ज्ञानेश्वरी १२ वा अध्याय पारायण प्रत

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय १२ ॥
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अध्याय बारावा ।
भक्तियोगः ।


जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनवरत आनंदे । वर्षतिये ॥१॥
विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी । ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥२॥
तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥३॥
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे । सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥४॥
आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं । हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥५॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं । आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥६॥
सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी । समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥७॥
म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं । या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥८॥
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी । तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥९॥
म्हणौनि अंबे श्रीमंते । निजजनकल्पलते । आज्ञापीं मातें । ग्रंथनिरूपणीं ॥१०॥


नवरसीं भरवीं सागरु । करवीं उचित रत्नांचे आगरु । भावार्थाचे गिरिवरु । निफजवीं माये ॥११॥
साहित्यसोनियाचिया खाणी । उघडवीं देशियेचिया क्षोणीं । विवेकवल्लीची लावणी । हों देई सैंघ ॥१२॥
संवादफळनिधानें । प्रमेयाचीं उद्यानें । लावीं म्हणे गहनें । निरंतर ॥१३॥
पाखांडाचे दरकुटे । मोडीं वाग्वाद अव्हांटे । कुतर्कांचीं दुष्टें । सावजें फेडीं ॥१४॥
श्रीकृष्णगुणीं मातें । सर्वत्र करीं वो सरतें । राणिवे बैसवी श्रोते । श्रवणाचिये ॥१५॥
ये मऱ्हाठियेचिया नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं । घेणें देणें सुखचिवरी । हों देईं या जगा ॥१६॥
तूं आपुलेनि स्नेहपल्लवें । मातें पांघुरविशील सदैवें । तरी आतांचि हें आघवें । निर्मीन माये ॥१७॥
इये विनवणीयेसाठीं । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी । म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु ॥१८॥
तेथ जी जी महाप्रसादु । म्हणौनि साविया जाहला आनन्दु । आतां निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ॥१९॥
अर्जुन उवाच ।
एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥१॥

तरी सकलवीराधिराजु । जो सोमवंशीं विजयध्वजु । तो बोलता जाहला आत्मजु । पंडुनृपाचा ॥२०॥


कृष्णातें म्हणे अवधारिलें । आपण विश्वरूप मज दाविलें । तें नवल म्हणौनि बिहालें । चित्त माझें ॥२१॥
आणि इये कृष्णमूर्तीची सवे । यालागीं सोय धरिली जीवें । तंव नको म्हणोनि देवें । वारिलें मातें ॥२२॥
तरी व्यक्त आणि अव्यक्त । हें तूंचि एक निभ्रांत । भक्ती पाविजे व्यक्त । अव्यक्त योगें ॥२३॥
या दोनी जी वाटा । तूंतें पावावया वैकुंठा । व्यक्ताव्यक्त दारवंठां । रिगिजे येथ ॥२४॥
पैं जे वानी श्यातुका । तेचि वेगळिये वाला येका । म्हणौनि एकदेशिया व्यापका । सरिसा पाडू ॥२५॥
अमृताचिया सागरीं । जे लाभे सामर्थ्याची थोरी । तेचि दे अमृतलहरी । चुळीं घेतलेया ॥२६॥
हे कीर माझ्या चित्तीं । प्रतीति आथि जी निरुती । परि पुसणें योगपती । तें याचिलागीं ॥२७॥
जें देवा तुम्हीं नावेक । अंगिकारिलें व्यापक । तें साच कीं कवतिक । हें जाणावया ॥२८॥
तरी तुजलागीं कर्म । तूंचि जयांचें परम । भक्तीसी मनोधर्म । विकोनि घातला ॥२९॥
इत्यादि सर्वीं परीं । जे भक्त तूंतें श्रीहरी । बांधोनियां जिव्हारीं । उपासिती ॥३०॥


आणि जें प्रणवापैलीकडे । वैखरीयेसी जें कानडें । कायिसयाहि सांगडें । नव्हेचि जें वस्तु ॥३१॥
तें अक्षर जी अव्यक्त । निर्देश देशरहित । सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ॥३२॥
तयां आणि जी भक्तां । येरयेरांमाजी अनंता । कवणें योगु तत्त्वतां । जाणितला सांगा ॥३३॥
इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला । म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करूं ॥३४॥
श्री भगवानुवाच ।
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥२॥

तरी अस्तुगिरीचियां उपकंठीं । रिगालिया रविबिंबापाठीं । रश्मी जैसे किरीटी । संचरती ॥३५॥
कां वर्षाकाळीं सरिता । जैसी चढों लागें पांडुसुता । तैसी नीच नवी भजतां । श्रद्धा दिसे ॥३६॥
परी ठाकिलियाहि सागरु । जैसा मागीलही यावा अनिवारु । तिये गंगेचिये ऐसा पडिभरु । प्रेमभावा ॥३७॥
तैसें सर्वेंद्रियांसहित । मजमाजीं सूनि चित्त । जे रात्रिदिवस न म्हणत । उपासिती ॥३८॥
इयापरी जे भक्त । आपणपें मज देत । तेचि मी योगयुक्त । परम मानीं ॥३९॥
ये त्वक्षर्मनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं ॥३॥

आणि येर तेही पांडवा । जे आरूढोनि सोऽहंभावा । झोंबती निरवयवा । अक्षरासी ॥४०॥


मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे । ते इंद्रियां कीर जोगें । कायि होईल ? ॥४१॥
परी ध्यानाही कुवाडें । म्हणौनि एके ठायीं न संपडे । व्यक्तीसि माजिवडें । कवणेही नोहे ॥४२॥
जया सर्वत्र सर्वपणें । सर्वांही काळीं असणें । जें पावूनि चिंतवणें । हिंपुटी जाहलें ॥४३॥
जें होय ना नोहे । जें नाहीं ना आहे । ऐसें म्हणौनि उपाये । उपजतीचि ना ॥४४॥
जें चळे ना ढळे । सरे ना मैळे । तें आपुलेनीचि बळें । आंगविलें जिहीं ॥४५॥
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥४॥

पैं वैराग्यमहापावकें । जाळूनि विषयांचीं कटकें । अधपलीं तवकें । इंद्रियें धरिलीं ॥४६॥
मग संयमाची धाटी । सूनि मुरडिलीं उफराटीं । इंद्रियें कोंडिलीं कपाटीं । हृदयाचिया ॥४७॥
अपानींचिया कवाडा । लावोनि आसनमुद्रा सुहाडा । मूळबंधाचा हुडा । पन्नासिला ॥४८॥
आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले । निद्रेचें शोधिलें । काळवखें ॥४९॥
वज्राग्नीचिया ज्वाळीं । करूनि सप्तधातूंची होळी । व्याधींच्या सिसाळीं । पूजिलीं यंत्रें ॥५०॥


मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारीं केला उभा । तया चोजवलें प्रभा । निमथावरी ॥५१॥
नवद्वारांचिया चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी । उघडिली खिडकी । ककारांतींची ॥५२॥
प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे । मनोमहिषाचेनि मुंडें । दिधलीं बळी ॥५३॥
चंद्रसूर्यां बुझावणी । करूनि अनुहताची सुडावणी । सतरावियेचें पाणी । जिंतिलें वेगीं ॥५४॥
मग मध्यमा मध्य विवरें । तेणें कोरिवें दादरें । ठाकिलें चवरें । ब्रह्मरंध्र ॥५५॥
वरी मकारांत सोपान । ते सांडोनिया गहन । काखे सूनियां गगन । भरले ब्रह्मीं ॥५६॥
ऐसे जे समबुद्धी । गिळावया सोऽहंसिद्धी । आंगविताती निरवधी । योगदुर्गें ॥५७॥
आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठीं । तेही मातेंचि किरीटी । पावती गा ॥५८॥
वांचूनि योगचेनि बळें । अधिक कांहीं मिळे । ऐसें नाहीं आगळें । कष्टचि तया ॥५९॥
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥५॥

जिहीं सकळ भूतांचिया हितीं । निरालंबीं अव्यक्तीं । पसरलिया आसक्ती । भक्तीवीण ॥६०॥


तयां महेन्द्रादि पदें । करिताति वाटवधें । आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें । पाडोनि ठाती ॥६१॥
कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग । आणि शून्येंसीं आंग । झुंजवावें कीं ॥६२॥
ताहानें ताहानचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी । अहोरात्र वावीं । मवावा वारा ॥६३॥
उनी दिहाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें । झाडासि साजणें । चाळावें गा ॥६४॥
शीत वेढावें । उष्ण पांघुरावें । वृष्टीचिया असावें । घरांआंतु ॥६५॥
किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीच नवा । भातारेंवीण करावा । तो हा योगु ॥६६॥
एथ स्वामीचें काज । ना वापिकें व्याज । परी मरणेंसीं झुंज । नीच नवें ॥६७॥
ऐसें मृत्यूहूनि तीख । कां घोंटे कढत विख । डोंगर गिळितां मुख । न फाटे काई ? ॥६८॥
म्हणौनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥६९॥
पाहें पां लोहाचे चणे । जैं बोचरिया पडती खाणें । तैं पोट भरणें कीं प्राणें । शुद्धी म्हणों ॥७०॥


म्हणौनि समुद्र बाहीं । तरणे आथि केंही । कां गगनामाजीं पाईं । खोलिजतु असें ? ॥७१॥
वळघलिया रणाची थाटी । आंगीं न लागतां कांठी । सूर्याची पाउटी । कां होय गा ॥७२॥
यालागीं पांगुळा हेवा । नव्हे वायूसि पांडवा । तेवीं देहवंता जीवां । अव्यक्तीं गति ॥७३॥
ऐसाही जरी धिंवसा । बांधोनियां आकाशा । झोंबती तरी क्लेशा । पात्र होती ॥७४॥
म्हणौनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा । जे कां भक्तिपंथा । वोटंगले ॥७५॥
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥६॥

कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्में अशेखें । जियें कां वर्णविशेखें । भागा आलीं ॥७६॥
विधीतें पाळित । निषेधातें गाळित । मज देऊनि जाळित । कर्मफळें ॥७७॥
ययापरी पाहीं । अर्जुना माझें ठाईं । संन्यासूनि नाहीं । करिती कर्में ॥७८॥
आणीकही जे जे सर्व । कायिक वाचिक मानसिक भाव । तयां मीवांचूनि धांव । आनौती नाहीं ॥७९॥
ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर । ध्यानमिषें घर । माझें झालें ॥८०॥


जयांचिये आवडी । केली मजशीं कुळवाडी । भोग मोक्ष बापुडीं । त्यजिलीं कुळें ॥८१॥
ऐसे अनन्ययोगें । विकले जीवें मनें आंगें । तयांचे कायि एक सांगें । जें सर्व मी करीं ॥८२॥
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥७॥

किंबहुना धनुर्धरा । जो मातेचिया ये उदरा । तो मातेचा सोयरा । केतुला पां ॥८३॥
तेवीं मी तयां । जैसे असती तैसियां । कळिकाळ नोकोनियां । घेतला पट्टा ॥८४॥
एऱ्हवीं तरी माझियां भक्तां । आणि संसाराची चिंता । काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥८५॥
तैसे ते माझें । कलत्र हें जाणिजे । कायिसेनिही न लजें । तयांचेनि मी ॥८६॥
जन्ममृत्यूचिया लाटीं । झळंबती इया सृष्टी । तें देखोनियां पोटीं । ऐसें जाहलें ॥८७॥
भवसिंधूचेनि माजें । कवणासि धाकु नुपजे । तेथ जरी कीं माझे । बिहिती हन ॥८८॥
म्हणौनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा । करूनि त्यांचिया गांवा । धांवतु आलों ॥८९॥
नामाचिया सहस्रवरी । नावा इया अवधारीं । सजूनियां संसारीं । तारू जाहलों ॥९०॥


सडे जे देखिले । ते ध्यानकासे लाविले । परीग्रहीं घातले । तरियावरी ॥९१॥
प्रेमाची पेटी । बांधली एकाचिया पोटीं । मग आणिले तटीं । सायुज्याचिया ॥९२॥
परी भक्तांचेनि नांवें । चतुष्पदादि आघवे । वैकुंठींचिये राणिवे । योग्य केले ॥९३॥
म्हणौनि गा भक्तां । नाहीं एकही चिंता । तयांतें समुद्धर्ता । आथि मी सदा ॥९४॥
आणि जेव्हांचि कां भक्तीं । दीधली आपुली चित्तवृत्ती । तेव्हांचि मज सूति । त्यांचिये नाटीं ॥९५॥
याकारणें गा भक्तराया । हा मंत्र तुवां धनंजया । शिकिजे जे यया । मार्गा भजिजे ॥९६॥
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत उर्ध्वं न संशयः ॥८॥

अगा मानस हें एक । माझ्या स्वरूपीं वृत्तिक । करूनि घालीं निष्टंक । बुद्धि निश्चयेंसीं ॥९७॥
इयें दोनीं सरिसीं । मजमाजीं प्रेमेसीं । रिगालीं तरी पावसी । मातें तूं गा ॥९८॥
जे मन बुद्धि इहीं । घर केलें माझ्यां ठायीं । तरी सांगें मग काइ । मी तू ऐसें उरे ? ॥९९॥
म्हणौनि दीप पालवे । सवेंचि तेज मालवे । कां रविबिंबासवें । प्रकाशु जाय ॥१००॥


उचललेया प्राणासरिसीं । इंद्रियेंही निगती जैसीं । तैसा मनोबुद्धिपाशीं । अहंकारु ये ॥१०१॥
म्हणौनि माझिया स्वरूपीं । मनबुद्धि इयें निक्षेपीं । येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी ॥१०२॥
यया बोला कांहीं । अनारिसें नाहीं । आपली आण पाहीं । वाहतु असें गा ॥१०३॥
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनन्जय ॥९॥

अथवा हें चित्त । मनबुद्धिसहित । माझ्यां हातीं अचुंबित । न शकसी देवों ॥१०४॥
तरी गा ऐसें करीं । यया आठां पाहारांमाझारीं । मोटकें निमिषभरी । देतु जाय ॥१०५॥
मग जें जें कां निमिख । देखेल माझें सुख । तेतुलें अरोचक । विषयीं घेईल ॥१०६॥
जैसा शरत्कालु रिगे । आणि सरिता वोहटूं लागे । तैसें चित्त काढेल वेगें । प्रपंचौनि ॥१०७॥
मग पुनवेहूनि जैसें । शशिबिंब दिसेंदिसें । हारपत अंवसे । नाहींचि होय ॥१०८॥
तैसें भोगाआंतूनि निगतां । चित्त मजमाजीं रिगतां । हळूहळू पंडुसुता । मीचि होईल ॥१०९॥
अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे । येणें कांहीं न निपजे । ऐसें नाहीं ॥११०॥


पैं अभ्यासाचेनि बळें । एकां गति अंतराळे । व्याघ्र सर्प प्रांजळे । केले एकीं ॥१११॥
विष कीं आहारीं पडे । समुद्रीं पायवाट जोडे । एकीं वाग्ब्रह्म थोकडें । अभ्यासें केलें ॥११२॥
म्हणौनि अभ्यासासी कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं । यालागी माझ्या ठायीं । अभ्यासें मीळ ॥११३॥
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन सिद्धिमवाप्स्यसि ॥१०॥

कां अभ्यासाही लागीं । कसु नाहीं तुझिया अंगीं । तरी आहासी जया भागीं । तैसाचि आस ॥११४॥
इंद्रियें न कोंडीं । भोगातें न तोडीं । अभिमानु न संडीं । स्वजातीचा ॥११५॥
कुळधर्मु चाळीं । विधिनिषेध पाळीं । मग सुखें तुज सरळी । दिधली आहे ॥११६॥
परी मनें वाचा देहें । जैसा जो व्यापारु होये । तो मी करीतु आहें । ऐसें न म्हणें ॥११७॥
करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥११८॥
उणयापुरेयाचें कांहीं । उरों नेदी आपुलिया ठायीं । स्वजाती करूनि घेईं । जीवित्व हें ॥११९॥
माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेलें । तया पाणिया ऐसें केलें । होआवें गा ॥१२०॥


म्हणौनि प्रवृत्ति आणि निवृत्ती । इयें वोझीं नेघे मती । अखंड चित्तवृत्ती । माझ्या ठायीं ॥१२१॥
एऱ्हवीं तरी सुभटा । उजू कां अव्हाटां । रथु काई खटपटा । करितु असे ? ॥१२२॥
आणि जें जें कर्म निपजे । तें थोडें बहु न म्हणिजे । निवांतचि अर्पिजे । माझ्यां ठायीं ॥१२३॥
ऐसिया मद्भावना । तनुत्यागीं अर्जुना । तूं सायुज्य सदना । माझिया येसी ॥१२४॥
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान ॥११॥

ना तरी हेंही तूज । नेदवे कर्म मज । तरी तूं गा बुझ । पंडुकुमरा ॥१२५॥
बुद्धीचिये पाठीं पोटीं । कर्माआदि कां शेवटीं । मातें बांधणें किरीटी । दुवाड जरी ॥१२६॥
तरी हेंही असो । सांडीं माझा अतिसो । परि संयतिसीं वसो । बुद्धि तुझी ॥१२७॥
आणि जेणें जेणें वेळें । घडती कर्में सकळें । तयांचीं तियें फळें । त्यजितु जाय ॥१२८॥
वृक्ष कां वेली । लोटती फळें आलीं । तैसीं सांडीं निपजलीं । कर्में सिद्धें ॥१२९॥
परि मातें मनीं धरावें । कां मजौद्देशें करावें । हें कांहीं नको आघवें । जॐ दे शून्यीं ॥१३०॥


खडकीं जैसें वर्षलें । कां आगीमाजीं पेरिलें । कर्म मानी देखिलें । स्वप्न जैसें ॥१३१॥
अगा आत्मजेच्या विषीं । जीवु जैसा निरभिलाषी । तैसा कर्मीं अशेषीं । निष्कामु होईं ॥१३२॥
वन्हीची ज्वाळा जैसी । वायां जाय आकाशीं । क्रिया जिरों दे तैसी । शून्यामाजी ॥१३३॥
अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु । परी योगामाजीं योगु । धुरेचा हा ॥१३४॥
येणें फलत्यागें सांडे । तें तें कर्म न विरूढे । एकचि वेळे वेळुझाडें । वांझें जैसीं ॥१३५॥
तैसें येणेंचि शरीरें । शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारे । चिरा पडे ॥१३६॥
पैं अभ्यासाचिया पाउटीं । ठाकिजे ज्ञान किरीटी । ज्ञानें येइजे भेटी । ध्यानाचिये ॥१३७॥
मग ध्यानासि खेंव । देती आघवेचि भाव । तेव्हां कर्मजात सर्व । दूरी ठाके ॥१३८॥
कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे । त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ॥१३९॥
म्हणौनि यावया शांति । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । म्हणौनि अभ्यासुचि प्रस्तुतीं । करणें एथ ॥१४०॥
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ञानाद् ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम् ॥१२॥


अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥१४१॥
मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥१४२॥
ऐसिया या वाटा । इहींचि पेणा सुभटा । शांतीचा माजिवटा । ठाकिला जेणें ॥१४३॥
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥१३॥

जो सर्व भूतांच्या ठायीं । द्वेषांतें नेणेंचि कहीं । आपपरु नाहीं । चैतन्या जैसा ॥१४४॥
उत्तमातें धरिजे । अधमातें अव्हेरिजे । हें काहींचि नेणिजे । वसुधा जेवीं ॥१४५॥
कां रायाचें देह चाळूं । रंकातें परौतें गाळूं । हें न म्ह्णेचि कृपाळू । प्राणु पैं गा ॥१४६॥
गाईची तृषा हरूं । कां व्याघ्रा विष होऊनि मारूं । ऐसें नेणेंचि गा करूं । तोय जैसें ॥१४७॥
तैसी आघवियांचि भूतमात्रीं । एकपणें जया मैत्री । कृपेशीं धात्री । आपणचि जो ॥१४८॥
आणि मी हे भाष नेणें । माझें काहींचि न म्हणे । सुख दुःख जाणणें । नाहीं जया ॥१४९॥
तेवींचि क्षमेलागीं । पृथ्वीसि पवाडु आंगीं । संतोषा उत्संगीं । दिधलें घर ॥१५०॥
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥१४॥


वार्षियेवीण सागरू । जैसा जळें नित्य निर्भरु । तैसा निरुपचारु । संतोषी जो ॥१५१॥
वाहूनि आपुली आण । धरी जो अंतःकरण । निश्चया साचपण । जयाचेनि ॥१५२॥
जीवु परमात्मा दोन्ही । बैसऊनि ऐक्यासनीं । जयाचिया हृदयभुवनीं । विराजती ॥१५३॥
ऐसा योगसमृद्धि । होऊनि जो निरवधि । अर्पी मनोबुद्धी । माझ्या ठायीं ॥१५४॥
आंतु बाहेरि योगु । निर्वाळलेयाहि चांगु । तरी माझा अनुरागु । सप्रेम जया ॥१५५॥
अर्जुना गा तो भक्तु । तोचि योगी तोचि मुक्तु । तो वल्लभा मी कांतु । ऐसा पढिये ॥१५६॥
हें ना तो आवडे । मज जीवाचेनि पाडें । हेंही एथ थोकडें । रूप करणें ॥१५७॥
तरी पढियंतयाची काहाणी । हे भुलीची भारणी । इयें तंव न बोलणीं । परी बोलवी श्रद्धा ॥१५८॥
म्हणौनि गा आम्हां । वेगां आली उपमा । एऱ्हवीं काय प्रेमा । अनुवादु असे ? ॥१५९॥
आतां असो हें किरीटी । पैं प्रियाचिया गोष्टी । दुणा थांव उठी । आवडी गा ॥१६०॥


तयाही वरी विपायें । प्रेमळु संवादिया होये । तिये गोडीसी आहे । कांटाळें मग ? ॥१६१॥
म्हणौनि गा पंडुसुता । तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता । वरी प्रियाची वार्ता । प्रसंगें आली ॥१६२॥
तरी आतां बोलों । भलें या सुखा मीनलों । ऐसें म्हणतखेंवीं डोलों । लागला देवो ॥१६३॥
मग म्हणे जाण । तया भक्तांचे लक्षण । जया मी अंतःकरण । बैसों घालीं ॥१६४॥
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥१५॥

तरी सिंधूचेनि माजें । जळचरां भय नुपजे । आणि जळचरीं नुबगिजे । समुद्रु जैसा ॥१६५॥
तेवीं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे । आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु ॥१६६॥
किंबहुना पांडवा । शरीर जैसें अवयवां । तैसा नुबगे जीवां । जीवपणें जो ॥१६७॥
जगचि देह जाहलें । म्हणौनि प्रियाप्रिय गेलें । हर्षामर्ष ठेले । दुजेनविण ॥१६८॥
ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु । भयोद्वेगरहितु । याहीवरी भक्तु । माझ्यां ठायीं ॥१६९॥
तरी तयाचा गा मज मोहो । काय सांगों तो पढियावो । हें असे जीवें जीवो । माझेनि तो ॥१७०॥


जो निजानंदें धाला । परिणामु आयुष्या आला । पूर्णते जाहला । वल्लभु जो ॥१७१॥
अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥१६॥

जयाचिया ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा । सुखासि चढावा । जयाचें असणें ॥१७२॥
मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर । परी वेचावें लागें शरीर । तिये गांवीं ॥१७३॥
हिमवंतु दोष खाये । परी जीविताची हानि होये । तैसें शुचित्व नोहे । सज्जनाचें ॥१७४॥
शुचित्वें शुचि गांग होये । आणि पापतापही जाये । परी तेथें आहे । बुडणें एक ॥१७५॥
खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे । रोकडाचि लाहिजे । न मरतां मोक्षु ॥१७६॥
संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगे । तेणें संतसंगें । शुचित्व कैसें ॥१७७॥
म्हणौनि असो जो ऐसा । शुचित्वें तीर्थां कुवासा । जेणें उल्लंघविलें दिशा । मनोमळ ॥१७८॥
आंतु बाहेरी चोखाळु । सूर्य जैसा निर्मळु । आणि तत्त्वार्थींचा पायाळु । देखणा जो ॥१७९॥
व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश । तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ॥१८०॥


संसारव्यथे फिटला । जो नैराश्यें विनटला । व्याधाहातोनि सुटला । विहंगु जैसा ॥१८१॥
तैसा सतत जो सुखें । कोणीही टवंच न देखे । नेणिजे गतायुषें । लज्जा जेवीं ॥१८२॥
आणि कर्मारंभालागीं । जया अहंकृती नाही आंगीं । जैसें निरिंधन आगी । विझोनि जाय ॥१८३॥
तैसा उपशमुचि भागा । जयासि आला पैं गा । जो मोक्षाचिया आंगा । लिहिला असे ॥१८४॥
अर्जुना हा ठावोवरी । जो सोऽहंभावो सरोभरीं । द्वैताच्या पैलतीरीं । निगों सरला ॥१८५॥
कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोही भागीं । वांटूनियां आंगीं । सेवकै बाणी ॥१८६॥
येरा नाम मी ठेवी । मग भजती वोज बरवी । न भजतया दावी । योगिया जो ॥१८७॥
तयाचे आम्हां व्यसन । आमुचें तो निजध्यान । किंबहुना समाधान । तो मिळे तैं ॥१८८॥
तयालागीं मज रूपा येणें । तयाचेनि मज येथें असणें । तया लोण कीजे जीवें प्राणें । ऐसा पढिये ॥१८९॥
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥१७॥

जो आत्मलाभासारिखें । गोमटें कांहींचि न देखे । म्हणौनि भोगविशेखें । हरिखेजेना ॥१९०॥


आपणचि विश्व जाहला । तरी भेदभावो सहजचि गेला । म्हणौनि द्वेषु ठेला । जया पुरुषा ॥१९१॥
पैं आपुलें जें साचें । तें कल्पांतींहीं न वचे । हें जाणोनि गताचें । न शोची जो ॥१९२॥
आणि जयापरौतें कांहीं नाहीं । तें आपणपेंचि आपुल्या ठायीं । जाहला यालागीं जो कांहीं । आकांक्षी ना ॥१९३॥
वोखटें कां गोमटें । हें काहींचि तया नुमटे । रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवीं ॥१९४॥
ऐसा बोधुचि केवळु । जो होवोनि असे निखळु । त्याहीवरी भजनशीळु । माझ्या ठायीं ॥१९५॥
तरी तया ऐसें दुसरें । आम्हां पढियंतें सोयरें । नाहीं गा साचोकारें । तुझी आण ॥१९६॥
समः शत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥१८॥

पार्था जयाचिया ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं । रिपुमित्रां दोहीं । सरिसा पाडु ॥१९७॥
कां घरींचियां उजियेडु करावा । पारखियां आंधारु पाडावा । हें नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा ॥१९८॥
जो खांडावया घावो घाली । कां लावणी जयानें केली । दोघां एकचि साउली । वृक्षु दे जैसा ॥१९९॥
नातरी इक्षुदंडु । पाळितया गोडु । गाळितया कडु । नोहेंचि जेवीं ॥२००॥


अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा । मानापमानीं सरिसा । होतु जाये ॥२०१॥
तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन । तैसा एकचि मान । शीतोष्णीं जया ॥२०२॥
दक्षिण उत्तर मारुता । मेरु जैसा पंडुसुता । तैसा सुखदुःखप्राप्तां । मध्यस्थु जो ॥२०३॥
माधुर्यें चंद्रिका । सरिसी राया रंका । तैसा जो सकळिकां । भूतां समु ॥२०४॥
आघवियां जगा एक । सेव्य जैसें उदक । तैसें जयातें तिन्ही लोक । आकांक्षिती ॥२०५॥
जो सबाह्यसंग । सांडोनिया लाग । एकाकीं असे आंग । आंगीं सूनी ॥२०६॥
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥१९॥

जो निंदेतें नेघे । स्तुति न श्लाघे । आकाशा न लगे । लेपु जैसा ॥२०७॥
तैसें निंदे आणि स्तुति । मानु करूनि एके पांती । विचरे प्राणवृत्ती । जनीं वनीं ॥२०८॥
साच लटिकें दोन्ही । बोलोनि न बोले जाहला मौनी । जो भोगितां उन्मनी । आरायेना ॥२०९॥
जो यथालाभें न तोखे । अलाभें न पारुखे । पाउसेवीण न सुके । समुद्रु जैसा ॥२१०॥


आणि वायूसि एके ठायीं । बिढार जैसें नाहीं । तैसा न धरीच कहीं । आश्रयो जो ॥२११॥
आघवाची आकाशस्थिति । जेवीं वायूसि नित्य वसती । तेवीं जगचि विश्रांती । स्थान जया ॥२१२॥
हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ॥२१३॥
मग याहीवरी पार्था । माझ्या भजनीं आस्था । तरी तयातें मी माथां । मुकुट करीं ॥२१४॥
उत्तमासि मस्तक । खालविजे हें काय कौतुक । परी मानु करिती तिन्ही लोक । पायवणियां ॥२१५॥
तरी श्रद्धावस्तूसी आदरु । करितां जाणिजे प्रकारु । जरी होय श्रीगुरु । सदाशिवु ॥२१६॥
परी हे असो आतां । महेशातें वानितां । आत्मस्तुति होतां । संचारु असे ॥२१७॥
ययालागीं हें नोहे । म्हणितलें रमानाहें । अर्जुना मी वाहें । शिरीं तयातें ॥२१८॥
जे पुरुषार्थसिद्धि चौथी । घेऊनि आपुलिया हातीं । रिगाला भक्तिपंथीं । जगा देतु ॥२१९॥
कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडी बांधी करी । कीं जळाचिये परी । तळवटु घे ॥२२०॥


म्हणौनि गा नमस्कारूं । तयातें आम्ही माथां मुगुट करूं । तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं ॥२२१॥
तयाचिया गुणांचीं लेणीं । लेववूं अपुलिये वाणी । तयाची कीर्ति श्रवणीं । आम्हीं लेवूं ॥२२२॥
तो पहावा हे डोहळे । म्हणौनि अचक्षूसी मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ॥२२३॥
दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि । आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ॥२२४॥
तया संगाचेनि सुरवाडें । मज विदेहा देह धरणें घडे । किंबहुना आवडे । निरुपमु ॥२२५॥
तेणेंसीं आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ? । परी तयाचें चरित्र । ऐकती जे ॥२२६॥
तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें । जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती ॥२२७॥
जो हा अर्जुना साद्यंत । सांगितला प्रस्तुत । भक्तियोगु समस्त । योगरूप ॥२२८॥
तया मी प्रीति करी । कां मनीं शिरसा धरीं । येवढी थोरी । जया स्थितीये ॥२२९॥
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव प्रियाः ॥२०॥

इति श्रीमद्भग्वद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगोनाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥

ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य । करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥२३०॥


तेसीचि श्रद्धेचेनि आदरें । जयांचे ठायीं विस्तरे । जीवीं जयां थारे । जे अनुष्ठिती ॥२३१॥
परी निरूपली जैसी । तैसीच स्थिति मानसीं । मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ॥२३२॥
परी मातें परम करूनि । इयें अर्थीं प्रेम धरूनि । हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ॥२३३॥
पार्था गा जगीं । तेचि भक्त तेचि योगी । उत्कंठा तयांलागीं । अखंड मज ॥२३४॥
तें तीर्थ तें क्षेत्र । जगीं तेंचि पवित्र । भक्ति कथेसि मैत्र । जयां पुरुषां ॥२३५॥
आम्हीं तयांचें करूं ध्यान । ते आमुचें देवतार्चन । ते वांचूनि आन । गोमटें नाहीं ॥२३६॥
तयांचें आम्हां व्यसन । ते आमुचें निधिनिधान । किंबहुना समाधान । ते मिळती तैं ॥२३७॥
पैं प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पंडुसुता । ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही ॥२३८॥
ऐसे निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें । बोलिलें मुकुंदें । संजयो म्हणे ॥२३९॥
राया जो निर्मळु । निष्कलंक लोककृपाळु । शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो ॥२४०॥


पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीळु । प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ॥२४१॥
जो धर्मकीर्तिधवलु । आगाध दातृत्वें सरळु । अतुळबळें प्रबळु । बळिबंधनु ॥२४२॥
जो भक्तजनवत्सळु । प्रेमळजन प्रांजळु । सत्यसेतु सकळु । कलानिधी ॥२४३॥
तो श्रीकृष्ण वैकुंठींचा । चक्रवर्ती निजांचा । सांगे येरु दैवाचा । आइकतु असे ॥२४४॥
आतां ययावरी । निरूपिती परी । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥२४५॥
तेचि रसाळ कथा । मऱ्हाठिया प्रतिपथा । आणिजेल आतां । आवधारिजो ॥२४६॥
ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही । हें पढविलों जी स्वामी । निवृत्तिदेवीं ॥२४७॥


इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां द्वादशोऽध्यायः ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां नवमोऽध्यायः ॥

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *