सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

276-11
तंव देखिलें जी आघवेंचि । तरि आतां तुज ठावो तूंचि । तूं कुणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता ॥276॥
हें संपूर्ण मी पाहिलें, तेव्हा कळून आले की तुझें स्थान तूंच आहेस — म्हणजे तुझ्याहून स्थान निराळे नाही. तू कोणाचाहि नव्हेस – म्हणजे तू कोणापासून उत्पन्न झालेला नाहीस असा तूं अनादि व सिध्द आहेस.
(विश्वरूपाचे ठिकाणी विश्वरूपाहून दुसर्‍या पदार्थाचा अनुभवच नाही, म्हणून दुसर्‍या कोणापासून त्याची उत्पत्ती मानतां येत नाही. अर्थात् “अनादि आयता” म्हणजे विश्वरूप हें उत्पत्तीरहित स्वतःसिध्द वस्तुस्वरूप आहे असा अर्थ.)
277-11
तूं उभा ना बैठा । दिघडु ना खुजटा । तुज तळीं वरी वैकुंठा । तूंचि आहासी ॥277॥
तूं उभा नाहीस किंवा बसला नाहीस. तूं उंच नाहीस, ठेंगणा नाहीस. भगवंता ! तुझ्या खाली वर सर्वत्र एक तूंच भरला आहेस.
278-11
तूं रूपें आपणयांचि ऐसा । देवा तुझी तूंचि वयसा । पाठीं पोट परेशा । तुझें तूं गा ॥278॥
देवा !तूं रूपाने आपल्यासारखाच आहेस – म्हणजे तूं जसा अपरिमित तसें तुझें रूपहि अपरिमित आहे. तूंच तुझे वय आहेस – म्हणजे तुला जशी मर्यादा नाही व तुझें पाठ पोट तूंच आहेस तुझें पाठ पोटयुक्त इत्यादि अवयवयुक्त शरीर तूंच आहेस.
279-11
किंबहुना आतां । तुझें तूंचि आघवें अनंता । हें पुढत पुढती पाहतां । देखिलें मियां ॥279॥
किंबहुना आता सर्व तूच आहेस म्हणजे तूं जसा सच्चिदानंद स्वरूप तसें तुझे अवयवयुक्त शरीर सच्चिदानंदस्वरूप आहे असेच मी वारंवार पाहिलें आहे.
280-11
परि या तुझिया रूपाआंतु । जी उणीव एक असे देखतु । जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाहीं ॥280॥
पण या विश्वरूपांत एकच मला उणीव दिसत आहे, ती म्हणजे तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी आदि, मध्य, अंत हे तिन्ही नाहीत.


281-11
एऱ्हवीं गिंवसिलें आघवां ठायीं । परि सोय न लाहेचि कहीं । म्हणौनि त्रिशुद्धी हे नाहीं । तिन्ही एथ ॥281॥
तुला आदि, मध्य, अंत कोठे आहेत, हे सर्व ठिकाणी निरखून पाहिलें, परंतु कोठे थांग लागत नाही; म्हणून हे तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत हे त्रिवार सत्य आहे.
282-11
एवं आदिमध्यांतरहिता । तूं विश्वेश्वरा अपरिमिता । देखिलासि जी तत्त्वतां । विश्वरूपा ॥282॥
हे आदिमध्यान्तरहिता ! हे सर्व ब्रह्मांडाच्या नियंत्या! हे अमर्यादरूपा!हे विश्वरूपा ! याप्रमाणे तूं खरोखर आहेस, हे मी पाहिलें.
283-11
तुज महामूर्तीचिया आंगी । उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी । लेइलासी वानेपरींची आंगीं । ऐसा आवडतु आहासी ॥283॥
तुझ्या विश्वरूप महामूर्तीच्या अंगावर ज्या अनेक निरनिराळ्या मूर्ती प्रगट झाल्या आहेत त्या पाहतां, तू नाना प्रकारची आंगडीं घातली आहेस, असा वाटतोस.
284-11
नाना पृथक् मूर्ती तिया द्रुमवल्ली । तुझिया स्वरूपमहाचळीं । दिव्यालंकार फुलीं फळीं । सासिन्नलिया ॥284॥
किंवा नाना प्रकारच्या निरनिराळ्या मूर्ती ह्याच कोणी निरनिराळ वृक्षे वेली असून, त्या तुझ्या विश्वरूपी महापर्वताचे ठिकाणी दिव्य अलंकाररूपी फळा फुलांनी भरास आल्या आहेत.
285-11
हो कां जे महोदधीं तूं देवा । जाहलासि तरंगमूर्ती हेलावा । कीं तूं एक वृक्षु बरवा । मूर्तिफळीं फळलासी ॥285॥
किंवा देवा!असेहि वाटते की तूं महासमुद्र असून, मूर्ती ह्या तुझे तरंगरूप हेलकावे आहेत किंवा तूं एक सुंदर वृक्ष असून मूर्तीरूप फळांनी फलद्रूप झाला आहेस.


286-11
जी भूतीं भूतळ मांडिलें । जैसें नक्षत्रीं गगन गुढलें । तैसें मूर्तिमय भरलें । देखतसें तुझें रूप ॥286॥
अहो जी देवा ! जशी पृथ्वी भूतांनी व्यापिली आहे किंवा आकाश नक्षत्रांनी भरलें आहे, त्याप्रमाणे तुझें विश्वरूप मूर्तीने भरलेलें मी पाहात आहे.
287-11
जी एकेकीच्या अंगप्रांतीं । होय जाय हें त्रिजगती । एवढियाही तुझ्या आंगीं मूर्ती । कीं रोमा जालिया ॥287॥
देवा ! काय सांगू ! तुझ्या अंगावर दिसणार्‍या एका एका मूर्तीच्या एका एका अवयवावर हें त्रैलोक्य, उत्पन्न व नष्ट होत असून, एवढ्याहि मूर्ती तुझ्या अंगाचे ठिकाणी रोमाप्रमाणे दिसत आहेत.
288-11
ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा । तूं कवण पां एथ कोणाचा । हें पाहिलें तंव आमुचा । सारथी तोचि तूं ॥288॥
असा हा विश्वरूपाचा विस्तार मांडून राहिलेला तूं कोण व कोणाचा हे मी पाहिलें, तेव्हा आमचा जो सारथी श्रीकृष्ण, तोच तूं आहेस, असें दिसून आलें.
(आपल्या सारथी श्रीकृष्णाच्या एकदेशीयस्वरूपाचे ठिकाणीच अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होत होतें, असे माऊलिंचे म्हणणें आहे, अर्थात श्रीकृष्णस्वरूप व विश्वरूप असा या दोन्ही स्वरूपांचा प्रत्यय अर्जुनाला विश्वरूप दर्शनांत येत होता असे स्पष्ट दिसतें. यावरून भगवंताच्या एकदेशीय श्रीकृष्णस्वरूपाचा व विश्वरूपाचा केव्हाच विरोध नसतो व बीजवृक्षाप्रमाणे एकदेशीय श्रीकृष्णस्वरूपाचे ठिकाणी संपूर्ण विश्वरूप व विश्वरूपांत श्रीकृष्णस्वरूप समाविष्ट असते, असेच सिध्द होतें,)
289-11
तरी मज पाहतां मुकुंदा । तूं ऐसाचि व्यापकु सर्वदा । मग भक्तानुग्रहें तया मुग्धा । रूपातें धरिसी ॥289॥
भगवंता ! मला असे वाटतें की तूं असाच सदासर्वदा व्यापक आहेस, पण भक्तांवर प्रेमवृध्दिरूप अनुग्रह करण्याकरितां तू सुंदर गोजिरवाणें एकदेशीय श्रीकृष्णस्वरूप धारण करतोस.
(समुद्राचे कांठी उभे राहून समुद्राकडे पाहिले असतां, जसा तो विस्तीर्ण समुद्र मनुष्याच्या मर्यादित दृष्टीने मर्यादित पाहिला जातो, तरीपण, समुद्र विस्तीर्ण आहे, हें तो विसरत नसतो, त्याप्रमाणे भगवान सदा सर्वदा व्यापक असतो तरी भक्ताच्या प्रेमवृत्तीच्या मर्यादेमुळे, तो भक्ताकडून एकदेशीय घेतला जातो, तरीपण भक्त भगवंताची व्यापकता विसरत नसतो, “प्रेम गली अती साकली तामे दो न समाये” प्रेमाची गल्ली अत्यंत अरूंद असल्यामुळे भगवंताचें सगुणसाकारस्वरूपच, प्रेमाचा विषय होऊं शकतें, व्यापकस्वरूप होऊ शकत नाही; हेंच माउलिंनी या ओवींत सांगितलें आहे.)
290-11
कैसें चहूं भुजांचें सांवळें । पाहतां वोल्हावती मन डोळे । खेंव देऊं जाइजे तरी आकळे । दोहींचि बाहीं ॥290॥
तुझें तें चतुर्भुजरूप कसे सुंदर व गोजिरवाणें आहे की जे पाहतांक्षणीं मनाची व डोळ्यांची तृप्ति होते आणि प्रेमाणे आलिंगन देऊं म्हटल्यास आम्हांला आपल्या दोन हातांनी ते कवटाळतां येतें.


291-11
ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा । अमुचियाचि दिठी सलेपा । जें सामान्यत्वें देखिती ॥291॥
हे विश्वरूप भगवंता ! याप्रकारें आम्हा भक्तांवर कृपा करून, अशी ही गोजिरवाणी सगुण सांवळी मूर्ति धारण करतोस, पण आमची दृष्टिच अविद्येने दूषित असल्यामुळें आम्ही त्या तुझ्या सगुणरूपाला सामान्य मनुष्याप्रमाणेच पांचभौतिक लेखतो.
(भगवंताच्या सगुण श्रीकृष्णस्वरूपाला सामान्यत्वाने – म्हणजे इतर अज्ञानी जीवाच्या शरीराप्रमाणे पांचभौतिक जडविनाशी समजणार्‍यांची दृष्टि अविद्यादोषाने दूषितच असते असे माउलिंचे स्पष्ट म्हणणे आहे.)
292-11
तरी आतां दिठीचा विटाळु गेला । तुवां सहजें दिव्यचक्षू केला । म्हणौनि यथारूपें देखवला । महिमा तुझा ॥292॥
परंतु देवा ! तुम्ही सहज माझ्यावर कृपा करून जी ज्ञानदृष्टि दिली, त्या ज्ञानदृष्टिने माझ्या पूर्वदृष्टींतील अविद्येचा दोष नाहीसा झाल्यामुळे तुझ्या सगुणसाकारस्वरूपाचें यथार्थ ज्ञान होऊन, त्या सगुणस्वरूपाचा खरा महिमा आतां मला कळून आला.
293-11
परी मकरतुंडामागिलेकडे । तोचि होतासि तूं एवढें । रूप जाहलासि हें फुडें । वोळखिलें मियां ॥293॥
आणि मकराच्या तोंडाच्या आकाराप्रमाणे असलेल्या जुवांच्या मागच्या बाजूला जे तुम्ही बसलां होता, त्याच तुम्ही एवढें विश्वरूप धारण केलें, हें मी पक्के ओळखलें.
किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्11.17॥

अर्थ मुकुट, गदा व सुदर्शन चक्र धारण करणारा, तेजाची राशी, सर्वत्र प्रभायुक्त, ज्याच्याकडे एकसारखे पहाणे देखील अशक्य आहे असा दीप्तिमान् अग्नी, सूर्य यांच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा समन्ताद्भागी पसरलेली आहे असा व अमर्याद असा तुला मी पहात आहे.॥11-17॥
294-11
नोहे तोचि हा शिरीं? । मुकुट लेइलासि श्रीहरी । परी आतांचें तेज आणि थोरी । नवल कीं बहु हें ॥294॥
श्रीहरी भगवंता ! तुझ्या चतुर्भुजमूर्तीच्या मस्तकावर जो मुकुट घातला जात असे, तोच हा आतां घातलेला मुकुट नव्हे काय? पण आतां त्या मुकुटाचे तेज थोरवी कांही अपूर्व आहे, हें नवल आहे.
295-11
तेंचि हें वरिलियेचि हातीं । चक्र परिजितया आयती । सांवरितासि विश्वमूर्ती । ते न मोडे खूण ॥295॥
(हे विश्वरूप भगवंता!) शत्रूच्या वधार्थ फिरविण्याकरितां जे चक्र तुझ्या वरच्या हातांत सज्ज असतें, तेंच तूं सांवरून धरीत आहेस, ती खूण नाहीशी झाली नाही.


296-11
येरीकडे तेचि हे नोहे गदा । आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा । वागोरे सांवरावया गोविंदा । संसरिलिया ॥296
हे गोविंदा ! दुसरीकडे जी गदा आहे ती, तीच नव्हे काय? आणि शस्ररहित असलेल्या खालच्या दोन्ही भुजा घोड्याचा लगाम धरण्यांकरितां पुढें सरसाविल्या आहेत.
297-11
आणि तेणेंचि वेगें सहसा । माझिया मनोरथासरिसा । जाहलासि विश्वरूपा विश्वेशा । म्हणौनि जाणें ॥297॥
आणि माझ्या इच्छेबरोबर हे विश्वेशा ! आपण “तेणेचि” म्हणजे त्याच सगुण श्रीकृष्णस्वरूपाने एकदम विश्वरूप झालांत, हे मलां कळून आलें.
298-11
परी कायसें बा हें चोज । विस्मयो करावयाहि पाडू नाहीं मज । चित्त होऊनि जातसें निर्बुज । आश्चर्यें येणें ॥298॥
पण कसें आश्चर्य आहे पहा की या विश्वरूपाच्या दर्शनाने माझे चित्त दिङ्मूढ होऊन गेले आहे आणि मला आश्चर्य करण्यापुरतीहि योग्यता राहिली नाही.
299-11
हें एथ आथि कां येथ नाहीं । ऐसें श्वसोंही नये कांहीं । नवल अंगप्रभेची नवाई । कैसी कोंदलीं सैंघ ॥299॥
हे विश्वरूप येथे आहे किंवा नाही, याचा माझे मन विचार करू शकत नाही, तुझ्या अंगप्रभेचे विलक्षण अपूर्वत्व असून, ती कशी सर्वत्र भरली आहे, पहा.
300-11
एथ अग्नीचीही दिठी करपत । सूर्य खद्योतु तैसा हारपत । ऐसें तीव्रपण अद्भुत । तेजाचें यया ॥300॥
या प्रभेपुढे अग्नीची दृष्टि देखील होरपळून जाईल, सूर्याचे तेज देखील काजव्याच्या तेजाप्रमाणे या तेजात लोपून जाईल, असे या तुझ्या अद्भुत तेजाचें तीव्रपण आहे.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *