सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

101-11
हां गा राजसूय यागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्भाग्य । शब्दीं निस्तेजिलासी ॥101॥
त्याचप्रमाणे दुसरा प्रसंग पहा ! पांडवांच्या राजसूययज्ञामध्यें सर्व सभासदांच्या समोर, त्रैलोक्यांतील समुदाय जमला असतांना, त्या शिशुपालाकडून हजारों अपशब्दांनी तुमचा कसा पाणउतारा केला गेला
102-11
ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपें ठावो दिधला गोपाळा । आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदीं चाड? ॥102॥
तसा घोर अपराध करणार्‍याशिशुपालाला देखील गोपाळा ! तुम्ही आपल्यांत मिळवून घेतले आणि उत्तानपादराजाच्या मुलाला ध्रुवाला काय ध्रुवपदाच्या प्राप्तीची इच्छा होती?
103-11
तो वना आला याचिलागीं । जे बैसावें पितयाचिया उत्संगीं । कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं । श्लाघ्यु केला 103॥
पित्याच्या मांडीवर बसावे याच उद्देशाने तपश्चर्या करण्याकरितां तो अरण्यांत आला होता, पण तुम्ही त्याला चंद्रसूर्यापेक्षाहि श्रेष्ठ केला.
104-11
ऐसा वनवासिया सकळां । देतां एकचि तूं धसाळा । पुत्रा आळवितां अजामिळा । अपणपें देसी ॥104॥
अशा रीतीने तुझ्यां करितां वनवास करणार्‍यांना तूच एक विचार न करतां देणारा आहेस. अजामेळ पुत्राला प्रेमाने बोलावित असतां तुम्ही त्याला आपलीच प्राप्ति करून दिली.
105-11
जेणें उरीं हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा । अझुनी वैरियांचिया कलेवरा । विसंबसीना 105
ज्याने तुमच्या वक्षस्थलावर लाथ मारली, त्याच्या चरणाचा ठसा, अजून तुम्ही वक्षस्थलावर धारण केला आहे. अजूनहि आपल्या (शंखासूर या) शत्रूच्या शरीराला (म्हणजे शंखाला) आपण दूर करीत नाहीत.


106-11
ऐसा अपकारियां तुझा उपकारु । तूं अपात्रींही परी उदारु । दान म्हणौनि दारवंठेकरु । जाहलासी बळीचा ॥106॥
असे तुम्ही अपकार करणार्‍यावरहि उपकार करणारे आहांत. दानाला अयोग्य असणार्‍यावरहि आपण उदार होऊन दान दिलें आहे, बळीने सर्व पृथ्वीचें दान केलें म्हणून आपण त्याचे द्वाररक्षक झालांत.
107-11
तूंतें आराधी ना आयकें । होती पुंसा बोलावित कौतुकें । तिये वैकुंठीं तुवां गणिके । सुरवाडु केला ॥107॥
नामस्मरणाने तुझी आराधना करीत नव्हती किंवा तुझें नांव ऐकतहि नव्हती. कौतुकाने राघुला रामकृष्ण म्हणून बोलविण्यास शिकवित होती; पण त्या वेश्येला आपण वैकुंठसुख दिलें. (गणिका महानंदा पाळलेल्या राघूला ‘राम कृष्ण हरि’ हे शब्द केवळ बोलण्याला शिकवित होती, त्यांत आपण नामस्मरण करून भगवंताची आराधना करावी किंवा राघूच्या मुखांतून आपण भगवंताचे नाव ऐकावे असा कांही एक उद्देश तिने धरला नव्हता; तरीपण कोणत्याहि निमित्ताने भगवंताचें नाव मुखीं आलें असतां मनुष्य उध्दरला जातो, अशा नामाच्या माहात्म्यामुळे व भगवंताच्या नामांतच रंगून तिची पापप्रवृत्ति बंद पडल्यामुळे, ती तात्काळ उध्दरली गेली.)
108-11
ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें । आपणपें देवों लागसी वानिवसें । तो तूं कां अनारिसें । मजलागीं करिसी ॥108॥
असें कांही तरी फोल निमित्त पाहून जो तूं आपली कौतुकाने प्राप्ति करून दूतोस, तो तूं इतका उदार, मी विश्वरूप दाखव म्हटल्यानंतर भलतेंच कसें करशील?
109-11
हां गा दुभतयाचेनि पवाडें । जे जगाचें फेडी सांकडें । तिये कामधेनूचे पाडे । काय भुकेले ठाती ?॥109॥
दुभत्याच्या प्रभावाने – म्हणजे इच्छिलें तें देण्यास समर्थ असल्यामुळे – जी कामधेनू सर्व जगाचे दुःख नाहीसे करते, त्या कामधेनूचेच वासरूं भुकेले राहील काय?
110-11
म्हणौनि मियां जें विनविलें कांहीं । तें देव न दाखविती हें कीर नाहीं । परी देखावयालागीं देईं । पात्रता मज ॥110॥
म्हणून मी जें आपल्याला विनंति करून विश्वरूप दाखवा म्हटले, तें आपण दाखविणार नाही असे मुळींच नाही; पण तें विश्वरूप पाहण्याची पात्रता मला द्या.


111-11
तुझें विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे । तरी आर्तीचे डोहळे । पुरवीं देवा ॥111॥
माझ्या या दोन्ही डोळ्यांनी विश्वरूप पाहण्याजोगें आहे, असें जर आपणांला वाटत असेल, तर देवा ! माझी विश्वरूपदर्शनाची इच्छा पूर्ण करा.
112-11
ऐसी ठायेंठावो विनंती । जंव करूं सरला सुभद्रापती । तंव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेचिना ॥112॥
सुभद्रापती अर्जुन अशी यथायोग्य विनंति जेव्हां करूं लागला तेव्हा षड्गुणैश्वर्याचा सार्वभौम राजा – म्हणजे अमर्याद षड्गुणैश्वर्यसंपन्न – जो भगवान श्रीकृष्ण, त्याला धीर धरवला नाही.
श्रीभगवानुवाच ।
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ 11.5॥

113-11
तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळां आला वर्षाकाळु । नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥113॥
कारण भगवान श्रीकृष्ण, कृपारूपी अमृताने वळून आलेला जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा अत्यंत जवळ येऊन ठेपलेला पावसाळा होता किंवा श्रीकृष्ण कोकिळपक्षी होता व अर्जुन वसंतऋतु होता.
114-11
नातरी चंद्रबिंब वाटोळें । देखोनि क्षीरसागर उचंबळे । तैसा दुणेंही वरी प्रेमबळें । उल्लसितु जाहला ॥114॥
किंवा वाटोळें पूर्णबिंब पाहून जसा क्षीरसागर उचंबळतो, त्याप्रमाणें अर्जुनावरील द्विगुणित झालेल्या प्रेमाने भगवान अत्यंत आनंदित झाले.
115-11
मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें । गाजोनि म्हणितलें सकृपें । पार्था देख देख अमुपें । स्वरूपें माझीं ॥115॥
मग त्या प्रसन्नचित्ताच्या आवेशाने भगवान श्रीकृष्ण गर्जना करून व दयार्द्र होऊन म्हणाले, अर्जुना ! माझीं असंख्य स्वरूपें पहा ! पहा!


116-11
एक विश्वरूप देखावें । ऐसा मनोरथु केला पांडवें । कीं विश्वरूपमय आघवें । करूनि घातलें ॥116॥
एकच विश्वरूप पहावें अशी अर्जुनाने इच्छा केली होती; पण भगवंतांनीं सर्व विश्वरूपमय करून टाकले
117-11
बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु । असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुलें ॥117॥
धन्य आहे हा अमर्याद उदार परमात्मा ! याचकाची इच्छा पूर्ण करण्यास हा सिध्द असतो आणि याचकाच्या मागण्याच्या सहस्रपट देतो किंवा आपलें सर्वस्वहि देतो
118-11
अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले । लक्ष्मीयेही राहविलें । जिव्हार जें ॥118॥
अहो, जें विश्वरूप अत्यंत गुह्य म्हणून शेषाच्या डोळ्यालाहि दिसू दिले नाही, वेदाला कळू दिले नाही व लक्ष्मीलाही ज्यापासून दूर ठेविलें
119-11
तें आतां प्रकटुनी अनेकधा । करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा । बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया ॥119॥
असें विश्वरूप आतां त्या धन्य व थोर भाग्यवान अर्जुनासाठी अनेकप्रकारें प्रगट करून, भगवान विश्वरूपदर्शनाचा खटाटोप करीत आहेत
120-11
जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवीं स्वप्नींचें आघवें होये । तेवीं अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला 120॥
जो जागा असलेला पुरूष, पुढें स्वप्नांत जातो व तो मग स्वप्नांत जेवढें कांही दिसतें, तें सर्व आपणच होतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान, आपणच अनंतब्रह्मांडरूप झाले.
(येथे भगवंताच्या विश्वरूपाने प्रगट होण्यास जो स्वप्नांचा दृष्टांत दिसला, तो एकच पुरुष अनेकरूप कसि होतो हें जीवाला स्वप्न दृष्टांतावरूनच समजत असल्यामुळे दिला आहे.
स्वप्न जसे भ्रमजन्य काल्पनिक खोटें असतें, तसें भगवंताचें हें विश्वरूप भ्रमजन्य काल्पनिक खोटे आहे, हे सांगण्याकरितिं दिला नाही. भगवंताचें हें स्वरूप तसें ‘अज्ञानजन्य, काल्पनिक, खोटें असतें, तर स्वप्नांत जसा मनुष्य, एक मीच अनेकरूपें झालों आहों हे जाणत नाही, तसें भगवंतांनीहि आपलें एकवस्तुत्व व अद्वैतत्व जाणलें नसतें आणि अर्जुनालाहि विश्वरूपदर्शनांत भगवंताचें एक अद्वैतवस्तुत्व अनुभवाला आलें नसतें व त्याला पाहण्याकरितां दिव्यदृष्टीची अवश्यकता लागली नसती.


121-11
ते सहसा मुद्रा सोडिली । आणि स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली । किंबहुना उघडिली । योगऋद्धी ॥121॥
आपल्या मर्यादित श्रीकृष्णस्वरूपाचा आकार एकदम लुप्त केला आणि ज्या अज्ञानजन्य स्थूलदृष्टीने भगवंताचें श्रीकृष्णस्वरूप व जगत् निरनिराळें पांचभौतिक स्थूल दिसत होते, त्या स्थूलदृष्टीचा पडदा दूर केला; किंबहुना भगवंताने आपलें परमैश्वर्य प्रगट केले.
(स्थूलदृष्टीची जवनिका फेडिली — स्थूल दृष्टि — संपूर्ण नामरूपात्मकदृश्य, नाना, जडविनाशीं व पांचभौतिक वस्तुरूप आहे असें समजणें, याला स्थूलदृष्टि म्हणतात. ही स्थूलदृष्टि अज्ञानदशेंत सर्वांच्या ठिकाणी असते.
जवनिका – ही दृष्टि, विश्वरूपाच्या दर्शनाला प्रतिबंधक आहे हें “जवनिका” शब्दाने सुचविलें आहे. फेडिली – भगवंताने आपल्या सामर्थ्याने ती नाहीशी केली.
122-11
परी हा हें देखेल कीं नाहीं । ऐसी सेचि न करी कांहीं । एकसरां म्हणतसे पाहीं । स्नेहातुर ॥122॥
पण हा अर्जुन हें पाहील किंवा नाही याची भगवंताला आठवण झाली नाहीं. प्रेमानें उतावीळ होऊन, अर्जुना ! विश्वरूप पहा, असे एकसारखें भगवान म्हणूं लागलें.
श्रीभगवानुवाच ।
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च॥11.5॥

123-11
अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें । आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें । आतां देखें आघवें भरिलें । माझ्याचि रूपीं ॥123॥
भगवान म्हणतात, अर्जुना ! तूं एक विश्वरूप दाखवा असें म्हटलेंस; आणि मी एकच विश्वरूप दाखविलें, तर मी आपलें पूर्ण विश्वरूप दाखविलें असें होणार नाही म्हणून जेवढें कांही आहे, ते सर्व माझ्याच रूपाने भरलें आहे पहा!
(आतां देखें आघवें भरिलें । माझ्याचि रूपी — भगवान श्रीकृष्णांनी, आपल्या श्रीकृष्णस्वरूपाचे ठिकाणीच अनंत ब्रह्मांडें दाखविलीं. अनंत ब्रह्मांडाला आधार असणारे श्रीकृष्णस्वरूप, भक्तांना प्रेमवृत्तिमुळे व इतरांना अज्ञानामुळे एकदेशीय दिसत असलें, तरी तें व्यापकच असतें. त्याची व्यापकता ज्ञानीभक्त विसरत नसतात.)
124-11
एकें कृशें एकें स्थूळें । एकें ऱ्हस्वें एकें विशाळें । पृथुतरें सरळें । अप्रांतें एकें ॥124॥
एक रोड तर एक स्थूल, एक ठेंगणें तर एक उंच, एक जाड पसरलेलें तर एक सरळ, एक अमर्याद.
125-11
एकें अनावरें प्रांजळें । सव्यापारें एकें निश्चळें । उदासीनें स्नेहाळें । तीव्रें एकें ॥125॥
एक न आवरण्याजोगें, तर एक सुलभ आहे. एक व्यापार करीत असलेलें, तर एक निश्चळ आहे. कांही उदासींन रूपें, तर कांही प्रेमळ रूपे आहेत व कांही तीव्र वाटत आहेत.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading