सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

376-11
असो दांत दाढांची दाटी । न झांकवे मा दों दों वोठीं । सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥376॥
हें असो संपूर्ण प्रलयकालच्या शस्रांचे दाट कुंपण लागावें, त्याप्रमाणे तुझ्या मुखांतील दांतदाढांची असलेली दाटी दोन्ही ओठांनी झांकली जात नाही.
377-11
जैसें तक्षका विष भरलें । हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें । कीं आग्नेयास्त्र परजिलें । वज्राग्नि जैसें ॥377॥
जणुं काय विषारी तक्षकाचे ठिकाणीं विष भरलें, प्रलयकालच्या रात्रीं भूतांचा संचार झाला किंवा प्रलयाग्नीने पुनः अग्नेयास्र हातात घेतलें.
378-11
तैशीं तुझीं वक्त्रें प्रचंडें । वरि आवेश हा बाहेरी वोसंडे । आले मरणरसाचे लोंढे । आम्हांवरी ॥378॥
त्याप्रमाणे तुझीं ही प्रचंड भयंकर मुखें असून त्यांतहि पुनः त्यांचा आवेश बाहेर प्रगट होत आहे. असें वाटतें की त्यातून आम्हांवर मरणरूपी रसांचे लोंढे आले आहेत. चंडा
379-11
संहारसमयींचा निळु । आणि महाकल्पांत प्रळयानळु । या दोहीं जैं होय मेळु । तैं काय एक न जळे? ॥379॥
देवा !प्रलयकाळचा भयंकर वायु व महिकल्पाच्या वेळचा प्रलयाग्नि, हे दोन्ही मिळाले असतां काय जळणार नाही?
380-11
तैसीं संहारकें तुझीं मुखें । देखोनि धीरु कां आम्हां पारुखे? । आतां भुललों मी दिशा न देखें । आपणपें नेणें ॥380॥
त्याप्रमाणेच तुझी सर्व ब्रह्मांडाचा संहार करणारी मुखें पाहून, धैर्य आम्हांला स्पर्श करील काय?आतां मी भ्रमिष्ट दिङ्मूढ झालों व मला माझेंहि भान राहिलें नाही.


381-11
मोटकें विश्वरूप डोळां देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें । आतां जापाणीं जाणारी । आपुलें अस्ताव्यस्त हें ॥381॥
तुझें विश्वरूप डोळ्यांनी पाहिले मात्र, तोच सुखाचा दुष्काळ पडला; म्हणून आपले हे अवाढव्य पसरलेलें विश्वरूप आतां आवरा आवरा.
382-11
ऐसें करिसी म्हणौनि जरी जाणें । तरी हे गोष्टी सांगावीं कां मी म्हणें । आतां एक वेळ वांचवी जी प्राणें । या स्वरूपप्रळयापासोनि ॥382॥
(हें आपले भयंकर विश्वरूप दाखवून आम्हांला) अशाप्रकारें अत्यंत भयभीत करशील असें जर मला माहित असतें, तर विश्वरूप दाखवा, असे मी कशाला म्हटलें असतें? तरी आतां देवा ! एकवेळ प्राणदान देऊन, या माझ्या जीवाच्या होऊं पाहणार्‍या स्वरूपप्रलयापासून -म्हणजे माझी संपूर्ण स्थूळ सूक्ष्मतत्वें अव्यक्तांत मिळू पाहत आहेत त्यापासून -प्राणाने मला वांचवा म्हणजे माझे प्राण जीवंत ठेवा.
383-11
जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरी सुईं वोडण माझिया जीविता । सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा ॥383॥
भगवंता !जर तूं आमचा स्वामी म्हणवितोस, तर माझ्या, जीवितावर आडपडदा घालून माझें संरक्षण कर व हा महामारीचा पसारा पुनः फिरून आपलें ठिकाणीं सांठवून घें.
384-11
आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्व वसतें । तें विसरलासी हें उपरतें । संहारूं आदरिलें ॥384॥
हे सर्व देवांच्याहि परम देवा!माझें म्हणने ऐक. तूंच चैतन्यस्वरूपाने सर्व विश्वांत वास करतोस, हें तूं विसरलास आणि उलट सर्व विश्वाचा संहार करावयास उठलास.
385-11
म्हणौनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया । काढीं मातें महाभया- । पासोनियां ॥385॥
म्हणून देवा !त्वरित प्रसन्न होऊन या आपल्या मायेचा, येथून उपसंहार कर व या महाभयापासून मला सोडवं.


386-11
हा ठायवरी पुढतपुढतीं । तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती । ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलों ॥386॥
अशाप्रकारें वारंवार तुला अत्यंत काकूळती येऊन म्हणावें, इतका मी, विश्वरूपा भगवंता!अत्यंत भित्रा झालो आहे.
387-11
जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा । जो मीकाळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं ॥387॥
जेव्हां इंद्राच्या अमरावती राजधानी वर राक्षसांची धाड पडली, तेव्हि ज्या मी एकट्यानेच त्यांचा पराभव केला, कारण मी मृत्यूच्या तोंडाचेंही भय बाळगीत नाही.
388-11
परी तया आंतुल नव्हे हें देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा । तुवां आमुचाचि घोटू भरावा । या सकळ विश्वेंसीं ॥388॥
पण देवा!हें तुझें विश्वरूप त्यापैकी दिसत नाही. येथे मृत्युवरहि ताण करून सर्व ब्रह्मांडासह आमचा घास घ्यावा असे तू केलेस.
389-11
कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूंचि मिनलासि काळु । बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥389॥
खरोखर हा सृष्टिच्या प्रलयाचा काल नसतांना मध्येच कसा तू काळ होऊन प्राप्त झालास?पहा!बिचारे हें संपूर्ण ब्रह्मांड अल्पायुषि झालें आहे.
390-11
अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिलें शांत करितां । कटाकटा विश्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं ॥390॥
आहारे माझ्या दुर्दैवा!विश्वरूप सुखप्राप्ति व्हावी म्हणून मी प्रयत्न करीत असतां,हें विघ्न उत्पन्न झालें हाय!तूं ग्रासू लागल्यामुळे आतां हे विश्व नाहीसें होणार!


391-11
हें नव्हे मा रोकडें । सैंघ पसरूनियां तोंडें । कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ॥391॥
जिकडे तिकडे मुखें पसरून या दोन्ही सैन्याला चहूंकडून आपल्या तोंडात टाकीत आहेस, हे स्पष्ट दिसत नाही काय?
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथाऽसौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः । 11.26 ।

अर्थ हे धृतराष्ट्राचे पुत्र, राजांच्या समुदायांसह वर्तमान, भीष्म, द्रोण, तसाच कर्ण, त्याप्रमाणेच आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योद्ध्यांसह॥26॥
392-11
नोहेति? हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर । हे गेले गेले सहपरिवार । तुझिया वदनीं ॥392॥
हे कौरव कुळांतील वीर आणि आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत काय? हे सर्व आपल्या परिवारासह तुझ्या मुखांत शिरलेत.
393-11
आणि जे जे यांचेनि सावायें । आले देशोदेशींचे राये । तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटित आहासी ॥393॥
आणि युध्दात यांचे सहाय्य करण्याकरिता इतर देशींचे जे जे राजे आले आहेत, त्यांची मृत्युवार्ता सांगायलाहि कोणी उरणार नाही. अशा रितीने सरसकट सर्वांना गिळीत आहेस.
394-11
मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां । आरणीं हन थाटा । देतासि मिठी ॥394॥
मदोन्मत्त हत्तींच्या समुदायांना तोंडात घटघट ओतीत आहेस व त्याचप्रमाणे युध्दात थाटलेल्या संपूर्ण सैन्यरचनेला मिठी मारत आहेस.
395-11
जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर । मुखाआंत भार । हारपताति मा ॥395॥
तोफादिक यंत्राचा मारा करणारे व पायदळांचे मुख्य यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखांत गडप होत आहेत ना?


396-11
कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्वातें गिळी । तियें कोटीवरी सगळीं । गिळितासि शस्त्रें ॥396॥
एकच शस्र संपूर्ण विश्वाचा संहार करते व म्हणून मृत्यूचे भावंड होय, अशी कोट्यावधी शस्रे तूं गिळीत आहेस.
397-11
चतुरंगा परिवारा । संजोडियां रहंवरां । दांत न लाविसी मा परमेश्वरा । कसा तुष्टलासि बरवा॥397॥
हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशा चतुरंग सेनेचा संपूर्ण परिवार व घोडे जोडलेले रथ यांना भगवंता! कसा प्रसन्न झाला आहेस पहा की, यांना तू दात लागू न देता गिळून टाकीत आहेस.
398-11
हां गा भीष्मा{ऐ}सा कवणु । सत्यशौर्यनिपुणु । तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ॥398॥
देवा!भीष्माचार्यासारखा सत्यवचनी व शौर्यात निपून असा कोण आहे? पण अरेरे! त्याला व द्रोणाचार्यासारख्या ब्राम्हणालाही ग्रासून टाकलेस.
399-11
अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु । आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखें । 399 ।
हाय! हाय! सूर्यपुत्र जो महायोध्दा कर्ण,तोही तुझ्या मुखांत गेला आणि आमच्या सर्वांचाकेरळच्या नाहीसा केलास,असे मी पाहत आहे.
400-11
कटकटा धातया । कैसें जाहलें अनुग्रहा यया । मियां प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिलें मरण ॥400॥
अरेरे ब्रह्मदेवा! विश्वरूप दर्शनाचा अनुग्रह कसा फळला पहा! मी विश्वरूपदर्शनाकरिता भगवंताची प्रार्थनाकरून बिचार्‍या जगा वरमरणाचा प्रसंग आणला.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading