101-14
आपपृथ्वी उत्कटें । आणि तमोमात्रें निकृष्टें । स्थावरु उमटे । उद्भिजु हा ॥101॥
आप व पृथ्वी यांच्या आधिक्याने आणि केवळ नीच अशा तमोगुणाने स्थावर असा उद्भिज उत्पन्न होतो.
102-14
पांचां पांचही विरजीं । होती मनबुद्ध्यादि साजीं । हीं हेतु जारजीं । ऐसें जाण ॥102॥
पंचमहाभूते ही सर्वच आपसात सहकार्य करतात व मन व बुद्धी इत्यादि ज्ञानसाधने तरतरीत होतात. ही मनुष्यादि जारज योनी उत्पन्न होण्याची कारणे आहेत असे समज.
103-14
ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ । महाप्रकृति स्थूळ । तेंचि शिर ॥103॥
या प्रमाणे चार भूतयोनी, हे ज्याचे सरळ चार हात व पाय आहेत व स्थूल जी महाप्रकृती हे ज्याचे मस्तक आहे.
104-14
प्रवृत्ति पेललें पोट । निवृत्ति ते पाठी नीट । सुर योनी आंगें आठ । ऊर्ध्वाचीं ॥104॥
प्रवृत्ती हे ज्याचे पुढे आलेले पोट आहे व निवृत्ती ही नीट (सरळ) पाठ आहे व अष्ट देवयोनी ही ज्याची वरची (कमरेच्या वरची) अंगे आहेत.
105-14
कंठु उल्हासता स्वर्गु । मृत्युलोकु मध्यभागु । अधोदेशु चांगु । नितंबु तो ॥105॥
आनंदभरित असा जो स्वर्ग हा ज्याचा कंठ (गळा) आहे, मृत्यूलोक ही ज्याची कंबर आहे व पाताळ ज्याचा चांगला कंबरेचा पृष्ठभाग आहे.
106-14
ऐसें लेकरूं एक । प्रसवली हें देख । जयाचें तिन्ही लोक । बाळसें गा॥106॥
अर्जुना, ज्याचे बाळसे तिन्ही लोक आहेत असे एक मूल ही प्रसवली पहा.
107-14
चौऱ्यांयशीं लक्ष योनी । तियें कांडां पेरां सांदणी । वाढे प्रतिदिनीं । बाळक हें ॥107॥
चौर्यांशी लक्ष योनी ह्या ज्याच्या (ज्या बालकाच्या) कांड्यांचे व पेरांचे सांधे आहेत असे हे बालक दिवसेंदिवस वाढत आहे.
108-14
नाना देह अवयवीं । नामाचीं लेणीं लेववी । मोहस्तन्यें वाढवी । नित्य नवें ॥108॥
(माया ही या बालकाच्या) देहाच्या निरनिराळ्या अवयवांवर नामांचे अलंकार घालते व मोहरूपी दूधाने ती माया या बालकाला नित्य नवेपणाने वाढवते.
109-14
सृष्टी वेगवेगळीया । तिया करांघ्रीं आंगोळियां । भिन्नाभिमान सूदलिया । मुदिया तेथें ॥109॥
वेगवेगळ्या सृष्ट्या, त्या या बालकाची हातांची व पायांची बोटे आहेत व प्रत्येक योनीत असणारे निरनिराळे अभिमान हे त्या बोटात घातलेल्या अंगठ्या होत.
110-14
हें एकलौतें चराचर । अविचारित सुंदर । प्रसवोनि थोर । थोरावली ॥110॥
स्थावर-जंगमात्मक जगद्रूपी एकुलते एक व अविचारकाली सुंदर वाटणारे असे हे मोठे बालक, त्याला जन्म देऊन ही माया थोर झाली (म्हणजे वाढली).
111-14
पै ब्रह्मा प्रातःकाळु । विष्णु तो मध्यान्ह वेळु । सदाशिव सायंकाळु । बाळा यया ॥111॥
ब्रह्मदेव हा या बालकाचा प्रात:काळ आहे, विष्णू हा त्या बालकाचा माध्यन्ह-काळ आहे व सदाशिव हा स्थितिकालामध्ये त्याचा सायंकाळ आहे.
112-14
महाप्रळयसेजे । खेळोनि निवांत निजे । विषमज्ञानें उमजें । कल्पोदयीं ॥112॥
हे बालक स्थितीकालामध्ये अनंत घडामोडींचा खेळ खेळुन खेळुन दमुन आले की ते महाप्रलयाच्या अंथरुणावर शांत झोपी जाते.आणि ज्यावेळेस कल्पाचा सुर्योदय झाला असता.
हे बालक भेदज्ञानाने जागे होते.
113-14
अर्जुना इयापरी । मिथ्यादृष्टीच्या घरीं । युगानुवृत्तीचीं करी । चोज पाउलें ॥113॥
अर्जुना, याप्रमाणे हे बालक मिथ्या दृष्टिच्या घरात कृतयुग,ञेता,द्वापार,आणि कलीयुग या चार युगांच्या अनुक्रमांची पावले कौतुकाने पुढे पुढे टाकत जाते.
114-14
संकल्पु जयाचा इष्टु । अहंकारु तो विनटु । ऐसिया होय शेवटु । ज्ञानें यया ॥114॥
या बालकाचा तर्हेतर्हेचे संकल्प करने हा या बालकाचा आवडता आहे व अहंकार हा याचा खेळगडी आहे. अशा या बालकाचा शेवट (नाश) त्यावेळी आत्मज्ञानाने होतो.
115-14
आतां असो हे बहु बोली । ऐसें विश्व माया व्याली । तेथ साह्य जाली । माझी सत्ता ॥115॥
आता हे पुष्कळ बोलणे पुरे झाले. वर वर्णन केल्याप्रमाणे माया ही सर्व जगताला जन्म देते. या क्रमात त्या मायेला माझ्या अधिष्ठानाचा आधार मिळतो.
किंवा माझ्या सत्तेच्या आधारेच मायापासुन हे विश्व तयार झाले.
सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः ।
तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥14.4॥
भावार्थ हे कौंतेया, सर्व योनीमधे ही जी शरीरे निर्माण होतात, त्या सर्वांची ञिगुणमयी माया ही गर्भ धारण करणारी माता आहे आणि मी त्या त्या योनीत बीज तयार करणारा पिता आहे.
116-14
याकारणें मी पिता । महद्ब्रह्म हे माता । अपत्य पंडुसुता । जगडंबरु ॥116॥
भगवान या कारणास्तव अर्जुनास सांगतात की,मी या सर्व विक्ष्वाचा पिता आहे आणि महद्ब्रह्म माया ही आई आहे व हा एवढा विशाल जगताचा जो आकार दिसत आहे. हे आम्हा दोघांपासुन झालेले मुल आहे.
117-14
आतां शरीरें बहुतें । देखोनि न भेदें हो चित्तें । जे मनबुद्ध्यादि भूतें । एकेंचि येथें ॥117॥
आता वेगवेगळ्या प्रकारचे शरीरे पाहून तुझ्या चित्तात भेद येऊ देऊ नकोस. कारण की या वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरात मन, बुद्धी, अहंकार व पंचमहाभूते, ही जी जगातील आठ तत्वे आहेत, ती एकच आहेत.
118-14
हां गा एकचि देहीं । काय अनारिसें अवयव नाहीं । तेवीं विचित्र विश्व पाहीं । एकचि हें ॥118॥
अरे अर्जुना, ज्याप्रमाने एकाच देहामधे निरनिराळे (भिन्न भिन्न प्रकारचे) अवयव नसतात काय? त्याप्रमाणे हे विचित्र जग, विक्ष्व वेगळ्या प्रकारचे दिसले तरी ते तत्वतः एकच आहे.
119-14
पैं उंचा नीचा डाहाळिया । विषमा वेगळालिया । येकाचि जेवीं जालिया । बीजाचिया ॥119॥
जसे एखादे झाड असते.त्याच्या फांद्या काही उंचच्या उंच तर काही खाली काही वाकड्या अशा प्रकारे त्या सर्व फांद्या भिन्न भिन्न स्वरुपाच्या असतात.तरी त्या शेवटी एकाच झाडाच्या किंवा त्या एकाच बीजापासुन उत्पन्न झालेल्या असतात.
120-14
आणि संबंधु तोही ऐसा । मृत्तिके घटु लेंकु जैसा । कां पटत्व कापुसा । नातू होय ॥120॥
म्हणुन आमचा या विशाल जगाशी संबंध आहे, पण तो देखील कसा आहे. जसा की मातीपासुन तयार झालेला घट हा मातीपासुन तयार झालेला मुलगा होय.किंवा थोडक्यात सांगायचे झाल्यास जसे कापड हे कापसाचे नातवंड आहे.
121-14
नाना कल्लोळपरंपरा । संतती जैसी सागरा । आम्हां आणि चराचरा । संबंधु तैसा ॥121॥
अथवा लाटांची परंपरा ही जशी संतती आहे, तसा आमचा व चराचराचा संबंध आहे.
122-14
म्हणोनि वन्हि आणि ज्वाळ । दोन्ही वन्हीचि केवळ । तेवीं मी गा सकळ । संबंधु तैसा ॥122॥
म्हणून अग्नी आणि ज्वाळा हे दोन्ही केवळ एक अग्नीच आहेत, त्याप्रमाणे मी आणि जग म्हणजे मीच असुन माझ्यापासुन सर्व जग हे वेगळे आहे. व हा सर्व संबंध,कल्पना करने मिथ्या आहे.
123-14
जालेनि जगें मी झांकें । तरी जगत्वें कोण फांके? । किळेवरी माणिकें । लोपिजे काई? ॥123॥
जगाच्या उत्पत्तीने जर मी झांकला जात असेन तर या पृथ्वीतलावावरचे व्यवहार कोणाच्या आधाराने चालतात माणिकाच्या तेजाने माणिक लोपले जाते काय?
124-14
अळंकारातें आलें । तरी सोनेपण काइ गेलें? । कीं कमळ फांकलें । कमळत्वा मुके ?॥124॥
सोने हे अलंकार स्वरुपाला आले असता त्याचे सोनेपण गेले काय? अथवा कमळ उमलले असता त्यातील कमळपण नष्ट होते काय?
125-14
सांग पां धनंजया । अवयवीं अवयविया । आच्छादिजे, कीं तया । तेंचि रूप? ॥125॥
भगवान अर्जुनास सांगतात की अवयव धारण करनारा हा अवयवांकडून झाकला जातो काय? कारण अवयव हेच अवयवीचे स्वरूप आहे?
Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण
