सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

151-15
स्त्री पुरुष नपुंसकें । हे व्यक्तिभेदांचे टके । आंदोळती आंगिकें । विकारभारें ॥151॥
✏ स्त्री, पुत्र व नंपुसक हे भेदात्मक आकाराचे घोस असलेल्या कामादिक विकारांच्या भाराने एकमेकांवर आदळतात.
152-15
जैसा वर्षाकाळु गगनीं । पाल्हेजे नवघनीं । तैसें आकारजात अज्ञानीं । वेलीं जाय ॥152॥
✏ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामधे नव्या नव्या मेघांच्या रूपाने दिसु लागतो. त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी जगातील विविध आकारमात्राचा वेल पसरतो.
153-15
मग शाखांचेनि आंगभारें । लवोनि गुंफिती परस्परें । गुणक्षोभाचे वारे । उदयजती ॥153॥
✏मग शाखेच्या स्वाभाविक ओझ्याने त्या शाखा आपआपल्या अंगभाराने खाली लवून एकमेकांमधे गुंततात व हे सर्व ञिगुणरुपी वाहु लागल्याने होत असते.
154-15
तेथ तेणें अचाटें । गुणांचेनि झडझडाटें । तिहीं ठायीं हा फांटे । ऊर्ध्वमूळ ॥154॥
✏ते गुण अती वाढल्यामुळे त्या ऊर्ध्वमूलाच्या वृक्षास खाली, वर व मध्ये असे तीन भेद तयार होऊन फाटे फुटतात.
155-15
ऐसा रजाचिया झुळुका । झडाडितां आगळिका । मनुष्यजाती शाखा । थोरावती ॥155॥
✏रजोगुणाचा वारा वहात असताना होणारी वाढ रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्यजातीरूपी फांद्या जोराने वाढतात.

156-15
तिया ऊर्ध्वीं ना अधीं । माझारींचि कोंदाकोंदी । आड फुटती खांदी । चतुर्वर्णांच्या ॥156॥
✏त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन, त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात.
157-15
तेथ विधिनिषेध सपल्लव । वेदवाक्यांचें अभिनव । पालव डोलती बरव । नीच नवे ॥157॥
✏विधिनिषेधरूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते.
158-15
अर्थु कामु पसरे । अग्रवनें घेती थारे । तेथ क्षणिकें पदांतरें । इहभोगाचीं ॥158॥
✏ज्याप्रमाने मनामध्ये अर्ध आणि कामाचा विस्तार होऊ लागतो. इहलोकात क्षणभंगुर असलेल्या जिवनास सुखाचे कोंभ फुटु लागतात.
159-15
तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलोभें । खांकरेजती शुभाशुभें । नानाकर्मांचे खांबे । नेणों किती ॥159॥
✏️त्य़ावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेकानेक शुभ आणि अशुभ कर्मांचे फाटे किती फुटतात हे कळत नाही.
160-15
तेवींचि भोगक्षीणें मागिलें । पडती देहांतींचीं बुडसळें । तंव पुढां वाढी पेले । नवेया देहांची ॥160॥
✏त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला की मागची देहरुपी सुकलेली जुनी बुडे पडुन जातात. तोच पुन्हा पुढे नव्या देहाच्या नव्या सालीच्या शाखा तयार होऊन वाढु लागतात.

161-15
आणि शब्दादिक सुहावे । सहज रंगें हवावे । विषयपल्लव नवे । नीत्य होती ॥161॥
ज्याप्रमाने त्या संसारवृक्षाला मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आवड तयार करणारे आणि नैसर्गिक असलेल्या आकर्षक शोभेने सुशोभित झालेली जी शब्दादिक विषयरूप पालवी ती नेहेमीच नवनव्याने तयार होत असते.
162-15
ऐसे रजोवातें प्रचंडें । मनुष्यशाखांचे मांदोडे । वाढती तो एथ रुढे । मनुष्यलोकु ॥162॥
याप्रमाणे रजोगुणाचा प्रचंड वारा सुटल्यावर मनुष्यशाखांचे समुदाय जेव्हा तयार होतात. त्यास या संसारवृक्षाचे ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रघात आहे.
163-15
तैसाचि तो रजाचा वारा । नावेक धरी वोसरा । मग वाजों लागे घोरा । तमाचा तो ॥163॥
तमोगुणाचा वारा वहात असतांना होणारी वाढ) त्याचप्रमाणे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वहाण्याचा बंद होतो तेव्हा तमोगुणाचा भयंकर वारा वहाण्यास लागतो.
164-15
तेधवां याचिया मनुष्यशाखा । नीच वासना अधीं देखा । पाल्हेजती डाहाळिका । कुकर्माचिया ॥164॥
तेव्हा तमोगुणाचा वारा सुटल्यावर याच मनुष्यरूपी शाखांना भोगाची निच वासना जेव्हा उत्पन्न होते. तेव्हा त्याच वाईट कर्माच्या डहाळ्या विस्ताराला पावतात असे समज.
165-15
अप्रवृत्तींचे खणुवाळे । कोंभ निघती सरळे । घेत पान पालव डाळें । प्रमादाचीं ॥165॥
ज्याप्रमाने वाईट मार्गाचे बळकट सरळ फोक निघुन (मनुष्यरूपी शाखेला) प्रमादरूपी पाने व फांद्या उत्पन्न करीत फुटतात.

166-15
बोलती निषेधनियमें । जिया ऋचा यजुःसामें । तो पाला तया घुमें । टकेयावरी ॥166॥
यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्मे (अमूक आहेत असे) सांगतात ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर फुटु लागतो.
167-15
प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार । तिहीं पानीं घेती प्रसार । वासना वेली ॥167॥
दुसर्‍याच्या नाशाकरता जारण,मारण स्तंभन,मोहन,,उच्चाटन,वशीकरण इत्यादी प्रतिपादन करणारी अविचाररुपी कर्मे आगम ग्रंथांनी सांगितलेली आहेत.
ती करण्याची ‘इच्छारुपी’ पानाची वेल विस्तार पावु लागते.
168-15
तंव तंव होतीं थोराडें । अकर्मांचीं तळबुडें । आणि जन्मशाखा पुढें पुढें । घेती धांव ॥168॥
मागील ओवीत सांगितल्या प्रमाणे जो जो वासना वेली विस्तारतात तो तो निषिद्ध कर्मांची तळातील मुळे मोठी होतात आणि यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे वाढत जातात. अर्थात श्रेष्ठ योनीतून नीच योनीच्या जन्मास प्राप्त होतात.
169-15
तेथ चांडाळादि निकृष्टा । दोषजातीचा थोर फांटा । जाळ पडे कर्मभ्रष्टां । भुलोनियां ॥169॥
तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादि निकृष्ट पाप योनीरूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते.
170-15
पशु पक्षी सूकर। व्याघ्र वृश्चिक विखार । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥170॥

ज्याप्रमाने जसजसा अधर्माची वाढ होऊ लागेल तसतसे पशु, पक्षी, डुक्कर, वाघ, विंचू, साप ह्या आडव्या शाखांचे समुदाय विस्तार पावु लागतात.

171-15
परी ऐशा शाखा पांडवा । सर्वांगींहि नित्य नवा । निरयभोग यावा । फळाचा तो ॥171॥
परंतु अर्जुना, (तमोगुणाच्या उत्कर्षात) अशा या मनुष्यशाखांना सर्व अंगांचे ठिकाणी नित्य नवी नरकभोग हीच फलाची प्राप्ती होते.
172-15
आणि हिंसाविषयपुढारी । कुकर्मसंगें धुर धुरी । जन्मवरी आगारी । वाढतीचि असे ॥172॥
आणि तेथे हिंसा व मैथुन ह्या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्मांची संगती ही तेथे अग्रगण्य आहे व ते हिंसादि निषिद्ध कर्मांचे अंकूर अनेक जन्मातून वाढतच असतात.
173-15
ऐसे होती तरु तृण । लोह लोष्ट पाषाण । इया खांदिया तेवीं जाण । फळेंही हेंची ॥173॥
(ज्या माणसांमधे तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे) ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता भोगता मग पुढे अखेरीस गवत, लोखंड, माती, दगड अशा जड योनीत जातात. येथे शाखा तरी ह्याच आणि फळे तरी हीच.
174-15
अर्जुना गा अवधारीं । मनुष्यालागोनि इया परी । वृद्धि स्थावरांतवरी । अधोशाखांची ॥174॥
(मनुष्यरूपी डहाळ्या ह्या खालच्या शाखांची मुळे आहेत.) अर्जुना, ऐक. याप्रमाणे या संसारवृक्षाच्या खालच्या शाखांची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते.
175-15
म्हणौनि जीं मनुष्यडाळें । तियें जाणावीं अधींचि मूळें । जे एथूनि हा पघळे । संसारतरु ॥175॥
म्हणून मनुष्यरूपी ज्या डहाळ्या आहेत, ह्याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे. कारण की मग तेथून संसारवृक्ष विस्ताराला पावतो.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading