101-8
चंडवातेंही न मोडे । तें गगनचि कीं फुडें । वांचूनि जरे होईल मेहुडें । तरी उरेल कैंचे ॥101॥
झंझावाताने न मोडणारे असे एक खरोखर गगनच आहे; त्याच्याशिवाय, त्या वाऱ्यापुढे ढग आले असतां कसे टिकतील?
102-8
तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणवलेपणेंचि उमाणलें । मग नेणवेचि तया म्हणितलें । अक्षर सहजें ॥102॥
त्याचप्रमाणे, ज्ञान्याला जे समजले तें ज्ञानाच्या मापांत आले म्हणून ते क्षर (नाशवंत) होय; मग, जे जाणण्यास अशक्य, त्याला सहज अक्षर (अविनाशी) असे म्हणतात.
103-8
म्हणोनि वेदविद नर । म्हणती जयातें अक्षर । जें प्रकृतीसी पर । परमात्मरूप ॥103॥
म्हणून वेदपारंगत पुरुष ज्याला अक्षर (ब्रह्म) असे म्हणतात, व जे मायेच्या पलीकडील असुन सच्चिदानंदरूप आहे,
104-8
आणि विषयांचें विष उलंडूनि । जे सर्वेंद्रियां प्रायश्चित देऊनि । आहाति देहाचिया बैसोनि । झाडातळी ॥104॥
आणि विषयांची इच्छा टाकुन व सर्व इंद्रियांचे दमन करुन देहरूपी झाडाच्या तळी उदासीनवृत्तीने बसलेले
105-8
ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात । निष्कामासि अभिप्रेत । सर्वदा जें ॥105॥
त्याप्रमाणे विरक्त पुरुषही ज्याची नेहमीं वाट पहात असतात व जे नेहमीं निरिच्छ लोकांना आवडते,
106-8
जयाचिया आवडी । न गणिती ब्रह्मचर्यादि सांकडी । निष्ठुर होऊनि बापुडी । इंद्रिये करिती ॥106॥
ज्याच्या आवडीकरितां योगीजन ब्रह्मचर्यादि संकटे जुमानीत नाहीत व निष्ठुरपणे इंद्रियांना दीन करतात,
107-8
दुर्लभ आणि अगाध । जयाचिये थडिये वेद । चुबुकळिले ठेले ॥ १०७॥
असे जे दुर्लभ आणि अगाध असलेले ब्रम्हपद, ज्याचा अंत नाही आणि ते वेदांनाही जाणता आले नाही. वेद अलिकच्या काठावर गंटागळ्या खात राहिले आहेत….
108-8
तें तें पुरूष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था हेचि स्थिती । एक वेळ सांगो ॥108॥
असे जे दुर्लभ पद – ज्याचा अंत नाही व जे वेदालाही जाणतां आले नाही, त्या पदाला, मी सांगीतल्याप्रमाणे जे देह ठेवतात, ते प्राप्त होतात, म्हणून, पार्था, त्याबद्दल आणखी एकवार तुला सांगतो.
109-8
तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी । हेंचि म्हणावया होतों पां मी । तंव सहजें कृपा केली तुम्ही । तरी बोलिजो कां ॥109॥
त्या वेळेस अर्जुन म्हणतो, ” हे गुरो, मी आपल्यास आतां हेंच विचारणार होतो, तो आपण मजवर कृपा केली. तर आता सांगण्यास सुरवात करावी;
110-8
परि बोलावें तें अति सोहोपें । तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें । तुज काय नेणों संक्षेपें । सांगेन ऐक ॥110॥
परंतु काय सांगावयाचे ते अगदी सोप्या रीतीने मात्र सांगा.” त्या वेळी, त्रिभुवनदीप जे श्रीकृष्ण ते म्हणाले :- तुला का आम्ही ओळखीत नाही? तुला संक्षेपाने सांगतो.
111-8
तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवे मोडे । हें हृदयाचिया डोहीं बुडे । तैसें कीजे ॥111॥
तर मग, मनाची बाहेर हिंडण्याची स्वाभावीक सवय मोडून, ते ह्रदयांतच स्थिर राहील, असे कर.
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरूध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥ 8.12॥
112-8
परी हें तरीच घडे । जरी संयमाची अखंडें । सर्वद्वारी कवाडें । कळासती ॥112॥
परंतु ज्या वेळेस इंद्रियरूपी कुलपाने बंद असतात, तेव्हांच ही गोष्ट घडते. असे झाले म्हणजे मग मन सहज कोंडले जाऊन ह्रदयांतच निर्विकल्प असते.
113-8
तरी सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें । जैसें करचरणीं मोडलें । परिवरू न संडी ॥113॥
परंतु ज्या वेळेस इंद्रियरूपी कुलपाने बंद असतात, तेव्हांच ही गोष्ट घडते. असे झाले म्हणजे मग मन सहज कोंडले जाऊन ह्रदयांतच निर्विकल्प असते. ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला प्राणी आपले घर सोडीत नाही,
114-8
तैसें चित्त राहिल्या पांडवा । प्राणाचा प्रणवुचि करावा । मग अनुवृत्तिपंथें आणावा । मूर्ध्निवरी ॥114॥
त्याचप्रमाणे अर्जुना, चित्ताची स्थिरता झाल्यावर प्राणायामाने ॐकाराचे ध्यान करावे; मग प्राणवायु क्रमाक्रमाने ब्रह्मरंध्रांपर्यंत आणावा
115-8.
तेथ आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें । जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं ॥115॥
मग, अकार, उकार व मकार ही त्रयी अर्धमात्रेत मिळेपर्यंत, धारणाशक्तीच्या बलाने, प्राणवायु ब्रह्माकाशांत मिळतो न मिळतो अशा बेताने धरावा;
116-8
तंववरी तो समीरु । निराळी कीजे स्थिरू । मग लग्नीं जेविं ॐकारू । बिंबींचे विलसे ॥116॥
तोपर्यंत तो वायु मस्तकाकांशांत स्थिर करावा; नंतर ॐकाराचा व त्याचा संयोग झाल्यावर, मुळ स्वरुप जे ब्रह्म त्यांत तो रममाण होतो.
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ 8.13॥
117-8
तैसें ॐ हें स्मरों सरे । आणि तेथेंचि प्राणु पुरे । मग प्रणवांतीं उरे । पूर्णघन जें ॥117॥
त्याबरोबर ॐकाराचे स्मरण बंद पडते, आणि तेव्हांच प्राणाचा शेवट होतो; मग ॐकाराचे पलीकडील जें ब्रह्मानंदस्वरूप तेंच बाकी राहते.
118-8
म्हणोनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म । जो माझें स्वरूप परम । स्मरतसांता ॥118॥
एकाक्षर ब्रह्म आहे, त्या माझ्या परमस्वरूपाचे स्मरण करीत असतां
119-8
यापरी त्यजी देहातें । तो त्रिशुद्धी पावे मातें । जया पावनया परौतें । आणिक पावणें नाहीं ॥119॥
जो त्या स्थितीतच देहत्याग करितो, तो निश्चयाने मजप्रत पावतो. कारण, त्याला माझ्या प्राप्तीशिवाय दुसरी गतिच नाही.
120-8
तेथे अर्जुना जरी विपायें । तुझ्या जीवीं हन ऐसें जाये । ना हें स्मरण मग होये । कायसयावरी अंती ॥120॥
अर्जुना, कदाचित् तुझ्या मनांत जर अशी शंका येईल की, कायहो, मरणसमयी माझे स्मरण कसे व्हावे?
121-8
इंद्रियां अनुघडु पडलिया । जीवितचें सुख बुडालिया । आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हें ॥121॥
जिविताचे सुख नाहींसे होऊन व इंद्रिये संकटात पडून अंतर्यामी व बाहेर मृत्युचिन्हें उघड दिसूं लागल्यावर त्या वेळेस उठून बसावे कोणी?
122-8
ते वेळीं बैसवेंचि कवणें । मग कवण निरोधी करणें । तेथे काह्याचेनि अंतकःरणें । प्रणव स्मरावा ॥122॥
इंद्रियांचे संयमन करावे कोणी? आणि कोणत्या अंतःकरणाने ॐकाराचे स्मरण करावे?
123-8
तरि गा ऐशिया ध्वनी । झणें थारा देशी हो मनीं । पैं नित्य सेविला मी निदानीं । सेवकु होयें ॥123॥
तर बाबारे, असल्या संशयास तूं आपल्या अंतःकरणांत थारा देऊ नको. असे पहा की, माझी जो नित्य सेवा करितो, त्याच्या निदानीच्या समयी मी त्याचा दास बनून राहतो.
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ 8.14॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् ।
नाप्नुवंति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥8.15 ॥
124-8
जे विषयांसि तीळांजळी देऊनी । प्रवृत्तीवरी निगड वाउनी । मातें हृदयीं सूनी । भोगताती ॥124॥
जे विषयांला तिलांजलि देऊन, विषयाविषयी होणाऱ्या इच्छा आवरून व मला ह्रदयांत साठवून त्या सुखाचा उपभोग घेतात,
125-8
परि भोगितया आराणुका । भेटणें नाहीं क्षुधादिकां । तेथ चक्षुरादि रंकां । कवण पाडु ॥125॥
त्यांना त्या समाधानांत क्षुधा वैगेरेची आठवणही रहात नाही.मग गरीब बिचाऱ्या नेत्रादिकांचा तेथे काय पाड !