सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७५१ ते ७७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

751-13
तैसें जीवित्व जाये । तयास्तव काळु पाहे । हें हातोहातींचें नव्हे । ठाउकें जया ॥13-751॥
त्याप्रमाणे (वरील 750 ओवी. मीठाच्या उदाहरणाप्रमाणे) दिवसानुदिवस आयुष्य कमी होत जाते. त्यामुळे काळाला उजाडते म्हणजे मरण जवळ येते. ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत नाही.
752-13
किंबहुना पांडवा । हा आंगींचा मृत्यु नीच नवा । न देखे जो मावा । विषयांचिया ॥752॥
अर्जुना, फार काय सांगावे? हे शरीराचे नित्य नवे मरण जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही.
753-13
तो अज्ञानदेशींचा रावो । या बोला महाबाहो । न पडे गा ठावो । आणिकांचा ॥753॥
हे महाबाहो अर्जुना, तो पुरुष अज्ञानदेशाचा राजा आहे. या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली असे नाही, तर हे अज्ञानाचे पूर्ण वर्णन झाले.
754-13
पैं जीविताचेनि तोखें । जैसा कां मृत्यु न देखे । तैसाचि तारुण्ये पोखें । जरा न गणी ॥754॥
(अज्ञानाची लक्षणे = म्हातारपणाविषयी बेफिकीर) जगण्याच्या सुखाने ज्याप्रमाणे मृत्यूकडे लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे तारुण्याच्या संतोषाने म्हातारपणाविषयी बेपर्वा असतो.
755-13
कडाडीं लोटला गाडा । कां शिखरौनि सुटला धोंडा । तैसा न देखे जो पुढां । वृधाप्य आहे ॥755॥
डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गाडा अथवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा जसा पुढील परिणामाला, म्हणजे आपले तुकडे तुकडे होतील हे पहात नाही. तसे पुढे म्हातारपण येणार आहे हे पहात नाही.

756-13
कां आडवोहळा पाणी आलें । कां जैसे म्हैसयाचें झुंज मातलें । तैसें तारुण्याचे चढलें । भुररें जया ॥756॥
अथवा आडरानातील ओढ्यास जसा पूर यावा किंवा रेड्यांची जशी टक्कर माजावी त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते.
757-13
पुष्टि लागे विघरों । कांति पाहे निसरों । मस्तक आदरीं शिरों । बागीबळ ॥757॥
शरीराचा लठ्ठपणा नाहीसा होण्य़ास लागतो व शरीरातील तेज कमी होण्यास लागते व मस्तकास कापरे सुटते.
758-13
दाढी साउळ धरी । मान हालौनि वारी । तरी जो करी । प्रियेचा पैसु॥758॥
दाढी पांढरी होते, मान हलून नाही नाही अशी निर्वाणीची खूण करते, तरी देखील जो प्रिय वस्तूचा पसारा वाढवीत रहातो,
759-13
पुढील उरीं आदळे । तंव न देखे जेवीं आंधळें । कां डोळ्यावरलें निगळे । आळशी तोषें ॥759॥
पुढे असलेला पदार्थ उरावर आदळेपर्यंत आंधळा जसा पुढे काय आहे ते पहात नाही अथवा डोळ्यावर आलेल्या चिपाडाच्या योगाने डोळे उघडत नाहीत या सबबीवर अधिकच झोप घेण्यास संधी सापडते म्हणून आळशी मनुष्य किळस घेण्याऐवजी अधिकच संतुष्ट होतो.
760-13
तैसें तारुण्य आजिचें । भोगितां वृद्धाप्य पाहेचें । न देखे तोचि साचें । अज्ञानु गा ॥760॥
अरे अर्जुना, त्याप्रमाणे आजचे तारुण्य भोगीत असता उद्याचे येणारे म्हातारपण जो पहात नाही, तोच खरोखर अज्ञानी आहे.

761-13
देखे अक्षमें कुब्जें । कीं विटावूं लागे फुंजें । परी न म्हणे पाहे माझें । हेचि भवे ॥761॥
आंधळ्या माणसाकडे पाहून किंवा कुबड्या माणसांकडे पाहून त्यास गर्वाने वेडावू लागतो पण असे म्हणत नाही की माझीही उद्या हीच अवस्था होईल.
762-13
आणि आंगीं वृद्धाप्यतेची । संज्ञा ये मरणाची । परी जया तारुण्याची । भुली न फिटे ॥762॥
आणि मरणाचे चिन्ह जे म्हातारपण ते शरीरावर आले परंतु ज्याला तारुण्याची भ्रांती सुटत नाही,
763-13
तो अज्ञानाचें घर । हें साचचि घे उत्तर तेवींचि परयेसीं थोर चिन्हें आणिक ॥763॥
तो पुरुष अज्ञानाचे घर आहे, हे बोलणे खरे मान. त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी मोठी लक्षणे ऐक.
764-13
तरि वाघाचिये अडवे । चरोनि एक वेळ आला दैवें । तेणें विश्वासें पुढती धांवे । वसू जैसा ॥764॥
(अज्ञानाची लक्षणे = रोगादींची चिंता करत नाही, क्षणभंगुरता जाणत नाही)
तर वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने एक वेळा सुरक्षितपणे पोळ (बैल) चरून आला, त्या विश्वासाने जसा तो पोळ पुन्हा त्या अरण्याकडे धावतो.
765-13
कां सर्पघराआंतु । अवचटें ठेवा आणिला स्वस्थु । येतुलियासाठीं निश्चितु । नास्तिकु होय ॥765॥
ज्या जागेत पुरलेल्या द्रव्यावर सर्प होता अशा जागेतून एकदा चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले, एवढ्यावरून जो खास नास्तिक होतो (म्हणजे पुरलेल्या द्रव्यावर सर्प असतो व तो द्रव्य घेऊ देत नाही ही गोष्ट खोटी आहे असे मानतो.

766-13
तैसेनि अवचटें हें । एकदोनी वेळां लाहे । एथ रोग एक आहे । हें मानीना जो ॥766॥
त्याप्रमाणे आरोग्य, हे एखादे दुसरे वेळी चुकून मिळालेले असले, तर तेवढ्यावरच या शरीरात रोग म्हणून काही एक आहे, ही गोष्ट जो मानीतच नाही.
767-13
वैरिया नीद आली । आतां द्वंद्वें माझीं सरलीं । हें मानी तो सपिली । मुकला जेवीं ॥767॥
शत्रूला झोप लागली एवढ्यावरून जो असे मानतो की आता आपले भांडणतंटे संपले, असे मानून जो स्वस्थ रहातो, तो ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांसह नाश पावतो.
768-13
तैसी आहारनिद्रेची उजरी । रोग निवांतु जोंवरी । तंव जो न करी । व्याधी चिंता ॥768॥
त्याप्रमाणे आहार व निद्रा ही जेथपर्यंत यथास्थित चालू आहेत व जोपर्यंत रोग निवांत आहे, तोपर्यंत जो रोगाची काळजी करीत नाही.
769-13
आणि स्त्रीपुत्रादिमेळें । संपत्ति जंव जंव फळे । तेणें रजें डोळे जाती । जयाचे ॥769॥
आणि स्त्री पुत्रादिकांच्या संगतीत जसजशी संपत्ती अधिकाधिक मिळत जाते, तसतसा त्या संपत्तीच्या धूराने ज्याच्यातील विचार नाहीसा होतो,
770-13
सवेंचि वियोगु पडैल । विळौनी विपत्ति येईल । हें दुःख पुढील । देखेना जो ॥770॥
या स्त्रीपुत्रादि व संपत्ती यांचा तात्काळ वियोग होईल व एका दिवसात वाईट अवस्था येईल, हे पुढले दु:ख जो आगाऊ जाणत नाही.

771-13
तो अज्ञान गा पांडवा । आणि तोही तोचि जाणावा । जो इंद्रियें अव्हासवा । चारी एथ ॥771॥
अर्जुना, तो अज्ञानी आहे, जो इंद्रियांना हवे ते बरे वाईट न पहाता विषय देतो, तो देखील अज्ञानीच समजावा.
772-13
वयसेचेनि उवाये । संपत्तीचेनि सावायें । सेव्यासेव्य जाये । सरकटितु ॥772॥
(अज्ञानाची लक्षणे = विषयाधीनता, अविचार) तारुण्याच्या उत्कर्षाने आणि संपत्तीच्या साह्याने जो सेवन करण्य़ास योग्य-अयोग्य अशी निवड न करता सरसकट विषय सेवन करतो.
773-13
न करावें तें करी । असंभाव्य मनीं धरी । चिंतू नये तें विचारी । जयाची मती ॥773॥
जे करू नये ते करतो व न होणार्‍या गोष्टी मनात आणतो आणि ज्याविषयी विचार करू नये त्याविषयीच ज्याची बुद्धी विचार करते.
774-13
रिघे जेथ न रिघावें । मागे जें न घ्यावें । स्पर्शे जेथ न लागावें । आंग मन ॥774॥
जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करतो, जे घेऊ नये ते मागतो व जेथे अंग किंवा मन लागू देऊ नये त्यांना जाऊन खेटतो.
775-13
न जावें तेथ जाये । न पाहावें तें जो पाहे । न खावें तें खाये । तेवींचि तोषे ॥775॥
जेथे जाऊ नये, तेथे जातो, जे पाहू नये ते पहातो व खाऊ नये ते खातो व ह्या निषिद्ध गोष्टी केल्याबद्दल वाईट न वाटता त्याविषयी आनंद मानतो.

, , , , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading