सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १२६ ते १५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

126-8
ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणी मजशीं लिगटले । मीचि होऊनि आटले । उपासैती ॥126॥
अशा रीतीने निरंतर माझ्या ऐक्यरूपास पावलेले, आपले अंतःकरणांत माझ्याशी तल्लीन झालेले, व मद्रूप होऊन जे माझीच सेवा करणारे आहेत,
127-8
तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें स्मरावें । मग म्यां जरी पावावें । तरि उपास्ति ते कायसी ॥127॥
त्यांचा अंतकाल समीप यावा, त्यांनी माझे स्मरण करावे, आणि मग जर मी त्यांस पावावे; तर मग त्यांनी पूर्वी जी माझी उपासना केली तिचा काय उपयोग?
128-8
पैं रंकु एक आडलेपणें । काकुळती अंती धांवा गा धांवा म्हणे । तरि तयाचिये ग्लानी धांवणे । काय न घडे मज ॥128॥
हे पहा की संकटाच्या वेळी एखाद्या गरीब मनुष्यानेंही मोठ्या काकुळतीने ‘ देवा, धावरे धाव ‘ म्हणून माझा धावा केला, तर त्याचे दुःख निवारण करण्याकरिता मला जावे लागत नाही काय?
129-8
आणि भक्तांही तेचि दशा । तरी भक्तीचा सोसु कायसा । म्हणऊनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा ॥129॥
आणि माझे जे भक्त आहेत, त्यांची जर तीच दशा झाली तर त्यांनी मग माझ्या भक्तीचे श्रम तरी कां करावे? म्हणून अशा संशयात्मक अभिप्रायाचे नाव देखील काढूं नको.
130-8
तिहीं जे वेळीं मी स्मरावा । ते वेळीं स्मरला कीं पावावा । तो आभारूही जीवा । साहवेचि ना ॥130॥
ते ज्या वेळीं स्मरण करितात त्या वेळीच त्यांच्या स्मरणाबरोबर मी त्यांना पावतो. (ते माझी भक्ति करितात) हें देखील मला सहन करवत नाही.


131-8
तें ऋणवैपण देखोनि आंगी । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं । भक्तांचिया तनुत्यागीं । परिचर्या करीं ॥131॥
अशा प्रकारे आपण ऋणी झालो आहो हे पाहून, त्यांतून उतराई होण्याकरिंता मी आपल्या भक्ताच्या अंतकाली त्याची सेवा करतो

132-8
देहवैकल्याचा वारा । झणें लागेल या सकुमारां । म्हणोनि आत्मबोधाचे पांजिरां । सूयें तयांतें ॥132॥
देहाच्या ग्लानीचा संबंध माझ्या त्या सुकुमार भक्ताला लागूं नये म्हणून मी त्याला आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवितो; त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची थंडगार अशी सावली करतो;
133-8
वरि आपुलिया स्मरणाची उवाइली । हींवाऐसी करीं साउली । ऐसेनि नित्य बुद्धि संचली । मी आणीं तयांतें ॥133॥
आणि अशा प्रकारे, ज्यांची बुद्धि नेहमीं मजकडे स्थिर असते त्यांना मी आपल्या स्वरुपीं आणितो.
134-8
म्हणोनि देहांतींचें सांकडें । माझियां कहींचि न पडे । मी आपुलियांतें आपुलीकडे । सुखेंचि आणीं ॥134॥
म्हणून, देहाच्या अंतकालचे दुःख माझ्या भक्तांस कधीही होत नाही, व माझा जो भक्त आहे त्याला मी सुखानें आपल्याकडे आणतो
135-8
वरचील देहाची गंवसणी फेडुनी । आहाच अहंकाराचे रज झाडुनी । शुद्ध वासना निवडुनी । आपणापां मेळवी ॥135॥
आत्म्यावरील देहरूप गवसणी काढून व त्यांतला अहंकाररूप धुरळा झाडून केवळ भगवत्प्राप्तीच्या वासनेने त्याला मद्रूप करतो;


136-8
आणि भक्तां तरी देहीं । विशेष एकवंकीचा ठाव नाहीं । म्हणऊनि अव्हेरू करितां कांही । वियोग ऐसा न वाटे ॥136॥
आणि भक्तालाही देहाचे ठिकाणी प्रेम नसल्यामुळे, त्याचा त्याग करतांना, त्याची व आपली ताटातूट होते असे वाटत नाही.
137-8
ना तरी देहांतींचि मियां यावें । मग आपणपें यांतें न्यावें । हेंही नाहीं जे स्वभावें । ते आधींचि मज मीनले ॥137॥
कारण, देहाच्या अंतसमयी भगवंतांनी पावावे आणि आपलेजवळ न्यावे, असेही त्यांच्या मनांत येत नाही; का की, ते पूर्वीच मद्रूप झालेले असतात.
138-8
येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हे साउले । वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रींचि आहे ॥138॥
याशिवाय त्यांचे जे शरीर राहीले त्या शरीररुप पाण्यांत आत्मा असतो खरा; परंतु तो सावलीप्रमाणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे चांदणे जरी बाहेर पसरलेले दिसते तरी खरोखर पांहू गेले असतां ते चंद्राचेचे ठिकाणी आहे.
139-8
ऐसे जे नित्ययुक्त । तयांसि सुलभ मी सतत । म्हणाऊनि देहांतीं निश्चित । मीचि होती ॥139॥
असे जे माझे नेहमीं स्मरण करणारे आहेत, त्यांना मी नेहमीं जवळच आहे. म्हणून ते मरणानंतर निश्चयाने मद्रूप होतात.
140-8
मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी । जे मृत्युकाकासि कुरोंडी । सांडिली आहे ॥140॥
मग, जे (शरीर)क्लेशरूप झाडांचे वन, जे तापत्रयरूप अग्नीची शेगडी, जे मृत्युरूप कावळ्यास बळी दिले आहे,


141-8
जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें । जें सकळ दुःखाचें पुरतें । भांडवल ॥141॥
जे दैन्य वाढविते, जे मृत्युचें भय वाढविणारे, जे सर्व दुःखाचें पूर्ण भांडवल,
142-8
जें दुर्मतीचें मूळ । जें कुमार्गाचें फळ । जें व्यामोहाचें केवळ । स्वरूपचि ॥142॥
जे वाईट बुद्धिचे मूळ, जे पूर्वजन्मीच्या वाईट कर्माचे फळ, जे भ्रांतीचे केवळ स्वरुपच,
143-8
जें संसाराचें बैसणें । जें विकाराचें उद्यानें । जें सकळ रोगांचें भाणें । वाढिलें आहे ॥143॥
जे संसाराची बसण्याची जागा, जे अहंकारादि विकरांची बाग, जे सर्व व्याधींचे वाढलेले ताटच होय;
144-8
जें काळाचा खिचउशिटा । जें आशेचा आंगवठा । जन्ममरणाचा वोलिंवटा । स्वभावें जें ॥144॥
जे काळाने चघळुन टाकलेली उष्टी खिचडी, जे आशेचे अंगबळ; जे स्वभावतः जन्ममरणाला ओल देणारे,
145-8
जें भुलीचें भरींव । जें विकल्पाचें वोतींव । किंबहुना पेंव । विंचुवांचें ॥145॥
देणारे, जे भ्रांतीने भरलेले, जे वाईट कल्पनांचे ओतलेले किंबहुना विंचवाचे पेवच होय,


146-8
जें व्याघ्राचें क्षेत्र । जें पण्यांगनेचें मैत्र । जें विषयविज्ञानयंत्र । सुपूजित ॥146॥
जे वाघाची जाळी, जे वेश्यांचे मित्र म्हणजे मनाला वेश्येप्रमाणे मोह घालणारे, जे विषय जाणण्याचे उत्तम यंत्रच होय;
147-8
जें लांवेचा कळवळा । निवालिया विषोदकाचा गळाळा । जें विश्वासु आंगवळा । संवचोराचा ॥147॥
जे जखिणीच्या दयेचे ठिकाण, व विषयरूपी थंड पाण्याचा घोट, जे स्नेहभावाने वागणाऱ्या चोराच्या बळकट विश्वासाप्रमाणे होय;
148-8
जें कोढियाचें खेंव । जें काळसर्पाचें मार्दव । गोरियाचें स्वभाव । गायन जें ॥148॥
जे कोडाने ग्रस्त झालेल्या मनुष्याचे आलिंगन, जे महाविषारी सर्पाच्या अंगाप्रमाणे मऊ, जे पारध्याच्या साहजिक गायनाप्रमाणे मधुर,
149-8
जें वैरियाचा पाहुणेर । जें दुर्जनाचा आदर । हें असो जें सागर । अनर्थाचा ॥149॥
जे वैऱ्याच्या पाहुणचाराची मेजवानी, जे दुर्जनांनी केलेले आगतस्वागत, फार काय सांगावे? जे अनर्थाचा समुद्रच होय,
150-8
जें स्वप्नीं देखिलें स्वप्न । जें मृगजळें सासिन्नलें वन । जें धूम्ररजांचें गगन । ओतलें आहे ॥150॥
जे अनर्थाचा समुद्रच होय, जे स्वप्नांत पडलेले स्वप्न, जे मृगजळाचे तयार झालेले वन, व धुराच्या रजांनी भरलेलें आकाश,

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *