सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ६०१ ते ६२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

601-13
महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षीं सरिसे । इष्टानिष्ट तैसें । जयाच्या ठायीं ॥601॥
15) चित्ताचे समत्व
आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय व अप्रिय गोष्टी सारख्या असतात (म्हणजे प्रिय गोष्टींनी ज्याला हर्ष होत नाही व अप्रिय गोष्टींनी ज्याला वाईट वाटत नाही.
602-13
कां तिन्ही काळ होतां । त्रिधा नव्हे सविता । तैसा सुखदुःखीं चित्ता । भेदु नाहीं ॥602॥
अथवा सकाळ, दुपार व संध्याकाळ या तीन काळी सूर्य जसा तीन प्रकारचा होत नाही त्याप्रमाणे सुखाचे व दु:खाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंत:करण सुखी अथवा दु:खी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही.
603-13
जेथ नभाचेनि पाडें । समत्वा उणें न पडे । तेथ ज्ञान रोकडें । वोळख तूं ॥603॥
कोणत्याही ऋतूच्या येण्याजाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही त्याप्रमाणे ज्याचे ठिकाणी प्रिय वा अप्रिय वस्तूंच्या हानी अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही, अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज.
(श्लोक10)
मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।
विक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥13.10॥

अर्थ माझ्या ठिकाणी अनन्ययोगाने अव्यभिचारिणी भक्ती, एकांत प्रदेशात रहाणे व जनांच्या समुदायाची खंती॥13-10॥
604-13
आणि मीवांचूनि कांहीं । आणिक गोमटें नाहीं । ऐसा निश्चयोचि तिहीं? जयाचा केला ॥604॥
अव्यभिचारिणी भक्ती
आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी (कायेने, वाचेने व मनाने) निश्चयच केलेला आहे.
605-13
शरीर वाचा मानस । पियालीं कृतनिश्चयाचा कोश । एक मीवांचूनि वास । न पाहती आन ॥605॥
ज्याचे शरीर वाचा, वाचा व मन ह्या तिघांनी वरील प्रमाणे केलेल्या निश्चयाचा कोश प्यायला आहे (प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे) आणि एक माझ्यावाचून आणखी कशाचीही इच्छा ते करत नाहीत.

606-13
किंबहुना निकट निज । जयाचें जाहलें मज । तेणें आपणयां आम्हां सेज । एकी केली ॥606॥
फार काय सांगावे ! ज्याचे अंत:करण माझ्याशी अगदी जडून राहिले आहे, त्याने आपले व आमचे एक अंथरुण केले आहे. (माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन राहिला आहे).
607-13
रिगतां वल्लभापुढें । नाहीं आंगीं जीवीं सांकडें । तिये कांतेचेनि पाडें । एकसरला जो ॥607॥
पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला शरीराने व अंत:करणाने जसा संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे.
608-13
मिळोनि मिळतचि असे । समुद्रीं गंगाजळ जैसें । मी होऊनि मज तैसें । सर्वस्वें भजती ॥608॥
गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात.
609-13
सूर्याच्या होण्यां होईजे । कां सूर्यासवेंचि जाइजे । हें विकलेपण साजे । प्रभेसि जेवीं ॥609॥
सूर्याच्या उदयाबरोबर प्रगट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा (अनन्यता) प्रभेला जसा शोभतो.
610-13
पैं पाणियाचिये भूमिके । पाणी तळपे कौतुकें । ते लहरी म्हणती लौकिकें । एऱ्हवीं तें पाणी ॥610॥
पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे.

611-13
जो अनन्यु यापरी । मी जाहलाही मातें वरी । तोचि तो मूर्तधारी । ज्ञान पैं गा ॥611॥
जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो, म्हणजे माझ्याशी ऐक्य पावूनही माझे भजन करतो, अर्जुना तोच ते मूर्तिमंत ज्ञान होय.
612-13
आणि तीर्थें धौतें तटें । तपोवनें चोखटें । आवडती कपाटें । वसवूं जया ॥612॥
17) एकांत
आणि तीर्थे (नदी व समुद्र यांचे) पवित्र किनारे, तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा ह्या ठिकाणी ज्यास रहावयास आवडते,
613-13
शैलकक्षांचीं कुहरें । जळाशय परिसरें । अधिष्ठी जो आदरें । नगरा न ये ॥613॥
डोंगराच्या बगलेतील गुहामधे व सरोवराच्या आसपास जो प्रेमाने रहातो आणि शहरात येत नाही,
614-13
बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदावरी खंती । जाण मनुष्याकारें मूर्ती । ज्ञानाची तो ॥614॥
ज्याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो, तो मनुष्यरूपाने ज्ञानाची केवल मूर्तीच आहे असे समज.
615-13
आणिकहि पुढती । चिन्हें गा सुमती । ज्ञानाचिये निरुती- । लागीं सांगों ॥615॥
हे बुद्धिमान अर्जुना, ज्ञानाचा निश्चय करण्याकरता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो.
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतद्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा ॥13.11॥

अर्थ अध्यात्मज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म तेथे दृष्टी स्थित होणे, या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. या खेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय.

616-13
तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे । तें जया दिसें । ज्ञानास्तव ॥616॥
(18) अध्यात्मज्ञानाचे नित्यत्व मानणे.
तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे, ती ज्या ज्ञानामुळे अनुभवाला येते.
617-13
तें एकवांचूनि आनें । जियें भवस्वर्गादि ज्ञानें । तें अज्ञान ऐसा मनें । निश्चयो केला ॥617॥
त्या अध्यात्मज्ञानावाचून, इतर जी स्वर्ग व संसारसंबंधाची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो,
618-13
स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी । दे अध्यात्मज्ञानीं बुडी । सद्भावाची ॥618॥
स्वर्गाला जाणे ही गोष्ट तो सोडून देतो आणि संसारासंबंधाने कानावर गोष्टी येऊ देत नाही व आत्मज्ञानाविषयी चांगली भावना ठेऊन त्यात रममाण होतो.
619-13
भंगलिये वाटे । शोधूनिया अव्हांटे । निघिजे जेवीं नीटें । राजपंथें ॥619॥
जसे एखाद्या प्रवाशाने जेथे वाट फुटते, तेथे आल्यावर पुढे आडमार्ग कोणते आहेत, त्यांचा शोध करून मग जसे सरळ मार्गाने निघावे,
620-13
तैसें ज्ञानजातां करी । आघवेंचि एकीकडे सारी । मग मन बुद्धि मोहरी । आत्मज्ञानी ॥620॥
त्याप्रमाणे जेवढी ज्ञाने आहेत त्यांचा नीट विचार करतो व आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व ज्ञाने एकीकडे सारतो आणि नंतर मन व बुद्धी यांस अध्यात्मज्ञानाच्या मार्गाला लावतो.

621-13
म्हणे एक हेंचि आथी । येर जाणणें ते भ्रांती । ऐसी निकुरेंसी मती । मेरु होय ॥621॥
तो म्हणतो की हे आत्मज्ञान हेच एक खरे आहे व इतर ज्ञाने ती भ्रांती होय, अशा निश्चयाला त्याची बुद्धी मेरु (आधार) होते.
622-13
एवं निश्चयो जयाचा । द्वारीं आध्यात्मज्ञानाचा । ध्रुव देवो गगनींचा । तैसा राहिला ॥622॥
याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय अध्यात्मज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुव तार्‍याप्रमाणे स्थिर राहिलेला असतो.
623-13
तयाच्या ठायीं ज्ञान । या बोला नाहीं आन । जे ज्ञानीं बैसलें मन । तेव्हांचि तें तो ॥623॥
त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे या माझ्या (भगवंताच्या) बोलण्यात आडपडदा आहे असे अर्जुना तू म्हणशील (तर तुला स्पष्ट सांगतो की) जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले, तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला.
624-13
तरी बैसलेपणें जें होये । बैसतांचि बोलें न होये । तरी ज्ञाना तया आहे । सरिसा पाडु ॥624॥
तरी ज्ञानाच्या ठिकाणी मनाची स्थिरता झाली असता जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती ज्ञानाचे ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही, तरी पण ज्ञानाची व ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्याची योग्यता सारखीच आहे.
625-13
आणि तत्त्वज्ञान निर्मळ । फळे जें एक फळ । तें ज्ञेयही वरी सरळ । दिठी जया ॥625॥
आणखी शुद्ध आत्मज्ञान जे एक फल उत्पन्न करते, ते फल म्हणजे ज्ञेय (ब्रह्म) होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *