सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी ७६ ते १०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

76-10
तो पाषाणांमाजीं परिसु । रसांमाजी सिद्धरसु । तैसा मनुष्याकृति अंशु । तो माझाचि जाण ॥76॥
जसा पाषाणांत परिस श्रेष्ठ आहे कींवा रसांत सिध्दरस म्हणजे अमृत श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे तो सर्व मनुष्यांत माझा अंश होय, हें जाण.
77-10
तो चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ । परि माणुसपणाची भांब । लोकाचि भागु ॥77॥
असा मनुष्य, अर्जुना ! ज्ञानाचें चालतें बोलतें बिंब होय, त्याचे जे अवयव दिसतात ते ब्रह्मसुखाला निघालेले कोंभ होत असें समज, बाकी वर वर जो मनुष्यपणाचा भाग दिसतो तो केवळ अज्ञानभ्रमाने दिसतो.
78-10
अगा अवचिता कापुरा । माजीं सांपडला हिरा । वरी पडिलिया नीरा । न निगे केवीं ॥78॥
बा अर्जुना ! कापुरामध्ये अकस्मात् हिरा मिसळला, तरी त्यावर पाणी पडलें असतां त्या पाण्याने जसा त्याचा हिरेपणा जात नाही.
79-10
तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । तऱ्ही प्रकृतिदोषाची मातु । नेणिजे तेथ ॥79॥
त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाला जाणणारा पुरूष, जरी या मनुष्यलोकांत सामान्य प्राकृतिक माणसासारखा दिसत असला, तरी त्याच्या ठिकाणी प्रकृतिरूप दोषांचा स्पर्शहि नसतो.
80-10
तो आपसयेंचि सांडिजे पापीं । जैसा जळत चंदनु सर्पीं । तैसा मातें जाणें तो संकल्पीं । वर्जूनि घालिजे ॥80॥
भीतीनें आपण होऊनच पापें त्यांच्यापाशीं येत नाहीत. ज्याप्रमाणे सर्प जळत असलेल्या चंदनाच्या झाडाला सोडून देतात त्याप्रमाणे माझ्या श्रीकृष्णस्वरूपाचे पूर्णब्रह्मत्व जो जाणतो त्याचा सर्व संकल्प संबंध सोडतात.

81-10
तेंचि मातें कैसें जाणिजे । ऐसें कल्पी जरी चित्त तुझें । तरी मी ऐसा हें माझें । भाव ऐकें ॥81॥
तेच माझे जगात व्यापून असणे कसें जाणावे असे जर तुझ्या चित्तांत वाटत असेल, तर जगांत मी असा आहे व हे माझे विकार आहेत, ते सांगतो ऐक.
82-10
जे वेगळालां भूतीं । सारिखे होऊनि प्रकृती । विखुरले आहेती त्रिजगतीं । आघविये ॥82॥
हे विकार, निरनिराळ्या प्राण्यामध्ये, त्यांच्या प्रकृतीसारखे होऊन संपूर्ण ब्रह्मांडांत पसरलेले आहेत.
बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥10.4॥
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥10.5॥

83-10
ते प्रथम जाण बुद्धी । मग ज्ञान जें निरवधी । असंमोह सहनसिद्धी । क्षमा सत्य ॥83॥
प्रथम भाव बुध्दि होय, हें लक्षांत ठेव. त्यानंतर जें अमर्याद ज्ञान हा दुसरा भाव होय. मोह नसणें, सर्व सहन करणें, क्षमा म्हणजे कोणी उपकार केल्यास त्याला प्रत्यपकार न करण्याची बुध्दि, सत्य म्हणजे जसें ऐकिलें किंवा पाहिले असेल तसेंच सांगणें.
84-10
मग शम दम दोन्ही । सुख दुःख वर्तत जनीं । अर्जुना भावाभाव मानीं । भावाचिमाजीं ॥84॥
दम म्हणजे इंद्रियनिग्रह किंवा इंद्रियांचे शास्रानूसार नियमन, शम म्हणजे मनोनिग्रह किंवा मनातील विषयवासना क्षीण होणें हे दोन भाव, सुख म्हणजे मनाच्या अनुकुल असणें दुःख म्हणजे मनाच्या विरूध्द असणें हे जे जगांत दिसून येते, त्याचप्रमाणे भावाभाव म्हणजे असणें व नसणें, हे दोन्ही भाव, भावामध्ये भावरूपच आहेत असें समज.
85-10
आतां भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । हे मम रुपची पांडुसुता । ओळख तू ॥85॥
आणखी अर्जुना ! भय व निर्भयता, अहिंसा म्हणजे कायावाचा मनाने कोणत्याहि प्राण्याला दुःख न देता सुखच देण्याची प्रवृत्ति आणि समता म्हणजे सर्व प्राणिमात्रांना एकसारखे पाहणें, तुष्टि म्हणजे संतोष, तपादिक हे माझे रूप आहे असें जाण.

86-10
दान यश अपकीर्ती । ते जे भाव सर्वत्र वसती । ते मजचि पासूनि होती । भूतांचा ठायीं ॥86॥
बा अर्जुना ! दान, यश, अपकीर्ति, हे जे सर्व भाव जगांत दिसून येतात, ते सर्व प्राण्यांच्या ठिकाणीं माझ्यापासूनच प्रगट झाले आहेत.
87-10
जैसीं भूतें आहाति सिनानीं । तैसेचि हेही वेगळाले मानीं । एक उपजती माझां ज्ञानीं । एक नेणती मातें ॥87॥
ज्याप्रमाणे निरनिराळे प्राणी आहेत, त्याप्रमाणेच हे निरनिराळे भाव आहेत असें जाण. कांही भाव माझ्या स्वरूपाचे ज्ञान करून देणारे आहेत व काही माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करणारे आहेत.
88-10
अगा प्रकाश आणि कडवसें । हें सूर्याचिस्तव जैसें । प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तुसीं ॥88॥
प्रकाश व अंधार हें दोन्ही सूर्यामुळेंच होत असतात. सूर्योदय झाला असतां प्रकाश होतो व सूर्यास्त झाला असतां अंधार होतो.
89-10
आणि माझें जे जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवाचें करणें । म्हणौनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे ॥89॥
आणि मला जाणणें किंवा न जाणणें हे जीवांच्या पूर्वजन्मांतील पापपुण्यरूप कर्माप्रमाणें होत असते, म्हणून भूतांचे ठिकाणीं माझें हे कार्यरूपभावाने प्रगट होणें विषम म्हणजे माझ्या ज्ञानाला कोठें अनुकूल व कोठें प्रतिकूल असें झालें आहे.
90-10
यापरी माझां भावीं । हे जीवसृष्टि आहे आघवी । गुंतली असे जाणावी । पंडुकुमरा ॥90॥
याप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या कार्यरूप भावांचे ठिकाणी सर्व जीव गुंतून पडले आहेत, असें अर्जुना ! जाण.

91-10
आतां इये सृष्टीचे पालक । तयां आधीन वर्तती लोक । ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ॥91॥
आता या सृष्टीचे पालक म्हणून परमेश्वराने नेमलेले व ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व लोक वागतात, ते अकरा भाव आणखी तुला सांगतो.
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारी मनवस्तथा ।
मद्‍भवा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः॥10.6॥

92-10
तरी आघवांचि गुणीं वृद्ध । जे महर्षींमाजीं प्रबुद्ध । कश्यपादि प्रसिद्ध । सप्त ऋषी ॥92॥
तरी ज्ञानतपादी सर्व गुणांनी श्रेष्ठ व सर्व महर्षींमध्ये ज्ञाते असे जे कश्यपादी प्रसिध्द सप्तर्षी आहेत.
93-10
आणिकही सांगिजतील । जे चौदा आंतील । स्वायंभू मुख्य मुद्दल । चारी मनु ॥93॥
आणखी सांगतो, ऐक. मुळात असलेल्या चौदा मनूंमध्ये पहिले स्वायंभुव वैगेरे जे चार मुख्य मनू आहेत.
94-10
ऐसें हे अकरा । माझां मनीं जाहाले धनुर्धरा । सृष्टीचिया व्यापारा- । लागोनियां॥94॥
अर्जुना ! असे हे अकराजण पुढील सृष्टीचा उत्पद्यादी व्यापार करण्याकरिता माझ्या मनापासून उत्पन्न झाले.
95-10
जैं लोकांची व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचे कांहीं न मांडे । तैं महाभूतांचे दळवाडें । अचुंबित असे ॥95॥
जेव्हा त्रिभुवनाची मांडणी व लोकांची उत्पत्ती होत नाही आणि पंचभूतांचा समुदाय क्रियारहित असतो,

96-10
तैंचि हे जाहाले । इहीं लोकपाळ केले । अध्यक्ष रचूनि ठेविले । इहीं जन ॥96॥
जेव्हा हे अकरा जण उत्पन्न झाले व त्यांनी मग हे स्वर्गादि लोक निर्माण केले व तेथे पूर्वपुण्यानुसार अधिकार प्राप्त झालेले अध्यक्ष नेमले व त्यांनी पुढे प्रजा निर्माण केली.
97-10
म्हणौनि अकरा हे राजा । मग येर लोक यांचिया प्रजा । ऐसा हा विस्तारु माझा । ओळख तूं ॥97॥
म्हणून या अकराजनांचा समुदाय, राजा असून बाकींचे जग त्यांची प्रजा होय, याप्रमाणे हा संपूर्ण विश्वाचा विस्तार माझाच आहे, असे समज.
98-10
पाहें पां आरंभीं बीज एकलें । मग तेंचि विरूढलिया बूड जाहालें । बुडीं कोंभ निघाले । खांदियांचे ॥98॥
हे पहा, अर्जुना ! पहिले एक बीजच असतें, मग तेच वाढले की बूड होतें, पुढे त्या बुडाला कोंभ निघतात.
99-10
खांदियांपासूनि अनेका । पसरलिया शाखोपशाखा । शाखांस्तव देखा । पल्लवपानें ॥99॥
त्या फांद्यापासून अनेक शाखा फुटतात व त्या शाखांना कोवळी कोरडी पाने येतात.
100-10
पल्लवीं फूल फळ । एवं वृक्षत्व जाहालें सकळ । तें निर्धारितां केवळ । बीजचि तें ॥100॥
पाना नंतर फुलें, फळें येतात. याप्रमाणे संपूर्ण झाडाचा विस्तार होतो. या सर्वांचा विचार केला असतां, ते सर्व एक बीजच होय.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *