सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ११५१ ते ११७० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

1151-13
तैसें जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा । पाहतां व्याख्यान चढलें थांवा । चौगुणें वरी ॥1151॥
महाराज, तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची टवटवी (श्रवण उत्सुकता पाहून त्यानांही सांगण्याला चौपटीपेक्षा जास्त जोर आला.
1152-13
सुवायें मेघु सांवरे । जैसा चंद्र सिंधु भरे । तैसा मातुला रसु आदरें । श्रोतयाचेनि॥1152॥
अनुकूल वार्‍याने पाऊस पाडणारे मेघ जसे जमतात अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्र दर्शनाने समुद्राला भरती येते, ऐकनार्‍यानीं आदर दाखविला की वक्त्यालाही वक्तव्य करण्यास स्फुरण चढते.
1153-13
आतां आनंदमय आघवे । विश्व कीजेल देवे । ते राये परिसावे । संजयो म्हणे ॥1153॥
संजय धृतराष्ट्रास म्हणतो कि, आता देव आपल्या मंजुळ वाणीतुन निघालेल्या भाषणांनी संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल, तो वृतांत महाराजांनी श्रवण करावा.
1154-13
एवं जे महाभारती । श्रीव्यासें आप्रांतमती । भीष्मर्वि शांती । म्हणितली कथा ॥1154॥
(ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) याप्रमाणे अमर्याद आणि विशालबुद्धीच्या महर्षी व्यासांनी महाभारतात भीष्मपर्वामधे शांतिरसाने भरलेली कथा सांगितली.
1155-13
तो श्रीकृष्णार्जुनसंवादु । नागरीं बोली विशदु । सांगोनि दाऊ प्रबंधु । ओवियेचा ॥1155॥
तो श्रीकृष्ण आणि अर्जुन संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर भावपुर्ण शब्दांनी स्पष्टपणे करून दाखवितो.

1156-13
नुसधीचि शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा । जे शृंगाराच्या माथां । पाय ठेवीती ॥1156॥
केवळ शांतिरसाची कथा वाणीच्या रुपाने आपल्या समोर ठेवनार आहे. म्हणजे शब्दांनी सांगितली जाईल पंरतु ती शृंगाररसाच्या मस्तकावर पाय ठेवणारी शृंगाररसावर ताण आणनारी अशी कथा सांगितली जाईल.
1157-13
दाऊं वेल्हाळ देशी नवी । जे साहित्यातें वोजवी । अमृतातें चुकी ठेवीह । गोडिसेपणें ॥1157॥
ज्या पद्धतिने देशी भाषा साहित्याला (अलंकाराला) सजविते व अमृताला देखिल आपल्या गोडपणाने मागे सारेल, अशा रीतीने अपूर्व उत्कृष्ट व सुंदर देशी भाषा (मराठी भाषा) उपयोगात आणू.
1158-13
बोल वोल्हावतेनि गुणें । चंद्रासि घे उमाणे । रसरंगीं भुलवणें । नादु लोपी ॥1158॥
ज्या चंद्राच्या उदयापासुन चंद्रकांत मन्यालासुद्धा पाझर फुटतो,त्या चंद्रालाही माझ्या भावमधुर बोलांपासुन पाझर फुटेल.तसेच माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मधुर शक्तिने नादब्रम्हास झाकुन टाकतील.
1159-13
खेचराचियाही मना । आणी सात्त्विकाचा पान्हा । श्रवणासवे सुमना । समाधि जोडे ॥1159॥
माझे निघालेले शब्द हे अज्ञानी असणार्‍या माणसाच्या मनात देखिल अष्ट सात्विक भावाचा पान्हा फुटेल.आणि ज्ञानी जिज्ञासु आणि शुद्ध अंत:करणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल.
1160-13
तैसा वाग्विलास विस्तारुं । गीतार्थेंसी विश्व भरूं । आनंदाचे आवारूं । मांडूं जगा ॥1160॥
असा गीतेचा अर्थ सांगेन की किंवा वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू.

1161-13
फिटो विवेकाची वाणी । हो काना मना जिणी । देखो आवडे तो खाणी । ब्रह्मविद्येची ॥1161॥
श्रवण केल्याने कानांचे आणि आत्म-साक्षात्काराने मनाचे जगणे सफल होईल.आणि त्यामुळे विचारांचे दैन्य फिटले जाईल.आणि चहुबाजुला ब्रह्मविद्देची खाण नजरेस पडेल.
1162-13
दिसो परतत्त्व डोळां । पाहो सुखाचा सोहळा । रिघो महाबोध सुकाळा- । माजीं विश्व ॥1162॥
परब्रह्म तत्व सर्वांच्या दिव्यचक्षुस किंवा नजरेस दिसावा व सर्वञ आनंदाचा उत्सव उदयास येवो व सर्व विक्ष्वामध्ये ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश व्हावा.
1163-13
हें निफजेल आतां आघवें । ऐसें बोलिजेल बरवें । जें अधिष्ठिला असें परमदेवें । श्रीनिवृत्तीं मी ॥1163॥
हे सर्व आता घडावे,असे मी भावमधुर शब्दाने बोलेन;श्रेष्ठ देव जे निवृत्तिनाथ, त्यांनी माझा अंगीकार केला असल्याने हे सर्व वर दिल्या प्रमानेच होईल.
1164-13
म्हणोनि अक्षरीं सुभेदीं । उपमा श्लोक कोंदाकोंदी । झाडा देईन प्रतिपदीं । ग्रंथार्थासी ॥1164॥
एवढ्याकरता मर्म स्पष्ट करणार्‍या शब्दांनी उपमा व काव्य यांची अर्थालंकारांची रेलचेल करून या गीताग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेन.
1165-13
हा ठावोवरी मातें । पुरतया सारस्वतें । केलें असे श्रीमंतें । श्रीगुरुरायें ॥1165॥
मला आमच्या श्रीमतं सद्गुरुनीं येथपर्यंत डोक्यावर हात ठेऊन सर्व शास्ञामध्ये हुशार तरबेज केले आहे.

1166-13
तेणें जी कृपासावायें । मी बोलें तेतुलें सामाये । आणि तुमचिये सभे लाहें । गीता म्हणों॥1166॥
महाराज, त्या कृपा आशिर्वादाने मी जितके बोलनार आहे, तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संतमंडळीमधे गितेचा भावार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे.
1167-13
वरी तुम्हा संतांचे पाये । आजि मी लाधलों आहें । म्हणोनि जी नोहे । अटकु कांहीं ॥1167॥
ह्या शिवाय आणखी तुम्हा संतांच्या चरणकमलांजवळ आज मी प्राप्त झालो आहे, म्हणून काही अडचण किंवा प्रतिबंध होऊ शकनार नाही.
1168-13
प्रभु काश्मिरीं मुकें । नुपजे हें काय कौतुकें । नाहीं उणीं सामुद्रिकें । लक्ष्मीयेसी ॥1168॥
हे देवा,प्रभु,दयाळा सरस्वतीच्या पोटी सहज देखील मुके बालक उत्पन्न होणार नाही.किंवा येऊ शकत नाही. व तसेच लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हाचीं कधीच कमतरता पडत नसते.
1169-13
तैसी तुम्हां संतांपासीं । अज्ञानाची गोठी कायसी । यालागीं नवरसीं । वरुषेन मी ॥1169॥
त्याप्रमाने तुम्हा संतांजवळ आल्यावर अज्ञानाची गोष्ट कसली? अज्ञान राहिलच कसे म्हणून मी आता गीतार्थाच्या द्वारे भावपुर्ण नवरसांचा वर्षाव करीन.
1170-13
किंबहुना आतां देवा । अवसरु मज देयावा । ज्ञानदेव म्हणे बरवा । सांगेन ग्रंथु ॥1170॥
फार काय सांगावे? देवा !श्रीसद्गुरुराया! मला गीतेचा भावार्थ सांगण्यास आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन, असे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
~~ हरि ॐ तत्सत्~ ॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां क्षेञ-क्षेञज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः॥13॥ ॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 34 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 1170 ॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥~~

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *