सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

476-15
तया एका नाम क्षरु । येरातें म्हणती अक्षरु । इहीं दोहींचि परी संसारु । कोंदला असे ॥ 476 ॥
त्यांतील पहिल्याचे नांव क्षर; व दुसऱ्याचे नांव अक्षर. या दोघांनीच हे संसारनगर व्यापून टाकले आहे. 76
477-15
आतां क्षरु तो कवणु । अक्षरु तो किं लक्षणु । हा अभिप्रायो संपूर्णु । विवंचूं गा ॥ 477 ॥
आतां ह्यांतील क्षर कोणता व अक्षराचे लक्षण काय, ही सर्व तुला विशद करून सांगतों. 77
478-15
तरी महदहंकारा- । लागुनियां धनुर्धरा । तृणांतींचा पांगोरा- । वरी पैं गा ॥ 478
तरी, अर्जुना महत्तत्त्व व अहंकारापासून गवताच्या काडीपर्यंत. 78
479-15
॥ जें कांहीं सानें थोर । चालतें अथवा स्थिर । किंबहुना गोचर । मनबुद्धींसि जें ॥ 479 ॥
जें कांहीं लहान थोर, स्थावर जंगम, किंवा मन व बुद्धि यांचा विषय होऊ शकणारे 79
480-15
जेतुलें पांचभौतिक घडतें । जें नामरूपा सांपडतें । गुणत्रयाच्या पडतें । कामठां जें ॥ 480 ॥
जें पंचमहाभूताचे कार्य आहे; नामरूपांत सांपडले, व तीन गुणांच्या कक्षेत येते. 480

481-15
भूताकृतीचें नाणें । घडत भांगारें जेणें । काळासि जूं खेळणें । जिहीं कवडां ॥ 481 ॥
ज्या पंचमहाभूतरूप सुवर्णानें अनंत आकृतीचे प्राणीरूप नाणे पाडले गेले आहे, व ज्या आकाररूप कवड्यांनी काळाचा जुगार नित्य चालू आहे. 81
482-15
जाणणेंचि विपरीतें । जें जें कांहीं जाणिजेतें । जें प्रतिक्षणीं निमतें । होऊनियां ॥ 482 ॥
जें जें कांहीं विपरीत ज्ञानाचा विषय असते, व प्रतिक्षणी उपन्न होऊन नाश पावतें. 82
483-15
अगा काढूनि भ्रांतीचे दांग । उभवी सृष्टीचें आंग । हें असो बहु जग । जया नाम ॥ 483 ॥
अरे, भ्रांतिरूप काष्ठांनी बनविलेला सृष्टीचा सांगाडा, हें असो; थोडक्यांत म्हणजे जे जग या नांवाने प्रसिद्ध आहे. 83
484-15
पैं अष्टधा भिन्न ऐसें । जें दाविलें प्रकृतिमिसें । जें क्षेत्रद्वारां छत्तिसें । भागी केलें ॥ 484 ॥
जें सातव्या अध्यायांत अष्टधा प्रकृतिरूपाने वर्णिले आहे व ज्यांचे तेराव्यांत छत्तीस प्रकारांनी क्षेत्राच्या रूपाने वर्णन आहे. 84
485-15
हें मागील सांगों किती । अगा आतांचि जें प्रस्तुतीं । वृक्षाकार रूपाकृती । निरूपिलें ॥ 485 ॥
हे मागील वर्णन कशाला? आतांच ह्याच अध्यायांत वृक्षाच्या रूपाने तुला जें वर्णन करून सांगितलें; 85

486-15
तें आघवेंचि साकारें । कल्पुनी आपणपयां पुरे । जालें असें तदनुसारें । चैतन्यचि ॥ 486 ॥
त्या सर्व साकारवस्तु ह्या आपल्या वास्तव्याच्या जागा आहेत असें कल्पून. त्या त्या आकारानें हे चैतन्यच नटले आहे.86
487-15
जैसा कुहां आपणचि बिंबें । सिंह प्रतिबिंब पाहतां क्षोभे । मग क्षोभला समारंभें । घाली तेथ ॥ 487 ॥
ज्याप्रमाणे सिंह विहिरीत आपलेंच प्रतिबिंब पाहून, त्यायोगे दुसऱ्या सिंहाच्या शंकेने क्रुद्ध होतो व त्या भरांत आंत उडी घेतो. 87
488-15
कां सलिलीं असतचि असे । व्योमावरी व्योम बिंबे जैसें । अद्वैत होऊनि तैसें । द्वैत घेपे ॥ 488 ॥
(आकाश सर्वव्यापक असल्यामुळे त्याच्या प्रतिबिंबाला वावच नाहीं तरीही ) जल ह्या उपाधीने युक्त असलेल्या आकाशांत पुन्हा आकाशाचेच प्रतिबिंब होते, त्याप्रमाणे अद्वैत आमचैतन्य हें कधींही द्वैत होणे शक्य नसून उपाधियोगें द्वैत बनल्यासारखे दिसतें, 88
489-15
अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरीं । आत्मा विस्मृतीचि करी । निद्रा तेथ ॥ 489 ॥
अर्जुना, याप्रमाणे, साकार नगराची कल्पना करून आत्मा तेथे स्वस्वरूपविस्मृतीची निद्रा घेतो. 89
490-15
पैं स्वप्नीं सेजार देखिजे । मग पहुडणें जैसें तेथ कीजे । तैसें पुरीं शयन देखिजे । आत्मयासी ॥ 490 ॥
स्वतः अंथरुणावर असतांनाच स्वप्नात पुन्हा जसे अंथरूण तयार करून त्यावर झोंप घ्यावी, त्याप्रमाणे, सर्वगत आत्मा अज्ञानउपाधीने पुन्हा शरीररूप नगर उत्पन्न करून तेथे झोंप घेतो. 490

491-15
पाठीं तिये निद्रेचेनि भरें । मी सुखी दुःखी म्हणत घोरें । अहंममतेचेनि थोरें । वोसणायें सादें ॥ 491 ॥
मग त्या निद्रेच्या भरात मी सुखी, मी दुःखी असे म्हणत घोरत पडतो व त्याच घोरांत मी आणि माझे असे मोठघाने बरळत असतो 91
492-15
हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता । पुत्र वित्त कांता । माझें हें ना ॥ 492 ॥
हा पहा, माझा पिता, ही आई हा पहा मी गोरा आहे, काळा आहे, अव्यंग आहे, आणि हा मुलगा, ही स्त्री, हे द्रव्य, हीं माझींच नव्हत कां? 92
493-15
ऐसिया वेंघोनि स्वप्ना । धांवत भवस्वर्गाचिया राना । तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा ॥ 493 ॥
अशा स्वप्नावर आरूढ होऊन स्वर्गसंसारादि अरण्यांत धांवा ठोकणारें जें चैतन्य त्याला, अर्जुना, क्षर पुरुष म्हणतात. 93
494-15
आतां ऐक क्षेत्रज्ञु येणें । नामें जयातें बोलणें । जग जीवु कां म्हणे । जिये दशेतें ॥ 494 ॥
त्याचा स्पष्ट अर्थ अस कीं, मागे जो क्षेत्रज्ञ म्हणून सांगितला किंवा येथे जगांत ज्याला जीव असे म्हणतात. 94
495-15
जो आपुलेनि विसरें । सर्व भूतत्वें अनुकरें । तो आत्मा बोलिजे क्षरें । पुरुष नामें ॥ 495 ॥
जो स्वस्वरूप विस्मृतीने सर्व भूतांसारखा होतो (म्हणजे ज्या ज्या उपाधीशी तादात्म्य पावेल ती मीच आहे असे म्हणतों) त्या जीवाम्याला क्षरपुरुष असे म्हणतात. 95

496-15
जे तो वस्तुस्थिती पुरता । म्हणौनि आली पुरुषता । वरी देहपुरीं निदैजतां । पुरुषनामें ॥ 496 ॥
त्याच्या “ पुरुषतेची” उपपत्ति दोन तऱ्हेने लागते वस्तुस्थितीने तो परिपूर्ण आहे म्हणून तो ” पुरुष” आहेच; किंवा देहपुरीमध्ये शयन करणारा अशा अर्थानेही त्याला “ पुरुषता ” आहे 96
497-15
आणि क्षरपणाचा नाथिला । आळु यया ऐसेनि आला । जे उपाधींचि आतला । म्हणौनियां ॥ 497 ॥
पण, असा हा “ पुरुष ” उपाधीशीं तादात्म्य पावल्यामुळे त्याजवर क्षरपणाच नसता आळ आला. 97
498-15
जैसी खळाळीचिया उदका- । सरसीं आंदोळे चंद्रिका । तैसा विकारां औपाधिका । ऐसाचि गमे ॥ 498 ॥
खळाळीच्या पाण्याच्या हालचालीने जसा आंतील चंद्रही हलत आहे असे दिसतें, (वस्तुतः तें हलणे फक्त जलाचे आहे) त्याप्रमाणे, उपाधींच्या विकारांमुळे हाही विकारी आहे असे वाटतें. 98
499-15
कां खळाळु मोटका शोषे । आणि चंद्रिका तैं सरिसींच भ्रंशे । तैसा उपाधिनाशीं न दिसे । उपाधिकु ॥ 499 ॥
तें खळाळीचे पाणी आटलें कीं त्यांतील प्रतिबिंबही त्याच क्षणीं नाश पावते, त्याप्रमाणे उपाधीच्या नाशानें औपाधिक (उपाधि युक्त) क्षरचैतन्यही प्रतीतीला येत नाही. 95
500-15
ऐसें उपाधीचेनि पाडें । क्षणिकत्व यातें जोडे । तेणें खोंकरपणें घडे । क्षर हें नाम ॥ 500 ॥
ह्याप्रमाणे, उपाधीच्या योगानें चैतन्याला क्षणिकत्व येऊन त्यालाच न्यूनतादर्शक क्षर असें नांव प्राप्त झाले; 500

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *