801-13
नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण । तैसी पाळी उणखुण । स्त्रीयेची जो ॥801॥
ज्याप्रमाणे नायट्यांच्या भीतीने देवीची शपथ मोडत नाही, त्याप्रमाणे जो स्त्रीचे मनोगत पाळतो.
802-13
किंबहुना धनंजया । स्त्रीचि सर्वस्व जया । आणि तियेचिया जालिया- । लागीं प्रेम ॥802॥
अर्जुना, फार काय सांगावे ! ज्याचे सर्वस्व काय ते एक स्त्रीच असते आणि तिच्यापासून झालेल्या मुलांवर ज्याचे प्रेम असते.
803-13
आणिकही जें समस्त । तियेचें संपत्तिजात । तें जीवाहूनि आप्त । मानी जो कां ॥803॥
अरे तिची जी आणखीही चीजवस्तू असेल ती जो जीवापेक्षा अत्यंत जवळची मानतो.
804-13
तो अज्ञानासी मूळ । अज्ञाना त्याचेनि बळ । हें असो केवळ । तेंचि रूप ॥804॥
तो पुरुष अज्ञानाचे मूळ आहे. अज्ञानाला त्याच्या योगाने बळ असते. हे बोलणे राहू दे. (फार काय सांगावे) तो अज्ञानाची मूर्तीच आहे.
805-13
आणि मातलिया सागरीं । मोकललिया तरी । लाटांच्या येरझारीं । आंदोळे जेवीं ॥805॥
अज्ञानाची लक्षणे = द्वंद्वयुक्त
आणि खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सोडली असता जशी ती लाटांच्या येण्या-जाण्याने झोके खाते.
806-13
तेवीं प्रिय वस्तु पावे । आणि सुखें जो उंचावे । तैसाचि अप्रियासवें । तळवटु घे ॥806॥
त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने फुगतो व त्याचप्रमाणे नावडती वस्तू प्राप्त झाल्याबरोबर जो संकोच पावतो.
807-13
ऐसेनि जयाचे चित्तीं । वैषम्यसाम्याची वोखती । वाहे तो महामती । अज्ञान गा ॥807॥
याप्रमाणे ज्याच्या अंत:करणात अप्रिय वस्तूप्राप्तीने दु:ख व प्रिय वस्तूप्राप्तीने सुख याची चिंता असते, तो हे महामती अर्जुना अज्ञान आहे.
808-13
आणि माझ्या ठायीं भक्ती । फळालागीं जया आर्ती । धनोद्देशें विरक्ती । नटणें जेवीं ॥808॥
अज्ञानाची लक्षणे = व्यभिचारी भक्ती
आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते, पण फलाच्या उत्कट इच्छेने असते, ती कशी तर जसे धनाच्या हेतूने वैराग्याचे सोंग आणावे,
809-13
नातरी कांताच्या मानसी । रिगोनि स्वैरिणी जैसी । राहाटे जारेंसीं । जावयालागीं ॥809॥
अथवा जाराकडे जाण्याकरता जारिणी स्त्री जशी नवर्याच्या अंत:करणात शिरून वागते.
810-13
तैसा मातें किरीटी । भजती गा पाउटी । करूनि जो दिठी । विषो सूये ॥810॥
अर्जुना त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमधे विषय ठेवतो म्हणजे जो विषयप्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो.
811-13
आणि भजिन्नलियासवें । तो विषो जरी न पावे । तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें ॥811॥
आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तो हे भजन टाकतो व सर्व खोटे आहे असे म्हणतो,
812-13
कुणबट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलाची परवडी । करी तया ॥812॥
अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदीम करतो, त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो व पहिल्याप्रथम जेवढ्या उत्सुकतेने पूजा करतो, तितक्या जोराने पुन्हा दुसर्या देवाचीही करतो.
813-13
तया गुरुमार्गा टेंकें । जयाचा सुगरवा देखे । तरी तयाचा मंत्र शिके । येरु नेघे ॥813॥
ज्या गुरूचा जास्त थाटमाट पहातो, त्या गुरूच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसर्याचा घेत नाही.
814-13
प्राणिजातेंसीं निष्ठुरु । स्थावरीं बहु भरु । तेवींचि नाहीं एकसरु । निर्वाहो जया ॥814॥
सर्व प्राण्यांशी तो निर्दयपणे वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो. त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते,
815-13
माझी मूर्ति निफजवी । ते घराचे कोनीं बैसवी । आपण देवो देवी । यात्रे जाय ॥815॥
माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपर्यात बसवतो व आपण देवतेच्या यात्रेला जातो.
816-13
नित्य आराधन माझें । काजीं कुळदैवता भजे । पर्वविशेषें कीजे । पूजा आना ॥816॥
दररोज माझे पूजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो व काही विशेष पर्वकाली तिसर्याच देवतेची पूजा करतो.
817-13
माझें अधिष्ठान घरीं । आणि वोवसे आनाचे करी । पितृकार्यावसरीं । पितरांचा होय ॥817॥
घरात माझी स्थापना असतांनाच दुसर्या देवतांची व्रते करतो आणि पितृकार्याच्यावेळी (श्राद्ध, पक्ष वगैरे काळी) पितरांचा भक्त होतो.
818-13
एकादशीच्या दिवशीं । जेतुला पाडु आम्हांसी । तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशीं ॥818॥
एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो.
819-13
चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदसी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ॥819॥
चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचाच उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे (देवी) मी तुझा भक्त आहे असे म्हणतो.
820-13
नित्य नैमित्तिकें कर्में सांडी । मग बैसे नवचंडी । आदित्यवारीं वाढी । बहिरवां पात्रीं ॥820॥
नित्य कर्मे व नैमित्तिक श्राद्धादिक कर्मे टाकतो आणि मग नवचंडीच्या नवरात्रातील देवीच्या अनुष्ठानास बसतो व रविवारी भैरोबाला त्याच्या पत्थरात नैवेद्य वाढतो.
821-13
पाठीं सोमवार पावे । आणि बेलेंसी लिंगा धांवे । ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥821॥
नंतर सोमवार आला की बेलासह शिवलिंगाकडे धावतो. याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो.
822-13
ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी । अवघेन गांवद्वारीं । अहेव जैसी ॥822॥
वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या, गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच रहाते, त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा रहात नाही (म्हणून ज्याचा भक्तपणा कायम असतो)
823-13
ऐसेनि जो भक्तु । देखसी सैरा धांवतु । जाण अज्ञानाचा मूर्तु । अवतार तो ॥823॥
त्याप्रमाणे तो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पहाशील तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज.
824-13
आणि एकांतें चोखटें । तपोवनें तीर्थे तटें । देखोनि जो गा विटे । तोहि तोचि ॥824॥
आणि पवित्र एकांत स्थाने, तपोवने, तीर्थांची स्थाने व पवित्र नद्यांचे किनारे ह्यास पाहून ज्याला कंटाळा येतो, तो देखील अज्ञानीच आहे.
825-13
जया जनपदीं सुख । गजबजेचें कवतिक । वानूं आवडे लौकिक । तोहि तोची ॥825॥
ज्याला लोकसमाजात सुख वाटते व लोकांच्या गलबल्याचे कौतुक वाटते व आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते, तोही तोच अज्ञानी आहे.