॥ भग्वद्गीतगीता श्लोक :-27 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- ५९९ ॥
॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ अथ पञ्चदशोऽध्यायः अध्याय पंधरावा ॥ पुरुषोत्तमयोग ॥
अध्याय पंधरावा
1-15
आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें । वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं ॥15-1॥
( सद्गुरुस्तवन)
आता आपले अंत:करण शुद्ध करुन त्या चौरंगावर श्रीगुरूंच्या पाउलांची स्थापना करु.
2-15
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी । भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥2॥
श्रीगुरू व आपण एक आहोत, अशा ऐक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत संपूर्ण कर्मेद्रिय- ज्ञानेद्रियरूपी फुलाच्या अनंत भावरुपी कमळकळ्या भरून त्या पुष्पांजुळीचे अर्घ्य श्रीगुरुचरणांवर देऊ.
3-15
अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ । ते लागलेसे अबोट । चंदनाचें ॥3॥
एकनिष्ठतारूपी स्वच्छ पाण्याने स्नान घालून, श्रीगुरूंच्या विषयी एकनिष्ठ असलेली जी वासना, तेच जणुकाय चंदन आहे असु मानुन श्रीगुरूस (अनामिका नावाचे) गंधाचे बोट लावू.
4-15
प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें । लेवऊं सुकुमारें । पदें तियें ॥4॥
श्रीगुरुविषयीचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागर्यांचे वाळे सद्गुरूच्या सुकुमार चरणकमलामध्ये घालू.
5-15
घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी । तिये घालूं जोडी । आंगोळिया ॥5॥
अनन्य भावाने शुद्ध झालेले सद्गुरुविषयीचे दृढ प्रेम हीच जणु रणजोडवी, ती सद्गुरूंच्या पायांच्या बोटात घालू.
6-15
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ । तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥6॥
आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ, ते सद्गुरूंच्या चरणावरी वाहू.
7-15
तेथे अहं हा धूप जाळूं । नाहं तेजें वोवाळूं । सामरस्यें पोटाळूं । निरंतर ॥7॥
देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहंवृत्ती हाच कोणी एक धूप, तो श्रीगुरुचरणांजवळ जाळू. या देहादिकांपकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती हेच कोणी एक तेज, त्या तेजाने श्रीगुरूस ओवाळू व त्या सद्गुरुचरणांस तदाकारतेने नेहेमी आलिंगन देऊ.
8-15
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण । करूं भोगमोक्ष निंबलोण । पायां तयां ॥8॥
श्रीगुरूच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण (स्थूलशरीर व लिंगशरीर) या दोन खडावा करून घालू व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष हे श्रीगुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकु
9-15
इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा ।
पाटु बांधे ॥9॥
ज्याच्या योगाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्रीगुरुचरणांच्या उपासनेस आम्ही योग्य होवो.
10-15
ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी । जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥10॥
ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते
11-15
पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापें कुरोंडी । तैसी आणी गोडी । अक्षरांतें ॥11॥
✏कोट्यावधी पूर्णचंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावेत अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते.
12-15
सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥12॥
✏ज्याप्रमाणे सूर्याने पूर्वदिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे (ज्या दैवाच्या योगाने) वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते.
13-15
नादब्रह्म खुजें । कैवल्यही तैसें न सजे । ऐसा बोलु देखिजे । जेणें दैवें ॥13॥
✏ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते की त्या व्याख्यानापुढे मोक्ष सुद्धा तसा (व्याख्यानासारखा) शोभत नाही
14-15.
श्रवणसुखाच्या मांडवीं । विश्व भोगी माधवीं । तैसी सासिन्नली बरवी । वाचावल्ली ॥14॥
✏श्रवणसुखाच्या मांडवामधे सर्व जगाला वसंतऋतुचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यानरूप वेली चांगली भरास येते.
15-15
ठावो न पवता जयाचा । मनेंसी मुरडली वाचा । तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु ॥15॥
✏ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असा जो देव तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो (शब्दाने त्याचे वर्णन करता येते) हे केवढे आश्चर्य आहे?
16-15
जें ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जें नागवे । तें अगोचर फावे । गोठीमाजीं ॥16॥
✏जे ज्ञानाला कळत नाही ध्यानासही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रह्म ते त्याच्या बोलण्यात सापडते.
17-15
येवढें एक सौभग । वळघे वाचेचें आंग । श्रीगुरुपादपद्मपराग । लाहे जैं कां ॥17॥
✏गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी वर सांगितलेले एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते.
18-15
तरी बहु बोलूं काई । आजि तें आनीं ठाईं । मातेंवाचूनि नाहीं । ज्ञानदेवो म्हणे ॥18॥
✏तर या संबंधाने फार काय सांगू? आज ते दैव माझ्याशिवाय दुसर्या ठिकाणी नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
19-15
जे तान्हेनि मियां अपत्यें । आणि माझे गुरु एकलौतें । म्हणौनि कृपेंसि एकहातें । जालें तिये ॥19॥
✏ कारण की मी श्रीगुरूचे तान्हे मूल आहे आणि माझे गुरु एकपुत्री आहेत. (म्हणजे मी माझ्या गुरूंना एकटाच मुलगा आहे). म्हणून मी त्या कृपेला एकटा ठिकाण झालो.
20-15
पाहा पां सरोवरी आघवी । मेघ चातकांसी रिचवी । मजलागीं गोसावी । तैसें केलें ॥20॥
✏ पहा चातक पक्ष्याकरता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामुग्रीची वृष्टी करतो, त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरता केले आहे. त्यांनी आपल्या बोधाचा सर्व साठा माझ्यात ओतला.
21-15
म्हणौनि रिकामें तोंड । करूं गेलें बडबड । कीं गीता ऐसें गोड । आतुडलें ॥21॥
म्हणून माझे रिकामे, शास्त्र वगैरे न शिकलेले, तोंड बडबड करू गेले, तर त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले.
22-15
होय अदृष्ट आपैतें । तैं वाळूचि रत्नें परते । उजू आयुष्य तैं मारितें । लोभु करी ॥22॥
दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो.
23-15
आधणीं घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ । जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥23॥
श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावी असे आले तर आधणात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात.
24-15
तयापरी श्रीगुरु । करिती जैं अंगीकारु । तैं होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा ॥24॥
त्याप्रमाणे श्रीगुरू जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात, तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन रहाते.
25-15
पाहा पां श्रीनारायणें । तया पांडवांचें उणें । कीजेचि ना पुराणें । विश्ववंद्यें? ॥25॥
गुरुस्तवनांतर्गत श्रीकृष्ण स्तवन असे पहा की त्या
पांडवांच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्ये असताही जगास पूज्य अशी त्यांची (त्या पांडवांच्या वैगुण्यांची) पुराणे श्रीकृष्णाने करून टाकली नाहीत काय?
Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण