सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १७६ ते २०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

176-15
एऱ्हवीं ऊर्ध्वींचें पार्था । मुद्दल मूळ पाहतां । अधींचिया मध्यस्था । शाखा इया ॥176॥
एरवी अर्जुना, संसारवृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूपी मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्यप्राणी ह्या मध्यावर असलेल्या शाखा होत.
177-15
परी तामसी सात्त्विकी । सुकृतदुष्कृतात्मकी । विरुढती या शाखीं । अधोर्ध्वींचिया ॥177॥
परंतु चांगल्या व वाईट कर्मांनी भरलेल्या ज्या सत्वगुणी व तमोगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्यारूपाने मनुष्यरूपी शाखाच वाढतात.
178-15
आणि वेदत्रयाचिया पाना । नये अन्यत्र लागों अर्जुना । जे मनुष्यावांचूनि विधाना । विषय नाहीं ॥178॥
अर्जुना तीन वेदरूपी पाने ह्या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसर्‍या ठिकाणी लागत नाहीत, कारण की तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही.
179-15
म्हणौनि तनु मानुषा । इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा । तरी कर्मवृद्धीसि देखा । इयेंचि मूळें ॥179॥
म्हणून मनुष्यतनु ह्या जरी संसारवृक्षाच्या वरच्या मूळच्या दृष्टीने शाखा आहेत तरी कर्माच्या विस्ताराला याच शाखा मुळे आहेत असे समज.
180-15
आणि आनीं तरी झाडीं । शाखा वाढतां मुळें गाढीं । मूळ गाढें तंव वाढी । पैस आथी ॥180॥
आणि इतर प्राकृत वृक्षांचेही असे आहे की त्यांच्या फांद्या जसजशा वाढतात तसतशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात. आणि जसजशी त्यांची मुळे जमिनीमधे खोल बळावलेली असतात, तसतसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिकाधिक फैलावतो.

181-15
तैसेंचि इया शरीरा । कर्म तंव देहा संसारा । आणि देह तंव व्यापारा । ना म्हणोंचि नये ॥181॥
या मनुष्यशरीराच्या बाबतीतही त्याचप्रमाणे आहे. (ते असे की) जेथेपर्यंत कर्मे आहेत तेथपर्यंत देहाचे रहाणे आहे आणि जेथेपर्यंत देह आहे तो पर्यंत कर्मे करण्यास नाही म्हणताच येत नाही,
182-15
म्हणौनि देहें मानुषें । इयें मुळें होती न चुके । ऐसें जगज्जनकें । बोलिलें तेणें ॥182॥
म्हणून मनुष्य देह ही (या संसारवृक्षाच्या खालच्या व वरच्या शाखांची) मुळे आहेत. यात चूक नाही असे त्या जगाच्या जनकाने (श्रीकृष्णाने) सांगितले.
183-15
मग तमाचें तें दारुण । स्थिरावलेया वाउधाण । सत्त्वाची सुटे सत्राण । वाहुटळी ॥183॥
(सत्वगुणाची वावटळ सुटल्यावर होणारी वाढ) मग ती तमाची भयंकर सुटलेली वावटळ शांत झाल्यावर सत्वाची वावटळ जोराने सुटते.
184-15
तैं याचि मनुष्याकारा । मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनि फुटती कोंबारा । सुकृतांकुरीं ॥184॥
त्याचवेळी ह्याच मनुष्याकाररूपी मुळांस सुवासनारूपी मोड निघतात व ते मोड कोंबास येऊन (म्हणजे त्यास सद्वासना दृढ होऊन जातात), नंतर त्यास (त्या कोंबास) सत्कर्मरूपी अंकुर फुटतात.
185-15
उकलतेनि उन्मेखें । प्रज्ञाकुशलतेंची तिखें । डिरिया निघती निमिखें । बाबळैजुनी ॥185॥
विकासणार्‍या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात.

186-15
मतीचे सोट वांवे । घालिती स्फूर्तींचेनि थांवें । बुद्धि प्रकाश घे धांवे । विवेकावरी ॥186॥
बुद्धीचे फोक स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते. म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो.
187-15
तेथ मेधारसें सगर्भ । अस्थापत्रीं सबोंब । सरळ निघती कोंभ । सद्वृत्तीचे ॥187॥
त्यावेळी मेधारस म्हणजे धारणाशक्तिरूपी रस ज्याच्या आत भरलेला आहे व जे आस्था (आदर) रूपी पानांनी सुशोभित आहेत असे सद्वृत्तींचे सरळ कोंब फुटतात.
188-15
सदाचाराचिया सहसा । टका उठती बहुवसा । घुमघुमिति घोषा । वेदपद्याच्या ॥188॥
सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेद पद्यांच्या गर्जना करू लागतात.
189-15
शिष्टागमविधानें । विविधयागविधानें । इये पानावरी पानें । पालेजती ॥189॥
श्रेष्ठ पुरुष व शास्त्रे यांनी सांगितले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानांवर पाने पसरतात.
190-15
ऐशा यमदमीं घोंसाळिया । उठती तपाचिया डाहाळिया । देती वैराग्यशाखा कोंवळिया । वेल्हाळपणें ॥190॥
अशा यमदमांचे घोस असलेल्या तपांच्या डहाळ्या उत्पन्न होतात व त्यास वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात.

191-15
विशिष्टां व्रतांचे फोक । धीराच्या अणगटी तिख । जन्मवेगें ऊर्ध्वमुख । उंचावती ॥191॥
आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे, उंच वाढतात. श्रेष्ठव्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात.
192-15
माजीं वेदांचा पाला दाट । तो करी सुविद्येचा झडझडाट । जंव वाजे अचाट । सत्त्वानिळु तो ॥192॥
जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो, तोपर्यंत मनुष्यरूपी शाखेच्या मधे असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांची, ज्ञानांची {झडझडाट} गर्जना करतो.
193-15
तेथ धर्मडाळ बाहाळी । दिसती जन्मशाखा सरळी । तिया आड फुटती फळीं । स्वर्गादिकीं ॥193॥
तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्यांना स्वर्गादिक फळाने युक्त असे अनेक आडफाटे फुटतात.
194-15
पुढां उपरति रागें लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । पाल्हाजत नित्य नवी । वाढतीचि असे ॥194॥
पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेस धर्म व मोक्षरूप लुसलुशित पालवी नित्य नवीन येऊन वाढतच रहाते.
195-15
पैं रविचंद्रादि ग्रहवर । पितृ ऋषी विद्याधर । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥195॥
नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य, चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह, पितर, ऋषी, विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. अभिप्राय असा की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात.

196-15
याहीपासून उंचवडें । गुढले फळाचेनि बुडें । इंद्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे ॥196॥
ह्याही फांद्यांपेक्षा वर उंच गेलेल्या इंद्रादिक मोठ्या फांद्यांचे झुबके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली असतात.
197-15
मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानीं उंचावलिया । मरीचि कश्यपादि इया । उपरी शाखा ॥197॥
मग त्याही डहाळ्यांवर (इंद्रादि शाखेवर) तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीचि-कश्यपादि वरल्या शाखा आहेत.
198-15
एवं माळोवाळी उत्तरोत्तरु । ऊर्ध्वशाखांचा पैसारु । बुडीं साना अग्रीं थोरु । फळाढ्यपणें ॥198॥
याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिक अधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्यास जास्त फळे असल्यामुळे थोर असा आहे.
199-15
वरी उपरिशाखाही पाठीं । येती फळभार जे किरीटी । ते ब्रह्मेशांत अणगटीं । कोंभ निघती ॥199॥
अर्जुना, शिवाय या वरच्या शाखांनंतर या संसारवृक्षाला जे फळभार येतात, ते ब्रह्मदेव आणि शंकररूपी अणकुचीदार कोंब येतात. अभिप्राय असा की ब्रह्मदेव आणि शंकर हेच फळभार आणि कोंब आहेत. कोंबही तेच व फळही तेच.
200-15
फळाचेनि वोझेपणें । ऊर्ध्वीं वोवांडें दुणें । जंव माघौतें बैसणें । मूळींचि होय ॥200॥
हा संसारवृक्ष, मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागाला इतका लवलेला आहे की ती मनुष्यरूपी शाखा (सत्कर्मांच्या) फळांच्या भाराने, मूळ जे माया, त्याला पुन्हा येऊन टेकते. ब्रह्माच्या जवळ येते.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *