सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

401-11
मागां थोडिया बहुवा उपपत्ती । येणें सांगितलिया विभूती । तैसा नसेचि मा पुढती । बैसलों पुसों ॥401॥
पूर्वी थोड्याबहुत युक्तीने भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या, त्या ऐकून तसाच मी राहिलो नाही आणि पुनः पुढे विश्वरूपदर्शनाविषयी विचारू लागलो.
402-11
म्हणौनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धिही होणारासारिखी ठाके । माझ्या कपाळीं पिटावें लोकें । तें लोटेल कांह्यां ॥402॥
म्हणून प्रारब्धभोग चुकत नाही म्हणतात, ते त्रिवार सत्य आहे आणि प्रारब्धानुसार जे होणार असेल, त्याप्रमाणेच बुध्दि होते. लोकांनी माझ्या नावाने रडावे, असे माझ्या कपाळी होते, ते चुकले कसे?
403-11
पूर्वीं अमृतही हातां आलें । परी देव नसतीचि उगले । मग काळकूट उठविलें । शेवटीं जैसें ॥403॥
पूर्वी समुद्रमंथन करता करता अमृत हाती लागले; पण त्यातच संतोष मानून देव मंथन सोडून उगे राहिले नाहीत, शेवटी हलाहल विष समुद्रातून निघाले.
404-11
परी तें एकबगीं थोडें । केलिया प्रतिकारामाजिवडें । आणि तिये अवसरीचें तें सांकडें । निस्तरविलें शंभू ॥404॥
क्षीराब्धीने केलेल्या चौदा रत्नांच्या अविष्कारामध्ये काळकूटाचा अविष्कार एका परीने थोडा होता आणि त्यावेळचे संकट भगवान शंकरांनी निवारण केले.
405-11
आतां हा जळतां वारा कें वेंटाळे? । कोणा हे विषा भरलें गगन गिळे? । महाकाळेंसि कें खेळें? । आंगवत असे ॥405॥
आताचा हा पेटलेला वारा कसा आवरला जाणार? हे संपूर्ण विषाने भरलेले आकाश कोण गिळणार? या महामृत्यूशी खेळण्याचे सामर्थ्य कोण अंगी वागवितो?


406-11
ऐसा अर्जुन दुःखें शिणतु । शोचित असे जिवाआंतु । परी न देखें तो प्रस्तुतु । अभिप्राय देवाचा ॥406॥
याप्रमाणे अर्जुन, दुःखाने अत्यंत व्याकुळ होऊन, अंतःकरणांत शोक करूं लागला; पण भगवंताच्या विश्वरूपदर्शनाचा प्रस्तुत हेतु काय आहे, हें तो जाणत नव्हता.
407-11
जे मी मारिता हे कौरव मरते । ऐसेनि वेंटाळिला होता मोहें बहुतें । तो फेडावयालागीं अनंतें । हें दाखविलें निज ॥407॥
मी मरणार व कौरव माझ्याकडून मारले जाणारे, अशा थोर अविवेकाने तो ग्रासला गेला होता. तो अविवेक नाहीसा करण्याकरितां भगवंतांनी आपले हें विश्वरूप दाखविलें.
408-11
अरे कोण्ही कोणातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारीं । हें विश्वरूपव्याजें हरी । प्रकटित असे ॥408॥
अरे !कोणी कोणाचा नाश करित नाही. एक मीच सर्वांचा नाश करणारा आहे, हेंच भगवंतांनी विश्वरूपाच्या मिषाने स्पष्ट दाखविलें.
जगांतील प्राण्यांच्या उत्पत्तिस्थितिसंहाराचा व्यापार, जीवांच्या कर्मानुसार एक परमेश्वरच करीत असतो; उत्पत्तिस्थितिलयाशीं संबंधित असलेले पदार्थ केवळ निमित्तमात्र असतात, असा वेदान्ताचा सिध्दांत आहे.
409-11
परी वायांचि व्याकुलता । ते न चोजवेचि पंडुसुता । मग अहा कंपु नव्हता । वाढवित असे ॥409॥
पण अर्जुन हें न जाणतां दुःखाने व्याकुळ होऊन नसताच थरकांप वाढवित होता.
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि । केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ।11. 27 ।
अर्थ त्वरा करणारे हे (अगोदर) भयानक व दाढांच्या येगाने (अधिक) भयानक अशा तुझ्या मुखांमधे शिरत आहेत. कोणी चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांमधे अडकलेले दिसतात.॥27॥
410-11
तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेंसि दोन्ही दळें । वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं ॥410॥
त्यावेळेला अर्जुन पुनः म्हणाला, अहो देवा! पहा! आकाशात जसे मेघ नाहीसे होतात, त्याप्रमाणे आंगावरील चिलखतें व हातांतील तलवारीसह दोन्हीकडील सैन्यें एकाचवेळीं तोंडांत गेली आहेत.


411-11
कां महाकल्पाचिया शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी । तैं एकविसांही स्वर्गां मिठी । पाताळासकट दे ॥411
किंवा महाकल्पाच्या शेवटीं संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याकरितां जेव्हा कृतांत सर्व सृष्टिवर क्रुध्द होतो, तेव्हा तो पाताळासह एकवीस स्वर्गांना ग्रासून टाकतो.
412-11
नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें । जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती ॥412॥
अथवा दैव प्रतिकूल झाले असतां, धनसंचय करणार्‍याची संपत्ति, जशी जागच्या जागीं नाहीशी होते.
413-11
तैसीं सासिन्नलीं सैन्यें एकवटें । इये मुखीं जाहलीं प्रविष्टें । परी एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा ॥413॥
त्याप्रमाणे युध्दाला सज्ज झालेली ही दोन्ही सैन्यै, तुझ्या मुखांत एकत्र शिरली आहेत. त्यापैकी तुझ्या मुखांतून एकहि सुटत नाही. कसें त्यांचे कर्म आहें, पहा.
414-11
अशोकाचे अंगवसे । चघळिले कऱ्हेनि जैसे । लोक वक्त्रामाजीं तैसे । वायां गेले ॥414॥
उंटाने अशोकवृक्षाचे डहाळे जसे चघळावें, त्याप्रमाणे सर्व लोक तुझ्या तोंडांत व्यर्थ गेले आहेत.
415-11
परि सिसाळें मुकुटेंसीं । पडिली दाढांचे सांडसीं । पीठ होत कैसीं । दिसत आहाती ॥415॥
राजांची मुकुटासहित शिरें दाढांच्या सांडशीत सांपडून त्यांचे कसे पीठ होतांना दिसत आहे.


416-11
तियें रत्नें दांतांचिये सवडीं । कूट लागलें जिभेच्या बुडीं । कांहीं कांहीं आगरडीं । द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥416॥
मुकुटांतील रत्ने दातांच्या संधीत असून, मस्तकांचे चूर्ण जिभेच्या बुडाशीं लागलें आहे व कांही कांही दाढांची टोकेंही माखली आहेत.
417-11
हो कां जे विश्वरूपें काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें । परि जीवित्व देहींचीं सिसाळें । अवश्य कीं राखिलीं ॥417॥
हो ! एक गोष्ट मात्र दिसते की, या विश्वरूपी काळाने लोकांची शरीरें व बळ ग्रासून टाकली; पण त्या जीवांच्या शरीरांचीं मस्तकें मात्र न गिळतां तशींच ठेवलीं.
418-11
तैसीं शरीरामाजीं चोखडीं । इयें उत्तमांगें होतीं फुडीं । म्हणौनि महाकाळाचियाही तोंडीं । परि उरलीं शेखीं ॥418॥
हीं सुंदर मस्तकें म्हणजे शरीरांतील खरोखर उत्तम अंगे असल्यामुळे, ती महाकिळाच्याही तोंडांत शेवटीं उरली आहेत.
419-11
मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहरचि नाहीं । जग आपैसेंचि वदनडोहीं । संचारताहे ॥419॥
पुढे अर्जुन म्हणतो, अरें ! हें काय आश्चर्य ! जन्माला आलेल्या प्राण्यांला दुसरी गतिच दिसत नाही. सर्व जगत् आपण होऊन विश्वरूपाच्या मुखरूपी डोहांत शिरत आहे ना !
420-11
यया आपेंआप आघविया सृष्टी । लागलिया आहाति वदनाच्या वाटीं । आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥420॥
ह्या संपूर्ण सृष्टी सहजगत्या विश्वरूपाच्या मुखांत जाण्याच्या मार्गास लागल्या आहेत आणि हा विश्वरूप भगवान जागच्या जागींच स्वस्थ त्यांना गिळीत आहे.


421-11
ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजीं धांवत । येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनीं ॥421॥
हे सर्व ब्रह्मादिकदेव वर असलेल्या मुखा मध्ये वेगाने शिरत असून, बाकीचे सर्व सामान्य लोक हे अलीकडील मुखातच भरले जात आहेत.
422-11
आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित । परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि कांहीं ॥422॥
आणि कित्येक प्राणीजात उत्पन्न झाल्याबरोबर ग्रासले जात आहेत; पण याच्या मुखातून निश्चित काही सुटत नाही.
(येथे प्राण्यांच्या तीन गती दाखविल्या आहेत. ब्रह्मादिक देवांना उंचलोक म्हणजे सत्यलोक प्राप्त होतो. सामान्य म्हणजे भगवत्प्रीत्यर्थ निष्काम चित्ताने विहित कर्माचे अनुष्ठान न करता स्वर्गादी लोकांच्या प्राप्तीकरिता कर्म करणारे जे पुरुष असतात, त्यांना चंद्रलोकप्राप्ती होऊन, ते तेथे सुख भोगून परत संसारात येतात व अत्यंत पातकी लोक, सुख भोगण्याकरितां कोणत्याही लोकांत न जाता जन्मानंतर मरण व मरणानंतर जन्म असे केवळ दुःखच भोगत असतात.)
यथा नदीनाम् बहवोऽम्बुवेगाः
समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
तथा तवामी नरलोकवीरा
विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति । 11-28 ।

अर्थ ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करून गमन करत असतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी जळत असलेल्या तुझ्या मुखामधे हे नरांमधील वीर प्रवेश करत आहेत.॥11-28॥
423-11
जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग । तैसें आघवाचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं ॥423॥
जसे महानदीचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रात येऊन मिळतात, तशी सर्व बाजूंनी ही सृष्टी तुझ्या मुखांत प्रविष्ट होत आहे.
424-11
आयुष्यपंथें प्राणिगणी । करोनि अहोरात्रांची मोवणी । वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती ॥424॥
सर्व प्राणी समुदाय, आपल्या आयुष्यरूपी मार्गाने दिवस व रात्र यांच्या पायर्‍या करून अत्यंत त्वरेने तुझ्या मुखांत पडण्याचे साधीत आहेत.
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।
तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः11.29 ।

अर्थ अत्यंत वेगाने युक्त होत्साते पतंग ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीमध्ये स्वत:च्या नाशाकरताच प्रवेश करतात, त्याप्रमाणेच हे प्राणी अत्यंत वेगाने युक्त होत्साते (स्वत:च्या) नाशासाठीच तुझ्या मुखांमधे प्रवेश करत आहेत.॥29॥
425-11
जळतया गिरीच्या गवखा । माजीं घापती पतंगाचिया झाका । तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडती ॥425॥
पेटलेल्या पर्वताच्या दरीत ज्याप्रमाणे पतंगाच्या झुंडीच्या झुंडी जाऊन पडतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक तुझ्या मुखात पडत आहेत.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *