सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

, ,

151-8
ऐसें जें हें शरीर । तें ते न पवतीचि पुढती नर । जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझें ॥151॥
ते हे शरीर, मद्रूप होऊन राहिलेल्या पुरुषांना पुनः प्राप्त होत नाही.
आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।
मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ 8.16॥

152-8
एऱ्हवीं ब्रह्मपणाचिय भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे । परि निवटलियाचें जैसें । पोट न दुखे ॥152॥
येरव्ही, ब्रह्मपणाची घमेंड असणाऱ्यांना सुद्धा (ब्रह्मदेवाला सुद्धा) पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत; परंतु मेलेल्या मनुष्याचे जसे पोट दुखत नाही
153-8
ना तरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नींचेनि महापूरें । तेवीं मातें पावलें ते संसारें । लिंपतीचि ना ॥153॥
किंवा जागृत झाल्यावर जसे स्वप्नांतल्या महापुरांत कोणी बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्याप्रत पावले, ते संसाराने लिप्त होत नाहीत.
154-8
एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थायीयांचे धुरे । ब्रह्मभुवन गा चवरें । लोकाचळाचें ॥154॥
येरव्ही, चौदा भुवनांचे शिखर, जे सप्त चिरंजीवामध्ये अग्रभागी असणारे, व त्रैलोक्यरूप पर्वताचे मस्तक जे ब्रह्मभुवन,
155-8
जिये गांवींचा पहारू दिवोवरी । एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी । विळोनि पांतीं उठी एकसरी । चवदा जणांची॥155॥
ज्या ब्रह्मलोकाच्या एक प्रहर दिवसापर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, व एका दिवसांत एकदम चौदा इंद्रांचा निकाल लागतो;
सहस्त्रयुगपर्यंतमहर्यद् ब्रह्मणो विदुः।
रात्रिं युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ 8.17॥


156-8
जैं चौकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होये । आणि तैसेंचि सहस्त्र भरिये पाहें । रात्री जेथ ॥156॥
चार युगे हजार वेळां जातील, तेव्हां ब्रह्मदेवाचा खरोखर पुरा एक दिवस होतो; आणि तशीच हजार चौकड्यांची जेथे रात्रही आहे.
157-8
येवढें अहोरात्र जेथिंचें । तेणें न लोटती जे भाग्याचे । देखती ते स्वर्गींचे । चिरंजीव ॥157॥
एवढा दिवस व रात्र जेथे आहे, तेथे जे भाग्यवान पुरुष आहेत, ते मरत नाहीत व त्या दिवसरात्रीं पाहतात. ते स्वर्गलोकीचे चिरंजीव होत.
158-8
येरां सुरगणांची नवाई । विशेष सांगावी तेथ काई । मुद्दल इंद्राचीचि दशा पाहीं । जे दिहाचे चौदा ॥158॥
येरव्ही, जेथे मुदली इंद्राचीच दशा अशी आहे की, एका दिवसांत चौदा इंद्र होतात, तेथे देवगणांची काय प्रतिष्ठा वर्णन करावी?
159-8
परि ब्रह्मयाचियाहि आठां पहारांतें । आपुलिया डोळां देखते । जे आहाति गा तयांतें । अहोरात्रविद म्हणिपे ॥159॥
परंतु ब्रह्मदेवाच्याही आठ प्रहराला जे आपल्या डोळ्यांनी पाहतात, त्यांना (ब्रह्मदेवाचे) दिवस व रात्र जाणणारे असे म्हणतात.
अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥ 8.18॥
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ 8.19 ॥

160-8
तये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये । ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ॥160॥
त्या ब्रह्मदेवाचा दिवस ज्या वेळेस उगवतो, त्या वेळेस निराकाराचे साकार विश्व अशा रीतीने उत्पन्न होते की, त्याची मोजदाद करवत नाही.


161-8
पुढती दिहाची चौपाहारी फिटे । आणि हा आकारसमुद्र आटे । पाठीं तैसाचि मग पाहांटे । भरों लागे ॥161॥
पुढे त्या दिवसाचे चार प्रहर संपल्यावर हे विश्व नाहींसे होते; आणि पुनः पहाट झाली म्हणजे पहिल्याप्रमाणे भंरू लागते.
162-8
शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं । मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ॥162॥
शरत्कालाच्या आरंभी आकाशातील अभ्रे नाहींतशीं होतात, आणि तिच पुनः ग्रीष्मऋतूचे शेवटी जशी उत्पन्न होतात
163-8
तैसी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी । मिळे जंव सहस्त्रावधी । निमित्त पुरे ॥163॥
त्याचप्रमाणे, ब्रह्मदेवाच्या दिवसाचे आरंभी ह्या भूतसृष्टीचा समुदाय एकत्र होतो, व तो चार हजार युगे वेळ जात तोपर्यंत असतो.
164-8
पाठीं रात्रीचा अवसरू होये । आणि विश्व अव्यक्तीं लया जाये । तोही युगसहस्त्र मोटका पाहे । आणि तैसेंचि रचे ॥164॥
मागाहून ब्रह्मदेवाचे रात्रीचा समय झाला असता हे विश्व निराकारांत लय पावते; तेही पूर्वोक्त काल गेल्यावर उदयकाली पूर्ववत् होते.
165-8
हें सांगावया काय उपपत्ति । जें जगाचा प्रळयो आणि संभूति । इथे ब्रह्मभुवनींचिया होती । अहोरात्रमाजीं ॥165॥
अशा रीतीने विश्वाची रचना होते. हे सांगण्याचा कोणता उद्देश म्हणशील, तर या ब्रह्मदेवाच्या दिवसांत आणि रात्रीत जगाची उत्पत्ति आणि लय होतो.


166-8
कैसें थोरिवेचें मान पाहें पां । हो सृष्टिबीजाचा साटोपा । परि पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहला ॥166॥
त्याच्या थोरपणाची योग्यता कशी आहे म्हणून पाहू गेले तर, तो ब्रह्मदेव सृष्टीच्या बिजाचे भंडार आहे, पण तोही जन्ममरणाला अग्रेसर झाला.
167-8
एऱ्हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा । तिये गांवींचा गा पसारा । तो हा दिनोदयीं एकसरां । मांडतु असे ॥167॥
हे धनुर्धरा, येरव्ही ही त्रैलोक्यसृष्टि सत्यलोकाचा पसारा असुन ब्रह्मदेवाचा दिवस उगवण्याबरोबर हा एकसारखा मांडला जातो.
168-8
पाठीं रात्रीचा समो पावे । आणि अपैसाचि सांटवे । म्हणिये जेथींचें तेथ स्वभावें । साम्यासि ये ॥168॥
मागाहून रात्रीचा समय झाला असता तो आपोआप अव्यक्तांत लय पावतो, व हे पंचभूतादिक ब्रह्मदेवाच्या आज्ञेने सहज जेथल्या तेथे लय पावते.
169-8
जैसें वृक्षपण बीजासि आलें । कीं मेघ हें गगन जाहालें । तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ॥169॥
ज्याप्रमाणे झाड हे बिजरूपांत सामावते, किंवा मेघ हे आकाशांत लीन होतात, त्याप्रमाणे, ज्या ठिकाणी पुष्कळ वस्तुंचा समावेश होतो, त्याला ‘ साम्य ‘ असे म्हणतात.
परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥8. 20॥

170-8
तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाही । जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय 170॥
त्या साम्यांत न्युनाधिक कांही दिसत नाही, म्हणून ते भूत हें नांव पावत नाही. ज्याप्रमाणे दुधाचे दही झाल्यावर त्याचे (दुधाचे) नांव व रूप ही नाहीं तशीं होतात

,
171-8
तेंविं आकारलोपासरिसें । जगाचें जगपण भ्रंशे । परि जेथ जाहालें तें जैसें । तैसेंचि असे ॥171॥
त्याप्रमाणे, आकाराचा नाश झाल्याबरोबर जगाचे जगपण नाहींसे होते; परंतु ज्याच्यावर हे झाले आहे, त्या ठिकाणी ते जसेच्या तसेच असते,
172-8
तैं तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारा वेळीं तेंचि व्यक्त । हें एकास्तव एक सूचित । एऱ्हवीं दोनी नाही ॥172॥
तेव्हांच त्याला ‘अव्यक्त’ असे म्हणतात आणि साकार होतो त्यालाच ‘ व्यक्त ‘ म्हणतात.ही एकाला एक दाखविणारी आहेत. परंतु पाहुं गेले असता दोन्ही नाहीत.
173-8
जैसें आटलिया स्वरूपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे । पुढती तो घनाकारू हारपे । जे वेळीं अळंकार होती ॥173॥
ज्याप्रमाणे रूपे आटल्यावर त्या आकाराला लगड म्हणतात, पुढे त्याचे दागिने बनल्यावर ती लगड नाहींशी होते;
174-8
हीं दोन्ही जैशीं होणीं । एकीं साक्षीभूत सुवर्णी । तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूच्या ठायी ॥174॥
ही दोन्ही रुपांतरे जशी एका रुप्यावरच होतात, त्याचप्रमाणे, व्यक्त व अव्यक्त हे दोन्ही विकार ब्रह्माच्याच ठिकाणी होतात.
175-8
तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत । या दोहीं भावाअतीत । अनादिसिध्द ॥175॥
ते ब्रह्म तर व्यक्त नाहीं आणि अव्यक्तही नाही, उत्पन्न होत नाही आणि नाश पावत नाही; परंतु या दोन्ही स्थितीच्या पलीकडले अनादिसिद्ध असे आहे.

, ,

Leave a Reply