सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ७६ ते १०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

76-16
नातरी वार्षिया नाहीं मांडिली । ग्रीष्में नाहीं सांडिली । माजीं निजरूपें निवडली । गंगा जैसी ॥ 76 ॥
किंवा, वर्षाऋतु संपून गेला आहे व ग्रीष्मऋतूस आरंभ नाही ह्या मधल्या कालांत गंगा जशी स्वत:च्या नित्यशुद्ध स्वरूपाने असते. 76
77-16
तैसी संकल्पविकल्पाची वोढी । सांडूनि रजतमाची कावडी । भोगितां निजधर्माची आवडी । बुद्धि उरे ॥ 77 ॥
त्याप्रमाणे, संकल्प व विकल्प ह्यांची ओढ व रज, तम, गुण, ह्यांची वस्ती ज्या बुद्धींतून । पार नाहीशी होऊन जिला निजधर्माची म्हणजे स्वस्वरूपाची आवड उत्पन्न झाली आहे. 77
78-16
इंद्रियवर्गीं दाखविलिया । विरुद्धा अथवा भलीया । विस्मयो कांहीं केलिया । नुठी चित्तीं ॥ 78 ॥
इष्ट अगर अनिष्ट अशा कोणत्याही गोष्टीचे इंद्रियवर्गाने दर्शन करविलें तरी ज्याचे चित्त चलित होत नाही. 78
79-16
गांवा गेलिया वल्लभु । पतिव्रतेचा विरहक्षोभु । भलतेसणी हानिलाभु । न मनीं जेवीं ॥ 79 ॥
पतीच्या परदेश गमनामुळे विरहदुःखाने पीडित पतिव्रता जशी प्रापंचिक इतर लहानमोठी हानि मनावरही घेत नाही. 79
80-16
तेवीं सत्स्वरूप रुचलेपणें । बुद्धी जें ऐसें अनन्य होणें । ते सत्त्वशुद्धी म्हणे । केशिहंता ॥ 80 ॥
तशी सत्वरूपाची आवड उत्पन्न जी बुद्धि त्या ठिकाण (सत्स्वरूपी) अनन्य होते तिला सत्वशुद्धि असे म्हणावें असे केशी दैत्यहन्त्या भगवंतांनी सांगितले. 80

81-16
आतां आत्मलाभाविखीं । ज्ञानयोगामाजीं एकीं । जे आपुलिया ठाकी । हांवें भरे ॥ 81 ॥
आतां, आत्मलाभासाठी ज्ञान अथवा योग ह्या दोन साधनांपैकी आपली बुद्धि ज्यावर स्थिर होईल.81
82-16
तेथ सगळिये चित्तवृत्ती । त्यागु करणें या रीती । निष्कामें पूर्णाहुती । हुताशीं जैसी ॥ 82 ॥
निष्काम यज्ञकर्म करणाराने अग्नीमध्ये जशी पूर्णाहुति द्यावी त्याप्रमाणे सर्व चित्तवृत्तीचा त्या आवडीच्या साधनाच्या ठिकाणीं लय करावा. 82
83-16
कां सुकुळीनें आपुली । आत्मजा सत्कुळींचि दिधली । हें असो लक्ष्मी स्थिरावली । मुकुंदीं जैसी ॥ 83 ॥
किंवा कुलीन गृहस्थाने सत्कुलांत अर्पण केलेली आपली कन्या जशी त्या कुलांत अनन्य होते अथवा लक्ष्मी जशी श्रीमुकुंदचरण अनन्य आहे.83
84-16
तैसे निर्विकल्पपणें । जें योगज्ञानींच या वृत्तिक होणें । तो तिजा गुण म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥ 84 ॥
त्याचप्रमाणे, योग अथवा ज्ञान ह्यापैकी एका विषयाविषयीं विकल्परहितत्वाने अनन्य असणे हा तिसरा गुण होय, असें भगवान् श्रीकृष्ण म्हणतात.84
85-16
आतां देहवाचाचित्तें । यथासंपन्नें वित्तें । वैरी जालियाही आर्तातें । न वंचणे जें कां ॥ 85 ॥
आतां कायावाचामने व शक्यनुसार धनी, आपला शत्रूही जर आर्त होऊन (अडून) पुढे आला तर त्याला विन्मुख न करणे असा जो गुण, 85

86-16
पत्र पुष्प छाया । फळें मूळ धनंजया । वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा ॥ 86 ॥
वाटेवरील वृक्षाची आलेल्या वाटसरूला, आपल्या फल, मूल, छाया वगैरेंचा उपभोग घेण्याला जशी कधीं ना नसते.86
87-16
तैसें मनौनि धनधान्यवरी । विद्यमानें आल्या अवसरीं । श्रांताचिये मनोहारीं । उपयोगा जाणें ॥ 87 ॥
त्याचप्रमाणे, असलेल्या धनधान्यादिकांचा आलेल्या याचकाला अथवा अतिथीला त्याच्या मनाप्रमाणे उपभोग घेऊ देऊन त्याचे समाधान करणे, 87
88-16
तयां नांव जाण दान । जें मोक्षनिधानाचें अंजन । हें असो आइक चिन्ह । दमाचें तें ॥ 88 ॥
ह्याला “दान” असे म्हणतात व मोक्षरूप ठेवा दिसण्याचे ते एक अंजनच होय; आतां “दम” म्हणजे काय त्याचे लक्षण ऐक. 88
89-16
तरी विषयेंद्रियां मिळणी । करूनि घापे वितुटणी । जैसें तोडिजे खड्गपाणी । पारकेया ॥ 89 ॥
शस्त्रधारी ज्याप्रमाणे शत्रूचा संबंध त्याच्या नाशानें तोडून टाकतो त्याचप्रमाणे, विषय व इंद्रियें यांचे सान्निध्य झाले असतां जो त्याची ताटातुट करितो. 89
90-16
तैसा विषयजातांचा वारा । वाजों नेदिजे इंद्रियद्वारां । इये बांधोनि प्रत्याहारा । हातीं वोपी ॥ 90 ॥
तसाच विषयमात्राचा उपद्रव इंद्रियद्वारा स्वतःला होऊ देत नाही व त्यांना (इंद्रियांना) प्रत्याहाराचे बंधन घालितो. 90

91-16
आंतुला चित्ताचें अंगवरीं । प्रवृत्ति पळे पर बाहेरी । आगी सुयिजे दाहींहि द्वारीं । वैराग्याची ॥ 91 ॥
दशेंद्रियांच्या द्वारांवर वैराग्यरूप अग्नि घातल्यामुळे चित्ताच्या आंत दडून असलेली विषयविषयक प्रवृत्ति बाहेर पळून जाते. 91
92-16
श्वासोश्वासाहुनी बहुवसें । व्रतें आचरे खरपुसें । वोसंतिता रात्रिदिवसें । नाराणुक जया ॥ 92 ॥
योग्याच्या प्राण निरोधनापेक्षांही कठीण अशी व्रते रात्रंदिवस आचरीत असल्याने ज्याला दुसरी सवडच नसते. 92
93-16
पैं दमु ऐसा म्हणिपे । तो हा जाण स्वरूपें । यागार्थुही संक्षेपें । सांगों ऐक ॥ 93 ॥
ज्याला दम असे म्हणतात. त्यांचे हे स्वरूप होय. आतां यज्ञ तो काय संक्षेपाने सांगतों तें श्रवण कर.93
94-16
तरी ब्राह्मण करूनि धुरे । स्त्रियादिक पैल मेरे । माझारीं अधिकारें । आपुलालेनि ॥ 94 ॥
तरी ब्राह्मणांपासून आरंभ करून स्त्रियांदिकापर्यंत आपापल्या अधिकारा प्रमाणे, 94
95-16
जया जे सर्वोत्तम । भजनीय देवताधर्म । ते तेणें यथागम । विधी यजिजे ॥ 95 ॥
ज्याला जें उचित असें भजनपूजनादि देवताधर्म शास्त्रविहित असतील, ते त्या आज्ञेप्रमाणे त्याने आचरावे. 95

96-19
जैसा द्विज षट्कर्में करी । शूद्र तयातें नमस्कारी । कीं दोहींसही सरोभरी । निपजे यागु ॥ 96 ॥
उदाहरणार्थ, ब्राह्मणाने षट्कर्माचरण करावें व शूद्राने त्याला नुसता नमस्कार करावा, तरी दोघांसही यज्ञाचे पुण्य घडते. 96
97-16
तैसें अधिकारपर्यालोचें । हें यज्ञ करणें सर्वांचें । परी विषय विष फळाशेचें । न घापे माजीं ॥ 97 ॥
ह्याप्रमाणे आपापला अधिकार पाहून सर्वांनी यज्ञाचरण करावें, पण, त्यापासून अमुक फलप्राप्ति व्हावी असें आशेचे विष मात्र पोटांत नसावें. 97
98-16
आणि मी कर्ता ऐसा भावो । नेदिजे देहाचेनि द्वारें जावों । ना वेदाज्ञेसि तरी ठावो । होइजे स्वयें ॥ 98 ॥
आणि ह्या यज्ञाचा मी कर्ता आहे असा देहबुद्धिद्वारा भाव उत्पन्न न होऊं देतांही वेदांज्ञा यथासांग पाळावी. 98
99-16
अर्जुना एवं यज्ञु । सर्वत्र जाण साज्ञु । कैवल्यमार्गींचा अभिज्ञु । सांगाती हा ॥ 99 ॥
अर्जुना, ह्याप्रमाणे यज्ञ हा सर्वत्र शास्त्राज्ञेप्रमाणेच असावा लागतो. (अथवा तसा असेल तोच यज्ञ होय) हा मोक्षमार्गातील एक उत्तम सोबती होय. 99
100-16
आतां चेंडुवें भूमी हाणिजे । नव्हे तो हाता आणिजे । कीं शेतीं बीं विखुरिजे । परी पिकीं लक्ष ॥ 100 ॥
कोणीही भूईवर चेंडू आपटतो तो पुन्हा आपल्याच हाती यावा ह्या उद्देशानेच होय (इतस्ततः जावा म्हणून नव्हे) अथवा शेतांत जें बीं पेरतात तें पिकाकडे लक्ष देऊनच होय. 100

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading