सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

276-9
जया ॐकाराचिये कुशी । अक्षरें होती अउमकारेंसीं । जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥276॥
ज्या ॐकाराच्या पोटी अ, उ व म् अशी अक्षरे उत्पन्न होतात, व जी उपजल्याबरोबर तीन वेद उत्पन्न झाले,
277-9
म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु । एंव मीचि कुलक्रमू । शब्दब्रह्माचा ॥277॥
ज्या ॐकाराच्या पोटी अ, उ व म् अशी अक्षरे उत्पन्न होतात, व जी उपजल्याबरोबर तीन वेद उत्पन्न झाले, म्हणून ऋक्, यजु व साम हे तिन्ही वेदही मीच, व ज्याप्रमाणे वेदांची वंशपरंपराही मीच होय, असे श्रीकृष्ण म्हणाले.
गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत् ।
प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम्॥9.18॥

278-9
हें चराचर आघवें । जिये प्रकृती आंत साठवे । ते शिणली जेथ विसवे । ते परमगती मी ॥278॥
हे सर्व स्थावर जंगम विश्व ज्या प्रकृतीच्या आंत भरलेले आहे, ती प्रकृति श्रमली असता ज्या ठिकाणीं विश्रांती पावते ते उत्तम स्थान मी;
279-9
आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणें अधिष्ठिली विश्व विये । जो येऊनि प्रकृती इये । गुणातें भोगी ॥279॥
आणि ज्याच्यामुळे ही प्रकृति वांचते ज्याच्या आश्रयाने विश्व प्रसवते व जो प्रकृतीच्या निमीत्ताने सत्व, रज, तम या गुणांचा उपभोग घेतो,
280-9
तो विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा पंडुसुता । मी गोसावी समस्ता । त्रैलोक्याचा ॥280॥
तो विश्वलक्ष्मीचा पति मीच; आणि अर्जुना, सर्व त्रैलोक्याचा स्वामी मीच.

281-9
आकाशें सर्वत्र वसावें ।वायूनें नावभरी उगें नसावें ।पावकें दहावें।वर्षावेंजळें॥२८१॥
आकाशाने सर्व ठिकाणी असावे, वायुने क्षणभर देखील स्वस्थ राहूं नये, अग्नीने जाळावे, मेघाने वृष्टि करावी,
282-9
पर्वतीं बैसका न संडावी ।समुद्रीं रेखा नोलांडावी ।पृथ्वीया भूतें वाहावीं ।हे आज्ञा माझी ॥ २८२ ॥
पर्वतांनी आपली जागा सोडु नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडु नये व पृथ्वीने सर्व भूतांचा भार वहावा, ही आज्ञा माझी आहे.
283-9
म्या बोलविल्या वेदु बोले ।म्यां चालविल्या सूर्यु चाले ।म्यां हालविल्या प्राणु हाले ।जो जगातें चाळिता ॥२८३॥
मी बोलविल्याने वेद बोलतात मी चालविल्याने सुर्य चालतो, सर्व जगाचा मालक जो प्राण, तोही मी हालविल्याने हालतो;
284-9
मियांचि नियमिलासांता ।काळु ग्रासितसे भूतां ।इयें म्हणियागतें पंडुसुता ।सकळें जयाचीं ॥ २८४ ॥
आणि मीच आज्ञा दिली असतां भुतांना काळ ग्रासतो. अर्जुना, याप्रमाणे हाच सर्व ज्यांची आज्ञाधारक असून
285-9
ऐसा जो समर्थु ।तो मी जगाचा नाथु ।आणि गगनाऐसा साक्षिभूतु ।तोहि मीचि ॥२८५॥
आपापली कामे करतात असा जो समर्थ, तो जगाचा नाथ मी; व आकाशाप्रमाणे सर्व ठिकाणीं असुन साक्षीभूत असणारा तोही मीच.

286-9
इहीं नामरुपीं आघवा ।जो भरला असे पांडवा ।आणि नामरुपांहि वोल्हावा ।आपणचि जो ॥ २८६ ॥
हे पांडवा, याप्रमाणे या नामरूपांनी जो सर्वत्र भरलेला आहे, आणि जो आपणच नामरूपांचाही जिव्हाळा आहे,
287-9
जैसे जळाचे कल्लोळ ।आणि कल्लोळ आथी जळ ।ऐसेनि वसवितसे सकळ ।तो निवासु मी ॥ २८७ ॥
ज्याप्रमाणे लाटा पाण्यांतच उत्पन्न होतात आणि लाटांतही पाणी असते, त्याप्रमाणे जग माझ्यांत व मी जगांत आहे.
288-9
जो मज होय अनन्य शरण ।त्याचें निवारीं मी जन्म मरण ।यालागीं शरणागता शरण्य ।मीचि एकु ॥२८८॥
जो मला एकनिष्ठपणे शरण येतो, त्याला जन्ममरणापासून मी मुक्त करतो. म्हणून शरणागताचे रक्षण करणारा एकटा मीच आहे.
289-9
मीचि एक अनेकपणें ।वेगळालेनि प्रकृतीगुणें ।जीत जगाचेनि प्राणें ।वर्तत असे ॥ २८९ ॥
प्रकृतीच्या वेगळाल्या गुणांनी मी एक असून अनेकपणाने जगांतील प्राणिमात्रांत प्राणरूपाने असतो.
290-9
जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां ।भलतेथ बिंबे सविता ।तैसा ब्रह्मादि सर्वां भूता ।सुहृद तो मी ॥ २९० ॥
ज्याप्रमाणे, हा समुद्र किंवा हा नाला असे न म्हणता सुर्य सर्व ठिकाणी प्रकाशित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मापासून चिलटापर्यंत प्राणिमात्राला आवडता म्हणून जो आहे तो मीच.

291-8
मीचि गा पांडवा । या त्रिभुवनासी वोलावा । सृष्टिक्षयप्रभावा । मूळ तें मी ॥291॥
हे पांडवा, या त्रिभुवनाचे जिवन, आणि उत्पत्ति, स्थिति, लय ह्या तिन्ही अवस्थांस जो मुळ तो मीच
292-9
बीज शाखांतें प्रसवे । मग तें रुखपण बीजीं सामावे । तैसे संकल्पें होय आघवें । पाठीं संकल्पीं मिळे ॥292॥
बीजापासुन वृक्ष व शाखा उत्पन्न होतात, पुढे ती झाडेच बीजांत समावेश पावतात; त्याप्रमाणे, आदिसंकल्पापासून सर्व जगाची उत्पत्ति होऊंन पुनः ते जग आदिसंकल्पातच लय पावते.
293-9
ऐसें जगाचें बीज जो संकल्पु । अव्यक्त वासनारुपु । तया कल्पांतीं जेथ निक्षेपु । होय तें मी ॥293॥
असे अव्यक्त वासनारूप जगाचे बिज जो संकल्प, त्याला कल्पांती जेथे राहण्यास ठिकाण मिळते, ते मीच.
294-9
इयें नामरुपें लोटती । वर्णव्यक्ती आटती । जातींचे भेद फिटती । जैं आकाश नाहीं ॥294॥
जेंव्हा निराकार स्वरूप प्रकट होते, तेंव्हा ही सर्व नाना रूपे लय पावतात, वर्णव्यक्ति नाहींतशा होतात, व जातीचे भेदही राहत नाहीत;
295-9
तैं संकल्पु वासनासंस्कार । माघौतें रचावया आकार । जेथ राहोनि असती अमर । तें निधान मी ॥295॥
तेव्हां पुनः जग निर्माण करण्याकरितां संस्काररूप वासनाशक्ति धारण करून ज्या ठिकाणीं देव राहातात, ते ठिकाणही मीच.
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन 9.19॥


296-9
मी सूर्याचेनि वेषें । तपें तैं हें शोषे । पाठीं इंद्र होऊनि वर्षें । तैं पुढती भ रे ॥296॥
मी सुर्याच्या रुपाने ज्या वेळेस तापतो, त्या वेळेस हे जग कोरडें होते, आणि पुनः इंद्राच्या रूपाने पाऊस पाडतो,
297-9
अग्नि काष्ठें खाये । तें काष्ठचि अग्नि होये । तेवि मरतें मारितें पाहें । स्वरुप माझें ॥297॥
तेव्हां पुनः समृद्धि होते. ज्याप्रमाणे अग्नीने काष्ठ भक्षण केल्यावर तेच काष्ठ पुनः अग्नी होते,
298-9
यालागीं मृत्यूचां भागीं जें जें । तेंही पैं रुप माझें । आणि न मरतें तंव सहजें । अविनाशु मी ॥298॥
त्याचप्रमाणेच मरणारे स्वरुप माझेच आहे. यावरुन, मृत्युच्या भागातील जी जी रूपे आहेत, ती ती माझीच आहे, आणि न मरणारीही रुपे सहज माझीच आहेत.
299-9
आता बहु बोलोनि सांगावें । तें एकिहेळां घे पां आघवें । तरी सतासतही जाणावें । मीचि पैं गा ॥299॥
आता फार बोलून काय सांगावे? सर्व तुला एकदाच सांगतो की, व्यक्त आणि अव्यक्त रुपे ही माझीच आहेत असे जाण
300-9
म्हणोनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे । परि प्राणियांचें दैव कैसे । जे न देखती मातें ॥300॥
म्हणून अर्जुना, मी नाही असे कोणते ठिकाण आहे? परंतु प्राणिमात्राचे दैव काय चमत्कारिक आहे, की ते मला पहात नाहीत.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *