सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

101-16
नातरी ठेविलें देखावया । आदर कीजे दिविया । कां शाखा फळें यावया । सिंपिजे मूळ ॥ 101 ॥
अंधारांतील जिन्नस सांपडावा म्हणून दिव्याला जपतात; किंवा मुळांना पाणी घालतात ते मुळांसाठी नसून खाद्यांना (फांद्याना) फळे यावी म्हणून होय. 1
102-16
हें बहु असो आरिसा । आपणपें देखावया जैसा । पुढतपुढती बहुवसा । उटिजे प्रीती ॥ 102 ॥
किंवा हें असो, आपले स्वच्छ प्रतिबिंब दिसावे म्हणून आरसा जसा वारंवार साफ करितात. 2
103-16
तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु । तो होआवयालागीं गोचरु । श्रुतीचा निरंतरु । अभ्यासु करणें ॥ 103 ॥
त्याप्रमाणे वेदांनींच ज्याचे प्रतिपादन केले आहे,अस जो ईश्वर त्याचे दर्शन (प्राप्ति) होण्यासाठीं जो निरंतर श्रुत्यर्थाचा अभ्यास करितो. 3
104-16
तेंचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र । येरा स्तोत्र कां नाममंत्र । आवर्तवणें पवित्र । पावावया तत्त्व ॥ 104 ॥
द्विजांनी हा अभ्यास ब्रह्मसूत्रद्वारा करावा व इतरांनी स्तोत्र नाममंत्रादिकांच्या आवर्तनाने करावा म्हणजे त्यांना तत्त्वज्ञान होईल. 4
105-16
पार्था गा स्वाध्यावो । बोलिजे तो हा म्हणे देवो । आतां तप शब्दाभिप्रावो । आईक सांगों ॥ 105 ॥
पार्था, ज्याला स्वाध्याय म्हणतात, तो देवांनी ह्याप्रमाणे सांगितला आहे.आतां तप शब्दाचा अभिप्राय सांगतों तो श्रवण कर. 5

106-16
तरी दानें सर्वस्व देणें । वेंचणें तें व्यर्थ करणें । जैसे फळोनि स्वयें सुकणें । इंद्रावणी जेवीं ॥ 106 ॥
आपले सर्वस्व दान करण्यांत खर्च करणें तें दान होय; नुसतें वाटेल तसें द्रव्य खर्च करणें तें दान न होतां व्यर्थ हानि होय. कसे तर, कडूवृंदावन वृक्ष वाटेल तेवढा फळांनी लादूनही व्यर्थ सुकून जातो. त्याप्रमाने 6
107-16
नाना धूपाचा अग्निप्रवेशु । कनकीं तुकाचा नाशु । पितृपक्षु पोषिता ऱ्हासु । चंद्राचा जैसा ॥ 107 ॥
अथवा धूपाचा व कनकाचा अग्निप्रवेश हा जसा गुणविकासामुळे त्यांचा एकप्रकारचा उत्कर्ष होय किंवा चंद्र कलांकलांनीं कृश झाला तरी पितृपक्षाचे वनस्पतींचे जसें पोषण होतें. 7
108-16
तैसा स्वरूपाचिया प्रसरा -। लागीं प्राणेंद्रियशरीरां । आटणी करणें जें वीरा । तेंचि तप ॥ 108 ॥
त्याप्रमाणे, अर्जुना, स्वस्वरूप (ब्रह्म) प्राप्तीसाठीं, प्राण, इंद्रिये, व शरीर ह्यांचा वेंच करणे तेच तप होय. 8
109-16
अथवा अनारिसें । तपाचें रूप जरी असे । तरी जाण जेवीं दुधीं हंसें । सूदली चांचू ॥ 109 ॥
अथवा याहून अन्य असे गणले गेलेलें जें तप, ती शुद्ध तप नसल्यामुळे त्यांतील शुद्धाशुद्धतेला हंसक्षीरन्याय लावणं प्राप्त आहे.9
110-16
तैसें देहजीवाचिये मिळणीं । जो उदयजत सूये पाणी । तो विवेक अंतःकरणीं । जागवीजे ॥ 110 ॥
म्हणून देह व जीव ह्यांचे तादात्म्य जन्मतःच तोडून टाकण्याकरितां ज्या विवेकाची आवश्यकता आहे तो विवेक अंतःकरणांत जागा असू दे. 110

111-16
पाहतां आत्मयाकडे । बुद्धीचा पैसु सांकडें । सनिद्र स्वप्न बुडे । जागणीं जैसें ॥ 111 ॥
जागृतींत निद्रेसह जसा स्वप्नाचा लय होतो, त्याचप्रमाणे अंतर्मुखतेने बुद्धि आत्म्याकडे वळली असतां तिची विषयाकडील धांव सहजच कुंठित होते. 11
112-16
तैसा आत्मपर्यालोचु । प्रवर्ते जो साचु । तपाचा हा निर्वेचु । धनुर्धरा ॥ 112 ॥
त्याचप्रमाणे आत्मप्राप्तीच्या इच्छेने ज्याची बुद्धि ह्याप्रमाणे प्रवृत्त होते, तें, अर्जुना, तप असे म्हणतात. 12
113-16
आतां बाळाच्या हितीं स्तन्य । जैसें नानाभूतीं चैतन्य । तैसें प्राणिमात्रीं सौजन्य । आर्जव तें ॥ 113 ॥
आतां स्तन्य (आईचे अथवा गाईचे दूध) जसें बालाचे व चैतन्य जसें भूतमात्राचे कल्याण होय, त्याचप्रमाणे, सर्व प्राणिमात्रांच्याविषयीं ज्याच्या ठिकाणी सौजन्य असतें तें “आर्जव” होय. 13
अहिंसा सत्यमक्रोध्स्त्यागः शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥16. 2॥

114-16
आणि जगाचिया सुखोद्देशें । शरीरवाचामानसें । राहाटणें तें अहिंसे । रूप जाण ॥ 114 ॥
आणि सर्व जगाला जेणकरून सुख होईल, असा कायावाचामने ज्याचा सर्व व्यापार सुरू असतो तें ‘अहिसेचे रूप’ होय असे समज. 14
115-16
आतां तीख होऊनि मवाळ । जैसें जातीचें मुकुळ । कां तेज परी शीतळ । शशांकाचें ॥ 115 ॥
आतां कमलकळिका जशी पाण्याचा भेद करते म्हणून तीक्ष्ण व स्पर्शाला पहावे तर अत्यंत मृदु असते किंवा प्रकाश देऊनही चंद्राचे तेज शीतल असते. 15

116-16
शके दावितांचि रोग फेडूं । आणि जिभे तरी नव्हे कडु । ते वोखदु नाहीं मा घडू । उपमा कैंची ॥ 116 ॥
ज्याच्या दर्शनानेच रोगनिवृत्ति होते व जें सेवन केले असतां कटु अगर अरोचक नसते असे औषधच दिसत नाही; मग ती उपमा कशी द्यावी? 16
117-16
तरी मऊपणें बुबुळे । झगडतांही परी नाडळे । एऱ्हवीं फोडी कोंराळें । पाणी जैसें ॥ 117 ॥
आणि मृदुपणा पाहू गेले तर जे डोळयाच्या बुबुळालाही खुपणार नाही असे असून कठोरता पाहू गेले तर पर्वताचे कडे फोडून बाहेर पडणाऱ्या पाण्यासारखे आहे. 17
118-16
तैसें तोडावया संदेह । तीख जैसें कां लोह । श्राव्यत्वें तरी माधुर्य । पायीं घालीं ॥ 118 ॥
त्याचप्रमाणे संदेहनिवृत्तिमध्यें जें लोखंडाच्या हत्याराप्रमाणे तीक्ष्ण असून, माधुर्यालाहि मागे टाकील असें श्रवण करितांना गोड वाटते. 18
119-16
ऐकों ठातां कौतुकें । कानातें निघती मुखें । जें साचारिवेचेनि बिकें । ब्रह्मही भेदी ॥ 119 ॥
ज्याचे कौतुकानें ही श्रवण केले असतां कानाला अधिक सेवनाची इच्छा होऊन जणू मुखेच फुटतात व सत्यत्वाच्या सामर्थ्याच्या दृष्टीने जे ब्रह्मालाही मागे टाकील अथवा हार जाणार नाही.19
120-16
किंबहुना प्रियपणे । कोणातेंही झक{ऊं} नेणे । यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा ॥ 120 ॥
किंबहुना, प्रियपणाच्या दृष्टीने पाहू गेले त्याचे शब्द कोणालाही फसविणारे नसतात व यथार्थ असूनही ते कोणालाही खुपण्यासारखे नसतात. 120

121-16
एऱ्हवीं गोरी कीर काना गोड । परी साचाचा पाखाळीं कीड । आगीचें करणें उघड । परी जळों तें साच ॥ 121 ॥
नाहीतर, फांसेपारध्याचे गायन अगर ध्वनि कानास गोड लागतो खरा; पण त्यांत सत्याच लेश नसतो; किंवा अग्नि आपलें कर्म चोरून नव्हे तर उघडपने करितो, पण त्या उघड अगर सत्य कर्माला काय आग लावावयाची आहे? 21
122-16
कानीं लागतां महूर । अर्थें विभांडी जिव्हार । तें वाचा नव्हे सुंदर । लांवचि पां ॥ 122 ॥
वरून कानारा गोड वाटणारे, पण, अर्थदृषष्ठया काळजाला घर पाडणारें भाषण सुंदर न म्हणत ती शुद्ध मायावी राक्षसीच म्हणावी. 22
123-16
परी अहितीं कोपोनि सोप । लालनीं मऊ जैसें पुष्प । तिये मातेचें स्वरूप । जैसें कां होय ॥ 123 ॥
परंतु अहितापासून रक्षण करण्याकरिता वरून रागाचा आव आणणारी, पण, अंतःकरणांत रक्षणाविषयीं पुष्पाप्रमाणे मृदु असणारी अशी आई असते. 23
124-16
तैसें श्रवणसुख चतुर । परीणमोनि साचार । बोलणें जें अविकार । तें सत्य येथें ॥ 124 ॥
तसें ऐकतांना मधुर व कौतुकास्पद, परिणामी सत्य व कोणाचेही वर्म न दुखविणारें जें भाषण ते ” सत्य ” असे म्हणतात. 24
125-16
आतां घालितांही पाणी । पाषाणीं न निघे आणी । कां मथिलिया लोणी । कांजी नेदी ॥ 125 ॥
किंवा दगडावर पाणी घातले तरी जसा अंकुर फुटणे शक्य नाही किंवा कांजी घुसळली असतां जसे लोणी निघणें शक्य नसतें. 25

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *