अष्टावक्र गीता – अध्याय १४
अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.अध्याय १४जनक म्हणालाजो पुरुष स्वभावानें शून्यचित्त आहे तो प्रारब्धकर्मानुसार आलेले विषय भोगतो. पण जसा गाढ झोपलेल्या माणसानें, उठवण्यांत आल्यानें, त्या झोपेचा पगडा असतांनाच सांगितलेलें काम करावें
, त्याच प्रकारें हानिलाभाचा विचार न करतां अलिप्त व साक्षी राहून तीं कर्में करतो. ॥१॥जनक म्हणतो कीं, शून्यचित्त झाल्यामुळें माझ्या विषयभावना मावळल्या आहेत. पूर्णात्मदर्शी अशा माझी विषयभोगांची इच्छा नष्ट झाल्यानें आतां माझें धन कुठलें ? मित्र कुठलें ? शास्त्रांचा अभ्यास कुठला ? आणि निदिध्यासनादिक कुठें उरलें ? माझी तर कशाबद्दलच आस्थाबुद्धि राहिली नाहीं. ॥२॥
साक्षी पुरुष व परब्रह्म पारमात्म्याचा बोध होऊन सार्या आशा मावळल्या, बंधनें गळून पडलीं व मोक्षाचीही कामना शिल्लक राहिली नाहीं. ॥३॥विकल्पशून्य अंतःकरणाच्या निभ्रांत पुरुषाच्या अवस्थेंत स्वच्छंदानें वावरणार्या, त्या मुक्त पुरुषाला त्याच मुक्त अवस्थेला पोहोंचलेला मुक्तपुरुषच जाणतो. ॥४॥
