सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी १२६ ते १५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

126-16
त्वचा पायें शिरीं । हालेयाही फडे न करी । वसंतींही अंबरीं । न होती फुलें ॥ 126 ॥
सर्पाच्या कांतेच्या शिरावर पाय दिला असतां ती जशी फडा वर करीत नाही, किंवा वसंत ऋतु प्राप्त झाला तरीही आकाशांत जशीं पुष्पे निर्माण होत नाहीत. 26
127-16
नाना रंभेचेनिही रूपें । शुकीं नुठिजेचि कंदर्पें । कां भस्मीं वन्हि न उद्दीपे । घृतेंही जेवीं ॥ 127 ॥
अथवा, रंभेचे लावण्यहीं जसे शुकाच्या चित्तांत विषयवासना उत्पन्न करू शकले नाही, किंवा भस्मात तूप घातले तरीही जशी अग्निज्वाला उत्पन्न होत नाही. 27
128-16
तेवींचि कुमारु क्रोधें भरे । तैसिया मंत्राचीं बीजाक्षरें । तियें निमित्तेंही अपारें । मीनलिया ॥ 128 ॥
त्याचप्रमाणे लहान मुलालाही राग येईल अशा शेलक्या शिव्या जरी कोणी दिल्या अथवा आणखींही अशीं कांहीं कारणें घडलीं.28
129-16
परी धातयाही पायां पडतां । नुठी गतायु पंडुसुता । तैसी नुपजे उपजवितां । क्रोधोर्मी गा ॥ 129 ॥
किंवा, अर्जुना, जो मृत झाला आहे तो, जसा ब्रह्मदेवाच्या पायां पडले तरी उठत नाही. तसा कांहीही प्रयत्न केला तरी ज्याच्या चित्तांत ऋोध उत्पन्न होत नाही. 29
130-16
अक्रोधत्व ऐसें । नांव तें ये दशे । जाण ऐसें श्रीनिवासें । म्हणितलें तया ॥ 130 ॥
अशी जी चित्ताची स्थिति तिला अक्रोधत्व असे म्हणावें असें भगवंतांनी सांगितले आहे. 130

131-16
आतां मृत्तिकात्यागें घटु । तंतुत्यागें पटु । त्यजिजे जेवीं वटु । बीजत्यागें ॥ 131 ॥
आतां मृत्तिकेच्या त्यागाने,तंतुत्यागाने, किंवा बीजत्यागाने जसा अनुक्रमें घट, पट व वृक्ष त्याग सहज व केल्या सारखा होतो. 31
132-16
कां त्यजुनि भिंतिमात्र । त्यजिजे आघवेंचि चित्र । कां निद्रात्यागें विचित्र । स्वप्नजाळ ॥ 132 ॥
किंवा भिंत त्यागिली असतां तिजवरील चित्र जसे सहजच टाकल्यासारखें होतें, किंवा निद्राभंगाने स्वप्न सहजच नष्ट होतें. 32
133-16
नाना जळत्यागें तरंग । वर्षात्यागें मेघ । त्यजिजती जैसे भोग । धनत्यागें ॥ 133 ॥
किंवा जलत्यागानें तरंग, वर्षाऋतूच्या अंताने जसे मेघ किंवा धन त्यागाने भोग जसे आपोआपच नष्ट होतात. 33
134-16
तेवीं बुद्धिमंतीं देहीं । अहंता सांडूनि पाहीं । सांडिजे अशेषही । संसारजात ॥ 134 ॥
त्याप्रमाणे विचारी पुरुषाने देहाच्या ठिकाणचा अहंभाव त्यागिला अथवा बाधित केला असतां, त्याचा सर्व संसार त्यक्तप्राय होतो. 34
135-16
तया नांव त्यागु । म्हणे तो यज्ञांगु । हे मानूनि सुभगु । पार्थु पुसे ॥ 135 ॥
अशा स्थितीला ” त्याग” म्हणावें असें यज्ञभोक्ता भगवान् श्रीकृष्ण परमात्मा ह्यांनी सांगितले. तें ऐकून भाग्यवान अर्जुना पुन्हा विचारिता झाला. 35

136-16
आतां शांतीचें लिंग । तें व्यक्त मज सांग । देवो म्हणती चांग । अवधान देईं ॥ 136 ॥
देवा, शांति कशाला म्हणावें तें मला स्पष्ट करून सांग; तेव्हां देव म्हणाले, सांगतों, लक्ष देऊन श्रवण कर. 36
137-16
तरी गिळोनि ज्ञेयातें । ज्ञाता ज्ञानही माघौतें । हारपें निरुतें । ते शांति पैं गा ॥ 137 ॥
ज्ञात्याने प्रथम सर्व ज्ञेयमात्राचा (त्याला स्वस्वरूपाहून पृथक् सत्ता नाही अशा बोधाने) ग्रास करून क्रमप्राप्त असे ज्ञातृत्व व ज्ञान हेंही पाठोपाठ जेथे लय पावतें अशी जी वस्तु (ब्रह्मवस्तु) तीच शुद्ध शांति होय.37
138-16
जैसा प्रळयांबूचा उभडु । बुडवूनि विश्वाचा पवाडु । होय आपणपें निबिडु । आपणचि ॥ 138 ॥
ज्याप्रमाणे प्रलयकालाचे जळ वाढू लागलें म्हणजे, विश्वचा थांगपत राहू न देतां, सर्व दिशा आपणच व्यापून आपल्याच स्वरूपानें केवल स्थित असतें. 38
139-16
मग उगम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु । परी जलैक्याचा बोधु । तोही कवणा? ॥ 139 ॥
व मग, उगम, प्रवाह, अगर विश्रांतिस्थान जो सागर इत्यादि व्यवहारभेद सर्व लोपून जातात, तेथे, ” सर्व जलमय आहे ” असा बोध होण्यासारखा तरी अन्य कोणता पदार्थ आहे की त्यास तो व्हावा? 39
140-16
तैसी ज्ञेया देतां मिठी । ज्ञातृत्वही पडे पोटीं । मग उरे तेंचि किरीटी । शांतीचें रूप ॥ 140 ॥
त्याप्रमाणे, अर्जुना, सर्व ज्ञेय आटून गेले असतां (बाधित झाले असतां ) ज्ञातृत्वही आपोआपच आपल्याच ठिकाणीं लयाला जाऊन केवळ ज्ञप्तिमात्र (ज्ञानमात्र) असणारी जी वस्तु, तेंच शान्तीचे खरे स्वरूप होय. 140

141-16
आतां कदर्थवीत व्याधी । बळीकरणाचिया आधीं । आपपरु न शोधी । सद्वैद्यु जैसा ॥ 141 ॥
आतां व्याधिग्रस्त रोग्याला आरोग्य प्राप्त करून देण्याच्या कामी सद्वैद्य जसा आपपर भाव बाळगीत नाही. 41
142-16
का चिखलीं रुतली गाये । धडभाकड न पाहे । जो तियेचिया ग्लानी होये । कालाभुला ॥ 142 ॥
किंवा चिखलांत रुतलेली गाय पाहून ज्याचे अंत:करण व्यथित होतें तो जसा तिचा उद्धार करतांना ती दुभती आहे की भाकड आहे ह्याचा विचार करीत बसत नाही. 42
143-16
नाना बुडतयातें सकरुणु । न पुसे अंत्यजु कां ब्राह्मणु । काढूनि राखे प्राणु । हेंचि जाणे ॥ 143 ॥
किंवा बुडणाऱ्या मनुष्याची करुणा येणारा समर्थ मनुष्य जसा तो अंत्यज आहे कीं ब्राह्मण आहे ह्याचा विचार न करितां त्याला तीराला पोंचवून त्याचा प्राण रक्षण करणे एवढेच आपले कर्तव्य समजतो. 43
144-16
कीं माय वनीं पापियें । उघडी केली विपायें । ते नेसविल्यावीण न पाहे । शिष्टु जैसा ॥ 144 ॥
किंवा पाप्यांनी एखादी गरीब अबला अरण्यांत उघडीनागडी केलेली दिसतांच तिचे शरीर आच्छादित केल्याशिवाय कोणीही शिष्ट स्वस्थ असत नाहीं. 44
145-16
तैसे अज्ञानप्रमादादिकीं । कां प्राक्तनहीन सदोखीं । निंदत्वाच्या सर्वविखीं । खिळिले जे ॥ 145 ॥
त्याप्रमाणे जे अज्ञान व घोर चुका ह्यांनी युक्त असून, पूर्वकर्मामुळे दुःखित आहेत व सर्वथैव निदेला पात्र आहेत. 45

146-16
तयां आंगीक आपुलें । देऊनियां भलें । विसरविजती सलें । सलतीं तियें ॥ 146 ॥
त्यांना स्वतःसहाय्य होऊन त्यांच्या त्या दुःखाचा विसर पाडून सुखविण्याचा प्रयत्न करतात.46
147-16
अगा पुढिलाचा दोखु । करूनि आपुलिये दिठी चोखु । मग घापे अवलोकु । तयावरी ॥ 147 ॥
अरे, पुढील म्हणजे गांठ पडणाच्या अंगीं जर कांहीं दोष दिसले तर ते वर्ज्य करून, मग त्याच्यापाशीं तो सलगी करितो. 47
148-16
जैसा पुजूनि देवो पाहिजे । पेरूनि शेता जाइजे । तोषौनि प्रसादु घेइजे । अतिथीचा ॥ 148 ॥
ज्याप्रमाणें देव पूजेनं सुशोभित करून मग प्रसन्नचित्ताने पहावा, शेतांत पेरणी करून मग फलाशेने तिकडे जावें, किंवा अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आशिर्वाद घ्यावा. 48
149-16
तैसें आपुलेनि गुणें । पुढिलाचें उणें । फेडुनियां पाहणें । तयाकडे ॥ 149 ॥
त्याप्रमाणे, आपल्या आंगच्या गुणांनीं अगर साधनांनी पुढील व्यक्तींतील उणीव भरून काढून मग त्यांच्याकडे (आदराने) अवलोकन करावें. 49
150-16
वांचूनि न विंधिजें वर्मीं । नातुडविजे अकर्मीं । न बोलविजे नामीं । सदोषीं तिहीं ॥ 150 ॥
इतकेच नव्हे तर, त्यांना झोंबतील असे शब्द बोलू नये, त्यांच्या अनाचाराचा उल्लेख करू नये किंवा त्यांच्या पापाचाराचा उच्चार करून त्यांना खेद होईल असेंही करू नये, 150

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading