणण्याची इच्छा करीत आहे, कारण तुझीही प्रवृत्ति मला समजत नाही31॥

444-11
तरी एक वेळ वेदवेद्या । जी त्रिभुवनैक आद्या । विनवणी विश्ववंद्या । आइकें माझी ॥444॥
वेदानेच जाणला जाणार्‍या, त्रैलोक्याच्या मूळ कारणा व त्रैलोक्याला पूज्य अशा भगवंता ! एक वेळ माझी प्रार्थना ऐक.
445-11
ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिलें शिरें । मग म्हणें तरी सर्वेश्वरें । अवधारिजो ॥445॥
असें बोलून, त्या श्रेष्ठ अर्जूनाने भगवंताच्या पायावर मस्तक ठेवलें व म्हणाला, हें सर्वेश्वरा ! ऐंक


446-11
मियां होआवया समाधान । जी पुसिलें विश्वरूपध्यान । आणि एकेंचि काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥446॥
माझें समाधान व्हावें म्हणून मी तुला विश्वरूप दाखविण्याची प्रार्थना केली आणि तूं तात्काळ संपूर्ण ब्रह्मांड गिळितच प्रगट झालास.
447-11
तरी तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं । आघवियाचि करीं परिजिलीं । शस्त्रें कांह्या ॥447॥
तरी तूं कोण आहेस?अशी एवढीं मुखें कशाकरितां घेतलीस?व संपूर्ण हातामध्यें परजलेली शस्रे कशाला धारण केलीस?
448-11
जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें । कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥448॥
आणि देवा ! जेव्हा तेव्हा क्रुध्दपणाने वाढून आकाशाला का मागे टाकतोस आणि अत्यंत लाल डोळे वटारून आम्हांला का भीति दाखवितोस?
449-11
एथ कृतांतेंसि देवा । कासया किजतसे हेवा । हा आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज ॥449॥
देवा! या ठिकाणी महामृत्यूशीं तू कशाला स्पर्धा करीत आहेस? असे करण्यांत तुझ्या मनांतील हेतु काय आहे, तो मला सांग.
450-11
या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु । आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसी ॥450॥
हें अर्जुनाचें म्हणणें ऐकून, भगवंत म्हणतांत, मी कोण आहे व आपलें ऐवढें उग्र स्वरूप का वाढवित आहे, हेच तूं विचारित आहेस.
श्रीभगवानुवाच ।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः॥
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः॥11.32॥

अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, लोकांचा संहार करणारा व त्यासाठी वृद्धि पावलेला मी काळ आहे. येथे मी लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. तुझ्याकखेरीज दोन्ही पक्षांच्या प्रत्येक समुदायामध्ये जे योद्धे आहेत ते सर्व नाहीसे होतील॥11-32॥

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading