सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २६ ते ५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

26-15
तैसें श्रीनिवृत्तिराजें । अज्ञानपण हें माझें । आणिलें वोजें । ज्ञानाचिया ॥26॥
(निवृत्तिनाथांच्या गुरुकृपेचे महत्व) त्याप्रमाणे श्रीनिवृत्तिनाथांनी माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले.
27-15
परी हें असो आतां । प्रेम रुळतसे बोलतां । कें गुरुगौरव वर्णितां । उन्मेष असे? ॥27॥
पण आता हे गुरुकृपेचे वर्णन राहू द्या, कारण की त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मलीन होते. श्रीगुरूचे महत्व वर्णन करणारे ज्ञान कोठे आहे?
28-15
आतां तेणेंचि पसायें । तुम्हां संताचे मी पायें । वोळगेन अभिप्रायें । गीतेचेनि ॥28॥
आता त्याच श्रीगुरूच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृद्गत सांगाण्याच्या साधनाने मी (ज्ञानदेव) तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करीन.
29-15
तरी तोचि प्रस्तुतीं । चौदाविया अध्यायाच्या अंतीं । निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला ॥29॥
चौदाव्या अध्यायाचा सिद्धांत ‘ज्ञानान्मोक्ष:’ तर आता तोच अभिप्राय ऐका की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी चौदाव्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला
30-15
जें ज्ञान जयाच्या हातीं । तोचि समर्थु मुक्ति । जैसा शतमख संपत्ती । स्वर्गींचिये ॥30॥
की ज्याप्रमाणे शंभर यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर्य (इंद्रपद) मिळावण्य़ास समर्थ होतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झालेले आहे, तोच मोक्ष मिळवण्य़ास समर्थ होतो.


31-15
कां शत एक जन्मां । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा । करी तोचि ब्रह्मा । आन नोहे ॥31॥
अथवा जो शंभर जन्म, ब्रह्मकर्म करत करत घालवतो, तोच काय तो निश्चितपणे त्यास ब्रह्मदेवाचे पद भेटते दुसरे कुणासही ही नाही.
32-15
नाना सूर्याचा प्रकाशु । लाहे जेवीं डोळसु । तेवीं ज्ञानेंचि सौरसु । मोक्षाचा तो ॥32॥
ज्याप्रमाने डोळे चांगले असणार्‍या माणसाला जसा सुर्यप्रकाशाचा फायदा होतो.
तसेच आत्मज्ञान असणार्‍या माणसासच मोक्षप्राप्तिचा आनंद घेता येतो.
33-15
तरी तया ज्ञानालागीं । कवणा पां योग्यता आंगीं । हें पाहतां जगीं । देखिला एकु ॥33॥
ज्याप्रमाने ते आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणाच्या अंगी पाञता आहे. याचा काही प्रमानात विचार करुन पाहिले असता, संपुर्ण जगामध्ये तोच एक योग्य आधिकारी दिसुन येतो.
34-15
जें पाताळींचेंही निधान । दावील कीर अंजन । परी होआवे लोचन । पायाळाचे ॥34॥
ज्याप्रमाने जमिनीमध्ये असलेली साधन सामुग्री अर्थात द्रव्य डोळ्यात अंजन घातल्यास दृष्टीस पडते, परंतु ते अंजन घालण्यास डोळे सुद्धा पायाळू मनुष्याचेच पाहिजेत.
35-15
तैसें मोक्ष देईल ज्ञान । येथें कीर नाहीं आन । परी तेंचि थारे ऐसें मन । शुद्ध होआवें ॥35॥
त्याप्रमाणे आत्मज्ञाना- पासुन मोक्ष प्राप्त होतो. यामध्ये शंका घेण्यास तिळमाञ जागा नाही. पंरतु ते ज्ञान आत्मसाथ करावयाचे झाल्यास प्रथमतःहा अंतकरणाची शुद्धता ही खुप महत्वाची आहे.


36-15
तरी विरक्तीवांचूनि कहीं । ज्ञानासि तगणेंचि नाहीं । हें विचारूनि ठाईं । ठेविलें देवें ॥36॥
ज्ञान टिकण्यास वैराग्याची आवश्यकता तर वैराग्यावाचून कोठेही ज्ञान टिकावयाचे नाही, हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे.
37-15
आतां विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनातें वरी । हेंही सर्वज्ञें श्रीहरी । देखिलें असे ॥37॥
आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की जो आपण होऊन येऊन मुमुक्षूच्या मनाला माळ घालील? हे देखील सर्व जाणणार्‍या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे.
38-15
जे विषें रांधिली रससोये । जैं जेवणारा ठाउवी होये । तैं तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ॥38॥
(पंधराव्या अध्यायाची प्रस्तावना संसार क्षणभंगुर आहे हे कळेल तर वैराग्य निर्माण होईल )
ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणार्‍यास माहीत होते तेव्हा तो जसा त्याच्यापुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो.
39-15
तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता । तैं वैराग्य दवडितां । पाठी लागे ॥39॥
त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे, असे ज्यावेळेला कळेल त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागते.
40-15
आतां अनित्यत्व या कैसें । तेंचि वृक्षाकारमिषें । सांगिजत असे विश्वेशें । पंचदशीं ॥40॥
आता या संसाराला क्षणभंगुरता कशा प्रकारे आहे, याचेच उदाहरण भगवान श्रीकृष्ण पंधराव्या अध्यायामध्ये वृक्षाची उपमा देऊन त्याचे वर्णन करत आहेत.


41-15
उपडिलें कवतिकें । झाड येरिमोहरा ठाके । तें वेगें जैसें सुके । तैसें हें नोहे ॥41॥
सहज उन्मळून पडलेले झाड, शेंडा खाली व बूड वर असे पडले असते, तेव्हा ते लवकर सुकते, त्याप्रमानेच हे संसाररुपी वृक्ष वर मुळ आणि खाली फांद्या असे जरी असले, तरी ते लवकर सुकुन जाणारे नाही. अर्जुना हे माञ लक्षात ठेव.
42-15
याचि एकेपरी । रूपकाचिया कुसरी । सारीतसे वारी । संसाराची ॥42॥
ज्याप्रमाने संसारविषयी झाडाचे कौशल्याने रुपक करुन भगवंतानी या जन्म आणि मृत्युच्या चक्रव्युहातुन संसाररुपी येरझार संपवुन टाकली आहे.
43-15
करूनि संसार वावो । स्वरुपी अहंतेचा ठावो । होआवया अध्यावो । पंधरावा हा ॥43॥
संसार हा एक मिथ्या आहे हे सिद्ध करुन दाखवून आत्मस्वरूपामध्ये मी पणाचा अंतर्भाव व्हावा हाच ह्या पंधराव्या अध्यायाचा मुख्य विषय आहे.
44-15
आतां हेंचि आघवें । ग्रंथगर्भींचें चांगावें । उपलविजेल जीवें । आकर्णिजे ॥44॥
आता हेच ग्रंथातील सर्व चांगले उत्तमोत्तम सिद्धांत विस्तारपुर्वक स्पष्ट करुन सांगण्यात येतील तरी ते तुम्ही श्रोत्यांनी तन मन लावून एकाग्रचित्ताने हे ज्ञान श्रवण करावे.
45-15
तरी महानंदु समुद्र । जो पूर्ण पूर्णीमा चंद्र । तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसें म्हणे ॥45॥
तर अनंत असणारा ब्रह्मानंदाचा समुद्र, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचा राजा, जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो असे म्हणाला. (संसारवृक्ष)


46-15
अगा पैं पंडुकुमरा । येतां स्वरूपाचिया घरा । करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ॥46॥
अरे बाबा अर्जुना, आपण आपल्या ब्रम्हरुपी स्वरुपाच्या घरी येताना जे भ्रमरुपी द्वैत समोरुन झपाटणार्‍या वार्‍याप्रमाने अडवणुक करीत असते.
47-15
तो हा जगडंबरु । नोहे, येथ संसारु । हा जाणिजे महातरु । थांबला असे ॥47॥
ते हे भले मोठे अवाढव्य विशालकाय जगत् दिसत आहे, यालाच संसार असे म्हणतात. या विवेचनामध्ये हा संसार मुळीच नसुन सगळ्या बाजुनीं पसरलेला मोठा वृक्ष असे, असे जानुन घेण्यास परमात्मा अर्जुनास सांगतात.
48-15
परी येरां रुखांसारिखा । हा तळीं मूळें वरी शाखा । तैसा नोहे म्हणौनि लेखा । नयेचि कवणा ॥48॥
परंतु इतर सर्वसामान्य वृक्षांसारखा, खाली मुळे व वर फांद्या असलेला असा हा वृक्ष नाही. हा अलौकिक असा वृक्ष आहे म्हणून या वृक्षाचे कोणासही वर्णन करता येत नाही कोणाला अंत लागत नाही.
49-15
आगी कां कुऱ्हाडी । होय रिगावा जरी बुडीं । तरी हो कां भलतेवढी । वरिचील वाढी ॥49॥
ज्यावेळेस झाडाच्या बुडापाशी आग लावली असता अथवा कुर्‍हाडीचे कितीही घाव घातले असता तरी ही त्याचे कार्य बंद न पडता त्या झाडाची वाढ ही होतच असते.
50-15
जे तुटलिया मूळापाशीं । उलंडेल कां शाखांशीं । परी तैशी गोठी कायशी । हा सोपा नव्हे ॥50॥
ज्याप्रमाने सर्व साधारण असणारी झाडे ज्यावेळेस मुळासकट उपटले असता ते झाड फांद्यासकट उन्मळुन पडते. पंरतु तशा प्रकारे या संसाररुपी वृक्षाची अवस्था नसते कारण हा संसाररुपी वृक्ष तोडण्यास बोलण्या इतका सोप्पा नाही.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *