ज्ञानेश्वरी ११ वा अध्याय पारायण प्रत

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय ११ ॥
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अध्याय अकरावा ।
विश्वरूपदर्शनयोगः ।


आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं । येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥१॥
जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥२॥
अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशी वराडियां लुगडीं लेणीं । तैसे देशियेच्या सुखासनीं । मिरविले रस ॥३॥
परी शांताद्भुत बरवे । जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावें । जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा ॥४॥
ना तरी अंवसेच्या दिवशीं । भेटलीं बिंबें दोनी जैशीं । तेवीं एकवळा रसीं । केला एथ ॥५॥
मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग । म्हणौनि सुस्नात होत जग । आघवें एथ ॥६॥
माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त । यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा ॥७॥
एथ श्रवणाचेनि द्वारें । तीर्थीं रिघतां सोपारें । ज्ञानदेवो म्हणे दातारें । माझेनि केलें ॥८॥
तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मऱ्हाठियां शब्दसोपानें । रचिली धर्मनिधानें । श्रीनिवृत्तिदेवें ॥९॥
म्हणौनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें । येतुलेनि संसारासि द्यावें । तिळोदक ॥१०॥

हें असो ऐसें सावयव । एथ सासिन्नले आथी रसभाव । तेथ श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा ॥११॥
जेथ शांताद्भुत रोकडे । आणि येरां रसां पडप जोडे । हें अल्पचि परी उघडें । कैवल्य एथ ॥१२॥
तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो । परी अर्जुन सदैवांचा रावो । जो एथही पातला ॥१३॥
एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला । जे गीतार्थु हा आला । मऱ्हाठिये ॥१४॥
याचिलागीं माझें । विनविलें आइकिजे । तरी अवधान दीजे । सज्जनीं तुम्ही ॥१५॥
तेवींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करूं न लभे । परी मानावें जी तुम्ही लोभें । अपत्या मज ॥१६॥
अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय ॥१७॥
तेवीं मी जें जें बोलें । तें प्रभु तुमचेंचि शिकविलें । म्हणौनि अवधारिजो आपुलें । आपण देवा ॥१८॥
हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड । तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे ॥१९॥
मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल । तुमचेनि धर्में होईल । सुरवाडु जगा ॥२०॥


या बोला संत रिझले । म्हणती तोषलों गा भलें केलें । आतां सांगैं जें बोलिलें । अर्जुनें तेथ ॥२१॥
तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनांचें बोलणें । मी प्राकृत काय सांगों जाणें । परी सांगवा तुम्ही ॥२२॥
अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणें करविले लंकेश्वरा । एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ? ॥२३॥
म्हणौनि समर्थ जें जें करी । तें न हो न ये चराचरीं । तुम्ही संत तयापरी । बोलवा मातें ॥२४॥
आतां बोलिजतसें आइका । हा गीताभाव निका । जो वैकुंठनायका । मुखौनि निघाला ॥२५॥
बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदीं प्रतिपाद्य देवता । तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं ॥२६॥
तेथिंचे गौरव कैसें वानावें । जें श्रीशंभूचिये मती नागवे । तें आतां नमस्कारिजे जीवेंभावें । हेंचि भलें ॥२७॥
मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपीं दिठी । पहिली कैसी गोठी । करिता जाहला ॥२८॥
हें सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु । तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनांसी ॥२९॥
हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगतां सांकड । कां जें विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावें ? ॥३०॥


म्हणे मागां कवणीं कहीं । जें पढियंतेनें पुसिलें नाहीं । ते सहसा कैसें काई । सांगा म्हणों ? ॥३१॥
मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहूनी अंतरंगु । परी तेही हा प्रसंगु । बिहाली पुसों ॥३२॥
माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली ? । परी तोही हें बोली । करीचिना ॥३३॥
मी काय सनकादिकांहूनि जवळां । परी तयांही नागवेचि हा चाळा । मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचिया ऐसा ? ॥३४॥
तयांतेंही लेकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले । परी विश्वरूप हें राहविलें । न दावीच कवणा ॥३५॥
हा ठायवरी गुज । याचिये अंतरीचें हें निज । केवीं उराउरी मज । पुसों ये पां ? ॥३६॥
आणि न पुसेंचि जरी म्हणे । तरी विश्वरूप देखिलियाविणें । सुख नोहेचि परी जिणें । तेंही विपायें ॥३७॥
म्हणौनि आतां पुसों अळुमाळसें । मग करूं देवा आवडे तैसें । येणें प्रवर्तला साध्वसें । पार्थु बोलों ॥३८॥
परी तेंचि ऐसेनि भावें । जें एका दों उत्तरांसवें । दावी विश्वरूप आघवें । झाडा देउनी ॥३९॥
अहो वांसरूं देखिलियाचिसाठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी । मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा धरे ? ॥४०॥


पाहा पां तया पांडवाचेनि नांवें । जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धावे । तयांतें अर्जुनें जंव पुसावें । तंव साहील काई ? ॥४१॥
तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण । आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण । ऐसिये मिळवणी वेगळेपण । उरे हेंचि बहु ॥४२॥
म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरूप होईल आपैसा । तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजे तरी ॥४३॥
अर्जुन उवाच ।
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् ।
यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥१॥

मग पार्थु देवातें म्हणे । जी तुम्ही मजकारणें । वाच्य केलें जें न बोलणें । कृपानिधे ॥४४॥
जैं महाभूतें ब्रह्मीं आटती । जीव महदादींचे ठाव फिटती । तैं जें देव होऊनि ठाकती । तें विसवणें शेषींचें ॥४५॥
होतें हृदयाचिये परिवरीं । रोंविलें कृपणाचिये परी । शब्दब्रह्मासही चोरी । जयाची केली ॥४६॥
तें तुम्हीं आजि आपुलें । मजपुढां हियें फोडिलें । जया अध्यात्मा वोवाळिलें । ऐश्वर्य हरें ॥४७॥
ते वस्तु मज स्वामी । एकिहेळां दिधली तुम्ही । हें बोलों तरी आम्ही । तुज पावोनि कैंचे ॥४८॥
परी साचचि महामोहाचिये पुरीं । बुडालेया देखोनि सीसवरी । तुवां आपणपें घालोनि श्रीहरी । मग काढिलें मातें ॥४९॥
एक तूंवांचूनि कांहीं । विश्वीं दुजियाची भाष नाहीं । कीं आमुचें कर्म पाहीं । जे आम्हीं आथी म्हणों ॥५०॥
मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु । आणि कौरवांतें इयां स्वजनु । आपुलें म्हणें ॥५१॥
याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें कें रिगेन । ऐसें देखत होतों दुःस्वप्न । तों चेवविला प्रभु ॥५२॥
देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ॥५३॥
जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें । ऐसें वायां मरतया जीवाचें । श्रेय तुवां घेतलें ॥५४॥
आपुलें प्रतिबिंब नेणता । सिंह कुहां घालील देखोनि आतां । ऐसा धरिजे तेवीं अनंता । राखिलें मातें ॥५५॥
एऱ्हवीं माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारीं । जें आतांचि सातांही सागरीं । एकत्र मिळिजे ॥५६॥
हें जगचि आघवें बुडावें । वरी आकाशहि तुटोनि पडावें । परी झुंजणें न घडावें । गोत्रजेशीं मज ॥५७॥
ऐसिया अहंकाराचिये वाढी । मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी । चांगचि तूं जवळां एऱ्हवीं काढी । कवणु मातें ॥५८॥
नाथिलें आपण पां एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें । थोर पिसें होतें लागलें । परि राखिलें तुम्ही ॥५९॥
मागां जळत काढिलें जोहरीं । तैं तें देहासीच भय अवधारीं । आतां हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ॥६०॥


दुराग्रह हिरण्याक्षें । माझी बुद्धि वसुंधरा सूदली काखे । मग माहार्णव गवाक्षें । रिघोनि ठेला ॥६१॥
तेथ तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें । हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज ॥६२॥
ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें । परी पांचही पालव मोकलिले । मजप्रती ॥६३॥
तें कांहीं न वचेचि वायां । भलें यश फावलें देवराया । जे साद्यंत माया । निरसिली माझी ॥६४॥
आजीं आनंदसरोवरींचीं कमळें । तैसे हे तुझे डोळे । आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती ॥६५॥
हां हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी ? । केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेंसीं ? ॥६६॥
आणि मी तंव दातारा । ये कृपेचिये रिघोनि गाभारां । घेत आहें चारा । ब्रह्मरसाचा ॥६७॥
तेणें माझा जी मोह जाये । एथ विस्मो कांहीं आहे ? । तरी उद्धरलों कीं तुझे पाये । शिवतले आहाती ॥६८॥
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥२॥

पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा । मियां तुजपासोनि महेशा । परिसिलें आजीं ॥६९॥
इयें भूतें जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती । ते मजपुढां प्रकृती । विवंचिली देवें ॥७०॥


आणि प्रकृती कीर उगाणा दिधला । वरि पुरुषाचाही ठावो दाविला । जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेदु ॥७१॥
जी शब्दराशी वाढे जिये । कां धर्माऐशिया रत्नांतें विये । ते एथिंचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणौनि ॥७२॥
ऐसें अगाध माहात्म्य । जें सकळमार्गैकगम्य । जें स्वात्मानुभवरम्य । तें इयापरी दाविलें ॥७३॥
जैसा केरु फिटलिया आभाळीं । दिठी रिगे सूर्यमंडळीं । कां हातें सारूनि बाबुळीं । जळ देखिजे ॥७४॥
नातरी उकलतया सापाचे वेढे । जैसें चंदना खेंव देणें घडे । अथवा विवसी पळे मग चढे । निधान हातां ॥७५॥
तैसी प्रकृती हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती । मग परतत्त्व माझिये मती । शेजार केलें ॥७६॥
म्हणौनि इयेविषयींचा मज देवा । भरंवसा कीर जाहला जीवा । परी आणीक एक हेवा । उपनला असे ॥७७॥
तो भिडां जरी म्हणों राहों । तरी आना कवणा पुसों जावों । काय तुजवांचोनि ठावो । जाणत आहों आम्ही ? ॥७८॥
जळचरु जळाचा आभारु धरी । बाळक स्तनपानीं उपरोधु करी । तरी तया जिणया श्रीहरी । आन उपायो असे ? ॥७९॥
म्हणौनि भीड सांकडी न धरवे । जीवा आवडे तेंही तुजपुढां बोलावें । तंव राहें म्हणितलें देवें । चाड सांगैं ॥८०॥
एवमेतद्यथाऽऽत्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥३॥


मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्हीं केली जे गोठी । तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी ॥८१॥
आतां जयाचेनि संकल्पें । हे लोकपरंपरा होय हारपे । जया ठायातें आपणपें । मी ऐसें म्हणसी ॥८२॥
तें मुद्दल रूप तुझें । जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें । सुरकार्याचेनि व्याजें । घेवों घेवों येसी ॥८३॥
पैं जळशयनाचिया अवगणिया । कां मत्स्य कूर्म इया मिरवणिया । खेळु सरलिया तूं गुणिया । सांठविसी जेथ ॥८४॥
उपनिषदें जें गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती । जयातें सनकादिक आहाती । पोटाळुनियां ॥८५॥
ऐसें अगाध जें तुझें । विश्वरूप कानीं ऐकिजे । तें देखावया चित्त माझें । उतावीळ देवा ॥८६॥
देवें फेडूनियां सांकड । लोभें पुसिली जरी चाड । तरी हेंचि एकीं वाड । आर्तीं जी मज ॥८७॥
तुझें विश्वरूपपण आघवें । माझिये दिठीसि गोचर होआवें । ऐसी थोर आस जीवें । बांधोनि आहें ॥८८॥
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयाऽत्मानमव्ययम् ॥४॥

परी आणीक एक एथ शारङ्गी । तुज विश्वरूपातें देखावयालागीं । पैं योग्यता माझिया आंगीं । असे कीं नाहीं ॥८९॥
हें आपलें आपण मी नेणें । तें कां नेणसी जरी देव म्हणे । तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचें ? ॥९०॥


आणि जी आर्तीचेनि पडिभरें । आर्तु आपुली ठाकी पैं विसरे । जैसा तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ॥९१॥
ऐशा सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली । यालागीं योग्यता जेवीं माउली । बालकाची जाणे ॥९२॥
तयापरी श्रीजनार्दना । विचारिजो माझी संभावना । मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे ॥९३॥
तरी ऐसी ते कृपा करा । एऱ्हवीं नव्हे हें म्हणा अवधारा । वायां पंचमालापें बधिरा । सुख केउतें देणें ? ॥९४॥
एऱ्हवीं येकले बापियाचे तृषे । मेघ जगापुरतें काय न वर्षे ? । परी जहालीही वृष्टि उपखे । जऱ्ही खडकीं होय ॥९५॥
चकोरा चंद्रामृत फावलें । येरा आण वाहूनि काय वारिलें ? । परी डोळ्यांवीण पाहलें । वायां जाय ॥९६॥
म्हणौनि विश्वरूप तूं सहसा । दाविसी कीर हा भरवंसा । कां जे कडाडां आणि गहिंसा । माजी नीत्य नवा तूं कीं ॥९७॥
तुझें औदार्य जाणों स्वतंत्र । देतां न म्हणसी पात्रापात्र । पैं कैवल्या ऐसें पवित्र । जें वैरियांही दिधलें ॥९८॥
मोक्षु दुराराध्यु कीर होय । परी तोही आराधी तुझे पाय । म्हणौनि धाडिसी तेथ जाय । पाइकु जैसा ॥९९॥
तुवां सनकादिकांचेनि मानें । सायुज्यीं सौरसु दिधला पूतने । जे विषाचेनि स्तनपानें । मारूं आली ॥१००॥

हां गा राजसूय यागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वाक्य शब्दीं । निस्तेजिलासी ॥१०१॥
ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपें ठावो दिधला गोपाळा । आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदीं चाड ? ॥१०२॥
तो वना आला याचिलागीं । जे बैसावें पितयाचिया उत्संगीं । कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं । श्लाघ्यु केला ॥१०३॥
ऐसा वनवासिया सकळां । देतां एकचि तूं धसाळा । पुत्रा आळवितां अजामिळा । आपणपें देसी ॥१०४॥
जेणें उरीं हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा । अझुनी वैरियांचिया कलेवरा । विसंबसीना ॥१०५॥
ऐसा अपकारियां तुझा उपकारु । तूं अपात्रींही परी उदारु । दान म्हणौनि दारवंठेकरु । जाहलासी बळीचा ॥१०६॥
तूंतें आराधी ना आयकें । होती पुंसा बोलावित कौतुकें । तिये वैकुंठीं तुवां गणिके । सुरवाडु केला ॥१०७॥
ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें । आपणपें देवों लागसी वानिवसें । तो तूं कां अनारिसें । मजलागीं करिसी ॥१०८॥
हां गा दुभतयाचेनि पवाडें । जे जगाचें फेडी सांकडें । तिये कामधेनूचे पाडे । काय भुकेले ठाती ? ॥१०९॥
म्हणौनि मियां जें विनविलें कांहीं । तें देव न दाखविती हें कीर नाहीं । परी देखावयालागीं देईं । पात्रता मज ॥११०॥


तुझें विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे । तरी आर्तीचे डोहळे । पुरवीं देवा ॥१११॥
ऐसी ठायेंठावो विनंती । जंव करूं सरला सुभद्रापती । तंव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेचिना ॥११२॥
तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळां आला वर्षाकाळु । नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥११३॥
नातरी चंद्रबिंब वाटोळें । देखोनि क्षीरसागर उचंबळे । तैसा दुणेंही वरी प्रेमबळें । उल्लसितु जाहला ॥११४॥
मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें । गाजोनि म्हणितलें सकृपें । पार्था देख देख अमुपें । स्वरूपें माझीं ॥११५॥
एक विश्वरूप देखावें । ऐसा मनोरथु केला पांडवें । कीं विश्वरूपमय आघवें । करूनि घातलें ॥११६॥
बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु । असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुलें ॥११७॥
अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले । लक्ष्मीयेही राहविलें । जिव्हार जें ॥११८॥
तें आतां प्रकटुनी अनेकधा । करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा । बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया ॥११९॥
जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवीं स्वप्नींचें आघवें होये । तेवीं अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला ॥१२०॥


ते सहसा मुद्रा सोडिली । आणि स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली । किंबहुना उघडिली । योगऋद्धी ॥१२१॥
परी हा हें देखेल कीं नाहीं । ऐसी सेचि न करी कांहीं । एकसरां म्हणतसे पाहीं । स्नेहातुर ॥१२२॥
श्रीभगवानुवाच ।
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥५॥

अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें । आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें । आतां देखें आघवें भरिलें । माझ्याचि रूपीं ॥१२३॥
एकें कृशें एकें स्थूळें । एकें ऱ्हस्वें एकें विशाळें । पृथुतरें सरळें । अप्रांतें एकें ॥१२४॥
एकें अनावरें प्रांजळें । सव्यापारें एकें निश्चळें । उदासीनें स्नेहाळें । तीव्रें एकें ॥१२५॥
एके घूर्णितें सावधें । असलगें एकें अगाधें । एकें उदारें अतिबद्धें । क्रुद्धें एकें ॥१२६॥
एकें शांतें सन्मदें । स्तब्धें एकें सानंदें । गर्जितें निःशब्दें । सौम्यें एकें ॥१२७॥
एकें साभिलाषें विरक्तें । उन्निद्रितें एकें निद्रितें । परितुष्टें एकें आर्तें । प्रसन्नें एकें ॥१२८॥
एकें अशस्त्रें सशस्त्रें । एकें रौद्रें अतिमित्रें । भयानकें एकें पवित्रें । लयस्थें एकें ॥१२९॥
एकें जनलीलाविलासें । एकें पालनशीलें लालसें । एकें संहारकें सावेशें । साक्षिभूतें एकें ॥१३०॥


एवं नानाविधें परी बहुवसें । आणि दिव्यतेजप्रकाशें । तेवींचि एकएका ऐसें । वर्णेंही नव्हे ॥१३१॥
एकें तातलें साडेपंधरें । तैसीं कपिलवर्णें अपारें । एकें सर्वांगीं जैसें सेंदुरें । डवरलें नभ ॥१३२॥
एकें सावियाचि चुळुकीं । जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं । एकें अरुणोदयासारिखीं । कुंकुमवर्णें ॥१३३॥
एकें शुद्धस्फटिकसोज्वळें । एकें इंद्रनीळसुनीळें । एकें अंजनवर्णें सकाळें । रक्तवर्णें एकें ॥१३४॥
एकें लसत्कांचनसम पिंवळीं । एकें नवजलदश्यामळीं । एकें चांपेगौरीं केवळीं । हरितें एकें ॥१३५॥
एकें तप्तताम्रतांबडीं । एकें श्वेतचंद्र चोखडीं । ऐसीं नानावर्णें रूपडीं । देखें माझीं ॥१३६॥
हे जैसे कां आनान वर्ण । तैसें आकृतींही अनारिसेपण । लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसीं सुंदरें एकें ॥१३७॥
एकें अतिलावण्यसाकारें । एकें स्निग्धवपु मनोहरें । शृंगारश्रियेचीं भांडारें । उघडिली जैसीं ॥१३८॥
एकें पीनावयवमांसाळें । एकें शुष्कें अति विक्राळें । एकें दीर्घकंठें विताळें । विकटें एकें ॥१३९॥
एवं नानाविधाकृती । इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती । ययांच्या एकेकीं अंगप्रांतीं । देख पां जग ॥१४०॥
पश्यादित्यान्वसून्रुद्रान अश्विनौ मरुतस्तथा ।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥६॥


जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी । पुढती निमीलनीं मिठीं । देत आहाती ॥१४१॥
वदनींचिया वाफेसवें । होत ज्वाळामय आघवें । जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचा ॥१४२॥
आणि भ्रूलतांचे शेवट । कोपें मिळों पाहतीं एकवट । तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखें ॥१४३॥
पैं सौम्यतेचा बोलावा । मिती नेणिजे अश्विनौदेवां । श्रोत्रीं होती पांडवा । अनेक वायु ॥१४४॥
यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांचीं कुळें । ऐसीं अपारें आणि विशाळें । रूपें इयें पाहीं ॥१४५॥
जयांतें सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेंही आयुष्य थोकडें । धातयाही परी न सांपडे । ठाव जयांचा ॥१४६॥
जयांतें देवत्रयी कधीं नायके । तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें । भोगीं आश्चर्याची कवतिकें । महासिद्धी ॥१४७॥
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्दृष्टुमिच्छसि ॥७॥

इया मूर्तीचिया किरीटी । रोममूळीं देखें पां सृष्टी । सुरतरुतळवटीं । तृणांकुर जैसे ॥१४८॥
चंडवाताचेनि प्रकाशें । उडत परमाणु दिसती जैसे । भ्रमत ब्रह्मकटाह तैसें । अवयवसंधीं ॥१४९॥
एथ एकैकाचिया प्रदेशीं । विश्व देख विस्तारेंशी । आणि विश्वाही परौतें मानसीं । जरी देखावें वर्ते ॥१५०॥


तरी इयेही विषयींचें कांहीं । एथ सर्वथा सांकडें नाहीं । सुखें आवडे तें माझिया देहीं । देखसी तूं ॥१५१॥
ऐसें विश्वमूर्ती तेणें । बोलिलें कारुण्यपूर्णें । तंव देखत आहे कीं नाहीं न म्हणे । निवांतुचि येरु ॥१५२॥
एथ कां पां हा उगला ? । म्हणौनि श्रीकृष्णें जंव पाहिला । तंव आर्तीचें लेणें लेइला । तैसाचि आहे ॥१५३॥
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥८॥

मग म्हणें उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे । परी दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥१५४॥
हे बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणियातें म्हणितलें । आम्हीं विश्वरूप तरी दाविलें । परी न देखसीच तूं ॥१५५॥
यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें ? । तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ॥१५६॥
हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दॐ बैसा । बहिरियापुढें हृषीकेशा । गाणीव करा ॥१५७॥
मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा । वायां धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा ॥१५८॥
जें अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटलें । तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखें ॥१५९॥
परी हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें । एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥१६०॥


साच विश्वरूप जरी आम्ही दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें । परी बोलत बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ॥१६१॥
काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेलु विलया जाइजे । तरी आतां माझें निजरूप देखिजे । तें दृष्टी देवों तुज ॥१६२॥
मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥१६३॥
ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोक आद्यें । बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥१६४॥
संजय उवाच ।
एवमुक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरिः ।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥९॥

पैं कौरवकुलचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती । जे श्रियेहूनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी ? ॥१६५॥
ना तरी खुणेचें वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं । ना सेवकपण तरी आंगीं । शेषाच्याचि आथी ॥१६६॥
हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पहार योगी जैसे । अनुसरलें गरुडाऐसें । कवण आहे ? ॥१६७॥
परी तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें । जिये दिवूनि जन्मले । पांडव हे ॥१६८॥
परी पांचांही आंतु अर्जुना । श्रीकृष्ण सावियाचि जाहला अधीना । कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे ॥१६९॥
पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले । कैसें दैव एथें सुरवाडलें । तें जाणों न ये ॥१७०॥


आजि हें परब्रह्म सगळें । भोगावया सदैव याचेचि डोळे । कैसे वाचेनि हन लळे । पाळीत असे ॥१७१॥
हा कोपे कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये । नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ॥१७२॥
एऱ्हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचें ॥१७३॥
हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेले पार्थाआधीन । यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ॥१७४॥
तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथें कौरवेशा । श्रीकृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥१७५॥
म्हणौनि तो देवांचा रावो । म्हणे पार्थाते तुज दृष्टि देवों । जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तूं ॥१७६॥
ऐसी श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंव एकसरें । तंव अविद्येचे आंधारें । जावोंचि लागे ॥१७७॥
तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका । अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया श्रीकृष्णें ॥१७८॥
मग दिव्यचक्षुप्रकाशु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी फांटा फुटला । ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुलें ॥१७९॥
हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ । विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥१८०॥


जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे । आपणपें श्रीवैकुंठें । दाविलें तया ॥१८१॥
मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एक वेळ खादली होती माती । तैं कोपोनियां हातीं । यशोदां धरिला ॥१८२॥
मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाडा द्यावयाचेनि मिसें । चवदाही भुवनें सावकाशें । दाविलीं तिये ॥१८३॥
ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें । आणि वेदांचियेही मतीं ठेलें । तें लागला बोलों ॥१८४॥
तैसा अनुग्रहो पैं राया । श्रीहरी केला धनंजया । आतां कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणेंचि तो ॥१८५॥
एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें । तया चमत्काराचें एकार्णव जाहलें । चित्त समाजीं बुडोनि ठेलें । विस्मयाचिया ॥१८६॥
जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पव्हे मार्कंडेय एकाकीं । तैसा विश्वरूप कौतुकीं । पार्थु लोळे ॥१८७॥
म्हणे केवढें गगन एथ होतें । तें कवणें नेलें पां केउतें । तीं चराचर महाभूतें । काय जाहलीं ? ॥१८८॥
दिशांचे ठावही हारपले । आधोर्ध्व काय नेणों जाहले । चेइलिया स्वप्न तैसे गेले । लोकाकार ॥१८९॥
नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपे । तैसीं गिळिलीं विश्वरूपें । प्रपंचरचना ॥१९०॥


तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपें न सांवरें । इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥१९१॥
तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें । टकासी टक लागले । जैसें मोहनास्त्र घातलें । विचारजातां ॥१९२॥
तैसा विस्मितु पाहे कोडें । तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें । तेंचि नानारूप चहूंकडे । मांडोनि ठेलें ॥१९३॥
जैसें वर्षाकाळींचे मेघौडे । कां महाप्रळयींचें तेज वाढे । तैसें आपणावीण कवणीकडे । नेदीचि उरों ॥१९४॥
प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन । सवेचि उघडी लोचन । तंव विश्वरूप देखें ॥१९५॥
इहींचि दोहीं डोळां । पाहावें विश्वरूपा सकळा । तो श्रीकृष्णें सोहळा । पुरविला ऐसा ॥१९६॥
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥१०॥

मग तेथ सैंघ देखे वदनें । जैसी रमानायकाचीं राजभुवनें । नाना प्रगटलीं निधानें । लावण्यश्रियेचीं ॥१९७॥
कीं आनंदाची वनें सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली । तैसीं मनोहरें देखिलीं । हरीचीं वक्त्रें ॥१९८॥
तयांही माजीं एकैकें । सावियाचि भयानकें । काळरात्रीचीं कटकें । उठवलीं जैसीं ॥१९९॥
कीं मृत्यूसीचि मुखें जाहलीं । हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं । कीं महाकुंडें उघडलीं । प्रळयानळाचीं ॥२००॥


तैसीं अद्भुतें भयासुरें । तेथ वदनें देखिलीं वीरें । आणिकें असाधारणें साळंकारें । सौम्यें बहुतें ॥२०१॥
पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें । परी वदनांचा शेवटु न टके । मग लोचन तें कवतिकें । लागला पाहों ॥२०२॥
तंव नानावर्णें कमळवनें । विकासिलीं तैसे अर्जुनें । डोळे देखिले पालिंगनें । आदित्यांचीं ॥२०३॥
तेथेंचि कृष्णमेघांचिया दाटी । माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी । तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळीं ॥२०४॥
हें एकैक आश्चर्य पाहतां । तिये एकेचि रूपीं पंडुसुता । दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ॥२०५॥
मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट कें दोर्दंडें । ऐसी वाढविताहे कोडें । चाड देखावयाची ॥२०६॥
तेथ भाग्यनिधि पार्था । कां विफलत्व होईल मनोरथा । काय पिनाकपाणीचिया भातां । वायकांडीं आहाती ? ॥२०७॥
ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे ? । म्हणौनि साद्यंतपण अपारांचे । देखिलें तेणें ॥२०८॥
जयाची सोय वेदां नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे । अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले ॥२०९॥
चरणौनि मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी । जे नाना रत्न अळंकारीं । मिरवत असे ॥२१०॥


परब्रह्म आपुलेनि आंगें । ल्यावया आपणचि जाहला अनेगें । तियें लेणीं मी सांगें । काइसयासारिखीं ॥२११॥
जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा । जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्व प्रगटे ॥२१२॥
तो दिव्यतेज शृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु । देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु । देखत असे ॥२१३॥
मग तेथेंचि ज्ञानाचिया डोळां । पहात करपल्लवां जंव सरळा । तंव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा । तैसीं शस्त्रें झळकत देखे ॥२१४॥
आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हतियार । आपण जीव आपण शरीर । देखें चराचर कोंदलें देवें ॥२१५॥
जयाचिया किरणांचे निखरपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे । तेजें खिरडला वन्हि म्हणे । समुद्रीं रिघों ॥२१६॥
मग कालकूटकल्लोळीं कवळिलें । नाना महाविजूंचें दांग उमटलें । तैसे अपार कर देखिले । उदितायुधीं ॥२१७॥
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥११॥

कीं भेणें तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी । तंव सुरतरूची सृष्टी । जयांपासोनि कां जाहली ॥२१८॥
जिये महासिद्धींचीं मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे । तैसीं कुसुमें अति चोखटें । तुरंबिलीं देखिलीं ॥२१९॥
मुगुटावरी स्तबक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक । कंठीं रुळताति अलौकिक । माळादंड ॥२२०॥


स्वर्गें सूर्यतेज वेढिलें । जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें । तैसें नितंबावरी गाढिलें । पीतांबरु झळके ॥२२१॥
श्रीमहादेवो कापुरें उटिला । कां कैलासु पारजें डवरिला । नाना क्षीरोदकें पांघरविला । क्षीरार्णवो जैसा ॥२२२॥
जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवीं बुंथी घेवविली । तैसीं चंदनपिंजरी देखिली । सर्वांगीं तेणें ॥२२३॥
जेणें स्वप्रकाशा कांतीं चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे । जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे । वेदवतीये ॥२२४॥
जयाचे निर्लेप अनुलेपु करी । जे अनंगुही सर्वांगीं धरी । तया सुगंधाची थोरी । कवण वानी ? ॥२२५॥
ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसें क्षोभा । तेवींचि देवो बैसला कीं उभा । का शयालु हें नेणवें ॥२२६॥
बाहेर दिठी उघडोनि पाहे । तंव आघवें मूर्तिमय देखत आहे । मग आतां न पाहें म्हणौनि उगा राहे । तरी आंतुही तैसेंचि ॥२२७॥
अनावरें मुखें समोर देखे । तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके । तंव तयाहीकडे श्रीमुखें । करचरण तैसेचि ॥२२८॥
अहो पाहतां कीर प्रतिभासे । एथ नवलावो काय असे ? । परि न पाहतांही दिसे । चोज आइका ॥२२९॥
कैसें अनुग्रहाचें करणें । पार्थाचें पाहणें आणि न पाहणें । तयाही सकट नारायणें । व्यापूनि घेतलें ॥२३०॥


म्हणौनि आश्चर्याच्या पुरीं एकीं । पडिला ठायेठाव थडीं ठाकी । तंव चमत्काराचिया आणिकीं । महार्णवीं पडे ॥२३१॥
तैसा अर्जुनु असाधारणें । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें । कवळूनि घेतला तेणें । अनंतरूपें ॥२३२॥
तो विश्वतोमुख स्वभावें । आणि तेचि दावावयालागीं पांडवें । प्रार्थिला आतां आघवें । होऊनि ठेला ॥२३३॥
आणि दीपें कां सूर्यें प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे । तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें । दिधली आहे ॥२३४॥
म्हणौनि किरीटीसि दोहीं परी । तें देखणें देखें अंधारी । हें संजयो हस्तिनापुरीं । सांगतसे राया ॥२३५॥
म्हणे किंबहुना अवधारिलें । पार्थें विश्वरूप देखिलें । नाना आभरणीं भरलें । विश्वतोमुख ॥२३६॥
दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥१२॥

तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसया ऐसा सांगावा । कल्पांतीं एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥२३७॥
तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती कां एकेचि अवसरीं । तऱ्ही तया तेजाची थोरी । उपमूं नये ॥२३८॥
आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे । तेवींचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ॥२३९॥
तऱ्ही तिये अंगप्रभेचेनि पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें । आणि तया ऐसें कीर चोखडें । त्रिशुद्धी नोहे ॥२४०॥


ऐसें महात्म्य या श्रीहरीचें सहज । फांकतसे सर्वांगीचें तेज । तें मुनिकृपा जी मज । दृष्ट जाहलें ॥२४१॥
तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् प्रविभक्तमनेकधा ॥
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा ॥१३॥

आणि तिये विश्वरूपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें । जैसे महोदधीमाजीं बुडबुडे । सिनानें दिसती ॥२४२॥
कां आकाशीं गंधर्वनगर । भूतळीं पिपीलिका बांधे घर । नाना मेरुवरी सपूर । परमाणु बैसले ॥२४३॥
विश्व आघवेंचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं । अर्जुन तिये अवसरीं । देखता जाहला ॥२४४॥
ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः ।
प्रणम्य शिरसा देवं कृताज़्जलिरभाषत ॥१४॥

तेथ एक विश्व एक आपण । ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण । तेंही आटोनि गेलें अंतःकरण । विरालें सहसा ॥२४५॥
आंतु आनंदा चेइरें जाहलें । बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें । आपाद पां गुंतलें । पुलकांचलें ॥२४६॥
वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलांचें सर्वांग जैसें । विरूढे कोमलांकुरीं तैसे । रोमांच जाहले ॥२४७॥
शिवतला चंद्रकरीं । सोमकांतु द्रावो धरी । तैसिया स्वेदकणिका शरीरीं । दाटलिया ॥२४८॥
माजीं सापडलेनि अलिकुळें । जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे । तेवीं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥२४९॥
कर्पूरकर्दळीचीं गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें । पुलिका गळती तेवीं थेंबुटें । नेत्रौनि पडती ॥२५०॥


उदयलेनि सुधाकरें । जैसा भरलाचि समुद्र भरे । तैसा वेळोवेळां उर्मिभरें । उचंबळत असे ॥२५१॥
ऐसा सात्त्विकांही आठां भावां । परस्परें वर्ततसे हेवा । तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली ॥२५२॥
तैसाचि तया सुखानुभवापाठीं । केला द्वैताचा सांभाळु दिठी । मग उसासौनि किरीटी । वास पाहिली ॥२५३॥
तेथ बैसला होता जिया सवा । तियाचिया कडे मस्तक खालविला देवा । जोडूनि करसंपुट बरवा । बोलतु असे ॥२५४॥
अर्जुन उवाच ।
पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान ॥
ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींश्चसर्वानुरगांश्च दिव्यान ॥१५॥

म्हणे जयजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्हीं । जें हें विश्वरूप कीं आम्हीं । प्राकृत देखों ॥२५५॥
परि साचचि भलें केलें गोसाविया । मज परितोषु जाहला साविया । जी देखलासि जो इया । सृष्टीसी तूं आश्रयो ॥२५६॥
देवा मंदराचेनि अंगलगें । ठायीं ठायीं श्वापदांचीं दांगें । तैसीं इयें तुझ्या देहीं अनेगें । देखतसें भुवनें ॥२५७॥
अहो आकाशचिये खोळे । दिसती ग्रहगणांचीं कुळें । कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीचीं ॥२५८॥
तयापरी श्रीहरी । तुझिया विश्वात्मकीं इये शरीरीं । स्वर्गु देखतसें अवधारीं । सुरगणेंसीं ॥२५९॥
प्रभु महाभूतांचें पंचक । येथ देखत आहे अनेक । आणि भूतग्राम एकेक । भूतसृष्टीचें ॥२६०॥


जी सत्यलोकु तुजमाजीं आहे । देखिला चतुराननु हा नोहे ? । आणि येरीकडे जंव पाहें । तंव कैलासुही दिसे ॥२६१॥
श्रीमहादेव भवानियेशीं । तुझ्या दिसतसे एके अंशीं । आणि तूंतेंही गा हृषीकेशी । तुजमाजीं देखे ॥२६२॥
पैं कश्यपादि ऋषिकुळें । इयें तुझिया स्वरूपीं सकळें । देखतसें पाताळें । पन्नगेंशीं ॥२६३॥
किंबहुना त्रैलोक्यपती । तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती । इयें चतुर्दशभुवनें चित्राकृती । अंकुरलीं जाणों ॥२६४॥
आणि तेथिंचे जे जे लोक । ते चित्ररचना जी अनेक । ऐसें देखतसे अलोकिक । गांभीर्य तुझें ॥२६५॥
अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनंतरूपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् ॥१६॥

त्या दिव्यचक्षूंचेनि पैसें । चहुंकडे जंव पाहात असें । तंव दोर्दंडीं कां जैसें । आकाश कोंभैलें ॥२६६॥
तैसे एकचि निरंतर । देवा देखत असें तुझे कर । करीत आघवेचि व्यापार । एकेचि काळीं ॥२६७॥
मग महाशून्याचेनि पैसारें । उघडलीं ब्रह्मकटाहाचीं भांडारें । तैसीं देखतसें अपारें । उदरें तुझीं ॥२६८॥
जी सहस्रशीर्षयाचें देखिलें । कोडीवरी होताति एकीवेळें । कीं परब्रह्मचि वदनफळें । मोडोनि आलें ॥२६९॥
तैसीं वक्त्रें जी जेउतीं तेउतीं । तुझीं देखितसे विश्वमूर्ती । आणि तयाचिपरी नेत्रपंक्ती । अनेका सैंघ ॥२७०॥


हें असो स्वर्ग पाताळ । कीं भूमी दिशा अंतराळ । हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसें ॥२७१॥
हें तुजवीण एकादियाकडे । परमाणूहि एतुला कोडें । अवकाशु पाहतसें परि न सांपडे । ऐसें व्यापिलें तुवां ॥२७२॥
इये नानापरी अपरिमितें । जेतुलीं साठविलीं होतीं महाभूतें । तेतुलाहि पवाडु तुवां अनंतें । कोंदला देखतसें ॥२७३॥
ऐसा कवणें ठायाहूनि तूं आलासी । एथ बैसलासि कीं उभा आहासि । आणि कवणिये मायेचिये पोटीं होतासी । तुझें ठाण केवढें ॥२७४॥
तुझें रूप वय कैसें । तुजपैलीकडे काय असे । तूं काइसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां ॥२७५॥
तंव देखिलें जी आघवेंचि । तरि आतां तुज ठावो तूंचि । तूं कवणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता ॥२७६॥
तूं उभा ना बैठा । दिघडु ना खुजटा । तुज तळीं वरी वैकुंठा । तूंचि आहासी ॥२७७॥
तूं रूपें आपणयांचि ऐसा । देवा तुझी तूंचि वयसा । पाठीं पोट परेशा । तुझें तूं गा ॥२७८॥
किंबहुना आतां । तुझें तूंचि आघवें अनंता । हें पुढत पुढती पाहतां । देखिलें मियां ॥२७९॥
परि या तुझिया रूपाआंतु । जी उणीव एक असे देखतु । जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाहीं ॥२८०॥


एऱ्हवीं गिंवसिलें आघवां ठायीं । परि सोय न लाहेचि कहीं । म्हणौनि त्रिशुद्धी हे नाहीं । तिन्ही एथ ॥२८१॥
एवं आदिमध्यांतरहिता । तूं विश्वेश्वरा अपरिमिता । देखिलासि जी तत्त्वतां । विश्वरूपा ॥२८२॥
तुज महामूर्तीचिया आंगी । उमटलिया पृथक मूर्ती अनेगी । लेइलासी वानेपरींची आंगीं । ऐसा आवडतु आहासी ॥२८३॥
नाना पृथक मूर्ती तिया द्रुमवल्ली । तुझिया स्वरूपमहाचळीं । दिव्यालंकार फुलीं फळीं । सासिन्नलिया ॥२८४॥
हो कां जे महोदधीं तूं देवा । जाहलासि तरंगमूर्ती हेलावा । कीं तूं एक वृक्षु बरवा । मूर्तिफळीं फळलासी ॥२८५॥
जी भूतीं भूतळ मांडिलें । जैसें नक्षत्रीं गगन गुढलें । तैसें मूर्तिमय भरलें । देखतसें तुझें रूप ॥२८६॥
जी एकेकीच्या अंगप्रांतीं । होय जाय हें त्रिजगती । एवढियाही तुझ्या आंगीं मूर्ती । कीं रोमा जालिया ॥२८७॥
ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा । तूं कवण पां एथ कोणाचा । हें पाहिलें तंव आमुचा । सारथी तोचि तूं ॥२८८॥
तरी मज पाहतां मुकुंदा । तूं ऐसाचि व्यापकु सर्वदा । मग भक्तानुग्रहें तया मुग्धा । रूपातें धरिसी ॥२८९॥
कैसें चहूं भुजांचें सांवळें । पाहतां वोल्हावती मन डोळे । खेंव देऊं जाइजे तरी आकळे । दोहींचि बाहीं ॥२९०॥


ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा । कीं अमुचियाचि दिठी सलेपा । जें सामान्यत्वें देखिती ॥२९१॥
तरी आतां दिठीचा विटाळु गेला । तुवां सहजें दिव्यचक्षू केला । म्हणौनि यथारूपें देखवला । महिमा तुझा ॥२९२॥
परी मकरतुंडामागिलेकडे । तोचि होतासि तूं एवढें । रूप जाहलासि हें फुडें । वोळखिलें मियां ॥२९३॥
किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥१७॥

नोहे तोचि हा शिरीं ? । मुकुट लेइलासि श्रीहरी । परी आतांचें तेज आणि थोरी । नवल कीं बहु हें ॥२९४॥
तेंचि हें वरिलियेचि हातीं । चक्र परिजितया आयती । सांवरितासि विश्वमूर्ती । ते न मोडे खूण ॥२९५॥
येरीकडे तेचि हे नोहे गदा । आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा । वागोरे सांवरावया गोविंदा । संसरिलिया ॥२९६॥
आणि तेणेंचि वेगें सहसा । माझिया मनोरथासरिसा । जाहलासि विश्वरूपा विश्वेशा । म्हणौनि जाणें ॥२९७॥
परी कायसें बा हें चोज । विस्मयो करावयाहि पाडू नाहीं मज । चित्त होऊनि जातसें निर्बुज । आश्चर्यें येणें ॥२९८॥
हें एथ आथि कां येथ नाहीं । ऐसें श्वसोंही नये कांहीं । नवल अंगप्रभेची नवाई । कैसी कोंदलीं सैंघ ॥२९९॥
एथ अग्नीचीही दिठी करपत । सूर्य खद्योतु तैसा हारपत । ऐसें तीव्रपण अद्भुत । तेजाचें यया ॥३००॥


हो कां महातेजाचिया महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टी आघवी । कीं युगांतविजूंच्या पालवीं । झांकलें गगन ॥३०१॥
नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचू बांधला अंतराळां । आतां दिव्य ज्ञानाचिया डोळां । पाहवेना ॥३०२॥
उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदाहसु । पडत दिव्यचक्षुंसही त्रासु । न्याहाळितां ॥३०३॥
हो कां जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळाग्निरुद्राचिया ठायीं गूढु । तो तृतीयनयनाचा मढू । फुटला जैसा ॥३०४॥
तैसें पसरलेनि प्रकाशें । सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे । पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ॥३०५॥
ऐसा अद्भुत तेजोराशी । जन्मा नवल म्यां देखिलासी । नाहीं व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये ॥३०६॥
त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥१८॥

देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर । श्रुती जयाचें घर । गिंवसीत आहाती ॥३०७॥
जें आकाराचें आयतन । जें विश्वनिक्षेपैकनिधान । तें अव्यय तूं गहन । अविनाश जी ॥३०८॥
तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं नित्य नवा । जाणें मी सदतिसावा । पुरुष विशेष तूं ॥३०९॥
अनादिमध्यान्तमनन्तवीर्यं अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥१९॥

तूं आदिमध्यांतरहितु । स्वसामर्थ्यें तूं अनंतु । विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तूं ॥३१०॥


पैं चंद्र चंडांशु डोळां । दावितासि कोपप्रसाद लीळा । एकां रुससी तमाचिया डोळां । एकां पाळितोसि कृपादृष्टी ॥३११॥
जी एवंविधा तूंतें । मी देखतसें हें निरुतें । पेटलें प्रळयाग्नीचें उजितें । तैसें वक्त्र हें तुझें ॥३१२॥
वणिवेनि पेटले पर्वत । कवळूनि ज्वाळांचे उभड उठत । तैसी चाटीत दाढा दांत । जीभ लोळे ॥३१३॥
इये वदनींचिया उबा । आणि जी सर्वांगकांतीचिया प्रभा । विश्व तातलें अति क्षोभा । जात आहे ॥३१४॥
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।
दृष्ट्वाऽद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन ॥२०॥

कां जे द्यौर्लोक आणि पाताळ । पृथिवी आणि अंतराळ । अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र ॥३१५॥
हें आघवेंचि तुंवा एकें । भरलें देखत आहे कौतुकें । परि गगनाहीसकट भयानकें । आप्लविजे जेवीं ॥३१६॥
नातरी अद्भुतरसाचिया कल्लोळीं । जाहली चवदाही भुवनांसि कडियाळीं । तैसें आश्चर्यचि मग मी आकळीं । काय एक ? ॥३१७॥
नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहवे रूपाचें उग्रपण । सुख दूरी गेलें परि प्राण । विपायें धरीजे ॥३१८॥
देवा ऐसें देखोनि तूंतें । नेणों कैसें आलें भयाचें भरितें । आतां दुःखकल्लोळीं झळंबतें । तिन्हीं भुवनें ॥३१९॥
एऱ्हवीं तुज महात्मयाचें देखणें । तरि भयदुःखासि कां मेळवणें ? । परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें । तें जाणवत आहे मज ॥३२०॥


जंव तुझें रूप नोहे दिठें । तंव जगासि संसारिक गोमटें । आतां देखिलासि तरी विषयविटें । उपनला त्रासु ॥३२१॥
तेवींचि तुज देखिलियासाठीं । काय सहसा तुज देवों येईल मिठी । आणि नेदीं तरी शोकसंकटीं । राहों केवीं ? ॥३२२॥
म्हणौनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु । आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥३२३॥
ऐसा माझारलिया सांकडां । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा । हा ध्वनि जी फुडा । चोजवला मज ॥३२४॥
जैसा आरंबळला आगीं । तो समुद्रा ये निवावयालागीं । तंव कल्लोळपाणियाचिया तरंगीं । आगळा बिहे ॥३२५॥
तैसें या जगासि जाहलें । तूंतें देखोनि तळमळित ठेलें । यामाजीं पैल भले । ज्ञानशूरांचे मेळावे ॥३२६॥
अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः स्तुवन्ति त्वां सुतिभिः पुष्कलाभिः ॥२१॥

हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें । मिळत तुज आंतु सहजें । सद्भावेसीं ॥३२७॥
आणिक एक सावियाचि भयभीरु । सर्वस्वें धरूनि तुझी मोहरु । तुज प्रार्थिताति करु । जोडोनियां ॥३२८॥
देवा अविद्यार्णवीं पडिलों । जी विषयवागुरें आंतुडलों । स्वर्गसंसाराचिया सांकडलों । दोहीं भागीं ॥३२९॥
ऐसें आमुचें सोडवणें । तुजवांचोनि कीजेल कवणें ? । तुज शरण गा सर्वप्राणें । म्हणत देवा ॥३३०॥


आणि महर्षी अथवा सिद्ध । कां विद्याधरसमूह विविध । हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ॥३३१॥
रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोश्मपाश्च ।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥२२॥

हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे । अश्विनौ देव विश्वेदेव विभवें । वायुही हे जी ॥३३२॥
अवधारा पितर हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व । जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक ॥३३३॥
हे आघवेचि आपुलालिया लोकीं । सोत्कंठित अवलोकीं । हे महामूर्ती दैविकी । पाहात आहाती ॥३३४॥
मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं । करित निजमुकटीं वोवाळणी । प्रभुजी तुज ॥३३५॥
ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे । ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥३३६॥
तिये विनयद्रुमाचिये आरवीं । सुरवाडली सात्त्विकांची माधवी । म्हणौनि करसंपुटपल्लवीं । तूं होतासि फळ ॥३३७॥
रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम् ।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाऽहम् ॥२३॥

जी लोचनां भाग्य उदेलें । मना सुखाचें सुयाणें पाहलें । जे अगाध तुझें देखिलें । विश्वरूप इहीं ॥३३८॥
हें लोकत्रयव्यापक रूपडें । पाहतां देवांही वचक पडे । याचें सन्मुखपण जोडें । भलतयाकडुनी ॥३३९॥
ऐसें एकचि परी विचित्रें । आणि भयानकें वक्त्रें । बहुलोचन हे सशस्त्रें । अनंतभुजा ॥३४०॥


अनंत चारु बाहु चरण । बहूदर आणि नानावर्ण । कैसें प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचें ॥३४१॥
हो कां महाकल्पाचिया अंतीं । तवकलेनि यमें जेउततेउतीं । प्रळयाग्नीचीं उजितीं । आंबुखिलीं जैसीं ॥३४२॥
नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें । कीं प्रळयभैरवाचीं क्षेत्रें । नाना युगांतशक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोढविलीं ॥३४३॥
तैसीं जियेतियेकडे । तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें । न समाती दरीमाजीं सिंव्हाडे । तैसे दशन दिसती रागीट ॥३४४॥
जैसें काळरात्रीचेनि अंधारें । उल्हासत निघतीं संहारखेंचरें । तैसिया वदनीं प्रळयरुधिरें । काटलिया दाढा ॥३४५॥
हें असो काळें अवंतिलें रण । कां सर्व संहारें मातलें मरण । तैसें अतिभिंगुळवाणेंपण । वदनीं तुझिये ॥३४६॥
हे बापुडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी । आणि दुःखकालिंदीचिया तटीं । झाड होऊनि ठेली ॥३४७॥
तुज महामृत्यूचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्य जीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ॥३४८॥
एथ कोपोनि जरी वैकुंठें । ऐसें हन म्हणिपैल अवचटें । जें तुज लोकांचें काई वाटे ? । तूं ध्यानसुख हें भोगीं ॥३४९॥
तरी जी लोकांचें कीर साधारण । वायां आड सूतसे वोडण । केवीं सहसा म्हणे प्राण । माझेचि कांपती ॥३५०॥


ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे । तो मी एथें अहाळबाहळीं कांपें । ऐसें तुवां केलें ॥३५१॥
परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी । हे भ्यासुरपणें हारी । भयासि आणी ॥३५२॥
नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥२४॥

ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें । तैसी कितीएकें मुखें रागिटें । इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें ॥३५३॥
गगनाचेंनि वाडपणें नाकळे । त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे । ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे ॥३५४॥
तेवींचि एकसारिखें एक नोहे । एथ वर्णावर्णाचा भेदु आहे । हो कां जें प्रळयीं सावावो लाहे । वन्हं ययाचा ॥३५५॥
जयाचिये आंगींची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य कीजे राखोंडी । कीं तयाही तोंडें आणि तोंडीं । दांत दाढा ॥३५६॥
कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं पडिला । विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥३५७॥
हळाहळ आगी पियालें । नवल मरण मारा प्रवर्तलें । तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ॥३५८॥
परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटलिया अंतराळ । आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें ॥३५९॥
नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं । तैं उघडले हाटकेश्वरीं । जेवीं पाताळकुहर ॥३६०॥


तैसा वक्त्रांचा विकाशु । माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु । विश्व न पुरे म्हणौनि घांसु । न भरीचि कोंडें ॥३६१॥
आणि पाताळव्याळांचिया फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरीं । तैसी पसरलिये वदनदरी । माजीं हे जिव्हा ॥३६२॥
काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें । जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे । तैसे आवाळुवांवरी आंकडे । धगधगीत दाढांचे ॥३६३॥
आणि ललाटपटाचिये खोळे । कैसें भयातें भेडविताती डोळे । हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले ॥३६४॥
ऐसें वाऊनि भयाचें भोज । एथ काय निपजवूं पाहातोसि काज । तें नेणों परी मज । मरणभय आलें ॥३६५॥
देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलों प्रतिफळें । बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥३६६॥
अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । परि आतां चैतन्य माझें विपायें । वांचे कीं न वांचे ॥३६७॥
एऱ्हवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळें तरी मन तापे । अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥३६८॥
परी येतुलियाही वेगळा । जो केवळ आनंदैककळा । तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ॥३६९॥
बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे ॥३७०॥


देवा तुझ्या ये दर्शनीं । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं । तें सावरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ॥३७१॥
तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें । हें असो परि मज भलें आतुडविलें । उपदेशा इया ॥३७२॥
जीव विसंवावयाचिया चाडा । सैंघ धांवाधांवी करितसे बापुडा । परि सोयही कवणेंकडां । न लभे एथ ॥३७३॥
ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहें चराचरीं । जी न बोलें तरि काय करीं । कैसेनि राहें ? ॥३७४॥
दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि ।
दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥२५॥

पैं अखंड डोळ्यांपुढें । फुटलें जैसें महाभयाचें भांडें । तैशीं तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखें ॥३७५॥
असो दांत दाढांची दाटी । न झांकवे मा दों दों वोठीं । सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥३७६॥
जैसें तक्षका विष भरलें । हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें । कीं आग्नेयास्त्र परजिलें । वज्राग्नि जैसें ॥३७७॥
तैशीं तुझीं वक्त्रें प्रचंडें । वरि आवेश हा बाहेरी वोसंडे । आले मरणरसाचे लोंढे । आम्हांवरी ॥३७८॥
संहारसमयींचा चंडानिळु । आणि महाकल्पांत प्रळयानळु । या दोहीं जैं होय मेळु । तैं काय एक न जळे ? ॥३७९॥
तैसीं संहारकें तुझीं मुखें । देखोनि धीरु कां आम्हां पारुखे ? । आतां भुललों मी दिशा न देखें । आपणपें नेणें ॥३८०॥


मोटकें विश्वरूप डोळां देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें । आतां जापाणीं जापाणीं आपुलें । अस्ताव्यस्त हें ॥३८१॥
ऐसें करिसी म्हणौनि जरी जाणें । तरी हे गोष्टी सांगावीं कां मी म्हणें । आतां एक वेळ वांचवी जी प्राणें । या स्वरूपप्रळयापासोनि ॥३८२॥
जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरी सुईं वोडण माझिया जीविता । सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा ॥३८३॥
आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्व वसतें । तें विसरलासी हें उपरतें । संहारूं आदरिलें ॥३८४॥
म्हणौनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया । काढीं मातें महाभया । पासोनियां ॥३८५॥
हा ठायवरी पुढतपुढतीं । तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती । ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलों ॥३८६॥
जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा । जो मी काळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं ॥३८७॥
परी तया आंतुल नव्हे हें देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा । तुवां आमुचाचि घोटू भरावा । या सकळ विश्वेंसीं ॥३८८॥
कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूंचि मिनलासि काळु । बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥३८९॥
अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिलें शांत करितां । कटाकटा विश्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं ॥३९०॥


हें नव्हे मा रोकडें । सैंघ पसरूनियां तोंडें । कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ॥३९१॥
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथाऽसौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥२६॥

नोहेति ? हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर । हे गेले गेले सहपरिवार । तुझिया वदनीं ॥३९२॥
आणि जे जे यांचेनि सावायें । आले देशोदेशींचे राये । तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटित आहासी ॥३९३॥
मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां । आरणीं हन थाटा । देतासि मिठी ॥३९४॥
जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर । मुखाआंत भार । हारपताति मा ॥३९५॥
कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्वातें गिळी । तियें कोटीवरी सगळीं । गिळितासि शस्त्रें ॥३९६॥
चतुरंगा परिवारा । संजोडियां रहंवरां । दांत न लाविसी मा परमेश्वरा । कसा तुष्टलासि बरवा ॥३९७॥
हां गा भीष्माऐसा कवणु । सत्यशौर्यनिपुणु । तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ॥३९८॥
अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु । आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखें ॥३९९॥
कटकटा धातया । कैसें जाहलें अनुग्रहा यया । मियां प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिलें मरण ॥४००॥


मागां थोडिया बहुवा उपपत्ती । येणें सांगितलिया विभूती । तैसा नसेचि मा पुढती । बैसलों पुसों ॥४०१॥
म्हणौनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धिही होणारासारिखी ठाके । माझ्या कपाळीं पिटावें लोकें । तें लोटेल कांह्यां ॥४०२॥
पूर्वीं अमृतही हातां आलें । परी देव नसतीचि उगले । मग काळकूट उठविलें । शेवटीं जैसें ॥४०३॥
परी तें एकबगीं थोडें । केलिया प्रतिकारामाजिवडें । आणि तिये अवसरीचें तें सांकडें । निस्तरविलें शंभू ॥४०४॥
आतां हा जळतां वारा कें वेंटाळे ? । कोणा हे विषा भरलें गगन गिळे ? । महाकाळेंसि कें खेळें ? । आंगवत असे ॥४०५॥
ऐसा अर्जुन दुःखें शिणतु । शोचित असे जिवाआंतु । परी न देखें तो प्रस्तुतु । अभिप्राय देवाचा ॥४०६॥
जे मी मारिता हे कौरव मरते । ऐसेनि वेंटाळिला होता मोहें बहुतें । तो फेडावयालागीं अनंतें । हें दाखविलें निज ॥४०७॥
अरे कोण्ही कोणातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारीं । हें विश्वरूपव्याजें हरी । प्रकटित असे ॥४०८॥
परी वायांचि व्याकुलता । ते न चोजवेचि पंडुसुता । मग अहा कंपु नव्हता । वाढवित असे ॥४०९॥
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥२७॥

तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेंसि दोन्ही दळें । वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं ॥४१०॥


कां महाकल्पाचिया शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी । तैं एकविसांही स्वर्गां मिठी । पाताळासकट दे ॥४११॥
नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें । जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती ॥४१२॥
तैसीं सासिन्नलीं सैन्यें एकवटें । इये मुखीं जाहलीं प्रविष्टें । परी एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा ॥४१३॥
अशोकाचे अंगवसे । चघळिले कऱ्हेनि जैसे । लोक वक्त्रामाजीं तैसे । वायां गेले ॥४१४॥
परि सिसाळें मुकुटेंसीं । पडिली दाढांचे सांडसीं । पीठ होत कैसीं । दिसत आहाती ॥४१५॥
तियें रत्नें दांतांचिये सवडीं । कूट लागलें जिभेच्या बुडीं । कांहीं कांहीं आगरडीं । द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥४१६॥
हो कां जे विश्वरूपें काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें । परि जीवित्व देहींचीं सिसाळें । अवश्य कीं राखिलीं ॥४१७॥
तैसीं शरीरामाजीं चोखडीं । इयें उत्तमांगें होतीं फुडीं । म्हणौनि महाकाळाचियाही तोंडीं । परि उरलीं शेखीं ॥४१८॥
मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहरचि नाहीं । जग आपैसेंचि वदनडोहीं । संचारताहे ॥४१९॥
यया आपेंआप आघविया सृष्टी । लागलिया आहाति वदनाच्या वाटीं । आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥४२०॥


ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजीं धांवत । येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनीं ॥४२१॥
आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित । परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि कांहीं ॥४२२॥
यथा नदीनाम् बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥२८॥

जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग । तैसें आघवाचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं ॥४२३॥
आयुष्यपंथें प्राणिगणी । करोनि अहोरात्रांची मोवणी । वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती ॥४२४॥
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।
तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥२९॥

जळतया गिरीच्या गवखा । माजीं घापती पतंगाचिया झाका । तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडती ॥४२५॥
परि जेतुलें येथ प्रवेशलें । तें तातलिया लोहें पाणीचि पां गिळिलें । वहवटींहि पुसिलें । नामरूप तयांचें ॥४२६॥
लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः ।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥३०॥

आणि येतुलाही आरोगण । करितां भुके नाहीं उणेपण । कैसें दीपन असाधारण । उदयलें यया ॥४२७॥
जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणगा दुकाळु पाहला । तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवें चाटितां ॥४२८॥
तैसें आहाराचे नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं । कैसी समसमीत नवाई । भुकेलेपणाची ॥४२९॥
काय सागराचा घोंटु भरावा ? । कीं पर्वताचा घांसु करावा ? । ब्रह्मकटाहो घालावा । आघवाचि दाढे ॥४३०॥


दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि घ्याविया । ऐसें वर्तत आहे साविया । लोलुप्य बा तुझें ॥४३१॥
जैसा भोगीं कामु वाढे । कां इंधनें आगीसि हाकाक चढे । तैसी खातखातांचि तोंडें । खाखांतें ठेलीं ॥४३२॥
कैसें एकचि केवढें पसरलें । त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें । जैसें कां कवीठ घातलें । वडवानळीं ॥४३३॥
ऐसीं अपार वदनें । आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें । कां आहारु न मिळतां येणें मानें । वाढविलीं सैंघ ॥४३४॥
अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा । जैसी वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ॥४३५॥
आतां तैसें यां विश्वा जाहालें । देव नव्हे हें कर्म आलें । कां जग चळचळां पांगिलें । काळजाळें ॥४३६॥
आतां इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें । हीं वक्त्रें नोहेती जोहारें । वोडवलीं जगा ॥४३७॥
आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणे । परी जया लागे तया प्राणें । सुटिकाची नाहीं ॥४३८॥
नातरी माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें । कां आपुलियां मारा नेणें । विष जैसें ॥४३९॥
तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं । परी ऐलीकडिले मुखीं खाई । हो सरली जगाची ॥४४०॥


अगा आत्मा तूं एकु । सकळ विश्वव्यापकु । तरी कां आम्हां अंतकु । तैसा वोडवलासी ? ॥४४१॥
तरी मियां सांडिली जीवित्वाची चाड । आणि तुवांही न धरावी भीड । मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें ॥४४२॥
किती वाढविसी या उग्ररूपा । आंगींचें भगवंतपण आठवीं बापा । नाहीं तरी कृपा । मजपुरती पाही ॥४४३॥
आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद ।
विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥३१॥

तरी एक वेळ वेदवेद्या । जी त्रिभुवनैक आद्या । विनवणी विश्ववंद्या । आइकें माझी ॥४४४॥
ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिलें शिरें । मग म्हणें तरी सर्वेश्वरें । अवधारिजो ॥४४५॥
मियां होआवया समाधान । जी पुसिलें विश्वरूपध्यान । आणि एकेंचि काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥४४६॥
तरी तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं । आघवियाचि करीं परिजिलीं । शस्त्रें कांह्या ॥४४७॥
जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें । कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥४४८॥
एथ कृतांतेंसि देवा । कासया किजतसे हेवा । हा आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज ॥४४९॥
या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु । आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसी ॥४५०॥
श्रीभगवानुवाच ।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥३२॥


तरी मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें ॥४५१॥
एथ अर्जुन म्हणे कटकटा । उबगिलों मागिल्या संकटा । म्हणौनि आळविला तंव वोखटा । उवाइला हा ॥४५२॥
तेवींचि कठिण बोलें आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी । म्हणौनि सवेंचि म्हणे किरीटी । परि आन एक असे ॥४५३॥
तरी आतांचिये संहारवाहरे । तुम्हीं पांडव असा बाहिरे । तेथ जातजातां धनुर्धरें । सांवरिले प्राण ॥४५४॥
होता मरणमहामारीं गेला । तो मागुता सावधु जाहला । मग लागला बोला । चित्त देऊं ॥४५५॥
ऐसें म्हणिजत आहे देवें । अर्जुना तुम्ही माझें हें जाणावें । येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं ॥४५६॥
वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसें जग हें माझिया तोंडीं । तुवां देखिलें जें ॥४५७॥
तरी तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं । इये वायांचि सैन्यें पाहीं । बरवतें आहाती ॥४५८॥
ऐसा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा । वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥४५९॥
हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें । यमावरी गजदळें । वाखाणिजताती ॥४६०॥


म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं । आणि जगाचा भरूं । घोंटु यया ॥४६१॥
पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरी जाळूं । कां बाणवरी खिळूं । वारयातें ॥४६२॥
बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट । मारकपणें काळकूट । महुर म्हणत ॥४६३॥
तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळें । अगा चित्रीव फळें । वीर हे देखें ॥४६४॥
हां गा मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला । इया शृंगारूनियां खाला । मांडिलिया पैं ॥४६५॥
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन ॥३३॥

येर चेष्टवितें जें बळ । तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ । आतां कोल्हारिचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥४६६॥
हालविती दोरी तुटली । तरी तियें खांबावरील बाहुलीं । भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती ॥४६७॥
तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळू न लगेल पैं गा । म्हणौनि उठीं उठीं वेगां । शाहाणा होईं ॥४६८॥
तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें । मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागाविलें ॥४६९॥
आतां हें त्याहूनि निपटारें जहालें । निवटीं आयितें रण पडिलें । घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें ॥४७०॥


आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे । तूं निमित्तमात्रचि होयें । सव्यसाची ॥४७१॥
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णां तथान्यानपि योधवीरान ।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान ॥३४॥

द्रोणाचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं । कैसेनि कर्णावरी । परजूं हें न म्हण ॥४७२॥
कोण उपायो जयद्रथा कीजे । हें न चिंतूं चित्त तुझें । आणिकही आथि जे जे । नावाणिगे वीर ॥४७३॥
तेही एक एक आघवें । चित्रींचे सिंहाडे मानावे । जैसे वोलेनि हातें घ्यावें । पुसोनियां ॥४७४॥
यावरी पांडवा । काइसा युद्धाचा मेळावा ? । हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां ॥४७५॥
जेव्हां तुवां देखिले । हे माझिया वदनीं पडिले । तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें ॥४७६॥
म्हणौनि वहिला उठीं । मियां मारिले तूं निवटीं । न रिगे शोकसंकटीं । नाथिलिया ॥४७७॥
आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे । तैसें देखें गा तुझें । निमित्त आहे ॥४७८॥
बापा विरुद्ध जें जाहलें । तें उपजतांचि वाघें नेलें । आतां राज्येंशीं संचलें । यश तूं भोगीं ॥४७९॥
सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद । ते वधिले विशद । सायासु न लागतां ॥४८०॥


ऐसिया इया गोष्टी । विश्वाच्या वाक्पटीं । लिहूनि घाली किरीटी । जगामाजीं ॥४८१॥
संजय उवाच ।
एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ॥
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥३५॥

ऐसी आघवीचि हे कथा । तया अपूर्ण मनोरथा । संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे ॥४८२॥
मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ । तैशी वाचा विशाळ । बोलतां तया ॥४८३॥
नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे । कां घुमघुमिला मंदराचळें । क्षीराब्धी जैसा ॥४८४॥
तैसें गंभीरें महानादें । हें वाक्य विश्वकंदें । बोलिलें अगाधें । अनंतरूपें ॥४८५॥
तें अर्जुनें मोटकें ऐकिलें । आणि सुख कीं भय दुणावलें । हें नेणों परि कांपिन्नलें । सर्वांग तयाचें ॥४८६॥
सखोलपणें वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । वेळोवेळां ललाट । चरणीं ठेवी ॥४८७॥
तेवींचि कांहीं बोलों जाये । तंव गळा बुजालाचि ठाये । हें सुख कीं भय होये । हें विचारा तुम्हीं ॥४८८॥
परि तेव्हां देवाचेनि बोलें । अर्जुना हें ऐसें जाहलें । मियां पदांवरूनि देखिलें । श्लोकींचिया ॥४८९॥
मग तैसाचि भेणभेण । पुढती जोहारूनि चरण । मग म्हणे जी आपण । ऐसें बोलिलेती ॥४९०॥
अर्जुन उवाच ।
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ॥
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ॥३६॥


ना तरी अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु । हा बोलु तुझा कीर अढळु । मानूं आम्ही ॥४९१॥
परि तुवां जी काळें । आजि स्थितीचिये वेळे । ग्रासिजे हें न मिळे । विचारासी ॥४९२॥
कैसेनि आंगींचें तारुण्य काढावें ? । कैचें नव्हे तें वार्धक्य आणावें ? । म्हणौनि करूं म्हणसी तें नव्हे । बहुतकरुनी ॥४९३॥
हां जी चौपाहारी न भरतां । कोणेही वेळे श्रीअनंता । काय माध्यान्हीं सविता । मावळतु आहे ? ॥४९४॥
पैं तुज अखंडिता काळा । तिन्ही आहाती जी वेळा । त्या तिन्ही परी सबळा । आपुलालिया समयीं ॥४९५॥
जे वेळीं हों लागे उत्पत्ती । ते वेळीं स्थिति प्रळयो हारपती । आणि स्थितिकाळीं न मिरविती । उत्पत्ति प्रळयो ॥४९६॥
पाठीं प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे । हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें ॥४९७॥
म्हणौनि आजि तंव भरें भोगें । स्थिति वर्तिजत आहे जगें । एथ ग्रसिसी तूं हें न लगे । माझ्या जीवीं ॥४९८॥
तंव संकेतें देव बोले । अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरलें । तें प्रत्यक्षचि तुज दाविलें । येर यथाकाळें जाण ॥४९९॥
हा संकेतु जंव अनंता । वेळु लागला बोलतां । तंव अर्जुनें लोकु मागुता । देखिला यथास्थिति ॥५००॥


मग म्हणतसे देवा । तूं सूत्रीं विश्वलाघवा । जग आला मा आघवा । पूर्वस्थिति पुढती ॥५०१॥
परी पडिलिया दुःखसागरीं । तूं काढिसी कां जयापरी । ते कीर्ति तुझी श्रीहरी । आठवित असे ॥५०२॥
कीर्ति आठवितां वेळोवेळां । भोगितसें महासुखाचा सोहळा । तेथ हर्षामृतकल्लोळा । वरी लोळत आहें ॥५०३॥
देवा जियालेपणें जग । धरी तुझ्या ठायीं अनुराग । आणि दुष्टां तयां भंग । अधिकाधिक ॥५०४॥
पैं त्रिभुवनींचिया राक्षसां । महाभय तूं हृषीकेशा । म्हणौनि पळताती दाही दिशां । पैलीकडे ॥५०५॥
येथ सुर नर सिद्ध किन्नर । किंबहुना चराचर । ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती ॥५०६॥
कस्माच्च ते न नमेरन्महात्मन गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥३७॥

एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि चरणा । पळते जाहले ॥५०७॥
आणि हें काय तूंतें पुसावें । येतुलें आम्हांसिही जाणवे । तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ? ॥५०८॥
जी तूं प्रकाशाचा आगरु । आणि जाहला आम्हासि गोचरू । म्हणौनिया निशाचरां केरु । फिटला सहजें ॥५०९॥
हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा । आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ॥५१०॥


जेथूनि नाना सृष्टींचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली । तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥५११॥
देवो निःसीम तत्त्व सदोदितु । देवो निःसीम गुण अनंतु । देवो निःसीम साम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥५१२॥
जी तूं त्रिजगतिये वोलावा । अक्षर तूं सदाशिवा । तूंचि सदसत देवा । तयाही अतीत तें तूं ॥५१३॥
त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥३८॥

तूं प्रकृतिपुरुषांचिया आदी । जी महत्तत्वां तूंचि अवधी । स्वयें तूं अनादि । पुरातनु ॥५१४॥
तूं सकळ विश्वजीवन । जीवांसि तूंचि निधान । भूतभविष्याचें ज्ञान । तुझ्याचि हातीं ॥५१५॥
जी श्रुतीचियां लोचनां । स्वरूपसुख तूंचि अभिन्ना । त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तूं ॥५१६॥
म्हणौनि जी परम । तूंतें म्हणिजे महाधाम । कल्पांतीं महद्ब्रह्म । तुजमाजीं रिगे ॥५१७॥
किंबहुना तुवां देवें । विश्व विस्तारिलें आहे आघवें । तरि अनंतरूपा वानावें । कवणें तूंतें ॥५१८॥
वायुर्यमोग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।
नमो नमस्तेऽस्तुसहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥३९॥

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥४०॥

जी काय एक तूं नव्हसी । कवणे ठायीं नससी । हें असो जैसा आहासी । तैसिया नमो ॥५१९॥
वायु तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि तो तूं ॥५२०॥


वरुण तूं सोम । स्रष्टा तूं ब्रह्म । पितामहाचाही परम । आदि जनक तूं ॥५२१॥
आणिकही जें जें कांहीं । रूप आथि अथवा नाहीं । तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा ॥५२२॥
ऐसें सानुरागें चित्तें । नमन केलें पंडुसुतें । मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥५२३॥
पाठीं तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥५२४॥
पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥५२५॥
इये चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयांतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥५२६॥
ऐसीं रूपें तियें अद्भुतें । आश्चर्यें स्फुरती अनंतें । तंव तंव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ॥५२७॥
आणिक स्तुतिही नाठवे । आणि निवांतुही न बैसवे । नेणें कैसा प्रेमभावें । गाजोंचि लागे ॥५२८॥
किंबहुना इयापरी । नमन केलें सहस्रवरी । कीं पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो ॥५२९॥
देवासि पाठी पोट आथि कीं नाहीं । येणें उपयोगु आम्हां काई । तरि तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी ॥५३०॥


उभा माझिये पाठीसीं । म्हणौनि पाठीमोरें म्हणावें तुम्हांसी । सन्मुख विन्मुख जगेंसीं । न घडें तुज ॥५३१॥
आतां वेगळालिया अवयवां । नेणें रूप करूं देवा । म्हणौनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका ॥५३२॥
जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो अमित विक्रमा । सकळकाळीं समा । सर्वरूपा ॥५३३॥
आघविया आकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे । तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व ॥५३४॥
किंबहुना केवळ । सर्व हें तूंचि निखिळ । परी क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे ॥५३५॥
म्हणौनिया देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां । हें आलें मज सद्भावा । आतां तूंचि सर्व ॥५३६॥
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥४१॥

परि ऐसिया तूतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही । म्हणौनि सोयरे संबंधधर्मीं । राहाटलों तुजसीं ॥५३७॥
अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें । वारिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें ॥५३८॥
परिसाचा खडवाचि जोडला । कीं फोडोनि आम्ही गाडोरा घातला । कल्पतरू तोडोनि केला । कूंप शेता ॥५३९॥
चिंतामणीची खाणी लागली । तेणें करें वोढाळें वोल्हांडिली । तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणें ॥५४०॥


हें आजिचेंचि पाहें पां रोकडें । कवण झुंज हें केवढें । एथ परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी ॥५४१॥
यया कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा । ऐसा वणिजेसाठीं जागेश्वरा । विकलासि आम्हीं ॥५४२॥
तूं योगियांचें समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख । उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं ॥५४३॥
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥४२॥

तूं या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदीं । तेथें सोयरीकीचिया संबंधीं । रळीं बोलों ॥५४४॥
विपायें राउळा येवों । तरि तुझेनि अंगें मानु पावों । न मानिसी तरी जावों । रुसोनि सलगी ॥५४५॥
पायां लागोनि बुझावणी । तुझ्या ठायीं शारङ्गपाणी । पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्हीं ॥५४६॥
सजणपणाचिया वाटा । तुजपुढें बैसें उफराटा । हा पाडु काय वैकुंठा ? । परि चुकलों आम्हीं ॥५४७॥
देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडा झोंबीलोंबी करूं । सारी खेळतां आविष्करूं । निकरेंही भांडों ॥५४८॥
चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि सांगों । तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही ॥५४९॥
ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये । जी नेणतांचि कीं पाये । शिवतिले तुझे ॥५५०॥


देवो बोनयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी । परी माझा निसुग गर्व अवधारीं । जे फुगूनचि बैसें ॥५५१॥
देवाचिया भोगायतनीं । खेळतां आशंकेना मनीं । जी रिगोनियां शयनीं । सरिसा पहुडें ॥५५२॥
‘ कृष्ण म्हणौनि हाकारिजे । यादवपणें तूंतें लेखिजे । आपली आण घालिजे । जातां तुज ॥५५३॥
मज एकासनीं बैसणें । कां तुझा बोलु न मानणें । हें वोतटीचेनि दाटपणें । बहुत घडलें ॥५५४॥
म्हणौनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता । मी राशि आहें समस्तां । अपराधांचि ॥५५५॥
यालागीं पुढां अथवा पाठीं । जियें राहटलों बहुवें वोखटीं । तियें मायेचिया परी पोटीं । सामावीं प्रभो ॥५५६॥
जी कोण्ही एके वेळे । सरिता घेऊन येती खडुळें । तियें सामाविजेति सिंधुजळें । आन उपायो नाहीं ॥५५७॥
तैसी प्रीती कां प्रमादें । देवेंसीं मज विरुद्धें । बोलविलीं तियें मुकुंदें । उपसाहावीं जी ॥५५८॥
आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा । आधारु जाली आहे या भूतग्रामा । म्हणौनि जी पुरुषोत्तमा । विनवूं तें थोडें ॥५५९॥
तरी आतां अप्रमेया । मज शरणागता आपुलिया । क्षमा कीजो जी यया । अपराधांसि ॥५६०॥


पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान ।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः ॥४३॥

जी जाणितलें मियां साचें । महिमान आतां देवाचें । जे देवो होय चराचराचें । जन्मस्थान ॥५६१॥
हरिहरादि समस्तां । देवा तूं परम देवता । वेदांतेंही पढविता । आदिगुरु तूं ॥५६२॥
गंभीर तूं श्रीरामा । नाना भूतैकसमा । सकळगुणीं अप्रतिमा । अद्वितीया ॥५६३॥
तुजसी नाहीं सरिसें । हें प्रतिपादनचि कायसें ? । तुवां जालेनि आकाशें । सामाविलें जग ॥५६४॥
तया तुझेनि पाडें दुजें । ऐसें बोलतांचि लाजिजे । तेथ अधिकाची कीजे । गोठी केवीं ॥५६५॥
म्हणौनि त्रिभुवनीं तूं एकु । तुजसरिखा ना अधिकु । तुझा महिमा अलौकिकु । नेणिजे वानूं ॥५६६॥
तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥४४॥

ऐसें अर्जुनें म्हणितलें । मग पुढती दंडवत घातलें । तेथें सात्त्विकाचें आलें । भरतें तया ॥५६७॥
मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद । काढी जी अपराध । समुद्रौनि मातें ॥५६८॥
तुज विश्वसुहृदातें कहीं । सोयरेपणें न मनूंचि पाहीं । तुज विईश्वेश्वराचिया ठायीं । ऐश्वर्य केलें ॥५६९॥
तूं वर्णनीय परी लोभें । मातें वर्णिसी पां सभे । तरि मियां वल्गिजे क्षोभें । अधिकाधिक ॥५७०॥


आतां ऐसिया अपराधां । मर्यादा नाहीं मुकुंदा । म्हणौनि रक्ष रक्ष प्रमादा । पासोनियां ॥५७१॥
जी हेंचि विनवावयालागीं । कैंची योग्यता माझिया आंगीं । परी अपत्य जैसें सलगी । बापेंसीं बोले ॥५७२॥
पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध । तरी पिता साहे निर्द्वंद्व । तैसें साहिजो जी ॥५७३॥
सख्याचें उद्धत । सखा साहे निवांत । तैसें तुवां समस्त । साहिजो जी ॥५७४॥
प्रियाचिया ठायीं सन्मान । प्रिय न पाहें सर्वथा जाण । तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो जी ॥५७५॥
नातरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जियें संकटें । तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं ॥५७६॥
कां उखितें आंगें जीवें । आपणपें दिधलें जिया मनोभावें । तिया कांतु मिनलिया न राहवें । हृदय जेवीं ॥५७७॥
तयापरी जी मियां । हें विनविलें तुमतें गोसाविया । आणि कांहीं एक म्हणावया । कारण असे ॥५७८॥
अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास ॥४५॥

तरी देवेंसीं सलगी केली । जे विश्वरूपाची आळी घेतली । ते मायबापें पुरविली । स्नेहाळाचेनि ॥५७९॥
सुरतरूंची झाडें । आंगणीं लावावीं कोडें । देयावें कामधेनुचें पाडें । खेळावया ॥५८०॥


मियां नक्षत्रीं डाव पाडावा । चंद्र चेंडुवालागीं आणावा । हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवां ॥५८१॥
जिया अमृतलेशालागीं सायास । तयाचा पाऊस केला चारी मास । पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणी पेरिले ॥५८२॥
ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्हीं । दाविलें जें हरब्रह्मीं । नायकिजे कानीं ॥५८३॥
मा देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाहीं भेटी । ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली ॥५८४॥
जी कल्पादीलागोनि । आजिची घडी धरुनी । माझीं जेतुलीं होउनी । गेलीं जन्में ॥५८५॥
तयां आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु । परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥५८६॥
बुद्धीचें जाणणें । कहीं न वचेचि याचेनि आंगणें । हे सादही अंतःकरणें । करवेचिना ॥५८७॥
तेथा डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी । किंबहुना पूर्वीं । दृष्ट ना श्रुत ॥५८८॥
तें हें विश्वरूप आपुलें । तुम्हीं मज डोळां दाविलें । तरी माझें मन झालें । हृष्ट देवा ॥५८९॥
परि आतां ऐसी चाड जीवीं । जे तुजसीं गोठी करावी । जवळीक हे भोगावी । आलिंगावासी ॥५९०॥


ते याचि रूपीं करूं म्हणिजे । तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे । आणि कवणा खेंव देईजे । तुज लेख नाहीं ॥५९१॥
म्हणौनि वारियासवें धावणें । न ठके गगना खेंव देणें । जळकेली खेळणें । समुद्रीं केउतें ? ॥५९२॥
यालागीं जी देवा । एथिंचें भय उपजतसे जीवा । म्हणौनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हें आतां ॥५९३॥
पैं चराचर विनोदें पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे । तैसें चतुर्भुज रूप तुझें । तो विसांवा आम्हां ॥५९४॥
आम्हीं योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें । शास्त्रांतें आलोडावें । परि सिद्धांतु तो हाचि ॥५९५॥
आम्हीं यजनें किजती सकळें । परि तियें फळावीं येणेंचि फळें । तीर्थें होतु सकळें । याचिलागीं ॥५९६॥
आणीकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्हीं कीजे । तया फळीं फळ तुझें । चतुर्भुज रूप ॥५९७॥
ऐसी तेथिंची जीवा आवडी । म्हणौनि तेंचि देखावया लवडसवडी । वर्तत असे ते सांकडी । फेडीजे वेगीं ॥५९८॥
अगा जीवींचें जाणतेया । सकळ विश्ववसवितेया । प्रसन्न होईं पूजितया । देवांचिया देवा ॥५९९॥
किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥४६॥

कैसें नीलोत्पलातें रांवित । आकाशाही रंगु लावित । तेजाची वोज दावित । इंद्रनीळा ॥६००॥


जैसा परिमळ जाहला मरगजा । कां आनंदासि निघालिया भुजा । ज्याचे जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव ॥६०१॥
मस्तकीं मुकुटातें ठेविलें । कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें । शृंगारा लेणें लाधलें । आंगाचेनि जया ॥६०२॥
इंद्रधनुष्याचिये आडणी । माजीं मेघ गगनरंगणीं । तैसें आवरिलें शारङ्गपाणी । वैजयंतिया ॥६०३॥
आतां कवणी ते उदार गदा । असुरां देत कैवल्य पदा । कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे ॥६०४॥
किंबहुना स्वामी । तें देखावया उत्कंठित पां मी । म्हणौनि आतां तुम्हीं । तैसया होआवें ॥६०५॥
हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे । आतां होताति आंधले । कृष्णमूर्तीलागीं ॥६०६॥
तें साकार कृष्णरूपडें । वांचूनि पाहों नावडे । तें न देखतां थोडें । मानिताती हे ॥६०७॥
आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं । श्रीमूर्तीवांचूनि नाहीं । म्हणौनि तैसाचि साकारु होईं । हें सांवरीं आतां ॥६०८॥
श्रीभगवानुवाच ।
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् ।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥४७॥

या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला । म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ॥६०९॥
कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी । मा भेणें काय नेणों बोलसी । हेकाडु ऐसा ॥६१०॥


आम्हीं सावियाचि जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिवरी म्हणें देणें । वांचोनि जीव असे वेंचणें । कवणासि गा ॥६११॥
तें हें तुझिये चाडे । आजि जिवाचेंचि दळवाडें । कामऊनियां येवढें । रचिलें ध्यान ॥६१२॥
ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी । म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥६१३॥
तें हें अपारां अपार । स्वरूप माझें परात्पर । एथूनि ते अवतार । कृष्णादिक ॥६१४॥
हें ज्ञानतेजाचें निखिळ । विश्वात्मक केवळ । अनंत हे अढळ । आद्य सकळां ॥६१५॥
हें तुजवांचोनि अर्जुना । पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना । जे जोगें नव्हे साधना । म्हणौनियां ॥६१६॥
न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।
एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥४८॥

याची सोय पातले । आणि वेदीं मौनचि घेतलें । याज्ञिकी माघौते आले । स्वर्गौनियां ॥६१७॥
साधकीं देखिला आयासु । म्हणौनि वाळिला योगाभ्यासु । आणि अध्ययनें सौरसु । नाहीं एथ ॥६१८॥
सीगेचीं सत्कर्मे । धाविन्नलीं संभ्रमें । तिहीं बहुतेकीं श्रमें । सत्यलोकु ठाकिला ॥६१९॥
तपीं ऐश्वर्य देखिलें । आणि उग्रपण उभयांचि सांडिलें । एक तपसाधन जें ठेलें । अपारांतरें ॥६२०॥


तें हें तुवां अनायासें । विश्वरूप देखिलें जैसें । इये मनुष्यलोकीं तैसें । न फवेचि कवणा ॥६२१॥
आजि ध्यानसंपत्तीलागीं । तूंचि एकु आथिला जगीं । हें परम भाग्य आंगीं । विरंचीही नाहीं ॥६२२॥
मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् ।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥४९॥

म्हणौनि विश्वरूपलाभें श्लाघ । एथिचें भय नेघ नेघ । हें वांचूनि अन्य चांग । न मनीं कांहीं ॥६२३॥
हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला । मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजैल म्हणौनि ? ॥६२४॥
नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु । ऐसें म्हणौनि अव्हेरु । करणें घडे ? ॥६२५॥
दैवें चिंतामणी लेईजे । कीं हें ओझें म्हणौनि सांडिजे ? । कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणौनि ? ॥६२६॥
चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगे करितोसि उबारा । पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर ॥६२७॥
तैसें ऐश्वर्य हें महातेज । आजि हातां आलें आहे सहज । कीं एथ तुज गजबज । होआवी कां ? ॥६२८॥
परि नेणसीच गांवढिया । काय कोपों आतां धनंजया । आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ? ॥६२९॥
हें नव्हे जो मी साचें । एथ मन करूनियां काचें । प्रेम धरिसी अवगणियेचें । चतुर्भुज जें ॥६३०॥


तरि अझुनिवरी पार्था । सांडीं सांडीं हे व्यवस्था । इयेविषयीं आस्था । करिसी झणें ॥६३१॥
हें रूप जरी घोर । विकृति आणि थोर । तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करीं ॥६३२॥
कृपण चित्तवृत्ति जैसी । रोंवोनि घालीं ठेवयापासीं । मग नुसधेनि देहेंसीं । आपण असे ॥६३३॥
कां अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळां । पक्षिणी अंतराळा । माजीं जाय ॥६३४॥
नाना गाय चरे डोंगरीं । परि चित्त बांधिलें वत्सें घरीं । प्रेम एथिंचें करीं । स्थानपती ॥६३५॥
येरें वरिचिलेनि चित्तें । बाह्य सख्य सुखापुरतें । भोगिजो कां श्रीमूर्तींतें । चतुर्भुज ॥६३६॥
परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा । जे इये रूपींहूनि सद्भावा । नेदावें निघों ॥६३७॥
हें कहीं नव्हतेंचि देखिलें । म्हणौनि भय जें तुज उपजलें । तें सांडीं एथ संचलें । असों दे प्रेम ॥६३८॥
आतां करूं तुजयासारखें । ऐसें म्हणितलें विश्वतोमुखें । तरि मागील रूप सुखें । न्याहाळीं पां तूं ॥६३९॥
संजय उवाच ।
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ॥
आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥५०॥

ऐसें वाक्य बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो । हें ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥६४०॥


श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरि सर्वस्व विश्वरूपायेवढें । हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासि ॥६४१॥
वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नासि दूषण ठेविजे । नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे । मना न ये हे ॥६४२॥
तया विश्वरूपायेवढी दशा । करितां प्रीतीचा वाढू कैसा । सेल दीधलीसे उपदेशा । किरीटीसिं देवें ॥६४३॥
मोडोनि भांगाराचा रवा । लेणें घडिलें आपलिया सवा । मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती ॥६४४॥
तैसें शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्वरूप केलें । तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें ॥६४५॥
हा ठाववरी शिष्याची निकसी । सहातें गुरु आहाती कवणे देशीं ? । परि नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ॥६४६॥
मग विश्वरूप व्यापुनि भोंवतें । जें दिव्य तेज प्रगटलें होतें । तेंचि सामावलें मागुतें । कृष्णरूपीं तये ॥६४७॥
जैसें त्वंपद हें आघवें । तत्पदीं सामावे । अथवा द्रुमाकारु सांठवे । बीजकणिके जेवीं ॥६४८॥
नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा । श्रीकृष्णें योगु हा तैसा । संहारिला तो ॥६४९॥
जैसी प्रभा हारपली बिंबीं । कीं जळदसंपत्ती नभीं । नाना भरतें सिंधुगर्भीं । रिगालें राया ॥६५०॥


हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी । ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥६५१॥
तंव परिमाणा रंगु । तेणें देखिलें साविया चांगु । तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणौनि घडी केली पुढती ॥६५२॥
तैसें वाढीचेनि बहुवसपणें । रूपें विश्व जिंतिलें जेणें । तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ॥६५३॥
किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें । परि आश्वासिलें पार्थातें । बिहालियासी ॥६५४॥
जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला । तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥६५५॥
नातरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें । स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें । श्रीमूर्ति देखिली ॥६५६॥
तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्वरूपाची जवनिका होती । ते फिटोनि गेली परौती । हें भलें जाहलें ॥६५७॥
काय काळातें जिणोनि आला । कीं महावातु मागां सांडिला । आपुलिया बाही उतरला । सातही सिंधु ॥६५८॥
ऐसा संतोष बहु चित्तें । घेइजत असे पंडुसुतें । विश्वरूपापाठीं कृष्णातें । देखोनियां ॥६५९॥
मग सूर्याचिया अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं । तैसी देखों लागला अवनीं । लोकांसहित ॥६६०॥


पाहे तंव तेंचि कुरुक्षेत्र । तैसेंचि देखे दोहीं भागीं गोत्र । वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवरी ॥६६१॥
तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु देखे निवांतु । धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ॥६६२॥
अर्जुन उवाच ।
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन ।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृउतिं गतः ॥५१॥

एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीरविलासें । मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ॥६६३॥
बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वळघलें रान । अहंकारेंसी मन । देशोधडी जाहलें ॥६६४॥
इंद्रियें प्रवृत्ती भुललीं । वाचा प्राणा चुकली । ऐसें आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं ॥६६५॥
तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटलीं प्रकृती । आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें मियां ॥६६६॥
ऐसें सुख जीवीं घेतलें । मग श्रीकृष्णातें म्हणितलें । मियां तुमचें रूप देखिलें । मानुष हें ॥६६७॥
हें रूप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया । बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें ॥६६८॥
जी विश्वरूपाचिया सागरीं । होतों तरंग मवित वांवेवरी । तो इये निजमूर्तीच्या तीरीं । निगालों आतां ॥६६९॥
आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतिया जी झाडा । हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ॥६७०॥


जी सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला । आतां जिणयाचा जाहला । भरंवसा मज ॥६७१॥
माझिया हृदयरंगणीं । होताहे हरिखलतांची लावणी । सुखेंसीं बुझावणी । जाहली मज ॥६७२॥
श्रीभगवानुवाच ।
सुदुदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम ।
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शकाङ्क्षिणः ॥५२॥

यया पार्थाचिया बोलासवें । हें काय म्हणितलें देवें । तुवां प्रेम ठेवूनि यावें । विश्वरूपीं कीं ॥६७३॥
मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती । ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि मा ॥६७४॥
अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरूही होय साना । ऐसा आथी मना । चुकीचा भावो ॥६७५॥
तरी विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें । तें शंभूही परि न जोडे । तपें करितां ॥६७६॥
आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताति किरीटी । परि अवसरु नाहीं भेटी । जयाचिये ॥६७७॥
तें विश्वरूप एकादे वेळ । कैसेनि देखों अळुमाळ । ऐसें स्मरतां काळ । जातसे देवां ॥६७८॥
आशेचिये अंजुळी । ठेऊनि हृदयाचिया निडळीं । चातक निराळीं । लागले जैसे ॥६७९॥
तैसे उत्कंठा निर्भर । होऊनियां सुरवर । घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ॥६८०॥


परि विश्वरूपासारिखें । स्वप्नींही कोण्ही न देखे । तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हें ॥६८१॥
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्यं एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥५३॥

पैं उपायांसि वाटा । न वाहती एथ सुभटा । साहीसहित वोहटा । वाहिला वेदीं ॥६८२॥
मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा । तपांचियाही संभारा । नव्हेचि लागु ॥६८३॥
आणि दानादि कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें । जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां ॥६८४॥
तैसा मी एकीचि परि । आंतुडें गा अवधारीं । जरी भक्ति येऊनि वरी । चित्तातें गा ॥६८५॥
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥५४॥

परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी । धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणें ॥६८६॥
कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिंवसिती । गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥६८७॥
तैसें सर्वभावसंभारें । न धरत प्रेम एकसरें । मजमाजीं संचरे । मीचि होऊनि ॥६८८॥
आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा । क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥६८९॥
तैसें मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरीं । भजनासि कां दुसरी । परीचि नाहीं ॥६९०॥


तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें । जाणितला तरी स्वभावें । दृष्टही होय ॥६९१॥
मग इंधनीं अग्नि उद्दीपें । आणि इंधन हें भाष हारपे । तें अग्निचि होऊनि आरोपें । मूर्त जेवीं ॥६९२॥
कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें । मग उदईलिया एकसरें । प्रकाशु होय ॥६९३॥
तैसें माझिये साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी । अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ॥६९४॥
मग मी तो हें आघवें । एक मीचि आथी स्वभावें । किंबहुना सामावे । समरसें तो ॥६९५॥
मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः ॥निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥५५॥
ॐ इति श्रीमद्भग्वद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगोनाम एकादशोऽध्यायः ॥११॥

जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगीं । जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥६९६॥
दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ । जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ॥६९७॥
मग भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहें सूदला । म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥६९८॥
ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये । तैं मीचि होउनि ठायें । पांडवा गा ॥६९९॥
ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें । संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ॥७००॥


ययावरी तो पंडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु । आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ॥७०१॥
तेणें देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्तीं । तंव विश्वरूपाहूनि कृष्णाकृतीं । देखिला लाभु ॥७०२॥
परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवें । जें व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी ॥७०३॥
हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी । उपपत्ती शारङ्गी । दाविता जाहला ॥७०४॥
तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु । तरि होय बरवें दोन्हीं आंतु । तें पुढती पुसों ॥७०५॥
ऐसा आलोचु करूनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी । आदरील ते परिसावी । पुढें कथा ॥७०६॥
प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें । तें परिसा आनंदें । ज्ञानदेवो म्हणे ॥७०७॥
भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोंवियाफुलें मोकळीं । अर्पिलीं अंघ्रियुगुलीं । विश्वरूपाच्या ॥७०८॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां एकादशोऽध्यायः ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां नवमोऽध्यायः ॥

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *