सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी १२६ ते १५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

126-11
एके घूर्णितें सावधें । असलगें एकें अगाधें । एकें उदारें अतिबद्धें । क्रुद्धें एकें ॥126॥
कांही रूपें धुंदीत असलेली, तर कांही सावध दिसत आहेत. कांही सूक्ष्म दिसतात, तर कांही रूपे फार मोठी आहेत. कांही रूपे उदार, कांही कृपण व कांही क्रुध्द आहेत.
127-11
एकें शांतें सन्मदें । स्तब्धें एकें सानंदें । गर्जितें निःशब्दें । सौम्यें एकें ॥127॥
कांही रूपें शांत दिसत आहेत, तर कांही मदयुक्त दिसत आहेत. कांही स्तब्ध, कांही आनंदयुक्त, कांही रूपें गर्जना करीत असलेलीं, तर कांहीच्या तोंडून एक शब्दहि निघतांना दिसत नाही व कांही अत्यंत सौम्य आहेत.
128-11
एकें साभिलाषें विरक्तें । उन्निद्रितें एकें निद्रितें । परितुष्टें एकें आर्तें । प्रसन्नें एकें ॥128॥
कांही रूपांचे ठिकाणी अभिलाष दिसून येतो, तर कांही निरिच्छ आहेत. कांही रूपें जागी, तर कांही रूपे निजलेंली, कांही रूपें अत्यंत संतोषयुक्त, तर कांही रूपे सवासन आहेत व कांही प्रसन्न आहेत.
129-11
एकें अशस्त्रें सशस्त्रें । एकें रौद्रें अतिमित्रें । भयानकें एकें पवित्रें । लयस्थें एकें ॥129॥
कांही रूपें शस्ररहित दिसतात, तर काही शस्रसहित दिसतात. कांही रूपे अति भयंकर आहेत, तर कांही रूपें अत्यंत मित्राप्रमाणे भासतात आणि कांही रूपे विक्राळ आहेत तर कांही विचित्र आहेत व कांही रूपे सर्व वृत्तींचा लय करून समाधिस्थ झालेली दिसत आहेत.
130-11
एकें जनलीलाविलासें । एकें पालनशीलें लालसें । एकें संहारकें सावेशें । साक्षिभूतें एकें ॥130॥
कांही रूपे प्रजोत्पत्तिरूप लीला करीत आहेत, तर कांही रूपांचे ठिकाणी प्रजा पालनाची इच्छा दिसून येते. कांहींच्या ठिकाणी सर्व सृष्टीचा संहार करण्याचा आवेश दिसून येतो, तर कांही रूपे केवळ साक्षीरूपाने दिसत आहेत.


131-11
एवं नानाविधें परी बहुवसें । आणि दिव्यतेजप्रकाशें । तेवींचि एक{ए}का ऐसें । वर्णेंही नव्हे ॥131॥
अशा रितीने नानाप्रकारची अनंत रूपे दिसतात, तरी ती असंख्य आहेत आणि त्या सर्वांचे तेजही अपरिमित आहे. त्याचप्रमाणे त्या सर्व रूपांचे वर्णही एकसारखे नाहीत.
132-11
एकें तातलें साडेपंधरें । तैसीं कपिलवर्णें अपारें । एकें सर्वांगीं जैसें सेंदुरें । डवरलें नभ ॥132॥
तापलेल्या सोन्याप्रमाणे लालसर अशी काही रूपे अमर्याद आहेत व आकाशाला शेंदूर फासावा, त्याप्रमाणे काहींचे सर्वांग शेंदरी रंगाचे आहे.
133-11
एकें सावियाचि चुळुकीं । जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं । एकें अरुणोदयासारिखीं । कुंकुमवर्णें ॥133
माणिकांनी जडविलेल्या ब्रह्मांडाप्रमाणे कित्येक स्वाभाविकपणे सुंदर व चमकणारी आहेत. काही रूपे अरूणोदयासारखी कुंकुमवर्णाची आहेत.
134-11
एकें शुद्धस्फटिकसोज्वळें । एकें इंद्रनीळसुनीळें । एकें अंजनवर्णें सकाळें । रक्तवर्णें एकें ॥134॥
कित्येक शुध्द स्फटिकाप्रमाणे पांढरी आहेत. कित्येक नीलमण्यासारखी नीलवर्ण आहेत. कित्येक काजळासारखी काळीकुट्ट आहेत, तर कित्येक लाल रंगाची आहेत.
135-11
एकें लसत्कांचनसम पिंवळीं । एकें नवजलदश्यामळीं । एकें चांपेगौरीं केवळीं । हरितें एकें ॥135॥
कित्येक रूपे चमकणार्‍या सोन्यासारखी पिवळी, कित्येक नवमेघाप्रमाणे श्यामवर्ण, कित्येक चाफ्याच्या फुलासारखी गौरवर्ण आहेत व कित्येक केवळ हिरवी आहेत.


136-11
एकें तप्तताम्रतांबडीं । एकें श्वेतचंद्र चोखडीं । ऐसीं नानावर्णें रूपडीं । देखें माझीं ॥136॥
कित्येक पातविलेल्या तांब्याप्रमाणे तांबडी, तर कित्येक पांढर्‍या चंद्राप्रमाणे पांढरी आहेत. अशा प्रकारे नाना प्रकारच्या वर्णांची माझी रूपे पहा.
137-11
हे जैसे कां आनान वर्ण । तैसें आकृतींही अनारिसेपण । लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसीं सुंदरें एकें ॥137॥
हे जसे नानाप्रकारचे वर्ण आहेत, तसेच आकृतीतही नाना प्रकार आहेत. काही रूपे, अत्यंत सुंदर आहेत की, मदनही लाजेने शरण जाईल.
138-11
एकें अतिलावण्यसाकारें । एकें स्निग्धवपु मनोहरें । शृंगारश्रियेचीं भांडारें । उघडिली जैसीं ॥138॥
श्रृंगारसंपत्तीची भांडारे उघडल्याप्रमाणे, काही रूपे, अत्यंत सौंदर्य साकार व्हावे, अशी होती, तर काही मनोहर तुकतुकीत शरीराची होती.
139-11
एकें पीनावयवमांसाळें । एकें शुष्कें अति विक्राळें । एकें दीर्घकंठें विताळें । विकटें एकें ॥139॥
कित्येकांचे अवयव मांसल व पुष्ट आहेत, तर कित्येकांचे देह शुष्क रोड व अती विक्राळ दिसतात. कित्येक देह लांब मान व मोठी डोकी असलेले आहेत, तर कित्येक वाकड्या तिकड्या आकाराचे आहेत.
140-11
एवं नानाविधाकृती । इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती । ययांच्या एकेकीं अंगप्रांतीं । देख पां जग ॥140॥
या प्रकारे नानाप्रकारच्या आकृती पाहता, अर्जुना ! अंत सापडणार नाही आणि या एकएकाच्या अवयवावर एक एक जग दिसत आहे, पहा
पश्यादित्यान्वसून्रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा ।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥11. 6॥


141-11
जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी । पुढती निमीलनीं मिठीं । देत आहाती ॥141॥
ज्या विश्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी उघडल्या बरोबर सर्व बाराही आदित्यांची उत्पत्ती होते व लावल्याबरोबर त्यांचा लोप होतो.
142-11
वदनींचिया वाफेसवें । होत ज्वाळामय आघवें । जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचा ॥142॥
तोंडातून निघणार्‍या वाफेबरोबर सर्व ज्वालामयच होऊन जाते व त्यातच अग्नी इत्यादि सर्व वसूंचा समूह दिसू लागतो.
143-11
आणि भ्रूलतांचे शेवट । कोपें मिळों पाहतीं एकवट । तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखें ॥143॥
आणि जेथे क्रोधाने भृकुटींचे शेवट एकत्र होऊ पाहत आहेत, तेथे रुद्रगणांचा समूह उत्पन्न होत आहे, पहा.
144-11
पैं सौम्यतेचा बोलावा । मिती नेणिजे अश्विनौदेवां । श्रोत्रीं होती पांडवा । अनेक वायु ॥144॥
माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी, जेथे सौम्यपणाचा थोडा थंडावा दिसेल, तेथे असंख्य अश्विनौ देव उत्पन्न झालेले दिसतील आणि कानाच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न झालेले आहेत, पहा.
145-11
यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांचीं कुळें । ऐसीं अपारें आणि विशाळें । रूपें इयें पाहीं ॥145॥
याप्रमाणे एका एका माझ्या रूपाच्या या लीलेमध्ये अनेक देव, सिध्द यांची कुळे जन्माला येतात. अशी माझी ही अनंत व विशाल रूपे पहा.


146-11
जयांतें सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेंही आयुष्य थोडे धातयाही परी न सांपडे । ठाव जयांचा ॥146॥
ज्या विश्वरूपाचे वर्णन करता करता वेदाची बोबडी वळली, ज्याला पाहण्याकरितां काळाचे आयुष्य अपुरे पडते म्हणजे जेथे काळाचाही अंत होतो व ब्रह्मदेवालाही ज्याचा पत्ता लागत नाही,
147-11
जयांतें देवत्रयी कधीं नायके । तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें । भोगीं आश्चर्याची कवतिकें । महासिद्धी ॥147॥
ज्या स्वरूपाची गोष्ट तिन्ही वेदांना देखील ऐकायला कधी मिळत नाही, ती माझी रूपे तू आता प्रत्यक्ष पहा व आश्चर्याचे कौतुक किंवा आनंद हीच कोणी महासिध्दि, तिचे सुख भोग.
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्दृष्टुमिच्छसि॥11.7॥

148-11
इया मूर्तीचिया किरीटी । रोममूळीं देखें पां सृष्टी । सुरतरुतळवटीं । तृणांकुर जैसे ॥148॥
ज्याप्रमाणे कल्पतरूच्या बुडाशी गवताचे अंकुर वाढावे, त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या रोमरोमांच्या ठिकाणी तुला सृष्टी दिसेल, पहा.
149-11
चंडवाताचेनि प्रकाशें । उडत परमाणु दिसती जैसे । भ्रमत ब्रह्मकटाह तैसें । अवयवसंधीं ॥149॥
एखाद्या गवाक्षातून आलेल्या सूर्याच्या किरणांत परमाणू उडत असलेले दिसतात, त्याप्रमाणे माझ्या विश्वरूपाच्या अवयवसंधीत अनेक ब्रह्मांडे फिरत असलेली दिसतील.
150-11
एथ एकैकाचिया प्रदेशीं । विश्व देख विस्तारेंशी । आणि विश्वाही परौतें मानसीं । जरी देखावें वर्ते ॥150॥
येथे एका एका अवयवप्रदेशावर सर्व विस्तृत ब्रह्मांडरचना आहे, पहा ! आणि ब्रह्मांडाच्या पलीकडेही पाहण्याची जर इच्छा असेल,

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *