सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

451-15
जैसा आरिसा आलिया जवळां । दिसे आपणपें आपला डोळा । तैसा संवादिया तूं निर्मळा । शिरोमणी ॥ 451 ॥
आरसा जवळ आणिला असतां जसे आपले मुख आपल्यास दिसते, त्याप्रमाणे, शुद्धस्वरूपवस्तुविषयक संवाद करणारांमध्ये श्रेष्ठ असा तू, मला जणू आरसाच भेटल्यामुळे माझ्या सुखरूपतेचा त्यांत मला पुन्हा भोग घडणार आहे. 51
452-15
तुवां नेणोनि पुसावें । मग आम्ही परिसऊं बैसावें । तो गा हा पाडु नव्हे । सोयरेया ॥ 452 ॥
अर्जुना, तुला माहित नाही म्हणून तू विचारीत आहेस, आणि म्हणून आम्ही सांगतों अशां तला हा प्रकार नाही. 52
453-15
ऐसें म्हणौनि आलिंगिलें । कृपादृष्टी अवलोकिलें । मग देवो काय बोलिले । अर्जुनेंसीं ॥ 453 ॥
असे म्हणून देवांनीं अर्जुनाला प्रेमानें आलिंगन दिले आणि त्याजकडे कृपादृष्टीने पाहून पुढे त्याला म्हणाले, 53
454-15
पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें । तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ॥ 454 ॥
अरे, दोन ओठा मिळून शब्द एक, दोन पायांनी होणारे चालणे एक, त्याचप्रमाणे तुझे पुसणेआणि माझे सांगणे हा प्रकार आहे (प्रश्न आणि उत्तर दोहीं मिळून निष्पत्ति एक आत्मज्ञानच.) 54
455-15
एवं आम्ही तुम्ही येथें । देखावें एका अर्थातें । सांगतें पुसतें येथें । दोन्ही एक ॥ 455 ॥
एकंदरीत, त्या विषयाबद्दल तुझी व माझी अर्थदृष्टि एकच आहे, म्हणून, मी सांगणारा व तू विचारणारा असे दिसले, तरी आपण दोघे एकच म्हटले पाहिजेत. 55

456-15
ऐसा बोलत देवो भुलला मोहें । अर्जुनातें आलिंगूनि ठाये । मग बिहाला म्हणे नोहें । आवडी हे ॥ 456 ॥
असें बोलणें चाललें असतां स्नेहानें मोहित होऊन गहिंवरून देवांनीं अर्जुनाला पोटाशी आलिंगून धरिलें व तसेच बसले; व थोडयाच वेळांत वृत्तीवर येऊन स्वतःशीच म्हणाले, ह्या प्रसंगी इतका मोह कामाचा नाहीं 56
457-15
जाले इक्षुरसाचें ढाळ । तरी लवण देणें किडाळ । जे संवादसुखाचें रसाळ । नासेल थितें ॥ 457 ॥
कां कीं, उसाच्या रसाच्या ठेपीस नासू नये म्हणून क्षाराचे मिश्रण लागते. तसेच संवादसुख नुसतें गोठू दिले तर नासेल. त्यालाही द्वैताचा,क्षार दिला तरच गोडी टिकेल. 57
458-15
आधींच आम्हां यया कांहीं । नरनारायणासी भिन्न नाहीं । परी आतां जिरो माझ्या ठाईं । वेगु हा माझा ॥ 458 ॥
आम्हा नरनारायणांत मूळचा भेद नाहींच; तरीही ह्या वेळी मला आलेला प्रेमाचा वेग माझ्या ठिकाणी जिरविलाच पाहिजे. 58
459-15
इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा । पैं गा तो तुवां कैसा । प्रश्नु केला? ॥ 459 ॥
असा विचार करून, देव सावध झाल्यासारखे करून एकदम म्हणाले, अर्जुना, आतांच तू मला काय प्रश्न केलास रे? 59
460-15
जो अर्जुन श्रीकृष्णीं विरत होता । तो परतोनि मागुता । प्रश्नावळीची कथा । ऐकों आला ॥ 460 ॥
इकडे अर्जुनाची वृत्तीही श्री कृष्णरूप होत होती, तो देवांच्या ह्या प्रश्नने देहभानावर येऊन, आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यास तयार झाला. 460

461-15
तेथ सद्गदें बोलें । अर्जुनें जी जी म्हणितलें । निरुपाधिक आपुलें । रूप सांगा ॥ 461 ॥
व सद्गदित वाणीने म्हणाला, “ हो, हो, देवा, आपले निरुपाधिक रूप सांगा” असें मी म्हटलें होतें. 61
462-15
यया बोला तो शारङ्गी । तेंचि सांगावयालागीं । उपाधी दोहीं भागीं । निरूपीत असे ॥ 462 ॥
अर्जुनाचें हे भाषण ऐकून, तें निरुपाधिक रूप सांगण्यासाठी भगवंतांनी प्रथम उपाधींचे दोन प्रकारे निरूपण केले. 62
463-15
पुसिलिया निरुपहित । उपाधि कां सांगे येथ । हें कोण्हाही प्रस्तुत । गमे जरी ॥ 463 ॥
आपलें निरुपाधिक रूपवर्णन ऐकण्याची इच्छा अर्जुनाने दर्शविली असतां, देवांनी प्रथम उपाधींचे वर्णन कां केलें अशी जर कोणास शंका येईल. 63
464-15
तरी ताकाचें अंश फेडणें । याचि नांव लोणी काढणें । चोखाचिये शुद्धी तोडणें । कीडचि जेवीं ॥ 464 ॥
तर असे पहा, की दह्यांतील तक्रांश (तक) काढून टाकणे ह्याचेच नांव लोणी काढणे. (ती कांहीं स्वतंत्र क्रिया नहीं) होय; किंवा शुद्ध सोनें पाहिजे असेल तेव्हां त्यांतील अशुद्ध धातु जाळून नाहीशी करणें हेंच होय. 64
465-5
बाबुळीचि सारावी हातें । परी पाणी तंव असे आइतें । अभ्रचि जावें गगन तें । सिद्धचि कीं ॥ 465 ॥
शेवाळ बाजूला करणे ह्याचाच अर्थ पाणी शुद्ध करणे होय; (हे तर प्रथमच शुद्ध असतें, करावें लागत नाहीं) अथवा, अभ्र मावळलें कीं आकाश मूळचेच स्वच्छ आहे. 65

466-15
वरील कोंडियाचा गुंडाळा । झाडूनि केलिया वेगळा । कणु घेतां विरंगोळा । असे काई? ॥ 466 ॥
अशुद्धता आणणाच्या वरील कोंडयाचे वेष्टन बाजूस झाडून टाकलें कीं शुद्ध धान्य प्राप्तीला वेळ कसला? 66
467-15
तैसा उपाधि उपहितां । शेवटु जेथ विचारितां । तें कोणातेंही न पुसतां । निरुपाधिक ॥ 467 ॥
(उपहित चैतन्य विचाराचा विषय होऊ शकतें; शुद्ध चैतन्य नव्हे उपहितांतीलही केवळ उपाधीच विचारार्ह आहे, चैतन्य नव्हे म्हणून ) उपाधियुक्त वस्तूतील उपाधीचा जेथे विचाराने शेवट अंत होतो, त्याच्या पलिकडे जे राहिलें तें निरुपाधिक; ते स्वप्रकाश आहे त्याला कोणाची संमंति नको. 67
468-15
जैसें न सांगणेंवरी । बाळा पतीसी रूप करी । बोल निमालेपणें विवरी । अचर्चातें ॥ 468 ॥
लग्न झालेली लहान मुलगी (घोडनवरी नव्हे) जे नांव घेतले असतां होय किंवा नहीं कांहीं न म्हणता, खाली मान घालून उगी रहाते, हे तिच्या पतीचे नांव तिच्या मनाने ठरले त्याप्रमाणे त्या शुद्ध, निरुपाधिक, अनिदं स्वरूपाच्या वर्णनात श्रुतीने मौन पत्करून त्यांचे “आवाङ्मनसगोचरत्व” दर्शित केले. 68
469-15
पैं सांगणेया जोगें नव्हे । तेथींचें सांगणें ऐसें आहे । म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहे । बोलिजे आदीं ॥ 469 ॥
म्हणून जें शब्दाने सांगण्यासारखे नसते त्याचे असें आजूबाजूने वर्णन करावें लागतें, हे मनांत आणून लक्ष्मीपति भगवंतानें प्रथम उपाधीचे वर्णन केले. 69
470-15
पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । दाविजे तेवीं औपाधिका । बोली इया ॥ 470 ॥
शुद्ध प्रतिपदेच्या चंद्रदर्शनार्थ जसा एखाद्या खांदीचा (फांदीचा) आधार दृष्टीला द्यावा लागतो, त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन करितांना तें उपाधिद्वारांच करावें लागते. 470
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ 15.16॥

471-15
मग तो म्हणे गा सव्यसाची । पैं इये संसारपाटणींची । वस्ती साविया टांची । दुपुरुषीं ॥ 471 ॥
देव म्हणाले, अर्जुना, या संसाररूप नगरांत, फक्त दोनच पुरुषांची वस्ती आहे. (क्षर व अक्षर) 71
472-15
जैसी आघवांचि गगनीं । नांदत दिवोरात्री दोन्ही । तैसे संसार राजधानीं । दोन्हीचि हे ॥ 472 ॥
ज्याप्रमाणे, सर्व आकाशांत दिवस आणि रात्र ही दोनच नांदतात त्याप्रमाणे ह्या संसार राजधानींत हे दोनच पुरुष नांदतात. 72
473-15
आणिकही तिजा पुरुष आहे । परी तो या दोहींचें नांव न साहे । जो उदेला गांवेंसीं खाये । दोहींतें ययां ॥ 473 ॥
आणखीही एक तिसरा पुरुष आहे, पण त्याच्या पुढे या दोन पुरुषांचे नुसतें नांवही घेण्याची सोय नाही; तो प्रगट झाला कीं, ह्या दोघांचा त्यांच्या नगरासह ग्रास करून टाकतो. 73
474-15
परी ते तंव गोठी असो । आधीं दोन्हींची हे परियेसों । जें संसारग्रामा वसों । आले असती ॥ 474 ॥
पण ह्या तिसन्या पुरुषाची गोष्ट तूर्त राहू दे; ह्या संसारग्रामांत प्रथम वस्तीला आलेले जे दोन पुरुष यांची गोष्ट ऐक. 74
475-15
एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगें पुरता चांगु । परी ग्रामगुणें संगु । घडला दोघां ॥ 475 ॥
त्यांतील एक आंधळा, वेडा व पंगु असून दुसरा सर्वांगपूर्ण व चांगला आहे; पण एकाच गांवांत आल्याने ही विषम मैत्री जडली. 75

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *