576-13
ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं । देखे मग मनीं । विटे जो गा ॥576॥
असा पुढे येणार्या म्हातारपणाचा इशारा आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पहातो आणि मग तो ज्याविषयी मनात विटतो.
577-13
म्हणे पाहे हें येईल । आणि आतांचें भोगितां जाईल । मग काय उरेल । हितालागीं? ॥577॥
तो मनात म्हणतो, उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषयभोगात निघून जाईल, मग आपले हित साधण्यास काय उरणार आहे?
578-13
म्हणौनि नाइकणें पावे । तंव आईकोनि घाली आघवें । पंगु न होता जावें । तेथ जाय ॥578॥
म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो, आपण पांगळे झालो नाही तोपर्यंत आपणास जेथे (देवस्थान, तीर्थ वगैरे ठिकाणी) जावयाचे असेल तेथे जातो.
579-13
दृष्टी जंव आहे । तंव पाहावें तेतुलें पाहे । मूकत्वा आधीं वाचा वाहे । सुभाषितें ॥579॥
जेथपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे तोपर्यंत जितके पहावयाचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी चांगले बोलायचे ते बोलून घेतो.
580-13
हात होती खुळे । हें पुढील मोटकें कळे । आणि करूनि घाली सकळें । दानादिकें ॥580॥
हात लुळे होतील, ही पुढली गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हातांनी दानादि सर्व सत्कृत्ये करून टाकतो.
581-13
ऐसी दशा येईल पुढें । तैं मन होईल वेडें । तंव चिंतूनि ठेवी चोखडें । आत्मज्ञान ॥13-581॥
अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडे होईल. तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो.
582-13
जैं चोर पाहे झोंबती । तंव आजीचि रुसिजे संपत्ती । का झांकाझांकी वाती । न वचतां कीजे ॥582॥
जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी, अथवा दिवा गेला नाही तोपर्यंत झाकापाक करून ठेवावी,
583-13
तैसें वार्धक्य यावें । मग जें वायां जावें । तें आतांचि आघवें । सवतें करीं ॥583॥
त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आताच तारुण्यातच त्याने सर्व हातावेगळे करून टाकले. जे करावयाचे ते सर्व केले.
584-13
आतां मोडूनि ठेलीं दुर्गें । कां वळित धरिलें खगें । तेथ उपेक्षूनि जो निघे । तो नागवला कीं? ॥584॥
आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्याकडे परत फिरण्याच्या वेळी (ऐन संध्याकाळी) जर एखादा प्रवासी प्रवास करत आला असता व त्या वेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यातच प्रवेश केला तर तो नागवला जाईल काय? (तो नागवला जात नाही.)
585-13
तैसें वृद्धाप्य होये । आलेपण तें वायां जाये । जे तो शतवृद्ध आहे । नेणों कैंचा ॥585॥
तसे म्हातारपण येईल व जन्माला आलेपण व्यर्थ जाईल, कारण (शंभर वर्षे आयुष्य आहे, तेव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असे म्हणाणारा) तो तरी शतायु आहे काय? (की नाही) कोणास ठाऊक?
586-13
झाडिलींचि कोळें झाडी । तया न फळे जेवीं बोंडीं । जाहला अग्नि तरी राखोंडी । जाळील काई? ॥586॥
तीळाचे कोळ (तीळाचे उपटलेले झाड) एकदा झाडून त्यातील सगले तीळ निघून गेल्यावर जर ती कोळे झाडली तर त्या कोळाच्या बोंडामधून जसे तीळ निघत नाहीत, तसेच अग्नी जरी असला, पण तो एकदा राखुंडी झाला मग तो कोणत्याही पदार्थास जाळू शकेल काय?
587-13
म्हणौनि वृद्धाप्याचे आठवें । वृद्धाप्या जो नागवे । तयाच्या ठायीं जाणावें । ज्ञान आहे ॥587॥
(त्याप्रमाणे तारुण्यात शक्ती व बुद्धी खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करील?) असे वृद्धावस्थेत होणार्या दुर्दशेचे त्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे.
588-13
तैसेंचि नाना रोग । पडिघाती जंव पुढां आंग । तंव आरोग्याचे उपेग । करूनि घाली ॥588॥
व्याधी = त्याचप्रमाणे नाना रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो.
589-13
सापाच्या तोंडी । पडली जे उंडी । ते लाऊनि सांडी । प्रबुद्धु जैसा ॥589॥
सापाच्या तोंडात पडलेला एखादा पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो,
590-13
तैसा वियोगें जेणें दुःखे । विपत्ति शोक पोखे । तें स्नेह सांडूनि सुखें । उदासु होय ॥590॥
त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दु:खे, विपत्ति व शोक ही पोसली जातात, तो स्नेह टाकून जो समाधानवृत्ती ठेऊन उदास होऊन रहातो,
591-13
आणि जेणें जेणें कडे । दोष सूतील तोंडें । तयां कर्मरंध्रा गुंडे । नियमाचे दाटी ॥591॥
आणि ज्या ज्या इंद्रियांच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचुप्रवेश करतील त्या त्या कर्म करणार्या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो ते प्रवेशाचे मार्गच बंद करतो.
592-13
ऐसाइसिया आइती । जयाची परी असती । तोचि ज्ञानसंपत्ती- । गोसावी गा ॥592॥
अशा अशा सामुग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो, तोच अर्जुना, ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज.
593-13
आतां आणीकही एक । लक्षण अलौकिक । सांगेन आइक । धनंजया ॥593॥
आता आणखीही एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो, अर्जुना, ऐक.
श्लोक9
असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु ।
नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥13.9॥
अर्थ देहासंबधी अनासक्ती, स्त्रीपुत्रगृह इत्यादिकांविषयी अलोलुपता व इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व ढळू न देणे॥13-9॥
594-13
तरि जो या देहावरी । उदासु ऐसिया परी । उखिता जैसा बिढारीं । बैसला आहे ॥594॥
अनासक्ती-
तर बिर्हाडी बसवलेला वाटसरू जसा त्या बिर्हाडाविषयी उदास असतो, तशा प्रकाराने जो स्वत:च्या शरीराविषयी उदास असतो.
595-13
कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली । घरावरी तेतुली । आस्था नाहीं ॥595॥
अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वत:च्या घरावर किंचितही ममत्व नसते.
596-13
साउली सरिसीच असे । परी असे हें नेणिजे जैसें । स्त्रियेचें तैसें । लोलुप्य नाहीं ॥596॥
अलोलुपता
आपली सावली आपल्याबरोबरच नेहेमी असते. परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते, त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते,
597-13
आणि प्रजा जे जाली । तियें वस्ती कीर आलीं । कां गोरुवें बैसलीं । रुखातळीं ॥597॥
आणि त्याला जी मुलेबाळे झालेली असतात, त्यास तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते (तसा तो ज्ञानी, प्रजेसंबंधी उदास असतो.
598-13
जो संपत्तीमाजी असतां । ऐसा गमे पंडुसुता । जैसा कां वाटे जातां । साक्षी ठेविला ॥598॥
अर्जुना, वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टींविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी अनासक्त असतो, तसा सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही तो अनासक्त असल्याचे दिसते.
599-13
किंबहुना पुंसा । पांजरियामाजीं जैसा । वेदाज्ञेसी तैसा । बिहूनि असे ॥599॥
फार काय सांगावे? राघू जसा पिंजर्यात असतो, तसा जो वेदाज्ञेला भिऊन संसारात असतो.
600-13
एऱ्हवीं दारागृहपुत्रीं । नाहीं जया मैत्री । तो जाण पां धात्री । ज्ञानासि गा ॥600॥
एरवी ज्याचे स्त्रीपुत्रगृहादिकांवर प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज.