सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी ५१ ते ७५ पहा.
51-8
मग मनप्राण आणि संयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु । येणें संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥51॥
मग, मन व प्राण यांचा निग्रह हीच होमाच्या द्रव्याची तयारी, इने, धुराशिवाय निर्दोप जो ज्ञानाग्नि त्याचा संतोष करितात.
52-8
ऐसेनि हें सकळ ज्ञानी समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे । पाठीं ज्ञेयचि स्वरूपें । निखिल उरे ॥52॥
याप्रमाणे हे साहित्य ज्ञानांत अर्पण करुन मग ते ज्ञान ब्रह्मांत लय पावते. नंतर निवळ जे ब्रह्म, तेच एकटे उरते.
53-8
तया नांव गा अधियज्ञु । ऐसें बोलिला जंव सर्वज्ञु । तंव अर्जुन अतिप्राज्ञु । तया पातलें तें ॥53॥
त्यालाच अधियज्ञ म्हणजे ब्रह्म म्हणावे. असे ज्या वेळेस सर्वज्ञ श्रीकृष्ण बोलले, त्या वेळेस महाबुद्धिमान अशा अर्जुनाला ते समजले.
54-8
हें जाणोनि म्हणितलें देवें । पार्था परिसतु आहासि बरवें । याकृष्णाचिया बोलासवें । येरू सुखाचा जाहला ॥54॥
अर्जुनाला ब्रह्म समजले असे देवांनीही जाणून ते म्हणाले, ‘ तूं फार उत्तम प्रकारे ऐकतो आहेस.’ असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन संतोष पावला.
55-8
देखा बालकाचिया धणी धाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होइजे । हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया ॥55॥
पहा की, तान्ह्या मुलाच्या तृप्तीनें आपण तृप्त व्हावे, किंवा शिष्याच्या कृतार्थपणाने आपण कृतार्थ व्हावे, हे एक आई किंवा सद्गुरूच जाणतात.
56-8
म्हणोनि सात्विकां भावांची मांदी । कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं । न समातसे परी बुद्धी । सांवरूनि देवें ॥56॥
म्हणून अर्जुनाच्या पूर्वीच श्रीकृष्णांच्या अंगी अष्ट सात्विक भाव उत्पन्न होऊन मावेनातसे झाले;
57-8
मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु । तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला ॥57॥
परंतू देवांनी बुद्धि आवरली, व पूर्णतेस पावलेल्या सुखाच्या सुगंधाप्रमाणे किंवा थंडगार अमृताच्या लाटांप्रमाणे कोमल आणि रसाळ असे बोल ते बोलू लागले.
58-8
म्हणे परिसणेयांच्या राया । आइके बापा धनंजया । ऐसी जळों सरलिया माया । तेथ जाळितें तेंही जळे ॥58॥
मग म्हणतात :- श्रवण करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ अशा अर्जुना, ऐक. बाबारे, माया जळून गेली, म्हणजे मग तिला जाळणारे ज्ञानही जळून जाते.
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः॥8.5॥
59-8
जें आतांचि सांगितलें होतें । अगा अधियज्ञ म्हणितला जयातें । जे आदीचि तया मातें । जाणोनि अंतीं ॥59॥
अरे! आत्तांच जे मीं सांगीतले, ज्याला मीं अधियज्ञ म्हटले, त्या मला जे अगोदर व प्राणान्तसमयीही जाणतात,
60-8
ते देह झोळ ऐसें मानुनी । ठेले आपणपें आपण होऊनी । जैसा मठ गगना भरूनी । गगनींचि असे ॥60॥
देहाला मिथ्या मानून स्वतःचे ठिकाणींच ब्रह्मरूप होतात. ज्याप्रमाणे एखादे घर आकाशानें भरुन आकाशांतच असते,
61-8
यें प्रतीतीचिया माजघरीं । तया निश्चयाची वोवरी । आली म्हणोनि बाहेरी । नव्हेचि से ॥61॥
त्याप्रमाणे, अनुभवरूप माजघरांत त्याची निश्चयरुप खोली असते, म्हणून त्याला ब्रह्माशिवाय बाहेरील वस्तुचें स्मरण नसते.
62-8
ऐसें सबाह्य ऐक्य संचलें । मीचि होऊनि असतां रचिलें । बाहेरि भूतांचीं पांचही खवलें । नेणतांचि पडिलीं ॥62॥
अशा प्रकारे जो अंतर्बाह्य ऐक्यतेमुळे मद्रूपच होऊन राहिला आहे, तो बाहेरील पंचमहाभूतांची पांच कवचे (शरीर) पडून गेली तरी तो जाणत नाही.
63-8
आतां उभयां उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें । म्हणोनि प्रतीतीचिये पोटींचें । पाणी न हाले ॥63॥
जे शरीर जिवंत असतांही त्याची जो पर्वा बाळगीत नाही, ते पडल्यावर त्याचें दुःख कोणाला होणार? म्हणून अनुभवाच्या पोटांतले पाणी हालत नाही. (अंतकाली त्याचा ब्रह्माविषयींचा अनुभव ढळत नाही.)
64-8
ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली । जैसी समरससमुद्रीं धुतली । रूळेचिना ॥64॥
तो अनुभव केवळ ऐक्याचा ओतून अविनाशीपणाच्या ह्रदयांत घातलेला आणि तसाच पूर्णानंदसमुद्रात धुतलेला असतो म्हणून कामादि मळांनी तो मळत नाही.
65-8
पैं अथावीं घट बुडाला । तो आंतबाहेरी उदकें भरला । पाठीं दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ॥65॥
हे पहा की, अथांग पाण्यांत घट बुडाला असतां त्याच्या आंत बाहेर पाणी असते; पण दैवगत्या जर तो मागाहून फुटला, तर उदकाचा नाश होतो का?
66-8
ना तरी सर्पे कवच सांडिलें । कां उबारेनें वस्त्र फेडिलें । तरी सांग पां काय मोडलें । अवेवामाजीं ॥66॥
किंवा सर्पाने कात टाकली, अथवा उष्णतेमुळे वस्त्र फेडून टाकले, तर अवयवांत कांही बिघाड होतो का सांग बरे
67-8
तैसा आकार हा आहाच भ्रंशे । वांचूनि वस्तु ते सांचलीचि असे । तेचि बुद्धि जालिया विसुकुसे । कैसेनि आतां ॥67॥
त्याचप्रमाणे, शरीर हे वरचेवर नाश पावले, तरी ब्रह्म हे सर्वत्र भरलेलेंच आहे. त्याचप्रमाणे. त्या ठिकाणी बुद्धि जर निपूण झाली, तर भय कशाचे आहे?
68-8
म्हणोनि यापरी मातें । अंतकाळीं जाणत सांते । जे मोकलिती देहातें । तें मीचि होती ॥68॥
म्हणून अशा रितीने अंतकाली माझे स्मरण ठेवून जे देह सोडतात ते मद्रूप होतात.
69-8
एऱ्हवीं तरी साधारण । उरीं आदळलिया मरण । जो आठव धरी अंतःकरण । तेंचि होइजे ॥69॥
येऱ्हवीं साधारण नियम असा आहे की, मरण प्राप्त असतां अंतःकरणांत ज्याचें स्मरण असते त्याप्रत तो पावतो.
70-8
जैसा कवण एक काकुळती । पळतां पवनगती । दुपाउलीं अवचितीं । कुहामाजी पडियेला ॥70॥
ज्याप्रमाणे एखादा भयभीत मनुष्य वाऱ्यासारखा पळत असतां मार्गात अवचित विहीरींत पडतो;
71-8
आतां तया पडणयाआरौतें । पडण चुकवावया परौतें । नाहीं म्हणोनि तेथें । पडावेंचि पडे ॥71॥
त्या स्थितींत त्याला पडण्याच्या अगोदर पळण्याचा वेग आवरून धरून, पडणे चुकविता येत नाही; म्हणून विहीरींत पडणे भाग पडते,
72-8
तेंवि मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके । तें होणें मग न चुके । भलतयापरी ॥72॥
त्याचप्रमाणे, मृत्युसमयी जीवासमोर जी वस्तु उभी राहते, तद्रूपच (मरणानंतर) त्यास व्हावे लागते. ते कोणत्याही उपायाने चुकत नाही
73-8
आणि जागता जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना भाविजे । डोळा लागतखेवों देखिजे । तेंचि स्वप्नीं ॥73॥
आणि मनुष्य जागा असतां त्याच्या मनांत ज्या कल्पना येतात, त्याच कल्पना डोळा लागल्यावर स्वप्नांत दिसूं लागतात.
यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः॥8.6॥
74-8
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥74॥
त्याचप्रमाणे, जिवंत असतांना जी जी गोष्ट आवडीने अंतःकरणांत उतरते, त्याविषयीचीच आवड अंतकालचे समयी वृद्धिंगत होते;
75-8
आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणोनि सदां स्मरावें । मातेंचि तुवां ॥75॥
आणि मरणाच्या समयी ज्या गोष्टीची आठवण असते, त्याच्याच गतीला तो (मरणानंतर) पावतो. म्हणून तूं नेहमीं मलाच स्मरत जा.
तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्॥8.7॥
