सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ९५१ ते ९७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

951-13
पैं बाळ जैं जेवविजे । तैं घांसु विसा ठायीं कीजे । तैसें एकचि हेंचतुर्व्याजें । कथिलें आम्हीं ॥951॥
मुलाला जेव्हा जेवायला घालायचे असते, तेव्हा एक घास वीस ठिकाणी करावा लागतो, त्याप्रमाणे एकच परब्रह्म चार प्रकारच्या निमित्ताने तुला सांगितले.
952-13
एक क्षेत्र एक ज्ञान । एक ज्ञेय एक अज्ञान । हे भाग केले अवधान । जाणौनि तुझें ॥952॥
तुझे लक्ष पाहून तुझी ग्र हणशक्ती पाहून, एकाच ब्रह्माचे, एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय व एक अज्ञान असे आम्ही चार भाग केले.
953-13
आणि ऐसेनही पार्था । जरी हा अभिप्रावो तुज हाता । नये तरी हे व्यवस्था । एक वेळ सांगों ॥953॥
(हाच विचार प्रकृति व पुरुष अशी दोन प्रकारे विभागणी करून सांगतील)
आणि अर्जुना असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू.
954-13
अवतां चौठायीं न करूं । एकही म्हणौनि न सरूं । आत्मानात्मया धरूं । सरिसा पाडु ॥954॥
आता त्या ब्रह्माचे चार ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व एक ब्रह्म आहे असे करून संपवणार नाही. तर आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. (एकाच ब्रह्माचे आत्मा (पुरुष) व अनात्मा (प्रकृति) असे भाग सारखे करून सांगू.
955-13
परि तुवां येतुलें करावें । मागों तें आम्हां देआवें । जे कानचि नांव ठेवावें । आपण पैं गा ॥955॥
(अर्जुनाचे श्रवण =)
परंतु तू एवढे मात्र कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हास दिले पाहिजे. ते मागणे हे आहे की तू आपल्या स्वत:स कानाचे नाव ठेव. इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेऊन फक्त ऐकण्याचे काम चालू दे.
956-13
या श्रीकृष्णाचिया बोला । पार्थु रोमांचितु जाहला । तेथ देवो म्हणती भला । उचंबळेना ॥956॥
या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते पाहून देव म्हणाले, तू चांगला आहेस, पण हर्षवेगाने अनावर होऊ नको.
957-13
ऐसेनि तो येतां वेगु । धरूनि म्हणे श्रीरंगु । प्रकृतिपुरुषविभागु । परिसें सांगों ॥957॥
अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णांनी आवरून, श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृतिपुरुषाचा विभाग सांगतो ऐक.
प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि ।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥13.19॥

भावार्थ प्रकृति व पुरुष ही दोन्हीही अनादि आहेत, असे जाण. (देहेंद्रियादि) विकार आणि (सत्व इत्यादि) गुण हे प्रकृतिपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण.
सांख्यांचा प्रकृति-पुरुष विचार
958-13
जया मार्गातें जगीं । सांख्य म्हणती योगी । जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों ॥958॥
या मार्गाला जगामधे योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्यमार्गाचे महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो.
959-13
तो आइक निर्दोखु । प्रकृतिपुरुषविवेकु । म्हणे आदिपुरुखु । अर्जुनातें ॥959॥
तो प्रकृतिपुरुषाचा शुद्ध विचार तू ऐक, असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले.
960-13
तरी पुरुष अनादि आथी । आणि तैंचि लागोनि प्रकृति । संसरिसी दिवोराती । दोनी जैसी ॥960॥
तर दिवस आणि रा त्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी (चिकटलेली) आहेत, त्याप्रमाणे पुरुष अनादि आहे व प्रकृति ही त्यावेळेपासून (अनादि) आहे.

961-13
कां रूप नोहे वायां । परी रूपा लागली छाया । निकणु वाढे धनंजया । कणेंसीं कोंडा ॥961॥
किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही, तरी पण त्या खर्‍या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहेमी जडवलेलीच असते किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीचे कणीस हे असार भूस व साररूप दाणे यासह वाढते.
962-13
तैसीं जाण जवटें । दोन्हीं इयें एकवटे । प्रकृतिपुरुष प्रगटें । अ नादिसिद्धें ॥962॥
त्याप्रमाणे उघड अनादिसिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृति-पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज.
963-13
पैं क्षेत्र येणें नांवें । जें सांगितलें आघवें । तेंचि एथ जाणावें । प्रकृति हे गा ॥963॥
अरे, क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृति होय असे समजावे.
964-13
आणि क्षेत्रज्ञ ऐसें । जयातें म्हणितलें असे । तो पुरुष हें अनारिसे । न बोलों घेईं ॥964॥
आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही.
965-13
इयें आनानें नांवें । परी निरूप्य आन नोहे । हें लक्षण न चुकावें । पुढतपुढती ॥965॥
ह्यास ही निरनिराळी नावे आहेत परंतु ज्याच्याविषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही हे वर्म तू वारंवार चुकू नकोस.

966-13
तरी केवळ जे सत्ता । तो पुरुष गा पंडुसुता । प्रकृतीतें समस्तां । क्रिया नाम ॥966॥
अर्जुना, केवळ सत्ता (सदत्व) तिला पुरुष असे नाव आहे. आणि (संपूर्ण) क्रियेस प्रकृति हे नाव आहे.
967-13
बुद्धि इंद्रियें अंतःकरण । इत्यादि विकारभरण । आणि ते तिन्ही गुण । सत्त्वादिक ॥967॥
बुद्धि, इंद्रिये, अंत:करण इत्यादि विकारांचा समुदाय सत्वादि (सत्व, रज व तम) तिन्ही गुण.
968-13
हा आघवाचि मेळावा । प्रकृती जाहला जाणावा । हेचि हेतु संभवा । कर्माचिया ॥968॥
हा सर्व समुदाय प्रकृतिपासून झाला आहे असे समज. आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू (कारण) आहे.
कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥13.20॥

भावार्थ कार्य म्हणजे मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळवण्याकरता इंद्रियांकडून होणारी क्रिया, कारण ज्याविषयी इच्छा उत्पन्न झाली असते तो पदार्थ, इच्छित वस्तू कर्तृत्व. इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगास मनाकडून होणारी प्रेरणारूप क्रिया) या सर्वास मूळ प्रकृति आहे असे म्हणतात. आणि सुखदु:खांच्या भोगाला कारण पुरुष आहे असे म्हणतात.
969-13
तेथ इच्छा आणि बुद्धि । घडवी अहंकारेंसीं आधीं । मग तिया लाविती वेधीं । कारणाच्या ॥969॥
(प्रकृतीच्या ठिकाणी) अगोदर इच्छा आणि बुद्धि ही अहंकारास उत्पन्न करतात आणि मग (इच्छा व बुद्धि) जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू (मिळवण्याच्या) नादी लावतात.
970-13
तेंचि कारण ठाकावया । जें सूत्र धरणें उपाया । तया नांव धनंजया । कार्य पैं गा ॥970॥
ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागला असेल, तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हालवावयाचे, अर्जुना, ह्या बाह्य प्रयत्नास ‘कार्य’ असे म्हणतात.

971-13
आणि इच्छा मदाच्या थावीं । लागली मनातें उठवी । तें इंद्रियें राहाटवी । हें कर्तृत्व पैं गा ॥971॥
आणि मदाच्या (धुंदीच्या) आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चिथावते व नंतर ते मन इंद्रियांकडून इच्छित करवून घेते. इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणार्‍या या प्रेरणारूप क्रियेस अर्जुना, कर्तृत्व असे म्हणतात.
972-13
म्हणोनि तीन्ही या जाणा । कार्यकर्तृत्वकारणा । प्रकृति मूळ हे राणा । सिद्धांचा म्हणे ॥972॥
आणि म्हणूनच या तिन्ही कारण, कर्तृत्व व कार्य यांना प्रकृति ही मूळ आहे असे समज. असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले.
973-13
एवं तिहींचेनि समवायें । प्रकृति कर्मरूप होये । परी जया गुणा वाढे त्राये । त्याचि सारिखी ॥973॥
याप्रमाणे या तिघांच्या समुदायास प्रकृति कर्मरूप होते. परंतु ज्या गुणांचे आधिक्य होईल, त्यासारखी ती बनते.
974-13
जें सत्त्वगुणें अधिष्ठिजे । तें सत्कर्म म्हणिजे । रजोगुणें निपजे । मध्यम तें ॥974॥
ज्या कर्माचा सत्वगुण अंगिकार करतो, त्याला सत्कर्म म्हणावे व जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे.
975-13
जें कां केवळ तमें । होती जियें कर्में । निषिद्धें अधमें । जाण तियें ॥975॥
किंबहुना जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्रविरुद्ध व निकृष्ट प्रतीची अधर्म्य समजावीत.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *